सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांचे आशीर्वाद

डावीकडून जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांचा आशीर्वाद घेतांना डावीकडून श्री. प्रसाद मानकर, सौ. प्राजक्ता मानकर आणि सौ. नमिता दुखंडे

मुंबई – लहान वयापासून मुलांवर संस्कार केले, तरच आपली संस्कृती टिकेल. धर्मरक्षणासाठी एकत्रित राहा, असे आवाहन अनंत श्री विभूषीत काशी धर्म पीठाधिश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांनी केले. श्री दत्त मंदिर ट्रस्ट, मुंबई आणि दत्तछंद संस्था, नाशिक यांच्या वतीने भोईवाडा येथील दत्तमंदिरामध्ये १० डिसेंबर या दिवशी श्री दत्त जन्मसोहळा आणि दत्तयाग यांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला काशी धर्म पीठाधीश्‍वर स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी महाराजांचे पाद्यपूजन, तर कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. प्रसाद शिंगणे यांनी पादुकापूजन केले. नाशिक येथील गुरुवर्य प.पू. गोरेकाका यांचीही वंदनीय उपस्थिती या सोहळ्याला लाभली.

या वेळी मार्गदर्शन करतांना स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज पुढे म्हणाले की, गुरुकृपा झाली, तर स्वतःची उन्नती होते. देवता आणि राक्षस यांनाही गुरु करावे लागले. श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारी पुरुषांच्या जीवनातही गुरु आले. आपण तर सर्वसामान्य आहोत. यानंतर महाराजांनी दत्तगुरूंचे महत्त्व सांगितले.

१० डिसेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता ‘श्रीं’च्या अभिषेक पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर श्री दत्तयाग, शांतीसूक्त पठण, प्रधान संकल्प, गणेश पूजन, प्रधान मंडळ स्थापना, प्रधान देवतापूजन, यज्ञविधीसाठी अग्नीप्रागट्य, नवग्रह स्थापना, रुद्रमंडल स्थापना, नवग्रह हवन, प्रधान देवता हवन, उत्तरांग हवन, बलिदान आणि पूर्णाहुति आणि सायंकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. ११ डिसेंबर या दत्तजयंतीच्या दिवशी सहस्र तुळसी अर्चन आणि कुंकूमार्चन, नामस्मरण, पारायण, भजन असे कार्यक्रम झाले. सायंकाळी दत्त जन्मोत्सव आणि दीपोत्सव, तसेच महाआरती अन् प्रसाद वाटप असे कार्यक्रम झाले. नाशिक येथील श्री. मोहन पुराणिकगुरुजी यांनी या वेळी यज्ञाचार्य म्हणून दायित्व पाहिले. या यज्ञाचे प्रधान यजमानपद सौ. अनुजा आणि श्री. अक्षय जोशी यांनी भूषवले.

 

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे
कार्यकर्ते यांनी घेतले स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांचे आशीर्वाद

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर, सनातन संस्थेचे साधक श्री. उल्हास भिके, सौ. नमिता दुखंडे, सौ. प्राजक्ता मानकर यांनी काशी धर्म पीठाधीश्‍वर स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या वेळी श्री. प्रसाद मानकर यांनी महाराजांना ‘श्रीराम जन्मभूमी विशेषांक’ भेट दिला. यावर महाराजांनी ‘हा अंक मी अवश्य वाचेन’, असे सांगितले. तसेच कांदिवली येथे २२ डिसेंबरपासून चालू होत असलेल्या आध्यात्मिक सत्संग ज्ञानयज्ञ सप्ताहाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण महाराजांनी दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment