देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात हरिनाम दिंडीचे आगमन

दिंडीचे यंदाचे १५वे वर्ष

विणेकरींचे पूजन करतांना श्री. विलास गरुड

देवद (पनवेल) – व्यसनमुक्ती आणि षड्विकार निर्मूलन या उदात्त हेतूंनी देवद गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या ‘हरिनाम दिंडी’चे मार्गशीर्ष शुक्ल पक्षपंचमीला (१ डिसेंबर) येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. दिंडीचे यंदाचे १५वे वर्ष आहे. सनातन संस्थेचे साधक श्री. विलास गरुड यांनी विणेकरींची पाद्यपूजा आणि औक्षण केले, तर सौ. विमल गरुड यांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिलांची पाद्यपूजा करून औक्षण केले. सौ. मानसी सहस्रबुद्धे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी ह.भ.प. गणेश महाराज यांनी मार्गदर्शन केले. सनातन संस्थेचे साधक श्री. निनाद गाडगीळ यांनी प्रतिवर्षी आश्रमात सात्त्विक दिंडीचे आगमन होत असल्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि या कार्याला शुभेच्छा दिल्या. दिंडीमध्ये महिला आणि लहान मुलेही सहभागी झाले होते. त्या सर्वांना प्रसाद देण्यात आला. ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजरात दिंडी मार्गस्थ झाली. दिंडी आश्रमात आल्यावर वातावरण प्रसन्न झाल्याचे साधकांनी अनुभवले.

क्षणचित्रे

१. दिंडीमध्ये सनातन संस्थेच्या साधिकाही डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन काही अंतरापर्यंत सहभागी झाल्या.

२. आश्रमातील परिसरात तुळशी वृंदावनाची रांगोळी काढली होती.

 

 सनातन संस्था ही पवित्र हेतूने धर्माचे
कार्य करणारी संस्था आहे ! – ह.भ.प. गणेश महाराज

सहा विकारांचे थोडे का होईना, निर्मूलन व्हावे, समाजात सात्त्विक पारमार्थिकता यावी, या हेतूने प्रतिवर्षी दिंडीचे आयोजन केले जाते. तुम्हा सर्वांचे साहाय्य मिळते; म्हणून हा हेतू सफल होतो. सनातन संस्था पवित्र हेतूने धर्मकार्य करणारी संस्था आहे. या मंडळींकडून (सनातन संस्थेच्या साधकांकडून) पुष्कळ शिकण्यासारखे आहे. येथील जमीन शेणाने सारवलेली आहे. शेण पवित्र असते. जुन्या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. वारकरी संप्रदायाप्रमाणेे सनातन संस्थेकडूनही तळमळीने धर्मकार्य होते. संस्थेच्या कार्याला माझ्या शुभेच्छा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment