बेंगळुरू येथील वैज्ञानिक प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि त्यांची पत्नी प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांना सनातन प्रभातविषयी सांगतांना श्री. डोंगरे

रामनाथी (गोवा) – बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थानात वैज्ञानिक म्हणून ४० वर्षे कार्यरत राहिलेले प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु यांनी सपत्नीक येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली. त्यांनी आश्रमात चालू असलेले धर्मशिक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य अत्यंत आत्मीयतेने जाणून घेतले. या वेळी सनातनचे साधक श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांना आश्रमात चालू असलेल्या धर्मकार्याची माहिती करून दिली.

चार दिवसांच्या त्यांच्या आश्रमातील वास्तव्यामध्ये त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या अंतर्गत चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या कार्याची विस्तृत रूपाने माहिती जाणून घेतली. याविषयी ते म्हणाले, ‘‘आपले संशोधन कार्य पुष्कळ चांगले आहे. समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे.’’ एकूणच साधनेच्या दृष्टीने प्रत्येक सूत्राकडे पाहण्याचा साधकांचा प्रयत्न त्यांना विशेषत्वाने आवडला. दोन्ही उभयता सनातनचे कार्य जाणून पुष्कळ प्रभावित झाले. त्यांना येथील युवा साधकांमधील नम्रता आणि सेवाभाव याविषयी पुष्कळ कौतुक वाटले.

 

प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु यांचा परिचय

प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु (वय ८० वर्षे) हे जगत्विख्यात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (IISc, Bengaluru) येथे ४० वर्षे कार्यरत होते. ‘अ‍ॅरॉनॉटिकल इंजिनियर’ या क्षेत्रात शिक्षण घेतलेले प्रा. (डॉ.) प्रभु हे वैज्ञानिक असून त्यांनी Fluid Mechanics च्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे. विद्यावाचस्पतीचे (‘डॉक्टरेट’चे) शिक्षण घेत असतांना त्यांना अध्यात्मात रुची निर्माण झाली. त्यांनी २० वर्षांपूर्वी त्यांचे गुरु मुखर्जी यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून आजपावेतो ते साधना करत आहेत.

 

प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांचा परिचय

प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु (वय ७५ वर्षे) यांनी हिंदी साहित्यामध्ये (Hindi Literature) उच्चशिक्षण घेतले असून त्या बेंगळुरू येथील विश्‍वविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सौ. प्रभु यांना समाजकार्याची विशेष आवड असून निवृत्तीनंतर त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले आहे. त्या आकाशवाणीवर व्याख्यात्या म्हणून विषय मांडतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात