अध्यात्माचे केंद्र आणि सर्वांसाठी आदर्श असलेली संस्था म्हणजे सनातन संस्था ! – डॉ. किशोर स्वामी

नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील याज्ञिक पीठम्चे संस्थापक
डॉ. किशोर स्वामी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

ध्यानमंदिरात देवतांचे दर्शन घेतांना डावीकडून श्री. पुरुषोत्तमाचार्य, डॉ. किशोर स्वामी आणि माहिती सांगतांना साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी

रामनाथी (गोवा) – नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील ‘याज्ञिक पीठम्’चे संस्थापक डॉ. पी.टी.जी.एस्. किशोर स्वामी आणि पीठम्चे व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तमाचार्य यांनी १९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. ते १९ आणि २० ऑक्टोबर या दिवशी आश्रमात वास्तव्याला होते. या वेळी स्वामीजींना सनातन संस्थेच्या साधिका सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विविध कार्य अन् आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली.

आश्रम पाहून डॉ. किशोर स्वामी म्हणाले, ‘‘आश्रमातील सर्व साधक सेवाभावाने कार्य करतात, हे पाहून पुष्कळ आनंद झाला. येथील साधकांना विशेष व्यावहारिक ज्ञान नसतांना ही ते सर्व शिकून कार्य करण्यासह आध्यात्मिक उन्नती करत आहेत. आश्रमात प्रचंड ऊर्जा आणि शक्ती आहे. तसेच अध्यात्माचे केंद्र आणि सर्वांसाठी आदर्श असलेली संस्था म्हणजे सनातन संस्था आहे.’’

या वेळी सनातन संस्थेचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रकाश मराठे यांच्या हस्ते डॉ. किशोर स्वामी अन् पुरुषोत्तमाचार्य यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन आणि हार घालून सन्मान करण्यात आला.

 

डॉ. किशोर स्वामी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

१. स्वामीजी त्यांच्या सेवेत असलेल्या साधकाला म्हणाले, ‘‘ज्यांच्या संकल्पाने असा आश्रम उभा आहे, ते गुरुजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) पुष्कळ महान आहेत.’’

२. मनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १२० वर्षे जगणे पुष्कळ आवश्यक आहे. त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती निर्माण होणे अशक्य आहे. त्यामुळे  त्यांचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य चांगले राहिले, तरच समाज आणि राष्ट्र ठीक राहील.

 

हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी डॉ. किशोर स्वामी यांनी केलेले भाष्य

येत्या ५ वर्षांत हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. परात्पर गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राचे जे बीज रोवले आहे, ते त्यांना अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी त्यांना संपूर्ण आयुष्य मिळणार आहे. आज ज्याप्रमाणे सनातन आश्रमातील व्यवस्था आदर्श आहे, तशीच व्यवस्था साधक पुढे समाजात निर्माण करतील. हेच साधक पुढे समाजाचे (साधनेचे) दायित्व घेऊन कार्य करतील. ज्याप्रमाणे अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर ‘आदर्श’ अशा सनातन आश्रमाची उभारणी झाली, त्याप्रमाणेच हिंदु राष्ट्राची स्थापना कठीण असली, तरी ती होणारच आहे.

 

आश्रम पाहिल्यावर डॉ. किशोर स्वामी यांनी काढलेले गौरवोद्गार

१. आश्रमाचे बांधकाम पुष्कळ चांगले आहे. अन्यत्र जर कुठे आश्रम उभारायचा झाल्यास रामनाथी आश्रमासारखाच उभा केला पाहिजे.

२. ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘तुम्ही जी सेवा कराल, ती गुरूंना अपेक्षित अशी करा. पत्रकारितेमध्ये नारदमुनी आणि मारुति हे दोन आदर्श आहेत. प्रभु श्रीरामांनी मारुतिरायांकडे सीतामातेसाठी जो संदेश दिला होता, तो मारुतिरायांनी जसाच्या तसा सीतामातेला दिला. याप्रमाणे ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता करा.’’

३. पुढच्या वेळी येतांना मी माझ्या १० शिष्यांना घेऊन येणार आणि आश्रमातील टापटीपपणा, उत्तम व्यवस्था अन् स्वच्छता हा भाग शिकण्यास सांगणार. आश्रमात असलेली शिस्त आणि व्यवस्था पुष्कळ चांगली असून देवाने मला येथील (आश्रमातील) वास्तव्यास पुष्कळ काही दिले आहे.

४. आश्रमातील प्रत्येक साधक आणि वस्तू यांमधून चांगली स्पंदने येतात. साधना करणार्‍यांसाठी ही जागा उत्तम आहे. बाहेर जगामध्ये वेदाभ्यास शिकतांना मन पुष्कळ विचलित होते; पण सनातनच्या आश्रमात शिकण्याची प्रक्रिया पुष्कळ जलद होऊ शकते.

५. ‘सनातन आश्रमात सेवा करणारे साधक आपलेच आहेत’, असे जाणवते.

६. स्वामीजींनी स्वयंपाकघर पाहिल्यावर सांगितले, ‘‘एवढी उत्तम व्यवस्था मी कुठेच पाहिली नाही. येथे कितीही जण येऊन प्रसाद ग्रहण करू शकतात, अशी व्यवस्था आहे.’’ या वेळी स्वयंपाकघरात पापड तळले जात असतांना स्वामीजींनी स्वतःहून काही पापड तळले. तसेच स्वयंपाकघरातील वेगवेगळे कप्पे आणि लोखंडी मांडण्या त्यांनी पाहिल्या अन् सांगितले की, मनाची शुद्धी असल्यामुळे हे सुंदर आहे.

७. आश्रमातून आंध्रप्रदेशला परत जात असतांना त्यांनी सांगितले की, येथे येऊन माझा पुनर्जन्म झाला आहे.

 

डॉ. किशोर स्वामी यांचा संक्षिप्त परिचय

डॉ. किशोर स्वामी

डॉ. किशोर स्वामी हे नागोला हयातनगर, आंध्रप्रदेश येथील ‘याज्ञिक पीठम्’चे  संस्थापक आहेत. वयाच्या ७ व्या वर्षापासून ते श्री श्री श्री त्रिदंडी चिन्नाजियर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञयाग शिकले आहेत. ते गोशाळाही चालवतात. त्यांनी पुरातन आणि जागृत अशा चार मंदिरांचा गावकर्‍यांच्या साहाय्याने जीर्णोद्धार केला आहे. ते गावातील प्रत्येक घरातून अर्पण घेऊन त्यातून मंदिराचा व्यय आणि पुजार्‍यांचे मानधन देणे याची व्यवस्था करतात. त्यांनी चालवलेल्या वेदपाठशाळांतून आतापर्यंत ३०० जणांना विनामूल्य प्रशिक्षण दिले आहे. ते ज्योतिषाच्या आधारे बाधा निवारण्यासाठी मंत्रजप आणि नामजप सांगतात. ‘मंदिराचे व्यवस्थापन कसे पाहावे’, यासाठी ते १०० दिवसांत इच्छुकांना प्रशिक्षण देतात. याचसमवेत ७ दिवसांमध्ये यज्ञ करण्याचेही प्रशिक्षण देतात. त्यांनी १०८ यज्ञकुंडे असलेले ३-४ यज्ञ केले आहेत.

 

डॉ. किशोर स्वामी यांना जाणवलेला अद्भुत योगायोग

१९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी पनामा, सेंटर अमेरिका येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ स्वाहिली’कडून त्यांना ‘डॉक्टर ऑफ फिलोसॉफी इन स्पिरिच्युअल एज्युकेशन विथ स्पेशलायझेशन ऑफ वेद’ ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी प्रदान केल्याच्याच दिवशी म्हणजे १९ ऑक्टोबरला स्वामीजी गोवा येथील सनातन आश्रमात आले होते, हा स्वामीजींच्या दृष्टीने एक अद्भुत योगायोग होता.

 

डॉ. किशोर स्वामी यांनी साधकांना होत असलेल्या वाईट
शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ केला ‘सुदर्शनचक्र शतक स्तोत्र’ अभिषेक !

डावीकडून डॉ. किशोर स्वामी, आरती ओवाळतांना पुरोहित श्री. ईशान जोशी आणि श्री. पुरुषोत्तमाचार्य

रामनाथी येथील सनातन आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत डॉ. किशोर स्वामीजी यांनी साधकांना होत असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ २० ऑक्टोबर या दिवशी ‘सुदर्शनचक्र शतक स्तोत्र’ अभिषेक केला. आश्रम पाहत असतांना स्वामीजी स्वतःहून म्हणाले, ‘‘साधकांना होत असलेले आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत आणि गुरुजींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आरोग्य चांगले राहावे’, याकरता ‘सुदर्शनचक्र शतक स्तोत्र’ अभिषेक मी सेवा म्हणून करतो. या विधीमध्ये श्री. पुरुषोत्तमाचार्य आणि सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी सहभाग घेतला.

 

पुरोहितांच्या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्यासाठी याज्ञिक पीठम्कडून करण्यात येणारे कार्य

१. याज्ञिक पीठम्कडून जी मंदिरे चालू केली आहेत, त्या ठिकाणी किंवा जे पुरोहित नवीन ठिकाणी कार्यरत होणार आहेत, त्या ठिकाणी जाणार्‍या पुरोहितांना गाय-वासरू दिले जाते, जेणेकरून प्रतिदिन अभिषेकासाठी लागणारे दूध त्या पुजार्‍यांना मिळते, तसेच गावातील हिंदू गायीची पूजा करण्यासाठी मंदिरात येतात.

२. मंदिरात प्रतिदिन हिंदू अभिषेक करण्यासाठी येतात, त्या वेळी ते कोणत्या समस्येसाठी अभिषेक करत आहेत, याचे कारण विचारले जाते. ज्या वेळी पुरोहित देवाला अभिषेक करतो, त्या वेळी त्याची उद्घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे केली जाते, जेणेकरून सर्वच ग्रामस्थांना अभिषेक झाल्याचे कळते.

३. मंदिरात येणार्‍या ग्रामस्थांना देव आणि धर्म यांविषयी सांगितले जाते.

४. पीठम्कडून पुरोहितांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवलेला आहे. त्यामध्ये धर्मकार्य, वेदमंत्र, तिथी, वार, नक्षत्र, धर्मरक्षण, मंदिर आणि हिंदूंचे रक्षण यांविषयी प्रतिदिन संदेश पाठवले जातात. हेच संदेश पुरोहित पुढे स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांना पाठवतात, जेणेकरून त्यांना धर्मशिक्षण मिळेल अन् ते संघटित राहतील.

 

‘याज्ञिक पीठम्’च्या माध्यमातून सक्षम आणि वेदसंपन्न
पुरोहित निर्माण करून हिंदूंना संघटित करण्याचा प्रयत्न ! – डॉ. किशोर स्वामी

डॉ. किशोर स्वामी हे त्यांच्या ‘याज्ञिक पीठम्’च्या माध्यमातून आंध्रप्रदेश आणि तेलंगण या राज्यांत वेदसंपन्न अन् सक्षम पुरोहित घडवण्याचे कार्य करत आहेत. त्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलेले कार्य आणि त्यामध्ये त्यांना मिळत असलेला प्रतिसाद त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

१. गुरूंच्या कार्यातून पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची प्रेरणा मिळाली !

श्री श्री श्री त्रिदंडी चिन्नाजियर स्वामी यांच्या वेदपाठशाळेत स्वामीजींनी १९७८ ते १९९८ या कालावधीत वेदाध्ययन पूर्ण केले. तेथेच राहत असतांना त्यांचे कार्य पाहून मला पुरातन आणि जागृत असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती पूर्ववत् चालू करण्याची प्रेरणा मिळाली. यातूनच पुढे मी ‘याज्ञिक पीठम्’ची स्थापना केली.

२. पुरातन मंदिरे चालू केल्याने हिंदु संघटित होणे

आतापर्यंत ४ पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार करून ती चालू केलेली आहेत. या मंदिरांकडे कोणाचेही लक्ष नव्हते आणि ती बंद पडलेल्या स्थितीत असल्यामुळे सरकारने ती कह्यात घेतलेली नव्हती. एक मंदिर १ मास पूर्णपणे बंद असणे म्हणजे हिंदु समाज १ वर्ष मागे गेल्यासारखे आहे. गावातील एक मंदिर बंद झाले, तर त्या गावात अन्य धर्मीय धर्मांतर करण्यास लगेचच पुढे येतात, तसेच हिंदु समाज विखुरला जातो. या हानीची हिंदूंना जाणीव करून देऊन त्यांना संघटित करत आहोत. यामुळे आता चालू केलेल्या मंदिरांच्या भागातील हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु समाज संघटित होत आहे.

३. याज्ञिक पीठम्च्या वेदपाठशाळेत किशोरवयीन मुलांसह गृहस्थ व्यक्तींनाही वेदांसह स्वरक्षणाचे धडे दिले जाणे

वेदपाठशाळेमध्ये केवळ किशोरवयीन मुलांना प्रवेश न देता गृहस्थ व्यक्तींनाही प्रवेश दिला जातो. हेच याज्ञिक पीठम्चे वैशिष्ट्य आहे. त्यांना वेदसंपन्न करण्यासमवेत स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि व्यवस्थापन कसे हाताळायचे, यांचेही प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून मंदिरात कोणी चोरी करायला आल्यास त्याच्यापासून मंदिराचे रक्षण करता येईल. आज अनेक मंदिरे बंद पडण्यामागे तेथे देवतेची पूजाअर्चा करण्यासाठी पुजारी नाहीत, ही मुख्य समस्या आहे. जर मंदिरात पुजारी असेल, तर तो मंदिर बंद पडू देणार नाही. मंदिरात पुजार्‍यांना आवश्यक तेवढे मानधन मिळत नसल्याने ते अन्यत्र नोकरी करतात. त्यांनी तसे करू नये, यासाठी त्यांना ३ मासांचे वेगळे प्रशिक्षण देतो. त्यामध्ये विवाह विधी, वास्तुशांत, मुहूर्त पाहणे, पंचांग पाहणे, असे काही विधी शिकवतो, जेणेकरून त्याला मंदिरातून मिळणार्‍या पैशासह अन्य चांगल्या मार्गाने पैसे मिळवता येतील. याचसमवेत ज्या पुजार्‍यांना शिकण्याची इच्छा किंवा जिज्ञासा असेल, त्यांना अन्य पुढचे विधी किंवा यज्ञयाग शिकवतो. यामुळे जी मंदिरे बंद पडण्याच्या मार्गावर असतात, तेथील पुजारी अशा विविध मार्गांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहतो आणि या माध्यमातून हिंदूंना संघटित करतो. आंध्रप्रदेश किंवा तेलंगण येथील पुजार्‍यांना जर शिकण्यासाठी वेदपाठशाळेत येणे शक्य नसेल, तर स्वामीजी त्यांना त्या त्या भागात जाऊन शिकवतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment