औक्षण करण्याची कृती

औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे. वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे. औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून घेऊया !

१. पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. ज्याचे औक्षण करायचे त्याला (संस्कार्य व्यक्तीला) पाटावर बसवावे.

पाटाच्या भोवती रांगोळी काढणे
पाटाच्या भोवती रांगोळी काढणे

२. संस्कार्य व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर ओले कुंकू लावून त्यावर अक्षता लावाव्यात.

आज्ञाचक्राच्या जागी अक्षता लावण्यामागील शास्र

अक्षता आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने नंतर ओवाळतांना तबकातील दिव्यातून प्रक्षेपित होणार्‍या गोलाकार, गतीमान रजोगुणी लहरी अक्षतांतील पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या कणांमुळे धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जिवाच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रक्षेपित केल्या जातात. या वेळी रजोगुणी लहरींतील क्रियाऊर्जा न्यून झाल्याने त्यांचे रूपांतर सात्त्विक लहरींत होते. सात्त्विक लहरींची गती ही पहिल्याच्या तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरिरात हळुवार संक्रमित होतात. त्यामुळे जिवाला मिळणारा सात्त्विकतेचा लाभ बराच काळ टिकतो अन् जिवाला याचा त्रासही होत नाही. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

३. निरांजनाचे तबक हातात घेऊन त्यातील अंगठी किंवा एखादा दागिना आणि सुपारी हातात घेऊन त्यांनी व्यक्तीच्या तोंडवळ्याभोवती पुढीलप्रमाणे ओवाळावे.

अंगठी आणि सुपारी यांनी ओवाळणे

अंगठी आणि सुपारी यांनी ओवाळण्यामागील शास्त्र

अंगठी आणि सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक देवतांकडून येणार्‍या सात्त्विक लहरींनी भारित झालेले असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

अ. प्रथम व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श करावा.

आ. अंगठी आणि सुपारी यांनी व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळण्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे. मग असेच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत यावे. असे तीनदा करावे. प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श तबकाला करावा.

अंगठी आणि सुपारी यांचा तबकाला स्पर्श करण्यामागील शास्त्र

औक्षण करतांना जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षिल्या जातात. अंगठीने ओवाळतांना अंगठीकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींचे रूपांतर रजोलहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसर्‍या जिवाच्या सभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. त्यानंतर सात्त्विक लहरींनी भारित अंगठी ताम्हणाला टेकवली असता तिच्यातील लहरी तांब्याच्या ताम्हणात आकर्षिल्या जातात. ताम्हणातून या लहरी औक्षण करणार्‍या जिवाच्या शरिरात त्याच्या हातांद्वारे संक्रमित केल्या जातात. त्यामुळे औक्षण करणार्‍या आणि औक्षण करवून घेणार्‍या अशा दोन्ही जिवांना सात्त्विक लहरींचा लाभ मिळतो.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

४. संस्कार्य व्यक्तीला औक्षणाच्या तबकाने ओवाळावे.

 

जिवाच्या पातळीप्रमाणे आणि त्याला असणार्‍या
वाईट शक्तींच्या त्रासानुसार औक्षण करण्याच्या पद्धती आणि त्यामागील शास्त्र

 

जिवाची पातळी आणि त्याला वाईट शक्तींचा त्रास असणे / नसणे

औक्षण करण्याची पद्धत

शास्त्र

१. ‘५० टक्क्यांपेक्षा अल्प किंवा जास्त पातळी आणि वाईट शक्तींचा त्रास असणे अपूर्ण वर्तुळाकृती (टीप १) वाईट शक्तींचा त्रास असणार्‍याचे अपूर्ण वर्तुळाकार पद्धतीने औक्षण केल्यामुळे त्याच्यातील वाईट शक्तीला देहाबाहेर पडण्यास स्थान रहाते. पूर्ण वर्तुळाकार ओवाळल्यास त्याच्या शरिराभोवती मंडल निर्माण झाल्याने वाईट शक्ती व्यक्तीच्या देहातच अडकून रहाण्याची शक्यता असते.
२. ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी आणि वाईट शक्तींचा त्रास नसणे पूर्ण वर्तुळाकृती : तबक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत तीनदा फिरवावे. (टीप २)
३. ७० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी

अ. जागृतावस्थेत
असलेले संत

अपूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने एकदाच ओवाळावे. (टीप ३)
आ. ध्यानावस्थेत
असलेले किंवा
अती उच्च
पातळीचे संत
पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने एकदाच ओवाळावे. बहुधा ध्यानावस्थेतील किंवा अती उच्च पातळीचे (शांतीच्या अवस्थेतील) संत निर्गुणावस्थेत असतात. त्याचे प्रतीक म्हणून त्यांना पूर्ण वर्तुळाकृती ओवाळावे.’

 

टीप १ – पुढे दिलेल्या पद्धतींपैकी एखादी वापरावी.

१. पाटावर बसलेल्या व्यक्तीला ओवाळतांना तिच्या उजव्या गुडघ्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने डाव्या गुडघ्यापर्यंत तबक फिरवावे आणि मग तसेच उलट दिशेने उजव्या गुडघ्यापर्यंत यावे. असे तीनदा करावे.

२. आसंदीत (खुर्चीत) बसलेल्या व्यक्तीला ओवाळतांना तिच्या उजव्या पावलापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आरंभ करून डाव्या पावलापर्यंत यावे आणि मग तसेच उलट दिशेने उजव्या पावलापर्यंत यावे. असे तीनदा करावे.

३. व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तबक फिरवण्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे आणि मग तसेच उलट दिशेने ओवाळावे. असे तीनदा करावे. (मूळ स्थानी)

टीप २ – जिवाला पूर्ण वर्तुळाकृती ओवाळण्यामागील शास्त्र पुढे दिले आहे.

अ. कुंडलिनी चक्रांना गती लाभून ती कार्यरत होणे

‘जिवाभोवती तबक ओवाळतांना त्याची कुंडलिनी जागृत होते आणि कुंडलिनीचा प्रवासही चांगल्या पद्धतीने होतो. तबक अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत फिरवतांना कुंडलिनी चक्रांना गती लाभून ती गतीमान होऊन कार्यरत होतात.’
– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

आ. जिवातील देवत्वाला अनाहतचक्राशी प्रकट करून आज्ञाचक्रातील प्रदीप्त अशा तेजाला गवसणी घालण्यासाठी गेलेल्या आत्मज्योतीचे औक्षणातील दीपज्योतीने स्वागत करणे

‘औक्षण करतांना तबक जिवाच्या अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत फिरवावे; कारण औक्षण करणे, म्हणजे जिवातील देवत्वाला अनाहतचक्राशी प्रकट करून आज्ञाचक्रातील प्रदीप्त अशा तेजाला गवसणी घालण्यासाठी गेलेल्या आत्मज्योतीचे औक्षणातील दीपज्योतीने स्वागत करणे. औक्षण प्रक्रियेतून जिवात प्रकट झालेली आत्मज्योत ही कार्य करून आज्ञाचक्रात विलीन होते, म्हणजेच अद्वैतात जाते. तिचा प्रवास औक्षण करतांना तबकाच्या अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत ओवाळण्याच्या प्रक्रियेतून स्पष्ट होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

इ. जिवाची अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत उन्नती व्हावी, हा भावार्थ असणे

‘वाढदिवसाला जिवाचे औक्षण करतांना तबक जिवाच्या अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत फिरवावे. ‘जिवाची अनाहतचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत उन्नती व्हावी’, हा त्यामागील भावार्थ आहे. अनाहतचक्र हे भावनेचे प्रतीक आहे, तर आज्ञाचक्र हे भावाचे प्रतीक आहे. जिवातील भावना अल्प होऊन त्याचा भाव वाढावा, म्हणजेच त्याच्या जीवनाची वाटचाल ‘मायेतून ब्रह्माकडे व्हावी’, असा उद्देश ओवाळतांना असतो. मायेची ओढ अल्प होऊन जीव ब्रह्माकडे जाण्यातच त्याची उन्नती असते. असे झाले तरच ‘जिवाची खर्‍या अर्थाने वाढ झाली’, असे म्हणून आपण त्याचा वाढदिवस साजरा करू शकतो.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून) (मूळ स्थानी)

टीप ३ – बहुधा जागृतावस्थेत असलेले संत आनंदावस्थेत असतात. त्याचे प्रतीक म्हणून त्यांना अपूर्ण वर्तुळाकृती ओवाळावे. त्यांची सुषुम्नानाडी जागृत असते. संतांना पूर्ण वर्तुळाकृती ओवाळल्यास त्यांची सुषुम्नानाडी बंद होऊन उजवी (पिंगला किंवा सूर्य) किंवा डावी (इडा किंवा चंद्र) नाडी सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची आनंदावस्था भंग होऊ शकते. यासाठी त्यांना अपूर्ण वर्तुळाकृती ओवाळावे. (मूळ स्थानी)

५. तिला खाण्यास गोड पदार्थ द्यावा.

६. तिच्यासाठी मंगल कामना करणारी प्रार्थना करावी.

७. औक्षणाचे तबक खाली ठेवतांना त्याखाली अक्षता ठेवाव्यात.

अक्षतांवर तबक ठेवण्यामागील शास्त्र

‘तबकाखाली अक्षता ठेवणे, म्हणजे निरांजनाकडे आकृष्ट झालेल्या आणि आवश्यकतेप्रमाणे प्रक्षेपित होणार्‍या ब्रह्मांडातील वेगवेगळ्या देवतांच्या तत्त्वांच्या सात्त्विक लहरींना भूमीवर आसन देऊन त्यांना आसनस्थ होण्याची प्रार्थना करणे होय. देवतेच्या प्रत्यक्ष मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापेक्षा अक्षतांच्या माध्यमातून प्रत्यक्ष देवतेच्या रूपापेक्षा सूक्ष्म असलेल्या आणि जास्त प्रमाणात देवतेच्या निर्गुण तत्त्वाशी निगडित असणार्‍या या सूक्ष्म लहरींची प्राणप्रतिष्ठा करणे, हे जास्त सूक्ष्म अन् श्रेष्ठ प्रतीचे आहे. या सात्त्विक लहरी ग्रहण आणि या लहरी धरून ठेवण्याच्या कार्यात अक्षतांतील पृथ्वी अन् आप या तत्त्वांचे कण साहाय्य करतात. तसेच या लहरी अक्षतांच्या माध्यमातून जास्त वेळ टिकण्यास साहाय्य होते. अक्षता भूमीलहरींच्या माध्यमातून या सात्त्विक लहरींना प्रवाही बनवून भूमीवर एक सूक्ष्म-आच्छादन निर्माण करतात. या आच्छादनावरून चालल्यामुळे आपल्या पायासह धुळीच्या माध्यमातून आलेले रज-तम कण नष्ट होतात आणि त्यामुळे एकप्रकारे जिवाच्या स्थूलदेहाची शुद्धी होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

टीप ४ – सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, तर मोक्षाला गेलेल्या व्यक्तीची पातळी १०० टक्के असते. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीत नसते. साधनेने ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पातळी झाल्यावर सूक्ष्मातील थोडेफार कळू लागते आणि पुढे जसजशी पातळी वाढते, तसतशी ही क्षमता वाढते. गुरुकृपा असल्यास पातळी न्यून (कमी) असतांनाही सूक्ष्मातील कळू शकते.

‘औक्षण’च्या तात्त्विक माहितीसाठी येथे क्लिक करा !

2 thoughts on “औक्षण करण्याची कृती”

  1. व्वा अतिशय उपयुक्त माहिती. कुठलीही क्रिया किंवा विधी करताना ती आपण का करतो आहोत त्याच्या मागचं नक्की कारण काय हे माहिती असणं फार आवश्यक आहे. आज फारच छान माहिती मिळाली.धन्यवाद !!

    Reply

Leave a Comment