सनातन संस्थेच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद ! – प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

रामनाथी (गोवा) – हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी गुरुवार, १९ सप्टेंबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली. या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केलेल्या मंत्रघोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी प.पू. स्वामीजींचे पाद्यपूजन केले आणि त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. या मंगलप्रसंगी स्वामीजींचा भक्त परिवार, तसेच सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. प.पू. स्वामीजींनी त्यांच्या आशीर्वचनात सांगितले, सनातन संस्थेचे कार्य अतिशय उत्तम गतीने चालू आहे. या कार्यात उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद !

१. प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी आणि भक्तगण यांनी सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती देतांना, २. श्री. निषाद देशमुख

प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी हे त्यांच्या दुर्गाभाट, गोवा येथील मठाला भेट देण्याकरता आले होते. तेव्हा त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी स्वामीजींना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांच्याशी संबंधित विविधांगी कार्याची सविस्तर माहिती दिली. प.पू. स्वामीजींनी आश्रमातील सर्व कार्य आस्थेने जाणून घेतले. या वेळी साधकांच्या उत्कट भावामुळे सजीव वाटत असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पाहून प.पू. स्वामीजी म्हणाले, धर्मसंस्थापनेकरिता भगवान श्रीकृष्ण अवतरला आहे, असे त्याच्याकडे पाहून जाणवते, असे सांगितले. सर्व विरोधांना डावलून सनातन प्रभात नियतकालिकांचे चालू असलेले मार्गक्रमण, तसेच वेळ आणि धनरूपी समिधेची धर्मकार्यरूपी यज्ञामध्ये आहुती देण्यासंदर्भातील चित्र त्यांना अतिशय आवडले. ध्यानमंदिर, सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन, यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या यंत्राचा वापर करून आध्यात्मिक संशोधन करण्याची प्रक्रिया, भोजनकक्षातील चुकांचा फलक आदी माहिती त्यांना विशेषत्वाने भावली.

आश्रम पहातांना विविध सेवा करणारे साधक प.पू. स्वामीजींना उभे राहून नमस्काराच्या मुद्रेत भावपूर्ण अभिवादन करत असतांना स्वामीजींनी सर्वांना आपल्या प्रीतीमय दृष्टीने आशीर्वाद दिले. प.पू. स्वामीजी यांनी त्यांच्या भक्तांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया आश्रमात राहून शिकण्याविषयी सुचवले. तेव्हा त्यांच्या एका भक्ताने काही मास ही प्रक्रिया शिकण्यासाठी आश्रमात रहाण्याची सिद्धता दर्शवली. सूक्ष्म-ज्ञान प्राप्तकर्ते साधक, तसेच संगीत विभागातील साधक यांच्याविषयी प.पू. स्वामीजींनी आपुलकीने जाणून घेतले.

आश्रम पाहिल्यावर श्री. प्रकाश मराठे यांनी प.पू. स्वामीजी यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन भावपूर्ण सन्मान केला.

क्षणचित्रे

१. प.पू. स्वामीजींनी त्यांच्या भक्तांना साधकांच्या साधनेतील चुकांचा फलक आवर्जून वाचायला सांगितला.

२. यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या यंत्रासंदर्भात जाणून घेतांना प.पू. स्वामीजींनी हे यंत्र आश्रमात आहे का ?, याविषयी जिज्ञासेने विचारले.

३. श्री. निषाद देशमुख यांनी प.पू. स्वामीजींना सनातन संस्थेचे बालसंत पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांच्याविषयी अवगत केले. स्वामीजींच्या समवेत असलेल्या भक्तांनी त्यांच्या संप्रदायातील काही मुलांमध्येसुद्धा दैवी गुण असल्याचे सांगितले अन् तेही दैवी बालक असतील का ?, दैवी बालक कसे ओळखायचे ?, याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारले.

४. प.पू. स्वामीजी हे प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतात. आश्रम पहातांना त्यांनी रामनाथी आश्रमात झालेल्या काही दैवी पालटांविषयी दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचल्याचे आवर्जून सांगितले.

५. प.पू. स्वामीजी यांच्या फोंडा येथील भक्तांनी आश्रम पाहिल्यानंतर सर्व साधकांच्या चेहर्‍यावर आनंद आणि तेज असल्याचे सांगितले.

६. स्वामीजींच्या भक्तांनी आश्रमात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या प्रबोधनात्मक फलकांची आवर्जून मागणी केली.

 

प.पू. स्वामीजी यांनी सनातन संस्थेच्या साधकांचे केलेले कौतुक !

मोठ्या संख्येने साधक तन-मन-धनाचा त्याग करून आश्रमात राहून धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करत असल्याचे प.पू. स्वामीजी यांना समजल्यावर त्यांनी साधकांचे कौतुक केले. साधक अतिशय विनम्रतेने आणि शिस्तीने सेवारत आहेत. अन्य ठिकाणी असे पहायला मिळत नाही, असे ते या प्रसंगी म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment