हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

पू. सुरेश महाराज उटीकर (डावीकडे) यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करतांना पू. रमेश गडकरी

देवद (पनवेल)  – श्री नीलकंठेश्‍वर महादेव मंदिर ब्रह्मचारी संस्थान, उटी, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांनी २ सप्टेंबर या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे खारघर येथील शिष्य श्री. अविनाश मगर आणि सौ. उमा मगर हे उपस्थित होते. या वेळी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांचे कार्य, संकेतस्थळ आणि आश्रमातील वास्तूमध्ये होणार्‍या दैवी पालटांविषयी माहिती दिली. या वेळी त्यांनी ही सर्व माहिती आस्थेने जाणून घेतली.

सनातन संस्थेचे पू. रमेश गडकरी यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन आणि हार घालून सन्मान केला. त्यांना सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेले ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ आणि ‘प.पू. डॉक्टरांचे तेजस्वी विचार’ हे दोन ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी त्यांनी त्यांच्या गुरुपरंपरेविषयी माहिती दिली, तसेच साधनेत आल्यापासून त्यांच्या गुरूंनी त्यांच्या कशा परीक्षा घेतल्या आणि त्यात त्यांना आलेल्या अनुभूती यांची माहिती दिली. पू. सुरेश महाराज यांनी साधकांना आणि सनातन संस्थेच्या कार्यासाठी ‘तुम्हाला या कार्यासासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व मिळू दे’, असा आशीर्वाद दिला.

आश्रमाविषयी व्यक्त केलेले विचार . . .

१. सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ अद्वितीय आहे. सर्व काही पारदर्शक आहे. आश्रमातील स्वच्छतासुद्धा पुष्कळ छान ठेवली आहे.

२. आश्रमाने केलेले आदरतिथ्य पाहून पू. सुरेश महाराज म्हणाले ‘‘खरेतर तुम्ही हिंदुत्वाचे आणि सनातन हिंदु धर्माचे कार्य पुष्कळ मोठ्या प्रमाणावर करत आहात. वास्तविक आम्हीच आपल्या आश्रमात येऊन सेवा केली तर आम्हाला पुण्य लाभेल.’’

३. आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या साधकांविषयी सांगितल्यावर ते म्हणाले ‘‘आपण सर्वजण पुष्कळ भाग्यवान आहात की, या कार्याला वाहून घेतले आहे. देवाच्या भक्तीमुळे पुण्य मिळते; पण तुमच्या सगळ्यांचे पुण्याचे ‘डिपॉझिट’च चालू आहे आणि याचे इंटरेस्ट (व्याज) पण तुम्हाला देव देणार आहे.’’

४. पू. महाराजांनी त्यांच्या समवेतच्या शिष्यांना कुंकू लावण्यास आणि सात्त्विक कपडे परिधान करण्यास सांगितले.

५. आश्रमात ‘ॐ’ उमटलेले त्यांना दाखवल्यावर ‘हे सर्व चैतन्यच आहे’, असे त्यांनी सांगितले.

६. फलकावरील सर्व चुका त्यांनी शांतपणे वाचल्या आणि ‘प्रत्येक चूक लिहिल्यामुळे साधकांचे चुकीविषयी पापक्षालन होत आहे’, असे त्यांनी सांगितले.

७. ‘कुंभमेळ्याला गेलो असतांना सनातन संस्थेच्या वितरण कक्षाला भेट दिली होती’, असे त्यांनी सांगितले.

 

पू. सुरेश महाराज यांचा थोडक्यात परिचय

पू. सुरेश महाराज हिंगोली येथील संत असून त्यांच्या गुरूंचे नाव प.पू. यशवंत ब्रह्मचारी महाराज असे आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जाऊन ते साधनेविषयी शिष्यांना मार्गदर्शन करतात. पू. महाराजांना तलवार, दांडपट्टा चालवणे, नेमबाजी करणे आणि घोडेस्वारी करता येते. पू. महाराज गोरक्षणाच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत. पहाटे तीन वाजता उठून ते नित्य साधनेला प्रारंभ करतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment