गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, वेरावल येथील ‘भालका तीर्थ’

Article also available in :

 

 

१. सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा इतिहास

गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे गुरु स्वामी गोपालानंद सारंगपूर गावात आले असता त्यांना समजले, ‘अनेक वर्षे त्या भागात पाऊस न पडल्याने सगळे ओस पडले आहे.’ त्या वेळी त्यांनी हनुमंताला प्रार्थना केली आणि ईश्‍वरी प्रेरणेने त्या ठिकाणी हनुमंताची स्थापना केली. हनुमंतामुळे कष्ट दूर झाल्याने त्या मंदिराला ‘कष्टभंजन हनुमान मंदिर’ असे नाव पडले. हनुमंताच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी स्वामी गोपालानंद यांनी मूर्तीला एका चांदीच्या काठीने स्पर्श केल्यावर काही क्षण मूर्ती सजीव झाली आणि दात बाहेर काढून हसू लागली. आजही ही मूर्ती याच रूपात आहे.

भक्तांचे कष्ट नष्ट करणार्‍या कष्टभंजन हनुमानाची मूर्ती !

 

२. वेरावल येथील ‘भालका तीर्थ’ या स्थानाचा इतिहास

द्वापरयुगात श्रीकृष्णाने ज्या वृक्षाखाली देहत्याग केला, तोच हा ‘भालका तीर्थ’ क्षेत्रातील पिंपळाचा वृक्ष !

सोमनाथ ज्योर्तिलिंगापासून १० कि.मी. अंतरावर ‘वेरावल’ गाव आहे. यदुकुळाचा नाश झाल्यावर आणि द्वारकानगरी समुद्रात बुडाल्यावर श्रीकृष्ण वेरावल गावात एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसला होता. ‘जरा’ नावाच्या व्याधाने ‘श्रीकृष्णाचे पाय हे हरिण आहे’, असे समजून त्याला बाण मारला. जराने जवळ येऊन पाहिल्यावर त्याला दिसले, ‘श्रीकृष्णाच्या चरणांना बाण लागले आहेत.’ तेव्हा जराला पश्‍चाताप होतो आणि तो श्रीकृष्णाच्या चरणांपाशी बसून धाय मोकलून रडतो.

‘जरा’ नावाच्या व्याधाला त्याने साक्षात् श्रीकृष्णाला बाण मारला असल्याचे लक्षात आल्यावर त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. या मूर्तींमधून चित्रित करण्यात आलेला हाच तो प्रसंग !

श्रीकृष्ण जराचे सांत्वन करतांना त्याला सांगतो, ‘त्रेतायुगात मी श्रीरामावतारात असतांना तू सुग्रीवाचा भाऊ वाली होतास. त्या वेळी श्रीरामाने बाण मारून वालीचा वध केला. आता त्याची परतफेड झाली.’ श्रीकृष्ण जराला क्षमा करतो. श्रीकृष्ण त्या पिंपळाच्या झाडाखाली अवतारकार्य समाप्त करतो. आता हे स्थान ‘भालका तीर्थ’ या नावाने प्रसिद्ध आहे.

– श्री. विनायक शानभाग, देहली (२९.३.२०१९)

Leave a Comment