सनातन संस्थेच्या आश्रमात भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे खर्‍या अर्थाने आचरण केले जाते ! – जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश

कॅनडा येथील ‘विश्‍व’ या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी
डॉ. स्वामी सत्य प्रकाश यांचे रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आगमन

साधिका कु. निधी देशमुख (उजवीकडे) यांच्याकडून दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश आणि डॉ. प्रीती मिस्रा

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – व्हॅनकुव्हर (कॅनडा) येथील जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश यांचे सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १६ ऑगस्ट या दिवशी आगमन झाले. सनातन संस्थेच्या साधिका कु. निधी देशमुख यांनी आश्रमात चालू असणारे धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांच्या कार्यासंदर्भात स्वामीजी अन् त्यांच्यासमवेत आलेल्या त्यांच्या शिष्या डॉ. प्रीती मिस्रा यांना माहिती दिली.

आश्रमातील विविध सेवांविषयी त्यांना अवगत करण्यात आले. स्वामीजींनी धर्मप्रसारार्थ उपयोगात आणण्यात येणार्‍या दृकश्राव्य माध्यमांविषयी आवर्जून जाणून घेतले. आश्रमातील चुकांचा फलक पाहून ते प्रभावित झाले. या प्रसंगी स्वामीजी म्हणाले, ‘येथे (सनातन संस्थेच्या आश्रमात) भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे खर्‍या अर्थाने आचरण केले जाते.’ त्यांनी कलेसंदर्भातील संशोधनकार्याविषयीही रुची दाखवली.

आश्रमातील त्यांच्या वास्तव्यात स्वामीजी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांना संगीत-साधनेविषयी मार्गदर्शन करत आहेत.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या साधकांची सदिच्छा भेट घेतांना डॉ. स्वामीजी

सनातन संस्थेच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .

स्वामीजींचा २० ऑगस्ट या दिवशी देहली येथे एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठी नियोजित कार्यक्रम होता; परंतु सनातन संस्थेच्या आश्रमातील सकारात्मक ऊर्जा आणि साधकांचा आध्यात्मिक साधनेचा भाग आवडल्याने त्यांनी अन् त्यांच्या शिष्या डॉ. प्रीतीजी यांनी त्या कार्यक्रमाला जाणे रहित केले. सनातन संस्थेच्या आश्रमातच अधिक दिवस वास्तव्य करून येथील साधकांना मार्गदर्शन लाभावे, याच उद्देशाने स्वामीजींनी १ दिवस अधिक थांबण्याचा निर्णय घेतला.

भावपूर्ण संगीत सादर करतांना जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश

 

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश यांचा परिचय

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्य प्रकाश हे सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक असून ‘वरद आश्रम इंटरकल्चरल सर्व्हिस ह्युमॅनेटेरियन वर्ल्ड असोसिएशन (VISHWA)’ म्हणजेच ‘वरद आश्रम अंतर्सांस्कृतिक सेवा मानवतावादी विश्‍व संघटने’चे संस्थापक आहेत.

 

स्वामीजींचे शिक्षण

स्वामीजींनी ‘बनारस हिंदु विश्‍वविद्यालया’तून कला क्षेत्रात पीएच्.डी. केली असून संगीतामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. यात ते विश्‍वविद्यालयामध्ये प्रथम आले. त्यांना ‘लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी ‘मास्टर इन योगा इन मेडिकल सायन्स’ ही पदवीही प्राप्त केली आहे. ‘बनारस हिंदु विश्‍वविद्यालया’मधून त्यांनी ‘तत्त्वज्ञान’ या विषयावरही पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

 

स्वामीजींनी केलेली साधना

स्वामीजींनी कठीण तपश्‍चर्या केली असून अध्यात्मात त्यांचा त्याग आहे. स्वामीजी हे वाराणसीला २५ वर्षे राहिले. तेथे त्यांनी अध्यात्मातील विविध अधिकारी पुरुषांकडून ज्ञान प्राप्त केले. संस्कृतचे ते मोठे विद्वान आहेत. संस्कृत, वेद, उपनिषदे, पुराण या शास्त्रांचा अभ्यास करण्यासमवेत त्यांनी कठीण तपश्‍चर्याही केली आहे. ऋषिकेश येथे, तसेच हिमालयात जाऊन त्यांनी सूक्ष्म क्रियांविषयीही अभ्यास केला आहे. त्यांनी कठीण योगासनेही अवगत केली आहेत.

 

स्वामीजींचे भारतातील ३ आश्रम !

देहलीमध्ये ‘सत्य सनातन शिव मंदिर’, वाराणसी येथे ‘सिद्धेश्‍वर महादेव’, तर हिमाचल प्रदेशात ‘साधना आश्रम शिव मंदिर’, असे स्वामीजी यांचे भारतात ३ आश्रम आहेत.

 

स्वामीजींच्या शिष्या डॉ. प्रीती मिस्रा यांचा परिचय !

स्वामीजींच्या शिष्या डॉ. प्रीती मिस्रा

स्वामीजींच्या शिष्या डॉ. प्रीती मिस्रा यांचे वास्तव्यही व्हॅन्कुव्हर, कॅनडा येथे असून त्या ‘विश्‍व’ संघटनेच्या सचिव आणि समन्वयक आहेत. त्या योगशिक्षिकाही आहेत. स्वामीजींचा सर्व कार्यभार त्या अतिशय चांगल्याप्रकारे पहातात.

 

स्वामीजींनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम
आणि आश्रमातील साधक यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. आश्रमात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याने मला येथे पुष्कळ चांगले वाटले. दुपारची विश्रांती न घेता मी लिखाण केले.

२. रामनाथी आश्रमात आणि साधकांमध्ये ध्यानासाठी आवश्यक असलेले यम-नियम यांचा सुरेख संगम आहे. येथील साधकांचा पाया सिद्धच आहे.

३. येथील प्रत्येक साधक त्यागी वृत्तीचा आहे. सर्व साधक त्याग करून साधनेसाठी आलेले आहेत. हे पाहून पुष्कळ आनंद वाटत आहे. माझ्याकडे जे आहे, ते सर्व तुम्हाला देईन. आपण (माझ्याकडून) हवे ते घेऊ शकता.

४. आश्रमातील सर्व साधकांचा शिकण्याचा भाग पाहून स्वामीजींच्या शिष्या डॉ. प्रीती मिस्रा म्हणाल्या, ‘‘स्वामीजी तुम्हाला कितीही वेळ द्यायला सिद्ध आहेत.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment