चंडिगड, पंजाब येथील सुप्रसिद्ध ज्योतिषी तथा ‘ऑरा’ तज्ञ पंडित राजेश वसिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

पंडित राजेश वसिष्ठ (डावीकडे) यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. अमोल हंबर्डे

रामनाथी (गोवा) – चंडिगड (पंजाब) येथील श्री त्रिशक्ती साधना आणि ज्योतिष अनुसंधान केंद्राचे संस्थापक सुप्रसिद्ध ज्योतिषी तथा ‘ऑरा’ (प्रभावळ) तज्ञ पंडित राजेश वसिष्ठ यांनी ५ जून या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयक कार्याची माहिती दिली. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी त्यांना अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा संशोधन विभाग आणि त्याअंतर्गत चालू असलेले कार्य यांविषयीची माहिती दिली.

 

श्री. वसिष्ठ यांचे वैशिष्ट्य

पंडित वसिष्ठ ऑरासह नाडी, वास्तू, अंक आणि ज्योतिषशास्त्र यांविषयी अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतात. ते श्री त्रिशक्ती साधना आणि ज्योतिष अनुसंधान केंद्राच्या माध्यमातून समस्यांचे निवारण आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून रोगांवर उपचार अन् वास्तूशी संबधित प्रश्‍नांचे निवारण करतात. २ दिवसांपूर्वी त्यांचा फोंडा, गोवा येथे एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ज्योतिष विभागप्रमुख सौ. प्राजक्ता जोशी यांना बोलावले होते. त्या वेळी त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांची प्रभावळ मोजली. त्यामध्ये त्यांना सौ. प्राजक्ता जोशी यांच्या भोवतीची प्रभावळ तेथे उपस्थित असलेल्या सर्वांपेक्षा अधिक असल्याचे जाणवले. याविषयी श्री. वसिष्ठ यांनी उपस्थितांना ‘साधनेने काय लाभ होतो?, तसेच प्रभावळ कशी वाढते’, याविषयी सांगितले.

 

संशोधन कार्यात साहाय्य करीन ! – पंडित राजेश वसिष्ठ

आश्रम पाहिल्यावर पंडित वसिष्ठ म्हणाले, ‘‘सनातनचे कार्य आणि आश्रम पुष्कळ आवडला. संशोधन कार्यात काही साहाय्य लागल्यास, तसेच संशोधनाच्या दृष्टीने काही उपकरणे लागल्यास संपर्क करा, मी साहाय्य करीन.’’ परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या आश्रमातील खोलीत ५ मिनिटे बसून त्यांनी खोलीचे परीक्षण केले आणि ‘या खोलीतून खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे’, असे सांगितले. सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांची भेट झाल्यावर ते म्हणाले, ‘‘यांना पहाताच त्यांच्यात सकारात्मक उर्जा  (पॉझिटीव्ह एनर्जी) असल्याचे लक्षात येते.’’ प्रभावळ कशी मोजायची, याविषयी साधकांना शिकवण्याची सिद्धताही त्यांनी दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment