सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

डावीकडून सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. प्रसाद देव, अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर आणि श्रीमती शुभांगी बुवा

रामनाथी (गोवा) – सोलापूर येथील अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १७ मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी अधिवक्त्या रामतीर्थकर (श्रीमती) यांच्यासमवेत शुभराय महाराजांच्या वंशज श्रीमती शुभांगी बुवा याही उपस्थित होत्या. सनातनचे साधक श्री. प्रसाद देव यांनी त्यांना सनातनच्या आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य आणि आध्यात्मिक संशोधन यांची माहिती दिली. अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर या आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक आणि स्तंभलेखक पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी आहेत.

आश्रम बघून एक वेगळीच अनुभूती प्राप्त झाली !
– श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, ओंकार सोसायटी, गजरेवाडी, सोलापूर

चार वर्षांपूर्वी एकदा आले होते. त्यापेक्षा या वेळी येथे येताना काही वेगळ्या भावना मनात होत्या. काही मनातील शंका विचारायच्या होत्या; परंतु आश्रम बघून एक वेगळीच अनुभूती आली. या परिसरातील प्रत्येक गोष्टीत चैतन्य जाणवत होते. सगळ्या सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती वलय निर्माण करत आहेत, असे वाटले.

सूक्ष्म-जगताविषयी श्रीमती रामतीर्थकर म्हणाल्या, ‘‘इतक्या बारीक-सारीक गोष्टी ठाऊक नव्हत्या. प्रदर्शन पाहिल्यावर लक्षात आले की, या सूक्ष्म-जगतात घडणार्‍या अनेक गोष्टी आपल्याला का ठाऊक नव्हत्या ? या प्रदर्शनामुळे आंतरिक आणि सकारात्मक विचारांचे, तसेच नामजपाचे महत्त्व कळले.’’

मोक्षापर्यंत जाऊ शकतो, याची पक्की खात्री
देणारा आणि त्यासाठी साधना करवून घेणारा आश्रम !
– श्रीमती शुभांगी जयकृष्ण बुवा, दक्षिण कसबा, श्री शुभराय महाराज मठ, सोलापूर

आश्रमाची इमारत छान आहे. आश्रमात डागडुजी चालू आहे; परंतु तिचा कोणत्याही कामात अडथळा नाही. आश्रम शांत आणि पवित्र आहे. देवाची भक्ती आणि ‘कृतीभक्ती’ यांचा मेळ घालून मोक्षापर्यंत जाऊ शकतो, याची पक्की खात्री देणारा अन् त्यासाठीच साधना करवून घेणारा आश्रम आहे. भविष्यात या आश्रमाची महती एवढी वाढेल की, मानवाला त्याच्या कर्तव्याची आणि जीवन जगण्याची रीती समजावून घेण्यासाठी येथे थांबून अन् नमस्कार करूनच जावे लागेल. इतके महत्त्वाचे आणि जीवन कल्याणाचे काम येथे चालू आहे.

सुक्ष्म जगताविषयी श्रीमती बुवा म्हणाल्या, ‘‘सूक्ष्म जगताविषयी माहिती होती. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. अंतरात असलेला भाव आणि निष्ठा दृढ झाली. येथील सर्वांना नमस्कार !’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात