सत्सेवा म्हणजे काय ?

‘बुद्धीने अध्यात्माचे महत्त्व पटले, ‘या जन्मातच मोक्षप्राप्ती करून घ्यायची आहे’, असा निश्‍चय झाला आणि साधना चालू झाली की, सत्संगात काय शिकवले जाते, याला अल्प महत्त्व उरते. अशा साधकाने नामजप आणि सत्संग यांच्या जोडीला सत्सेवा केल्याने जास्तीतजास्त आनंद मिळू लागतो आणि साधकावर गुरुकृपा सातत्याने होत रहाते.

या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी (आनंदप्राप्तीसाठी) साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !

 

 

 

 

 

 

 

१. सत्सेवा म्हणजे काय ?

अध्यात्माचा, म्हणजे साधनेचा प्रसार करणे ही सर्वोच्च प्रतीची सत्सेवा आहे. देवळांची स्वच्छता करणे, संतसेवा इत्यादी सत्सेवा आहेत. सेवा ही सत्सेवा हवी. विशिष्ट टप्प्यापर्यंत आध्यात्मिक प्रगती झाल्याविना सेवा मनापासून होत नाही. तोपर्यंत ती बुद्धीने साधना म्हणून केलेली असते.

 

२. सत्सेवेचे महत्त्व

सत्सेवा करतांना दुसर्‍याचे मन संतुष्ट करण्यास प्राधान्य दिल्यामुळे स्वतःच्या गरजा हळूहळू न्यून होऊन साधक निवृत्तीपरायण होतो. सत्सेवा केल्याने ईश्‍वराच्या सगुण रूपाचे, म्हणजे संतांचे किंवा गुरूंचे मन जिंकता येते. त्यानंतर सत्सेवा करत असतांना गुरूंच्या संकल्पानेच शिष्याची शीघ्र गतीने प्रगती होत जाते.

 

३. ईश्‍वरप्राप्तीसाठी (गुरुकृपेसाठी) असत् ची सेवा न करता सत्सेवाच करायला हवी !

असत् ची सेवा (उदा. रोग्यांची सेवा) करतांना ती मिथ्या गोष्टीला सत्य मानून केली जाते. तसेच त्यात ‘मी सेवा करतो’, हा अहंही असतो; त्यामुळे तिचा साधना म्हणून विशेष उपयोग होत नाही. याउलट गुरुसेवा ‘अहं’ला विसरण्यासाठी केली जाते. तसेच असत्सेवेने देवाणघेवाण संबंधही निर्माण होतो. सत्सेवा म्हणजे ‘सत्’ची, म्हणजे ईश्‍वराची सेवा. ती केल्यावर ईश्‍वर कशा अनुभूती देतो, याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.

३ अ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाला येणार्‍यांची
पादत्राणे व्यवस्थित लावून ठेवण्याची सेवा करतांना सूक्ष्म-सुगंध येणे अन् आनंद अनुभवणे

‘१९९८ मध्ये वडाळा, मुंबई येथे सनातनचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मला कार्यक्रमाला येणार्‍यांची पादत्राणे एके ठिकाणी व्यवस्थित लावून ठेवण्याची सेवा मिळाली होती. ती सेवा करत असतांना मला गुलाबाच्या सूक्ष्म-सुगंधाची अनुभूती आली, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करतांना मी संपूर्ण दिवस कधीही न अनुभवलेला आनंद अनुभवला.’ – श्री. मनोज पेवेकर, मुंबई

 

४. अध्यात्मप्रसार : सर्वोत्तम सत्सेवा

४ अ. महत्त्व

४ अ १. गुरूंनी दिलेले नाम, ज्ञान आपण इतरांना देऊन वाढवणे, हा अध्यात्मप्रसार !

एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले व सांगितले, ‘‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’’ एका वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले व त्याला विचारले, ‘‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’’ त्यावर त्या शिष्याने ‘‘हो’’ म्हणून गहू ठेवलेला डबा आणून दाखविला व म्हणाला, ‘‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’’ त्यानंतर गुरूंनी दुसर्‍या शिष्याला गव्हाबद्दल विचारले. तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. गुरु पहातात तर सगळीकडे गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना खूप आनंद झाला. असेच आपल्या गुरूंनी दिलेले नाम, ज्ञान आपण इतरांना देऊन वाढविले पाहिजे.

४ अ २. समाधीपेक्षा अध्यात्मप्रसार महत्त्वाचा

देखोनी सिद्ध सुखावती । समाधि लागली यासी म्हणती ।
सावध करावा मागुती । लोकोपकाराकारणें ।। ५२:५ ।।

म्हणोनी हस्तें कुरवाळिती । प्रेमभावे आलिंगिती ।
देहावरी ये ये म्हणती । ऐक बाळा शिष्योत्तमा ।। ५२:६ ।।

तूं तरलासी भवसागरीं । रहासी ऐसा समाधिस्थ जरी ।
ज्ञान राहील तुझ्या उदरीं । लोक तरती कैसे मग ।। ५२:७ ।। – श्री गुरुचरित्र

४ अ ३. गुरूंच्या निर्गुण आणि सगुण रूपांची सेवा

अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.

४ आ. अध्यात्मप्रसार कसा करावा ?

‘धर्म व साधना यांबद्दल मलाच माहिती नाही, तर मी अध्यात्माचा प्रसार कसा काय करू शकेन ?’, असे काही जणांना वाटण्याची शक्यता असते; पण ते चुकीचे आहे. कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीने उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपापल्या काठ्या लावून पर्वत उचलून धरायला आपल्या परीने मदत केलीच होती. ‘गुरु म्हणजे ईश्‍वर’ धर्मग्लानी दूर करणार आहेच; पण आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवा. प्रसारासाठी ज्याला अध्यात्माचा अभ्यास करून इतरांना शिकविता येते त्याने ते करावे व ज्याला आर्थिक साह्य करता येईल त्याने ते करावे. ज्याला हे दोन्ही शक्य नाही तो प्रसारासाठी भित्तीपत्रके व कापडीफलक लावणे, माहितीपत्रके वाटणे, वैयक्तिक संपर्काने इतरांना माहिती सांगणे, सत्संगाच्या जागेची साफसफाई करणे, सत्संगासाठी सतरंज्या घालणे, खुर्च्या लावणे, या कार्यासाठी पैसे गोळा करणे वगैरे गोष्टी करू शकतो.

४ इ. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती

सध्या दहशतवादी आणि नक्षलवादी यांनी देशात थैमान माजवले आहे. दारिद्र्य, जात्यंधता, सामाजिक विषमता, भ्रष्टाचार, आरक्षण यांसारख्या अनेक समस्यांनी देशाला घेरले आहे. थोडक्यात राष्ट्र रसातळाला जात आहे.देशाला निधर्मी राज्यकर्ते लाभले आहेत व हिंदूंमध्ये धर्मपालनाचा मोठा अभाव आढळत आहे. हिंदुद्वेष्टे व धर्मद्रोही यांच्याकडून हिंदु धर्म, देवता, संत, राष्ट्रपुरुष व धर्मग्रंथ यांची खुलेआम विटंबना व धर्महानी होत आहे. हिंदूंचे धर्मांतर केले जाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. धर्म नष्ट झाला, तर राष्ट्र व पर्यायाने आपण सर्व नष्ट होऊ. यासाठी राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांच्या संदर्भात समाजाला जागृत करणे महत्त्वाचे ठरते.

४ ई. हिंदुसंघटन

हिंदु धर्माला विरोध करायची वेळ आल्यावर धर्मद्रोही एकत्र येतात. या तुलनेत हिंदु धर्माच्या व राष्ट्राच्या नावाखाली हिंदूंचे संघटन होण्याचे प्रमाण फार कमी आहे. हिंदूंचे संघटन झाले, तर हिंदु धर्माचे आणि राष्ट्राचेही रक्षण होईल. यासाठी हिंदुसंघटनासाठी प्रयत्न करणे, हाही समष्टी साधनेचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

या लेखात दिलेले सत्सेवेचे महत्त्व समजून घेऊन अधिकाधिक मुमुक्षू आणि साधकजन यांच्याकडून जास्तीतजास्त सत्सेवा घडो आणि त्यांच्यावर गुरुतत्त्वाचे पूर्ण कृपा होवो, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’

Leave a Comment