आगामी भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रथमोपचार शिका !

सर्वसाधारणपणे ‘प्रथमोपचार’ म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत ! सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे. पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध होणे, हृदयविकाराचा आकस्मिक झटका येणे अशा अनेक प्रसंगी वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंतचा कालावधी पुष्कळ महत्त्वाचा असतो. काही मिनिटांच्या या कालावधीत मिळालेल्या योग्य प्रथमोपचारामुळे रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतो. ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन प्रत्येक सुजाण नागरिक उत्तम प्रथमोपचारक बनावा, तसेच आगामी महायुद्धकाळात समाज अन् राष्ट्र यांच्या सेवेसाठी प्रत्येक घर हे ‘प्रथमोपचार केंद्र’ व्हावे, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना !

 

१. तिसरे महायुद्ध

युद्धकाळ म्हणजे नागरिकांच्या राष्ट्राभिमानाच्या परीक्षेचा काळ ! या काळात स्वराष्ट्रासाठी योगदान देणे, हे प्रत्येक नागरिकाचे अलिखित राष्ट्रीय कर्तव्यच असते. युद्धजन्य परिस्थितीत तर सर्वाधिक हानी ही राष्ट्राची खरी संपत्ती असलेल्या मनुष्यबळाची अर्थात् नागरिक आणि सैनिक यांची होते. ही हानी रोखण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला युद्धसज्ज करण्यासाठी इंग्लंडने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात देशातील नागरिकांच्या साहाय्याने ठिकठिकाणी प्रथमोपचाराची विशेष पथके उभारली होती. या पथकांनी घायाळ सैनिक आणि नागरिक यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना वाचवण्याचे, तसेच त्यांना पुनश्‍च युद्धसज्ज होण्यास सिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. आज जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे; म्हणूनच आगामी युद्धकाळात राष्ट्रहितार्थ योगदान देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘प्रथमोपचारा’चे प्रशिक्षण घेऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

 

२. नैसर्गिक आणि मानव-निर्मित आपत्ती

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कधी भीषण स्वरूप धारण करतील, ती वेळ सांगून येत नाही. एखाद्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती असो कि देशभरात दंगलींच्या माध्यमातून वारंवार उसळणारा हिंसाचार असो, अशा आपत्तींमध्ये मनुष्यहानी न्यूनतम व्हावी, यासाठी सदैव सिद्ध रहाणे, हे शासन आणि प्रशासन यांच्यासह नागरिकांचेही उत्तरदायित्व ठरते. महापूर अन् भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, दंगली अन् अराजक यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती आणि युद्धासारख्या राष्ट्रीय आपत्ती यांत मनुष्यहानी अधिक होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक बंधुत्व, युद्धकाळात राष्ट्रबंधुत्व आणि दंगलीच्या काळात धर्मबंधुत्व प्रत्येकाला दाखवावे लागते. अशा प्रसंगी बहुसंख्य समाज प्रथमोपचार प्रशिक्षित असेल, तर मनुष्यहानीत घट करणे शक्य होते.

आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क करा !

१. पोलीस : १००

२. अग्नीशमन दल : १०१

३. रुग्णवाहिका : १०२

४. आपत्कालीन साहाय्य केंद्र (इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर) : १०८

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment