प्रथमोपचार प्रशिक्षण : भावी आपत्काळाची आवश्यकता !

Article also available in :

prathamopchar

सर्वसाधारणपणे ‘प्रथमोपचार’ म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत ! सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढते असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ प्रत्येक सुजाण नागरिकाने घेऊन प्रथमोपचारक होणे आवश्यक झाले आहे.

१. प्रथमोपचारक हा रुग्णांसाठी एकप्रकारे देवदूतच !

किरकोळ स्वरूपाच्या जखमेतून रक्तस्राव झाल्यास सामान्यपणे कोणी गोंधळून जात नाही. एखादी गंभीर दुखापत होते, तेव्हा ‘नेमके काय करायला हवे आणि काय करायला नको’, याविषयी अनेकांचा गोंधळ होऊ शकतो. जखमेतून मोठा रक्तस्राव होणे, हाड मोडणे, स्नायूंना दुखापत होणे, सांधा निखळणे, स्नायूंत गोळा येणे आदीप्रसंगी कोणते प्रथमोपचार करायचे, तसेच ‘ड्रेसिंग’, ‘बँडेज’ आणि झोळी बांधणे (स्लिंग) या कृती कशा कराव्यात, याविषयी प्रथमोपचारकाला किमान माहिती असणे आवश्यक आहे. पाण्यात बुडल्याने बेशुद्ध होणे, हृदयविकाराचा आकस्मिक झटका येणे, अशा अनेक प्रसंगी वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंतचा कालावधी पुष्कळच महत्त्वाचा असतो. काही मिनिटांच्या या कालावधीत मिळालेल्या योग्य प्रथमोपचारामुळे रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येऊ शकतो. म्हणून प्रथमोपचारक हा रुग्णांसाठी एकप्रकारे देवदूतच ठरतो.

२. उपयुक्त असलेली ‘AB-CABS’ ही प्रथमोपचार पद्धत !

प्रथमोपचार कसे करावेत, प्रथमोपचार पेटीत कोणते साहित्य असावे ?, ‘रुग्णाच्या विकाराचे प्राथमिक निदान आणि प्रत्यक्ष पडताळणी (तपासणी) कशी करावी ? आदींविषयी प्रथमोपचारकाला माहिती असणे आवश्यक आहे. प्रथमोपचाराच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा आणि उपयुक्त पालट झाला होता, तो वर्ष २०१० मध्ये. त्या वर्षापासून ‘AB-CABS’ ही प्रथमोपचार पद्धत सर्वत्र वापरली जाऊ लागली. त्यापूर्वी प्रथमोपचाराची ABC – दुसरे नाव DRSABCD – ही पद्धत वापरली जात असे. ‘AB-CABS’ ही पद्धत गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी वापरली जाते. म्हणूनच प्रथमोपचारकासाठी ही प्रथमोपचार पद्धत नेमकी काय आहे, संबंधित रोगांची लक्षणे काय आहेत आदी जाणून घेणे आवश्यक आहे. तथापि एखाद्या आजाराची वैद्यकीय ग्रंथात सांगण्यात आलेली सर्वच लक्षणे एकाच वेळी एखाद्या रुग्णात आढळतील असे नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

३. श्‍वानदंश वा सर्पदंश यांवरील प्रथमोपचार करता येणे क्रमप्राप्त !

गुदमरणे, भाजणे, विजेचा धक्का बसणे, शरिराच्या तापमानातील पालट यांमुळे होणारे विकार, विषबाधा, रस्त्यावरील अपघात आदीप्रसंगी करावयाचे प्रथमोपचारही प्रत्येक प्रथमोपचारकाला ज्ञात असणे हितकारक आहे. त्याच्या पुढच्या टप्प्याला श्‍वानदंश, सर्पदंश झाल्यास संबंधितावर प्रथोपचार कसे करावेत, याविषयीही प्रथोपचारकाला योग्य माहिती असणे क्रमप्राप्त आहे. श्‍वानदंशावरील प्रथमोपचाराविषयी जाणून घेतांना भारत शासनाने सिद्ध केलेल्या ‘नॅशनल गाईडलाइन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ अ‍ॅनिमल बाईट्स’चा, तर सर्पदंशावरील उपाययोजनांसाठी भारत शासनाने सिद्ध केलेल्या ‘नॅशनल स्नेकबाईट मॅनेजमेंट प्रोटोकॉल’चा अभ्यास करणे अचूक प्रथमोपचारासाठी साहाय्यभूत ठरेल.

४. प्रत्येक सुजाण नागरिकाने प्रथमोपचारक बनावे !

प्रथमोपचाराविषयीचे प्रशिक्षण हे तज्ञांकडून घेणे योग्य ठरते. संकटे काही कोणावर सांगून येत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन उत्तम प्रथमोपचारक बनणे अपेक्षित आहे.

(सनातनच्या ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ या ग्रंथाच्या मनोगताच्या आधारे संकलित केलेला लेख. )