गुरुपूजनासारखीच ‘मातृ-पितृ पूजना’ची आणि सार्थ श्री लक्ष्मीपूजनाची आवश्यकता ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक पूजनीय संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिवाळीनिमित्त धारकर्‍यांना दिलेला संदेश समस्त हिंदु समाजासाठी आचरणीय आहे. या लेखातून ‘हिंदु संस्कृतीमध्ये ओतप्रोत भरलेले श्रेष्ठत्व आणि पाश्‍चात्त्य कुप्रथेचे थिटेपण’ यांचा ठायीठायी अनुभव येतो. हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही !

१. ‘दोन देह एक आत्मा’, अशा प्रकारे
पती-पत्नीतील पवित्र नाते वर्णन करणारा हिंदु धर्म !

‘प्रतिवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्या सर्व माता-भगिनी वटसावित्रीची पूजा मनोभावे करतात. कडकडीत उपवास करतात आणि अगदी मनःपूर्वक भगवंताच्या पायाशी कळवळून आर्ततेने मागणे मागतात, ‘मी आणि माझे पती यांचे हे पती-पत्नीचे नाते अभेद्यपणे निरंतर अनंत काळापर्यंत राहू दे.’ कवी कुलगुरु श्री कालीदास यासंदर्भात आपल्या काव्यात ‘भावस्थिराणी जननांतर सौहृदानी’, असे वर्णन करतात. हृदयाची नाती अनेक जन्मांनंतरही पुढच्या अनेक जन्मांत तशीच अप्रतिहतपणे (अव्याहतपणे) वाहत रहातात.

राजा सत्यवानाचे प्राण घेऊन यम निघाला, तसे सती सावित्रीने यमाचा वायू गतीने पाठलाग करून, त्याला गाठून, त्याला अडवून, त्याच्यापुढे उभे राहून, स्वत:च्या पतीचे प्राण परत माघारी आणले अन् स्वत:चे सौभाग्य अढळ ठेवून अतर्क्य कोटीची पतीनिष्ठा सिद्ध केली. संसारात पती आणि पत्नी यांचे नाते संशयातीत, संदेहरहित, अभेद्य, अतूट असेच असले पाहिजे. पती आणि पत्नी या उभयतांतील एकरूपता, एकमयता, एकतानता आणि एकजीवता, याच गोष्टी कुटुंबातील सर्व सुखाचा पाया आहेत. उभयतांतील अभेद्यता त्यांच्या संसारात साठवलेली आहे. ‘दोन देह एक आत्मा’, असेच त्यांच्या एकजीव नात्याचे वर्णन करावे लागेल.

 

२. विठ्ठलचरणांशी असलेल्या एकनिष्ठेची
उपमा ‘पातिव्रात्या’ला देणारे संत तुकाराम महाराज !

‘एक एका जडले कैसे । जीवा अंग जैसे तैसे ॥’

असे श्री तुकोबाराय म्हणतात, म्हणजेच एकी एक विसावले. असेच कुटुंबात पतीपत्नीचे परस्परांशी नाते असले पाहिजे. ‘पती-पत्नी संसारी जीवनात सुखदु:खाच्या प्रसंगांत एकाच अंतःकरणाचे असले पाहिजेत’, असे आपण सर्व हिंदू मानतो. श्री तुकोबाराय यांच्या अंतःकरणात विठ्ठलचरणाशी असलेली निष्ठा, श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करतांना ते म्हणतात,

पतीव्रता नेणे आणिकांचीं स्तुती । सर्वभावे पती ध्यानी मनीं ॥

तैसे माझे चित्त एकविध झाले । नावडे विठ्ठलेवीण दुजे  ॥

सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गान ते कोकिळा वसंतेसी ॥

तुका म्हणे बाळ माते पुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘विठ्ठला ! तुझ्या पायी माझी निष्ठा अशी आहे –

अ. ‘सूर्य उगवला तरच सूर्यविकासिनी कमलिनी उगवणार आणि सूर्य मावळतीला जाऊ लागला की, ती सूर्यविकासिनी कमलिनी कोमेजणार नि मिटणार. शरद ऋतुतील पौर्णिमेच्या चंद्राच्या दर्शनानेही ती उमलणार नाही. उमलण्यासाठी तिला सूर्यदर्शनच व्हावे लागते.’

आ. ‘मासानाम् मार्गशीर्षोऽहम् ॥’, असे श्रीभद्भगवद्गीतेत ‘विभूतियोग’ अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात. याचा अर्थ असा की, ‘बाराही मासांतील मार्गशीर्ष मास हे भगवंताचे प्रखर रूप आहे. आपण त्याला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतो; पण अशा पुरुषोत्तम मास असणार्‍या मार्गशीर्ष मासात कोकिळेला कंठ फुटत नाही, तर ‘ऋतूनाम् कुसुमाकर:’ असे वर्णन असलेल्या वसंत ऋतूतच, म्हणजेच चैत्र-वैशाख मासांतच कोकिळेला कंठ असतो. आपण तेव्हाच कोकिळेचे कूजन ऐकू शकतो.

इ. गर्दीत आईचे बोट सोडून तिच्यापासून दूर गेलेले लहान लेकरू, आईशी चुकामूक झाल्यावर टाहो फोडून आईसाठी रडू लागते. अनेकजण समजूत घालण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्याचे रडणे काही थांबत नाही. अंतत: आईचा शोध घेऊन तिचे दर्शन होताच, आई दिसली नि भेटली की, लगेच तेच लेकरू रडणे चालू असतांनाच आनंदाने नाचू लागते. आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारते आणि पदराखाली अमृतपान करण्यात दंग होते.

ई. पतीव्रता ही जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेत पतीवाचून अन्य पुरुषाच्या ‘कल्पनेनेही स्पर्श’ सहन करू शकत नाही. ध्यानी, मनी, स्वप्नी, जनी तिला केवळ पतीचाच ध्यास असतो. सूर्यविकासिनी कमलिनी सूर्याशी एकरूप, एकतान, एकमय, एकचित्त असते. कोकिळा वसंत ऋतूशी एकतान, एकमय, एकचित्त नि एकरूप असते. लेकरू आईशीच एकरूप, एकमय, एकतान, एकचित्त असते आणि पतिव्रता केवळ पतीशी अन् केवळ पतीशीच एकरूप, एकमय, एकतान, एकचित्त असते. अगदी तसेच ‘पांडुरंगा, मी तुझ्याशी एकरूप, एकतान, एकमय, एकचित्त आहे. असंख्य देव असले, तरी केवळ तुझ्याशी आणि तुझ्याशीच माझे पतीव्रतेसारखे नाते आहे.’

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांनाही त्यांच्या अंत:करणात असणारी विठ्ठलनिष्ठा कशी आहे, हे सांगतांना ‘पतीव्रते’विना अन्य उपमा सुचू शकली नाही. नव्हे ‘उपमा कालीदासस्य’ असा गौरवोद्गार ज्यांच्याविषयी आहे, त्या कालिदासांनाही पतीव्रतेवाचून दुसरी उपमा सुचू शकणार नाही. अशी श्रेष्ठ पतीनिष्ठा रोमरोमांत भिनावी, बिंबावी, ठसावी, यांसाठी वटसावित्रीच्या व्रताचरणाचा फार मोठा उपयोग हिंदूंची कुटुंबसंस्था अनंतकालापासून आजपर्यंत टिकण्यासाठी झाला आहे.

 

३. वटसावित्रीचे व्रताचरण अर्थात्
हिंदूंच्या कुटुंबसंस्थेतील श्रेष्ठ पतीनिष्ठेचा आदर्श !

हिंदूंची कुटुंबसंस्था आजही टिकून आहे. त्याचा फार मोठा मूलाधार पातिव्रत्यांत आहे. तो मूलाधार उत्तरोत्तर अधिकाधिक घट्ट होत रहावा, यासाठी आपल्या समाजधुरिणांनी, म्हणजेच ऋषीमुनींनी ‘वटसावित्रीचे व्रत माताभगिनींनी श्रद्धेने आचरावे’, असा दंडक घातला आहे. आपल्या संस्कृतीत पतीच्या पायाशी अभंग निष्ठा, श्रद्धा, भावभक्ती ही जोपासण्याची काळजी घेतली आहे. याच आधारावर कुणाचाही संसार चांगला उभा राहू शकतो, हे आपल्या पूर्वसूरींनी चांगले जाणलेले होते. आताच्या समाजजीवनात सर्व भावभावना, निष्ठा उद्ध्वस्त होत चालल्या आहेत. कुटुंबसंस्था अभंग ठेवणारे हे भावबंध निखळू लागले आहेत.

 

४. संसार हा ‘पती-पत्नीचा नव्हे, तर ‘श्री लक्ष्मी-श्रीविष्णु’
यांचा आहे’, असा उदात्त विचार हिंदूंमध्ये रूढ होणे आवश्यक !

वस्त्रांत आडवे आणि उभे धागे असतात. यामुळेच वस्त्र टिकू शकते. हे लक्षात घेऊन आपल्या या संस्कृतीच्या वस्त्रप्रवाहात आणखी एक सांस्कृतिक कार्यक्रम नि कुटुंबसंस्थेचा घट्टपणा वाढवणारा एक भावबंध आपण हिंदु समाजाने जोपासला पाहिजे. हे पाऊल उचलणे, हे अत्यंत उचित आणि उपकारक होणार आहे. ते अत्यावश्यक आहे.

प्रतिवर्षी दीपावलीत घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. अगदी गरिबांतील गरीबही करतोच !

त्या लक्ष्मीपूजनात लक्ष्मीच्या प्रतिमेची आणि धनाची यथासांग पूजा झाल्यावर, प्रत्येक संसारी पुरुषाने म्हणजेच गृहस्थी पुरुषाने आपल्या धर्मपत्नीची पूजा तिला लक्ष्मीस्वरूप मानून केली पाहिजे. पत्नीच्या पायावर दूध आणि पाणी घालून, पाय धुऊन, पाय पुसून, दोनही पायांवर हळदी-कुंकू वाहून, फूल वाहून पूजा केली पाहिजे. तिला पंचारतीने ओवाळले पाहिजे. अचेतन असणार्‍या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची, नाण्यांची पूजा ‘लक्ष्मी’ म्हणून आपण करतो; मात्र ‘पत्नी तर आपल्या संसारातील जिवंत मनुष्य देहात वावरणारी साक्षात् लक्ष्मी आहे’, ही श्रद्धा अंत:करणात मनोभावे धरून हे लक्ष्मीपूजन केले पाहिजे. ‘पत्नी म्हणजे एक स्त्री आणि पती म्हणजे एक पुरुष’, असा अतिशुष्क नि उथळ भाव मनातून काढून टाकला पाहिजे. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे; परंतु अनंत काळापर्यंतची माता आहे. ‘पत्नी ही श्री लक्ष्मी आहे आणि पती हा श्रीविष्णु आहे’, असा उदात्त भाव अंतःकरणांत धरून हे लक्ष्मीपूजन झाले पाहिजे. ‘आमचा संसार पती-पत्नीचा नव्हे, तर तो ‘श्री लक्ष्मी-श्रीविष्णु’ यांचा संसार आहे’, अशी उदात्त भावना अंतःकरणात दृढमूल होण्यासाठी हा सार्थ लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आपल्या समाजात घरोघरी केला पाहिजे. पत्नी जशी पतिव्रता असावी, तसाच पतीसुद्धा पत्नीव्रती असावा. पतीच्या चित्तात पत्नीविषयी तशीच अत्युच्च कोटीची एकरूपता, एकमयता, एकचित्तता आणि एकजीवता असलीच पाहिजे. ही पत्नीनिष्ठा संसाराला उदात्तता, उत्तुंगता, पवित्रता, शुद्धता आणि अपार भावमयता देणारी ठरेल.

 

५. ‘स्त्री-पुरुष समानते’चा विचार स्त्रियांना न्यून लेखणारा !

(हिंदूंनी) स्त्री-पुरुष समानतेच्या अत्यंत उथळ विचारांचा प्रथम त्याग केला पाहिजे. स्त्री-पुरुष समानता, हा अत्यंत किळसवाणा आणि टाकाऊ विचार आहे. ‘स्त्री-पुरुष समानता मानणे’, याचाच अर्थ आपल्या उदात्त आणि पवित्र संस्कृतीला फाटा देणे होय.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।

– मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ५६

अर्थ : जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.

ही उदात्त धारणा पुरुषांच्या चित्तात असली पाहिजे. माता-भगिनींना आपल्या समान लेखून आपण त्यांना अभावितपणे न्यून लेखत आहोत. आपण पुरुषमंडळी त्यांच्याशी स्वत:ची तुलनाच करू शकत नाही. माता-भगिनी मानवी जीवनातील आंतरिक गुणांच्या दृष्टीने अतिश्रेष्ठ असतात. श्रद्धा, निष्ठा, माया, करुणा, दया, आपुलकी, जिव्हाळा, त्यागी वृत्ती,

सहनशीलता आणि सर्वस्वार्पण, हे सर्व दैवी भाव भगवंताने माता-भगिनींना पुरुषांच्या तुलनेत अपार प्रमाणात दिले आहेत. या आंतरिक गुणवत्तेमुळे संसारासाठी सर्वस्वार्पण करून त्या जीवन जगत असतात.

 

६. पातिव्रात्याचा आदर्श निर्माण करणारे
गेल्या ४०० वर्षांतील काही ऐतिहासिक दाखले !

‘मातेचिया चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती ।’

असे संतश्री तुकोबाराय म्हणतात. म्हणजेच ‘मातेचिया चित्ती अवघी ‘संसारा’ची व्याप्ती ।’, असेच त्यांना म्हणावयाचे आहे. ‘पतीनिष्ठ साध्वी माता-भगिनी किती अत्युच्च कोटीची पतीनिष्ठा जगत असतात’, याची असंख्य उदाहरणे हिंदुस्थानच्या सहस्रावधी वर्षांच्या सामाजिक जीवनप्रवाहात आढळतात.

६ अ. पुतळाबाई राणीसाहेब : पुण्यश्‍लोक श्रीशिवछत्रपती दिवंगत झाल्यानंतर विशाळगडावर असलेल्या त्यांच्या पत्नी पुतळाबाई राणीसाहेब यांना ती दु:खवार्ता समजली. तत्काळ त्या रायगडावर आल्या आणि चिता रचून, महाराजांचे पागोटे स्वत:च्या हृदयाशी धरून, अग्निकाष्ठ भक्षण करून ‘सती’ गेल्या.

६ आ. गोदाबाई जेधे : दक्षिण कर्नाटकातील कोप्पळ या संस्थानात मियां हुसेनखान आणि मियां अब्दुर रहमान या पठाणांच्या राजवटीत सर्व जनता अत्याचाराच्या वरवंट्याखाली पार भरडून निघत होती. त्या आसुरी जाचातून मुक्त करण्यासाठी दक्षिण दिग्वीजयाच्या स्वारीवर असतांना श्रीशिवछत्रपती यांनी सरसेनापती श्रीहंबीरराव मोहिते यांना त्या कामगिरीवर सैन्य देऊन धाडले. सरसेनापती श्रीहंबीरराव मोहिते या दोन्ही नराधम पठाणांचे पारिपत्य करण्यासाठी कोप्पळच्या स्वारीवर गेले. कोप्पळच्या घनघोर युद्धात श्रीकान्होजी जेधे यांचा नातू आणि श्रीबाजी जेधे यांचा केवळ २० वर्षांचा सुपुत्र नरवीर श्रीनागोजीराव जेधे रणांगणात लढतांना अपार पराक्रम करून, त्या दोन्ही खानांना पकडतांना, कपाळात शत्रूने मारलेला बाण घुसल्यामुळे गतप्राण झाले. या दुःखद प्रसंगानंतर श्रीशिवछत्रपती हे बाजी जेधेे यांना म्हणाले, ‘तुम्ही आपल्या  कारीस गावी परत जा.’ मात्र स्वतः कारीस गावी न जाता त्यांनी नरवीर नागोजी यांच्या अस्थी आणि निरोप कारीला धाडला. निरोप मिळताच संपूर्ण गाव अथांग शोकसागरात बुडाले. नरवीर श्रीनागोजी यांची पत्नी सौभाग्यवती गोदाबाई चिता रचून सती गेली. त्या वेळी तिचे वय अवघे १७ वर्षे होते.

६ इ. माधवराव पेशवे यांच्या पत्नी : पानिपत युद्धाच्या घावाने खचलेल्या मराठी राज्याला श्रीमंत माधवराव पेशवे सावरून हिमतीने उभे करत होते. यात ते वयाच्या केवळ ३० व्या वर्षी निवर्तले. सर्व हिंदवी स्वराज्य दुःखी झाले; मात्र माधवराव पेशवे यांच्या पत्नी थेऊर येथे माधवराव यांच्या धगधगत्या चितेवर, कपाळावर कुंकवाचा मळवट भरून आणि सतीची वस्त्रे परिधान करून आरूढ झाल्या अन् पतीसमवेत सहगमन करून गेल्या. या तीनही प्रसंगांत सती गेलेल्या तीनही माता-भगिनी अन्य लोकांच्या सक्तीने वा दबावाने सती गेल्या नसून अपार पतीनिष्ठेपोटीच सती गेल्या आहेत.

॥ श्री मातृपितृपूजन ॥

‘श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे संस्थापक पूजनीय संभाजीराव भिडेगुरुजी यांनी दिवाळीनिमित्त धारकर्‍यांना दिलेला संदेश समस्त हिंदु समाजासाठी आचरणीय आहे. या लेखातून ‘हिंदु संस्कृतीमध्ये ओतप्रोत भरलेले श्रेष्ठत्व आणि पाश्‍चात्त्य कुप्रथेचे थिटेपण’ यांचा ठायीठायी अनुभव येतो. हिंदूंनी आपल्या महान संस्कृतीचे हे श्रेष्ठत्व जाणून त्यानुसार आचरण केल्यास, म्हणजेच धर्माचरण केल्यास ‘हिंदु राष्ट्र’ दूर नाही ! या लेखाचा पूर्वार्ध कालच्या अंकात आपण पाहिला. आज उत्तरार्ध पाहूया !   (उतरार्ध)

 

७. इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे यांची पत्नीनिष्ठा !

आगी देखोनिया सती । अंगीं रोमांच उठती ॥

हा तो नव्हे सत्यवाद । सुख अंतरीं उल्हास ॥

वित्त गोताकड़े । न देखे न रडे ॥

आठवोनी एका । उडी घाले म्हणे तुका ॥

श्री तुकोबारायांनी सती जाणार्‍या पतिव्रतांचे केलेले हे वर्णन किती यथार्थ आहे, याची जाणीव होते. अशा पतीनिष्ठेला साक्षी ठेवून सांसारिक जीवन जगणार्‍या तुमच्या-आमच्या सर्वांच्या कुटुंबातील माता-भगिनी यांच्याकडे पाहून असे वाटते की, अशीच उर्जस्वल पत्नीनिष्ठा सर्वच पतींच्या जीवनात पत्नीसंबंधात जोपासली गेली पाहिजे. मराठ्यांच्या अत्यंत तेजस्वी इतिहासाचे थोर संशोधक, इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशिनाथ राजवाडे यांच्या आयुष्यातील त्यांच्या मनात पत्नीविषयी असणार्‍या निष्ठेचा आपण सर्वांनी अवश्य विचार केला पाहिजे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. २१ व्या वर्षी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पुढे ती कन्या एक वर्षाची होण्याच्या आत निवर्तली. त्यानंतर पत्नीही लगोलग निधन पावली. मामा आणि काका यांनी, तसेच सर्व नातेवाइकांनी ‘विश्‍वनाथ, लग्नाआधी होतास, तसाच आता कोरा झालास. तू पुन्हा विवाह कर, संसारी हो !’, असे सांगितले. त्यावर इतिहासाचार्य म्हणाले, ‘कन्या गेल्यानंतर मी दिवंगत झालो असतो, तर मागे राहिलेल्या माझ्या पत्नीला ‘तू पूनर्विवाह कर !’, असे तुम्ही सर्वजण म्हणाला असता का ?’ त्यांच्या या प्रश्‍नावर सर्वजण निरुत्तर झाले. ‘तुम्ही तिच्याकडून पतीनिष्ठेची अपेक्षा धरून तिने जीवनभर विधवाजीवन जगावे, असेच अपेक्षिले असते. ‘तान्हे लेकरू दिवंगत झाल्यानंतर स्वर्गात तिला स्तनपान मिळावे’, म्हणून तिची आईही लगोलग देवाघरी गेली. ‘ती दोघेजण स्वर्गात आणि मी इथे’, असा आमचा संसार आजही चालू आहे अन् पुढे अनंत काळापर्यंत चालू राहील.’ इतिहासाचार्य पुनरुपि विवाहित होऊन संसारी झाले नाहीत. हा पत्नीनिष्ठेचा असामान्य आदर्श संसार करणार्‍या सर्वच पतींच्या चित्तात असला पाहिजे. तो सदैव जागा राहिला पाहिजे. स्वतःच्या पित्याचे ४ विवाह झाले असतांना प्रभु श्रीरामचंद्र स्वतः मात्र ‘एकपत्नी’ व्रतधारीच राहिले.

त्याचसाठी दिवाळीत होणार्‍या लक्ष्मीपूजनात शेवटचा श्‍वास घेईपर्यंत, देवघरातील नंदादीपासारखे जीवन जगणार्‍या, पत्नीविषयी अशीच उदात्त पत्नीनिष्ठा पतीच्या चित्तात बिंबवण्यासाठी, भिनण्यासाठी, ठसण्यासाठी, एकरूप होण्यासाठी नि नेहमीच्या लक्ष्मीपूजनाला पूर्णत्व येण्यासाठी, जिवंत पत्नीचे ‘लक्ष्मीपूजन’ करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

८. ‘मातृ-पितृ’ पूजनाची प्रथा अवलंबणे आवश्यक !

दीपावलीचा खरा प्रारंभ ‘गोवत्स द्वादशी’पासूनच होतो. त्या दिवशी गोमातेची पूजा घराघरांतील माता न चुकता करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी ब्रह्माची पूजा करण्याची पद्धत आहे. कुटुंबसंस्थेत भगवंताप्रती अधिकाधिक भाव, भक्ती आणि श्रद्धा निर्माण करण्यासाठी आपण ती पद्धत आचरली पाहिजे. ‘ब्रह्मदेव’ हा जगाचा म्हणजेच सर्व प्राणीमात्रांना जन्म देणारा देव आहे. कुटुंबात आपण सर्वजण आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतो. आपणा प्रत्येकासाठी ‘माता-पिता’ हेच ब्रह्म आहेत. त्या दिवशी माता आणि पिता यांची पूजा करून ब्रह्मपूजा साधली पाहिजे. ‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ॥’, ही श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या चित्तात रुजवण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी या ‘मातृ-पितृ’ पूजनाची प्रथा आपण अवलंबली पाहिजे.

 

९. समाजजीवन निकोप आणि निरोगी रहाण्यासाठी धर्माचरण आवश्यक !

ही स्वाभाविक मनोधारणा उगवत्या पिढीत उत्पन्न करणे, राष्ट्र आणि संस्कृती यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करून,

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥’

अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्‍वराचा ईश्‍वर) आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

या गुरुनिष्ठेच्या धारणेसारखीच ‘मातृ-पितृ’ निष्ठा अगदी शैशव वयापासून हिंदुस्थानातील सर्व लोकांच्या अंतःकरणात निर्माण होणे अत्यावश्यक आहे. माता-पिता यांच्या ठायी अत्यावश्यक असलेल्या निष्ठेच्या अभावी समाजात कितीतरी कलंकभूत असणार्‍या घटना घडत आहेत. ‘वृद्धाश्रम’, ‘बालसुधारगृह’, ‘बाल मनोरुग्णालये’ आणि ‘घटस्फोटांची सतत वाढत जाणारी संख्या’ भविष्याच्या समाजजीवनातील भीषण अनैतिकतेच्या काळोखाची कल्पना देत आहेत. समाजजीवन निकोप आणि निरोगी रहाण्यासाठी धर्मसंस्कृतीच्या मार्गावर काही उदात्त आचारपद्धती रूढ करणे अत्यंत आवश्यक आहे. ‘सामाजिक सुधारणा’ आणि ‘स्त्री-पुरुष समानता’ यांसारख्या फसव्या कल्पनांचा त्याग करून राष्ट्रकुटुंब सांस्कृतिक अनुबंधाच्या आधारावर उभे केले पाहिजे.

 

१०. ‘मातृ-पितृ’ भक्ती हा प्रखर देशभक्तीचा मूलाधार !

धनत्रयोदशीच्या दिवशी आई-वडिलांची ‘बह्म’ समजून पूजा केल्याने अगदी लहान वयापासून ‘मातृ-पितृ’ भक्ती ही श्रेष्ठ निष्ठा नि श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात पोसली जाईल. देशाचा विचार केला, तर भारतमातेची प्रत्येक कन्या आणि पुत्र यांच्या  अंतःकरणात प्रखर देशभक्ती रोमारोमांत असणे अत्यंत आवश्यक आहे. मातृभक्त आणि पितृभक्त असणार्‍यांच्या अंतःकरणातच या देशभक्तीची निर्मिती अन् जोपासना होऊ शकते. ‘मातृ-पितृ’ भक्ती हा प्रखर देशभक्तीचा मूलाधार (पाया) आहे. पुंडलिक, श्रावणबळ आणि प्रभु श्रीरामचंद्र यांची ‘मातृ-पितृ’ भक्ती आमच्या हिंदु समाजाच्या सर्व कन्यापुत्रांत उत्पन्न झाल्यानेच माता-पिता अन् भारतमाता यांचे ऋण फेडण्यात धन्यता मानणारा राष्ट्रभक्तांचा हिंदुस्थान उभा रहाणार आहे.

 

११. हिंदु धर्म नि संस्कृती यांच्या रक्षणासाठी अंधाराच्या
नाशाचा वनवास घेतलेल्या दीपज्योतीचा आदर्श घ्यावा !

प्रगती, सुधारणा आणि आधुनिकता यांच्या नावाखाली संपूर्ण समाजाचे पाश्‍चात्त्यीकरण होऊ लागले आहे. पाश्‍चात्त्यांच्या सर्वच भ्रष्ट, चारित्र्यशून्य आणि अत्यंत अमंगळ अशा आचार-विचारांचे अंधानुकरण संपूर्ण समाज करू लागला आहे. घराघरांतील दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष संच यांमुळे तरुण पिढी भरकटलेली, बेताल, विषयासक्त, उन्मत्त, उद्दाम आणि पापाचरणात आनंद मानणारी झाल्याने बिघडत चालली आहे. नीतीमत्ता, सुसंस्कृती आणि सदाचरण यांची उगवत्या पिढीला शिसारी वाटू लागली आहे. आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या आणि दैवी गुणसंपत्तीने ओथंबलेल्या संस्कृतीचा नाश होत चालला आहे. अशा भीषण अंधारातून समाजमनाची वाटचाल उदात्तता, उत्तुंगता, पवित्रता आणि शुद्धता यांच्याकडे होण्यासाठी ‘अबोलपणे अंधाराच्या नाशाचा वनवास घेतलेल्या दीपज्योती’चा आदर्श चित्तात धरून आपण धीरोदात्तपणे वाटचाल केली पाहिजे.

‘किती भोवती दाट अंधार ठेला ।

कसे संपवावे आतां या तमाला ॥

असे ज्योतीनें ना कदापि म्हणावे ।

तमाला गिळोनि जगां उजळावें ॥’

हे दीपज्योतीचे ब्रीद चित्तात ठेवून समाजातील सर्वांनी या लेखातील कथन केलेल्या आचारांचा या वर्षीच्या दिवाळीपासूनच प्रारंभ करावा.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment