‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’
कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्र

तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्‍चिम महाराष्ट्र
देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य ! – धर्मगुरु महंत सुधीरदास महाराज

महंत सुधीरदास महाराज

मुंबई – सरकारने ‘टेम्पल अ‍ॅक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे. मंदिरे ही आध्यात्मिक ऊर्जा केंद्रे आहेत. त्यांचा योग्य वापर करायला हवा. आपणच सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजात कार्य करावे. धार्मिक देवस्थानच्या ऊर्जा जपल्या पाहिजेत. येथील समृद्धी, चेतना आणि पावित्र्य टिकवून ठेवलेच पाहिजे. याचा लाभ करून घेऊन आत्मकल्याण, राष्ट्रकल्याण आणि समाजकल्याण साधले पाहिजे, असे प्रतिपादन धर्मगुरु महंत सुधीरदास महाराज यांनी केले. २ ऑक्टोबर या दिवशी ‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीच्या ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडेे ?’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिर प्रवेशाच्या वेळी तोकडे कपडे परिधान न करण्याविषयी नुकत्याच घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित केले होते.

या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव, पुजारी हटाव समितीचे सदस्य डॉ. सुभाष देसाई, सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा भोसले, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चव्हाण यांनी केले.

धर्मगुरु महंत सुधीरदास महाराज पुढे म्हणाले की,

१. पुरो(अधो)गामी मंडळी मनुवादाचा उल्लेख करतात; परंतु मनु यांनी असे काही म्हटले नाही. पुरो(अधो)गामी मंदिरामध्ये दर्शनासाठी जातांना कोणती वस्त्रे वापरावीत, यामागील शास्त्र लक्षात न घेण्याची चूक करतात. या विषयाकडे धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास अधिक योग्य होईल.

२. अध्यात्मशास्त्रानुसार देवीच्या दर्शनाला जातांना रेशमी, नवीन किंवा स्वच्छ धुतलेली, तसेच लाल, पिवळी किंवा हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या वस्त्रांच्या रंगांच्या छटांना जुळणारे मंत्र म्हटल्यास देवीची आणि आपल्या वस्त्रातील रंगांची स्पंदने जुळतात. त्यांचा भाविकांना अधिक प्रमाणात लाभ होतो, असे मंत्र धर्मशास्त्रात आहेत. हा धर्मशास्त्राने सांगितलेला सुंदर विचार ग्रहण करायला हवा.

३. शुचिर्भूत होऊन प्रथम वस्त्रे परिधान करून मंदिरात जावे, असा नियम आहे. नियम न पाळता पायदळी तुडवायचे असतील, तर त्याला आपण काहीच करू शकत नाही.

 

धर्मगुरु महंत सुधीरदास महाराज यांनी तृप्ती देसाई यांना सुनावले !

तृप्ती देसाई यांनी धमक्या देऊ नयेत !

तृप्तीताईंनी यापूर्वीही अनेक आंदोलने केलेली आहेत. हा वादाचा विषय नसावा. वैयक्तिक टीका आणि राग यांविषयी मतभेद असतील, तर त्यातून कोणाला तोडणे किंवा धमक्या देणे अतिशय अयोग्य आहे. तृप्ती देसाई यांनी अशा प्रकारच्या (श्री महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे घालून आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश न देण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेला निर्णय मागे घ्यावा अन्यथा अध्यक्षांना चोप देऊ’, अशी तृप्ती देसाई यांनी धमकी दिली होती.) धमक्या द्यायला नकोत. अध्यात्म आणि संस्कृती या दृष्टीने पहायला हवे. भाविकांना वस्त्रांच्या माध्यमातून आध्यात्मिक लाभ कसा करून घ्यायचा, असा दूरगामी विचार आपल्या ऋषिमुनींनी दिला आहे, तो समजून घेऊन त्याप्रमाणे आपण कृती करायला हवी.

हा निर्णय अगोदरच घ्यायला हवा होता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

चर्चासत्रात विषय मांडतांना सौ. नयना भगत

प्रत्यक्षात हा निर्णय घ्यायला विलंबच झाला आहे. तो लवकरच व्हायला हवा होता. अध्यात्माच्या ठिकाणी ड्रेस कोड पालटले जावेत, असा आग्रह धरतो; परंतु सामाजिक ठिकाणी मात्र मान-प्रतिष्ठा यांमुळे विरोध करत नाही, हे अयोग्य आहे. सात्त्विक वेशभूषा केल्यास मंदिरातील सात्त्विकतेचा लाभ होतो, हे शास्त्र समजून घेऊन मंदिर देवस्थान समितीने घेतलेला निर्णय सर्वांनी स्वीकारल्यास त्यामध्ये सर्वांचेच हित साधले जाणार आहे.

‘फादर किंवा मौलवी यांची गय केली जाणार नाही’, असे म्हणणार्‍या तृप्ती
देसाई यांनी आतापर्यंत त्यांच्या विरोधात कधीच ‘ब्र’ही काढला नाही, हे लक्षात घ्या !

सौ. नयना भगत म्हणाल्या, ‘‘तृप्ती देसाई यांनी धर्माविषयी काही सांगू नये. त्यांना खरोखर महिलांचा कळवळा असेल, तर केरळ येथील ननवर केलेल्या बलात्कारविषयी तुम्ही त्या फादरना काळे फासणार का ? त्यांच्या कानशिलात मारणार का ?’’ यावर तृप्ती देसाई म्हणाल्या, ‘‘हाजी अली दर्ग्यासाठीही आम्ही आंदोलन केले आहे. फादर किंवा मौलवी यांची गय केली जाणार नाही.’’

मंदिर देवस्थान समितीच्या निर्णयाचा
सन्मान करावा ! – अनुराधा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या

मंदिरात भक्ती आणि भावनिकता यांना महत्त्व द्यावे. मंदिरात जातांना कुणीही बीभत्स पोषाख करत नाहीत. देवस्थान समितीने पुढाकार घेतला आहे, यामधून नकारात्मक संदेश जात नाही ना, असे पहावे. पोषाखाविषयी काय करायचे, ते स्त्रिया आणि जनता यांवर सोडावे. मंदिर देवस्थान समितीने दिलेला हा त्यांचा वैयक्तिक संदेश आहे, असे समजून त्याचा सन्मान करावा.

 

संस्कृतीला लाथाडणार्‍यांना असे आवाहन करण्याचा काय अधिकार ?

(म्हणे) ‘अध्यक्षांनी आवाहन मागे घेऊन जाहीर क्षमा मागावी !’ – तृप्ती देसाई, अध्यक्षा, भूमाता ब्रिगेड

हा कायदा नसून आम्ही आवाहन केलेले आहे, असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न अध्यक्ष करत आहेत. अध्यक्षांनी हे आवाहनही मागे घ्यावे आणि जाहीर क्षमा मागावी. तसे केल्यास आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागणार नाही. ही आमची धमकी नसून इशारा आहे. आज या नियमाच्या विरोधात आम्ही काही केले नाही, तर उद्या महिलांना मंदिरात जायलाही बंदी घालतील. असे होऊ नये, यासाठीच आम्ही या निर्णयाला विरोध करत आहोत.

(म्हणे) ‘ड्रेस कोड ठरवण्यापेक्षा भ्रष्ट पुजार्‍यांना
हटवा !’ – डॉ. सुभाष देसाई, सदस्य, पुजारी हटाव समिती

मी नास्तिक नसून आस्तिक आहे. त्यामुळे मला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे. ड्रेस कोड ठरवण्यापेक्षा ‘भ्रष्ट पुजार्‍यांना हटवा’, हा कायदा झालेला आहे, त्याचा वापर करावा. अंबाबाईच्या सर्व उत्सवांमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामील करून घ्यावे.

 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष
श्री. महेश जाधव यांनी तृप्ती देसाई यांना ठणकावले !

काहीही झाले, तरी आम्ही आवाहन मागे घेणार नाही !

कायदा करण्याचा अधिकार न्याय विधी खात्याचा आहे. भक्तांनी मागणी केल्यामुळे दर्शनासाठी सर्वांनीच भारतीय पोषाखामध्ये यावे, असे आवाहन आम्ही केलेले आहे. आवाहन करणे आमचे काम आहे. अधिकार काय आहे, हे आम्हाला कोणी सांगू नये. आम्हाला कायद्याने अधिकार दिलेले आहेत. आम्ही कायद्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही चांगले कार्य केलेले आहे. मोठे निर्णय घेतलेले आहेत. भडक बोलले म्हणजे सर्वकाही होते, असे नाही. आम्हाला धमक्या देऊ नका. तृप्ती देसाई यांनी निर्णय कोणत्या आधारे झाला आहे, त्याचा भावार्थ काय आहे, हे समजून घेऊन चर्चा केल्यास अधिक योग्य झाले असते. ही शाहू महाराजांची नगरी आहे. काहीही झाले, तरी आम्ही आवाहन मागे घेणार नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment