सनातनचे ७२ वे संतरत्न पू. नीलेश सिंगबाळ यांचा साधनाप्रवास – भाग २

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

साधनेच्या प्रवासात साधकांचे वेळोवेळी साहाय्य लाभल्याने, तसेच संतांचे अनमोल
मार्गदर्शन अन् शिकवण मिळाल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पू. नीलेश सिंगबाळ !

१५. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सौ. बिंदा यांची काळजी
करू नका’, असे सांगणे आणि अल्पावधीत त्यांची वेगाने प्रगती होणे

मी वाराणसीहून पहिल्यांदाच गोव्यात घरी आलो असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला गेलो. तेव्हा ते माझ्या पत्नीविषयी म्हणाले होते, ‘‘बिंदाची काळजी करू नका. तिच्या साधनेच्या प्रगतीविषयी  आम्ही बघतो.’’ पुढे तसेच घडले. अल्प कालावधीमध्ये सौ. बिंदा सिंगबाळ यांचे आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्यांची वेगाने प्रगती झाली.

 

१६. साधकांचे लाभलेले साहाय्य !

१६ अ. स्वतःला सेवाकेंद्र किंवा आश्रम येथे रहाता येत नसल्याची
खंत वाटत असतांना वाराणसी सेवाकेंद्रात जायची संधी मिळाल्यावर कृतज्ञता वाटणे

वाराणसी सेवाकेंद्रात येण्याआधी मी गोव्यातील त्या वेळचे सेवाकेंद्र म्हणजे ‘सुखसागर’ येथेे रहाणार्‍या अनेक साधकांना पहायचो. तेव्हा मला वाटायचे, ‘हे साधक किती भाग्यवान आहेत.  साक्षात गुरूंचे वास्तव्य असणार्‍या सेवाकेंद्रात ते रहात आहेत, म्हणजे निश्‍चितच त्यांनी गेल्या जन्मी भरपूर पुण्य केले असणार ! ‘मी तेवढे पुण्य केले नाही; म्हणून या जन्मी तरी मला सेवाकेंद्र किंवा आश्रम येथे रहाता येणार नाही. नंतर मला वाराणसी सेवाकेंद्रात जायची संधी मिळाली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१६ आ. वाराणसी येथील साधकांनी सर्व सेवा शिकवल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

मी वाराणसीला आलो. तेव्हा मला आश्रमजीवनाचा अनुभव नव्हता. येथील साधकांनी मला सेवाकेंद्रातील, अनेक सेवा न कंटाळता शिकवल्या. सेवाकेंद्र आणि प्रसार यांतील विविध सेवांचे नियोजन चांगले होण्यासाठी मला साहाय्य केले. सत्संगात माझे स्वभावदोष आणि चुका सांगून मला साधनेत साहाय्य केले. माझ्यात साधनेचे गांभीर्य निर्माण केले. रुग्णाईत असतांना माझी काळजी घेतली. अनेक प्रतिकूल प्रसंगांत ते सर्व जण माझ्यासमवेत राहिले. अशा साधकरूपी गुरुरूपांविषयी मला नेहमीच कृतज्ञता वाटते. केवळ गुरुकृपेनेच मला या सेवा करता आल्या. त्या सेवांमध्ये प्राविण्य असलेल्या साधकांना विचारून मी शिकायचे प्रयत्न केले आणि त्यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका प्रांजळपणे स्वीकारल्या.

१६ इ. साधकांना तत्त्वनिष्ठतेनेे त्यांच्या चुका सांगून
साधनेत साहाय्य करतांना स्वतःच्या चुकांकडेही अंतर्मुखतेने पहाणे

मी नेहमी तत्त्वनिष्ठ राहून सेवाकेंद्रातील जीवन जगण्याचा प्रयत्न केला. साधकांना मानसिक स्तरावर न सांभाळता त्यांना त्यांच्या चुका सांगून साहाय्य करण्याचे प्रयत्न केले. काही जणांना चुका सांगितल्यावर राग यायचा किंवा प्रतिक्रिया यायच्या; पण ‘वेळप्रसंगी वाईटपणा आला, तरी चालेल; पण ‘देवाला काय वाटते ?’, ते महत्त्वाचे आहे’, असा विचार मी करायचो. ‘सेवाकेंद्रात नेहमी साधनेचे वातावरण असावे, तसेच साधकांंच्या साधनेची हानी होऊ नये’, या उद्देशांनी मी त्यांना चुका सांगायचो. मी माझ्या चुकाही प्रांजळपणे सांगत असे, फलकावर लिहित असे आणि सत्संगात सर्वांना विचारूनही घेत असे. नंतर समितीचे राष्ट्रीय सत्संग चालू झाले. तेव्हा माझ्याकडून झालेल्या चुका सांगून मी स्वतःची शुद्धी होण्यासाठी प्रयत्न केले.

 

१७. स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी विचार येणे

१७ अ. ‘स्वतःची आध्यात्मिक प्रगती होत नाही’, असे वाटून मन खिन्न
होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने आत्मनिवेदन केल्यावर भावजागृतीचे प्रयत्न वाढणे

वरील सर्व सेवा आणि साधना चालू असतांना मी माझी व्यष्टी साधनेची सर्व अंगे, म्हणजे लिखाण, सत्रे, दैनंदिनी इत्यादी पूर्ण करूनच झोपायचो. असे असूनही माझी ‘आध्यात्मिक प्रगती का होत नव्हती ?’, हे मला कळत नव्हते. त्याच वेळी काही साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे घोषित झाले. तेव्हा विचार करून काही वेळा माझे मन खिन्न व्हायचे. नंतर वर्ष २०११ मध्ये रामनाथी आश्रमात एकाच दिवशी ११ साधकांनी ६० टक्के पातळी गाठल्याचे घोषित झाले. तेव्हा पहिल्यांदाच मला वाटले, ‘मीही हा टप्पा गाठू शकीन.’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना शरण जाऊन क्षमायाचना केली आणि ‘मलाही प्रगती करायची आहे’, यासाठी आर्ततेने आत्मनिवेदन केले. यानंतर माझे भावजागृतीचे प्रयत्न आपोआपच वाढले. स्वयंसूचनाही भावपूर्ण होऊ लागल्या आणि आतून काही वेगळे जाणवू लागले. यानंतर इतरांची प्रगती झाल्याची बातमी वाचल्यावर मला आनंद मिळू लागला आणि ‘कधीतरी माझाही क्रमांक लागेल’, अशी श्रद्धा जागृत झाली.

१७ आ. सद्गुरु राजेंद्रदादांना स्वतःच्या प्रगतीविषयी विचारणे, त्यांनी
सांगितल्याप्रमाणे नियमित आढावा चालू झाल्यावर त्यांचे मार्गदर्शन
मिळून साधनेला वेगळेच वळण लागणे आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होणे

डिसेंबर २०११ मध्ये मी कार्यशाळेसाठी देवद आश्रमात गेलो होतो. त्या वेळी एका सत्संगात मी सद्गुरु राजेंद्रदादांना विचारले, ‘‘सर्व प्रयत्न करूनही माझी प्रगती का होत नाही ?’’ तेव्हा त्यांनी मला माझ्या साधनेचा नियमित आढावा देण्यास सांगितले. माझा नियमित आढावा चालू झाला आणि मला त्यांचे अनमोल मार्गदर्शन मिळून माझ्या साधनेला एक वेगळेच वळण लागले. मनातील विचारांचे प्रमाण न्यून होऊन माझ्या आनंदाचे प्रमाण वाढले आणि जून २०१२ मध्ये देवद आश्रमात माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित झाले. त्या वेळी मला वाटले, ‘अन्य साधकांनी पुष्कळ प्रयत्न केले; पण मी विशेष प्रयत्न केले नाहीत, तरी परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर कृपा केली आहे.’

 

१८. समष्टीची तळमळ वाढणे

१८ अ. ‘समितीचे कार्य वाढले पाहिजे, तसेच साधकांची आध्यात्मिक प्रगतीही व्हायला हवी’, ही तळमळ वाढणे

मी ‘समिती समन्वयक’ ही सेवा करतांना मला नेहमी वाटायचे, ‘उत्तरप्रदेश, तसेच बिहार येथील कार्य वाढत नाही. महाराष्ट्र्रातील कार्याच्या बातम्या वाचतांना मला याची तीव्रतेने जाणीव होऊन ‘मी सेवेत न्यून पडतो’, अशी खंत वाटायची. ‘देवाच्या मनात आले की, तोच सर्व करून घेणार’, अशी दृढ श्रद्धा मनात असल्याने मला कधी निराशा आली नाही आणि प्रयत्न करण्याची तळमळ जागृत राहिली. वर्ष २०१५ मध्ये माझ्या मनातील ‘गुरुकार्य पुष्कळ वाढले पाहिजे, तसेच सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हायला हवी’, असे विचार वाढले. त्या अनुषंगाने मी आहे त्या स्थितीतच समितीचे कार्य वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केले. यानंतर गुरुकृपेने माझ्याकडून ‘आंदोलने, सभा, निवेदने देणे, राष्ट्र्र आणि धर्म यांच्याशी संबंधित प्रासंगिक मोहिमा करणे’, आदी प्रयत्न चालू झाले.

१८ आ. समष्टी स्तरावर विषय मांडण्यासाठी प्रयत्न करणे

याच वेळी रामनाथी आश्रमात ‘प्रवक्ता’ सत्संग घेतले जायचे. मी ‘स्वतःमध्ये प्रवक्त्याचे गुण यावेत’, यासाठी सिद्धता करणे आणि सत्संगात विषय मांडणे असे प्रयत्न चालू केले. मी प्रतिमास होणार्‍या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त विषय मांडण्याची, तसेच दूरचित्रवाहिनींना ‘बाईट’ देण्याची (विचार मांडण्याची) सिद्धताही करत होतो. यामुळे माझा अभ्यास झाला आणि विविध विषयांवर बोलायचा सरावही झाला.

१८ इ. सभांमध्ये वक्ता म्हणून बोलायची संधी मिळणे

साधारण वर्ष २०१० पासून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे आयोजित झालेल्या धर्मजागृती सभांमध्ये मला समितीचा वक्ता म्हणून भाषण करायची संधी मिळू लागली. यामुळे सभांमध्ये बोलण्याचा सराव आणि राष्ट्र-धर्म या संबंधीच्या विषयांचा अभ्यासही झाला.

 

१९. ‘प्रसारसेवक’ या नात्याने सेवा करतांना ‘सर्व भगवंतच करत
आहे’, याची जाणीव होणे आणि २ मासांतच ‘समष्टी संत’ म्हणून घोषित होणे

वर्ष २०१७ मध्ये मला असे वाटू लागले, ‘मला लवकरच ‘समष्टी संत’ होऊन समष्टी साधना वाढवली पाहिजे. यासाठी मी प्रार्थनाही करत होतो. वर्ष २०१७ च्या सप्टेंबरमध्ये मला ‘पूर्व भारत प्रसारसेवक’ ही सेवा मिळाली. नोव्हेंबर मासात ‘प्रसारसेवक’ या नात्याने उत्तरप्रदेशमध्ये माझा पहिला दौरा झाला. त्या दौर्‍यात संपर्क करणे, सत्संग घेणे, प्रश्‍नांची उत्तरे देणे आदी सेवा करतांना ‘माझ्या क्षमतेच्या पलीकडे सर्व कार्य होत आहे आणि सर्व भगवंतच करत आहे’, असे मला जाणवले. यानंतर डिसेंबरमध्ये वाराणसी सेवाकेंद्रात मला ‘समष्टी संत’ म्हणून घोषित केले गेले. परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर कृपेचा वर्षाव केला. माझ्यासारख्या सामान्य आणि अज्ञानी जिवाला त्यांनी तारून नेले अन् सर्वांना आनंद दिला.

 

२०. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती करण्यासाठी संपर्क दौरे करणे

यानंतर सलग साडेचार मास हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती करण्यासाठी संपर्क करत असतांना ‘हिंदु राष्ट्रासंबंधी विषयांचा अभ्यास करणे, सत्संग घेणे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारधारेचा प्रचार विविध वर्गाच्या लोकांमध्ये करणे’, ही सेवा करता आली.

 

साधनेच्या प्रवासात संतांचे लाभलेले कृपाशीर्वाद !

१ . परात्पर गुरु पांडे महाराज यांची शिकवण !

१ अ १. ‘अधिवक्त्यांना संपर्क करण्यास न्यून पडल्याचे सांगून
‘संपर्क कसा करावा ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

वर्ष २००८ मध्ये वाराणसी येथे ‘बनारस बार एसोसिएशन’मध्ये ‘फॅक्ट’चे प्रदर्शन (काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारंचे प्रदर्शन) लावले होते. काही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी या प्रदर्शनाला होणारा विरोध मोडून काढला होता. यानंतर उत्तर भारतात पहिल्यांदाच अनेक अधिवक्ते संपर्कात आले आणि वृत्तपत्रांमधून समितीच्या कार्याला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. तेव्हा माझ्याकडून फलनिष्पत्तीचा विचार करून अधिवक्त्यांना संपर्क करण्याचे नियोजन काही काळ झाले नाही. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज अधिवक्त्यांच्या संपर्काच्या नियोजनाचा पाठपुरावा घ्यायचे. त्यांनी मला माझी ही चूक सांगितली आणि ‘कसा संपर्क करावा ?’, हेही त्यांनी सांगितले. यानंतर संपर्क केल्यावर काही अधिवक्ते सनातन संस्थेशी कायमचे जोडले गेले. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या कृपेमुळे सध्या वाराणसी येथील अधिवक्त्यांशी आपले चांगले संबंध निर्माण झाले आहेत. ते आपल्याला कार्यात साहाय्यही करतात.

१ अ २. ‘अल्पसंतुष्टता नको, तर तळमळीने आणि गतीने
प्रयत्न कर’, असे सांगून तळमळ वाढवणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

कधी देवद आश्रमात गेलो, तर मला परात्पर गुरु पांडे महाराज यांचे दर्शन आणि मार्गदर्शन मिळायचे. माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते, ‘‘आता साधनेची गती वाढवायला हवी. अल्पसंतुष्ट राहू नको, तर तळमळीने आणि गतीने प्रयत्न कर !’’ ‘कधी प्रसाद देऊन, तर विजयादशमीला आपट्याचे पान पाठवून देऊन त्यांनी त्यांची कृपादृष्टी नेहमी माझ्यावर ठेवली’, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

 

२. ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची सेवा करायला मिळणे,
तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभणे’, हा जीवनातील एक अमूल्य ठेवा !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने योगतज्ञ दादाजी वैशंपायन त्यांच्या भक्तांसह वर्ष २००८ आणि वर्ष २०१४ मध्ये वाराणसी सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी त्यांच्या सेवेचा आणि अस्तित्वाचा लाभ सर्व साधकांना मिळाला.

वर्ष २००८ मध्ये ते वाराणसीला आले असता सेवाकेंद्रात भजने म्हणण्याचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा त्यांच्या पत्नी आदरणीय सौ. प्रमिला वैशंपायन यांनी भजने म्हटली होती. पेटी (‘हार्मोनियम’) वाजवून मी त्यांना साथ दिली होती. त्या वेळी योगतज्ञ दादाजीही उपस्थित होते. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला संतसेवा म्हणून पेटी वाजवण्याची संधी मिळाली. एक दिवस योगतज्ञ दादाजींनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. तेव्हा मला त्यांचा अनमोल सत्संग लाभला. त्यांच्या चरणांशी बसवून घेऊन त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि केलेल्या तपःश्‍चर्येच्या सामर्थ्याविषयी सांगितले. ते अनमोल क्षण होते.

ते वाराणसीहून परत जात असतांना आगगाडीमध्ये मी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांनी मला ‘आनंदाने रहा’, असा आशीर्वाद दिला. ते श्री काशी-विश्‍वनाथाच्या दर्शनाला जातांना मला त्यांच्यासमवेत जाण्याची संधी मिळाली. योगतज्ञ दादाजींची सेवा करणे, त्यांच्या भक्तांची व्यवस्था करणे आणि अनुष्ठानाची सिद्धता करणे, यांतून मिळालेला आनंद हा जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे. मला एवढ्या थोर संतांचा सत्संग दिल्याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

सनातनच्या संतांचा लाभलेला सत्संग आणि अनमोल मार्गदर्शन !

सनातनच्या अनेक संतांचे अनमोल मार्गदर्शन मला साधनेमध्ये पथदर्शक ठरले. सर्वच संत आपल्यासाठी काही ना काही करतच असतात. ‘त्यांचा केवळ सहवास मिळणे किंवा त्यांनी आपली आठवण काढणे’, हे मोठे भाग्यच असते. त्यांचा साधनाप्रवास हासुद्धा पथदर्शक असतो. सर्व संतांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सहवासात आलेल्या काही संतांविषयी सांगतो.

१ . शिकण्याच्या स्थितीत रहाण्याची शिकवण देणारे परात्पर गुरु कालीदास देशपांडेकाका !

परात्पर गुरु कालीदास देशपांडे

परात्पर गुरु देशपांडेकाका एकदा वाराणसी सेवाकेंद्रात आले होते. मला जवळ बोलावून ते म्हणाले, ‘‘कोणी काही सांगितले, म्हटले, तरी वाईट वाटून घ्यायचे नाही. त्याकडे ‘शिकायला मिळाले’, या दृष्टीकोनातून पहायचे.’ हा त्यांचा आशीर्वादच होता; कारण त्यानंतर विविध प्रसंगांत मी नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहू शकलो.

२ . ‘संतसेवा कशी करायची ?’, याची कृतीतून शिकवण देणारे सद्गुरु सत्यवानदादा !

सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवानदादा वाराणसी सेवाकेंद्रात आल्यावर ‘संत सेवा कशी करायची ? संतांचे मन कसे ओळखायचे ?’, हेे शिकायला मिळायचे. ‘संतांचे मन ओळखणे सहज साध्य नसून त्यासाठी ‘सतत अनुसंधान आणि भाव असावा लागतो’, हे मला शिकायला मिळाले. त्यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे माझ्याकडून दीर्घ कालावधीपर्यंत साधना चांगली व्हायची.

३ . साधनेला योग्य दिशा देणारे सद्गुरु राजेंद्रदादा !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

सद्गुरु राजेंद्रदादा यांनी साधनेचा आढावा देण्याविषयी गांभीर्य निर्माण करून माझ्या साधनेला योग्य दिशा दिली. देवद आश्रमात गेलो असतांना कधी ‘मला त्रास होत आहे’, असे जाणवल्यास त्यांनी सलग काही घंटे मला नामजपादी उपाय करण्यास सांगितले. ‘उपाय पूर्ण झाल्यावर त्याविषयी लघुसंदेश पाठवायला सांगून ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हेेही शिकवले. त्यांनी मला पुष्कळ प्रेमही दिले.

साधनेत पत्नी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सर्वच
कुटुंबीय यांनी वेळोवेळी केलेल्या साहाय्यासाठी, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनी
साधनेसह सर्वच योगक्षेम वाहिल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पू. नीलेश सिंगबाळ !

२३. गुरुकृपेने आजारपणातून तरून जातांना रामनाथी आश्रमात राहिल्यामुळे झालेली २ वर्षांची साधना !
२३ अ. ‘वाराणसी ते नाशिक’ या प्रवासात भुसावळ स्थानकावर उतरण्यासाठी साहित्य उचलतांना अकस्मात तीव्र कंबरदुखी चालू होणे : गेली १५ वर्षे मी उत्तर भारतात राहून सेवा करत आहे. या काळात जशी छोटी-मोठी आजारपणे सर्वांनाच येतात, तशी ती मलाही आली. ऑगस्ट २०१५ मध्ये मी कुंभमेळ्याच्या सेवेनिमित्त ‘वाराणसी ते नाशिक’ हा प्रवास करत होतो. भुसावळ स्थानकावर उतरण्यासाठी सामान उचलतांना मला कंबरदुखीचा त्रास झाला आणि वेदना होऊ लागल्यामुळे मला स्थानकावरच झोपावे लागले. वर्ष २००८ मध्येही असा त्रास मला थोड्या प्रमाणात झाला होता. प्रवासात माझ्यासमवेत सौ. श्रेया प्रभु या सहसाधिका होत्या. नंतर भुसावळच्या साधकांनी मला जळगाव सेवाकेंद्रात नेले. त्या वेळी मला दिवसभर झोपूनच रहावे लागायचे.

२३ आ. विविध सेवांमध्ये सक्रीय असतांना तीव्र कंबरदुखीमुळे झोपून रहायची वेळ आल्याने ‘साधनेत मोठा अडथळा निर्माण झाला’, असे वाटणे : एक आठवडा जळगाव सेवाकेेंद्रात राहून मी त्याच स्थितीत पुणे येथे ‘एम्.आर्.आय.’ या वैद्यकीय पडताळणीसाठी गेलो. पडताळणी झाल्यानंतर मी गोव्याला गेलो. माझे ठराविक व्यायाम करणे आणि विश्रांती, उपचार, तसेच औषधे घेणे इत्यादी सर्व चालू होते. दिवसभर विविध सेवांमध्ये सक्रीय असणारा मी ‘काही करू शकत नाही आणि काही उचलू शकत नाही’, अशा स्थितीला आलो. त्या वेळी ‘साधनेत हा मोठा अडथळा निर्माण झाला आहे’, असे मला वाटले.

२३ इ. आरंभी मन सेवेच्या विचारांमध्ये असणे, जागेवर बसून करता येण्यासारख्या सेवा चालू करणे आणि ५ मासांनंतर प्रकृती मूळ पदावर येणे : आरंभी मन सतत सेवेच्या विचारांमध्ये असायचे. एकदा मी सद्गुरु बिंदाताईंना म्हणालो, ‘‘मी आता वाराणसीला परत जातो; कारण तेथे पुष्कळ सेवा आहेत.’’ वैद्यकीय समादेश (सल्ला) तसा नसल्याने मी जाऊ शकलो नाही. जवळपास ५ मास मी रुग्णाईत होतो; पण मला निराशा आली नाही. ‘मी पुन्हा पूर्वरत होऊन सेवारत होईन’, असेच मला वाटायचे. यासाठी मी प्रार्थनाही करायचो. त्या वेळी मी संगणकीय सेवा करणे, वाराणसी सेवाकेंद्रातील साधकांचा आढावा घेणे आणि प्रलंबित असलेली काही वैयक्तिक कामे करणे यांसाठी प्रयत्न केला. या कालावधीत मी आध्यात्मिक नामजपादी उपाय केले आणि परेच्छेने वागण्याचा प्रयत्न केला. या ५ मासांत माझी स्थिती पुन्हा वाराणसीला जाण्यायोग्य झाली.

२३ ई. गोव्याहून वाराणसीला जातांना परात्पर गुरुदेवांनी काढलेले उद्गार ! : गोव्याहून वाराणसीला जातांना मला परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘‘या आजारपणाच्या कारणाने रामनाथीला रहायला मिळाले, ते चांगले झाले. यामुळे दोन वर्षांची साधना झाली.’’ अशा स्थितीतही त्यांनी माझ्याकडून साधना करून घेतली.

या संपूर्ण कालावधीत साधकांचे मिळालेले साहाय्य अनमोल होते. वाराणसी सेवाकेंद्रातील साधकांनी माझ्या अनुपस्थितीत माझ्या सेवा सांभाळण्याचा प्रयत्न केला. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी आईच्या प्रेमाने मला साहाय्य केले, तसेच सोहमनेही (मुलानेही) माझी पुष्कळ काळजी घेतली.

२४. साधनेत कुटुंबियांकडून वेळोवेळी मिळालेले अनमोल साहाय्य !
२४ अ. पत्नी – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

२४ अ १. स्वतःला साधना करायची इच्छा असूनही स्वतः नोकरी करून पतीला पूर्णवेळ साधना करू देणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा ! : नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करण्याची माझ्या, तसेच पत्नी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मनाचीही सिद्धता झाली होती; पण मला पहिली संधी मिळावी; म्हणून त्यांनी नोकरी चालू ठेवणे स्वीकारले. त्यामुळे मला पूर्णवेळ साधना करता आली.

२४ अ २. ‘पतीची साधना चांगली व्हावी’, हा ध्यास असल्याने साधनेत निरपेक्षपणे साहाय्य करणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा ! : मी साधना करण्यास आरंभ केला. तेव्हा माझा विवाह होऊन ३ वर्षे झाली होती. सर्वसामान्य लोकांचा जीवनाकडे पहाण्याचा उद्देश आणि आमचा उद्देश यांत भेद होता. ‘अध्यात्मशास्त्र हे मनुष्य जन्माचे सार्थक करणारे शास्त्र आहे’, हे समजले होते आणि त्या दृष्टीने विचार करून ते शास्त्र आचरणात आणण्यासाठीचे प्रयत्न टप्प्याटप्प्याने चालू झाले होते. आमच्या नकळत अल्पावधीत साधनेत सक्रीय होऊन मी पूर्णवेळ साधक झालो. तेव्हा आमचा विवाह होऊन ७ वर्षे झाली होती. त्यानंतर वर्ष २००३ पासून मी गोव्याच्या बाहेर सेवेसाठी गेलो. मी आरंभी वर्षातून दोनदा आणि नंतर एकदा घरी येऊ लागलो. मी गोव्याला आल्यावर ‘माझी पुढची साधना चांगली व्हावी’, याचा सद्गुरु बिंदाताईंनाच ध्यास असायचा. नवीन सेवा पहायला लागल्यानंतर त्या काही चांगल्या साधकांसह माझे शिकायचेे नियोजन करायच्या. साधना आणि व्यवहार यांमध्ये मिळालेल्या त्यांच्या साहाय्यामुळे मला त्यांचा नेहमीच आधार वाटतो. माझ्या साधनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

२४ अ ३. पारिवारिक दायित्व असूनही परात्पर गुरुदेवांवरील अपार श्रद्धेमुळे पतीकडून कोणतीही अपेक्षा न करता पतीला सेवेसाठी उत्तर भारतात जाऊ देणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा ! : मी सेवेसाठी उत्तर भारतात जायचे ठरले, तेव्हा आमचा विवाह होऊन १० वर्षे झाली होती. त्या वेळी सद्गुरु बिंदाताईंना आध्यात्मिक त्रास होता आणि त्यांची माझ्याशी अधिक जवळीक होती. साधनेत पुढे जाण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. तेव्हा मी त्यांना साधनेत साहाय्य करत असे. मुलगा लहान म्हणजे ७ वर्षांचा होता. अन्य पारिवारिक दायित्वही होते; पण निरपेक्ष प्रेम आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावर असलेली अपार श्रद्धा यांमुळे कसलीच अपेक्षा न ठेवता त्यांनी मला जाऊ दिले. केवळ ‘माझी साधना व्हावी, प्रगती व्हावी’, एवढाच विचार त्यांच्या मनात होता. नंतर भ्रमणभाषवर नेहमी आमचे साधनेविषयी बोलणे व्हायचे. आवश्यकतेनुसार आम्ही व्यवहारातील विषयांवर बोलायचो.

२४ अ ४. श्रद्धेच्या बळावर स्वतःला होणारा आध्यात्मिक त्रास सहन करणार्‍या, तसेच कौटुंबिक दायित्व आनंदाने स्वीकारून ते पार पाडणार्‍या मोठ्या मनाच्या सद्गुरु (सौ.) बिंदा ! : माझ्या अनुपस्थितीत सद्गुरु (सौ.) बिंदा यांनी लहान मुलगा सोहम्, त्याचे शिक्षण, राहतो त्या घराचे दायित्व, वयस्कर आई-वडिलांचे दायित्व, त्यांच्या आरोग्याची काळजी, सावईवेरे, गोवा, येथील मूळ घरात होणार्‍या वर्षभरातील कुलाचारांचे पालन, नातेवाईक आणि त्यांचे विवाहादी सोहळे, हे सर्व सांभाळले. त्याचबरोबर स्वतःची साधना आणि आध्यात्मिक त्रासांवर नामजपादी उपाय करणे, हा संघर्ष करत अन् अनेक ज्ञात-अज्ञात, तसेच प्रासंगिक दायित्वही त्यांनी केवळ श्रद्धेने पार पाडले. काही प्रसंगी समाजातील लोकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना करावा लागणारा संघर्षही त्यांनी श्रद्धेने केला. एका प्रसंगी माझ्या आई-वडिलांचे शस्त्रकर्म करायची वेळ आली. तेव्हा त्यांनी इतरांचे साहाय्य घेऊन पुढाकार घेतला आणि त्याचे नियोजन केले. त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणजे ‘मला हे करावे लागते, मला अमुक अडचण येते’, असे त्यांनी आजपर्यंत कधीच बोलून दाखवले नाहीच; पण मला कधी तसे जाणवूही दिले नाही. पहिली २ वर्षे सोडल्यास नंतरच्या कालावधीत मी वर्षातून एकदाच घरी येत होतो.

२५ अ ५. गोव्याहून उत्तर भारतात जातांना सर्व सिद्धता करून देणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदा ! : मी गोव्याहून उत्तर भारतामध्ये परत जातांना त्यांनी मला नेहमीच साधनेसाठी प्रोत्साहन दिले. ‘मला लागणारे साहित्य सिद्ध करणे, ‘मला काय हवे-नको ?’ ते पहाणे, नवीन कपडे घेणे, प्रवासात लागणार्‍या वस्तू उपलब्ध करून देणे’, हे सर्व त्या अजूनही करतात.

२५ अ ६. श्री गुरुदेवांच्या कृपेने कुटुंबातील सर्वजण एकमेकांच्या साधनेला पूरक होणे : मुलगा सोहम् लहान असल्यापासूनच मी आणि सदगुरु (सौ.) बिंदा प्रसाराच्या निमित्ताने बाहेर जायचो. त्यामुळे मी त्याला अधिक वेळ देऊ शकत नव्हतो. तो ६ वर्षांचा असतांना मी प्रसारासाठी गोव्याबाहेर गेलो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला कधीच काही न्यून पडले नाही. त्यांनी सर्वांवर भरभरून कृपा केली आणि आम्हाला एकमेकांच्या साधनेला पूरक बनवले.

(क्रमश: लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, उत्तर-पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी. (जुलै २०१८)

सनातनच्या संतांचा लाभलेला सत्संग आणि अनमोल मार्गदर्शन !
सनातनच्या अनेक संतांचे अनमोल मार्गदर्शन मला साधनेमध्ये पथदर्शक ठरले. सर्वच संत आपल्यासाठी काही ना काही करतच असतात. ‘त्यांचा केवळ सहवास मिळणे किंवा त्यांनी आपली आठवण काढणे’, हे मोठे भाग्यच असते. त्यांचा साधनाप्रवास हासुद्धा पथदर्शक असतो. सर्व संतांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सहवासात आलेल्या काही संतांविषयी सांगतो.

१ . साधनेत साहाय्य करणार्‍या, नेहमी आधार
देणार्‍या आणि ‘समर्पणभावा’ने गुरुसेवा करणार्‍या सद्गुरु (सौ.) बिंदाताई !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

सौ. बिंदा (पत्नी) यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर मी साधनेत त्यांचे साहाय्य घेऊ लागलो. ‘माझी प्रगती व्हावी’, याची त्यांनाच अधिक तळमळ आहे. वर्ष २०१५ मध्ये मला कंबरदुखीचा त्रास होत होता. तेव्हा त्यांनी मला आईसारख्या प्रेमाने साहाय्य केले. ‘मला साधनेत साहाय्य व्हावे’, म्हणून त्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून मला नेहमीच आधार दिला. वेळ प्रसंगी माझी चूक सांगूनही त्यांनी मला साधनेत साहाय्य केले. माझ्या आधी त्यांची प्रगती झाली, ही माझ्यासाठी गुरुकृपाच आहे. ‘एकाच वेळी अनेक सेवा कशा करायच्या ? निर्णय कसे घ्यायचे ? प्रेमभाव कसा वाढवायचा ? नियोजन कसे करायचे ? सेवेची गती कशी वाढवायची ? छोटी कृतीसुद्धा परिपूर्ण रितीने कशी करायची आणि त्यांचा समर्पणभाव आदी अनेक गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले

२ . सेवेचे प्रेमळपणे मार्गदर्शन करून संतसेवेचा
आनंद अनुभवायला देणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

एकदा माझ्या मनाची स्थिती चांगली नसतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला नवीन दिशा मिळाली आणि माझा उत्साह वाढला. वर्ष २०१४ मध्ये ‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन त्यांच्या भक्तांसमवेत वाराणसी सेवाकेंद्रात येेणार’, असे ठरले. त्या वेळी जवळपास १० दिवस विविध उनष्ठाने आणि याग केले जाणार होते. तेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ त्यांच्या दौर्‍यातील साधकांसह सेवाकेंद्रात आल्या आणि त्यांनी आमच्याकडून सेवा करून घेतली. त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे आम्हाला आयोजन करायला पुष्कळ सोपे झाले आणि सेवेचा आनंदही मिळाला. ‘संतांचे मन जिंकण्यासाठी कशी सेवा केली पाहिजे ?’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. वर्ष २०१६ मध्ये त्यांचा दैवी दौरा वाराणसी येथे होता. तेव्हा त्या ‘नाडीपट्टी’ घेऊन वाराणसी सेवाकेंद्रात आल्या. सर्व साधकांना त्याचा पुष्कळ लाभ झाला.

३ . साधनेत आधार देणारे आणि अनेक गुणांचा
समुच्चय असलेले सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

वर्ष २०१२ मध्ये सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे ‘मार्गदर्शक’ म्हणून उत्तर भारतात आले. तेव्हा सर्वांच्याच साधनेला एक आध्यात्मिक वळण लागले. त्यांची गुरुकार्याची तीव्र तळमळ पाहिल्यावर माझ्यात साधनेचे गांभीर्य निर्माण झाले. माझ्याकडून होणार्‍या चुका सांगून त्या सुधारण्यासाठी त्यांनी मला साहाय्य केले. ‘विचारण्याची आणि आढावा देण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी मला त्यांचे अनमोल मार्गदर्शन मिळालेे. ‘एखादी चूक सद्गुरु काकांना सांगितली की, त्याचे पापक्षालनच झाले’, असे मला वाटायचे. मला त्यांचा आधार वाटतो. त्यांची प्रेम देण्याची पद्धतही आगळीवेगळी आणि आनंददायी आहे. वर्ष २०१३ मध्ये प्रयाग कुंभमेळ्याला मला त्यांचा पुष्कळ सहवास लाभला आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘सतर्कता, निरीक्षणक्षमता यांसह ‘परीक्षण कसे करायचे ?, सावध कसे रहायला हवे ?’ आदी गोष्टी मला त्यांच्या आचरणातून शिकायला मिळाल्या.

४ . आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन विकसित करणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर !

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

सद्गुरु (कु.) अनुराधाताईंचे त्या संत होण्याआधी मला मार्गदर्शन लाभले आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्याने माझ्यात आध्यात्मिक स्तरावरील दृष्टीकोन विकसित झाले. गेल्या काही वर्षांपासून प्रतिदिन होत असलेल्या समितीच्या राष्ट्रीय सत्संगात त्यांचे मार्गदर्शन मिळून माझ्या साधनेची गुणवत्ता वाढली.

५ . अहवाल परिपूर्ण करण्यास शिकवणारे पू. होनपकाका !

पू. पद्माकर होनप

 

पू. होनपकाका वाराणसीला लेखा पडताळणीसाठी यायचे. त्यांच्याकडून मला ‘लेखा पडताळणीची सेवा परिपूर्ण आणि चिकाटीने कशी करायची ?’, हे शिकायला मिळायचे. एकदा मी त्यांना एक अहवाल संगणकावर दाखवून त्याचे विश्‍लेषण करत होतो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमचा अहवाल बोलला पाहिजे. तुम्हाला काही बोलण्याची आवश्यकताच पडायला नको.’’ ‘अहवाल इतका परिपूर्ण असायला पाहिजे की, वाचणार्‍याला काही प्रश्‍नच पडायला नकोत’, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता.

६ . प्रेमाने चौकशी करणारे पू. भाऊकाका परब !

पू. भाऊ परब

पू. भाऊकाका (परब) यांचा आणि माझा फार जुना स्नेहबंध आहे. मी ‘गोवा येथे सेवा करत’ असतांना बर्‍याच वेळा त्यांच्या घरी राहिलो आहे. ते आवर्जून आणि आठवणीने मला भ्रमणभाष करतात अन् माझी प्रेमाने चौकशी करतात.

– (पू.) श्री. नीलेश सिंगबाळ, उत्तर-पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी. (जुलै २०१८)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात