सनातनचे ७२ वे संतरत्न पू. नीलेश सिंगबाळ यांचा साधनाप्रवास – भाग १

उत्तर भारतात सेवेसाठी गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टरांना
अपेक्षित असे वाराणसी सेवाकेंद्र व्हावे’, या ध्यासापोटी ‘दिसेल ते कर्तव्य’ या
भावाने अविरत गुरुसेवा करणारे आणि भावानंद अनुभवणारे पू. नीलेश सिंगबाळ !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

‘माझा साधनेचा प्रवास म्हणजे सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘गुरूंचे महत्त्व, प्रकार आणि गुरुमंत्र’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाप्रमाणे आहे. यामध्ये गुरु साधकाच्या हाताला धरून त्याला पुढे घेऊन जातांना दाखवले आहे. माझ्याविषयीही अगदी तसेच घडलेे आहे. ‘मी कोणते प्रयत्न केले ?’, असे मागे वळून पहाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा मला ‘मी काही केलेच नाही’, असे जाणवते. माझ्यासारख्या अज्ञानी जिवाची ‘साधना व्हावी’ आणि ‘प्रगती व्हावी’, यासाठी केवळ अन् केवळ परात्पर गुरु डॉक्टर यांनी कधी प्रत्यक्ष रूपाने, कधी सूक्ष्म रूपाने, तर कधी विविध माध्यमांतून माझी साधना करून घेतली आहे.
‘त्यांनी काय काय केले ?’, याचे वर्णन करण्याची माझी क्षमता नाही. गेल्या काही वर्षांपासून रात्री झोपतांना मी कृतज्ञता व्यक्त करतो. तेव्हा मला ‘मी दिवसभरात काही केलेच नाही’, असे जाणवते. ‘माझ्यासारख्या छोट्याशा बालकाची साधना व्हावी; म्हणून त्यांचेच हात-पाय सेवा करत होते आणि मला आनंद देत होते’, असे वाटून माझा भाव जागृत होतो. त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून लिखाण करायचे म्हटले, तरी शब्द अपुरे पडतात आणि मला भावाश्रू येतात. त्यांचे प्रीतीरूप डोळ्यांसमोर येते. त्यांचे स्मरण करून माझ्या बाळबोध बुद्धीला जे समजले, ते लिहायचा मी प्रयत्न करत आहे.

१. साधनेत येण्यापूर्वीची स्थिती

१ अ. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय

‘मी ‘जहाज बांधणी अभियांत्रिकी’चे शिक्षण घेतले असून वर्ष १९९० ते २००१ पर्यंत पहिली ३ वर्षे मी एका खासगी आस्थापनात आणि नंतर ‘सेझा गोवा लिमिटेड’ या ‘मल्टीनॅशनल कंपनी’मध्ये नोकरी केली. ‘असिस्टंट अभियंता’ या पदावर असतांना मी नोकरी सोडली.

१ आ. स्वतःच्याच कोशात रहाणे

साधनेत येण्यापूर्वी मी पुष्कळ महत्त्वाकांक्षी होतो. विदेशात जाऊन पैसे मिळवण्याच्या तीव्र इच्छेने मी प्रयत्न करत होतो. मी स्वतःवर पुष्कळ खर्च करायचो. काही निवडक मित्रांच्या समवेत मला चांगले वाटायचे. ‘व्यापकत्वाचा अभाव आणि अबोल स्वभाव’ यांमुळे मला मिळून मिसळून वागायला आवडायचे नाही. कधी कधी ‘राग येणे आणि स्वतःच्या विचारांत रहाणे’, असेही माझ्याकडून होत असेे.

१ इ. महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे नोकरीच्या ठिकाणी पुष्कळ परिश्रम करणे
आणि त्यातच स्वतःला वाहून घेतलेले असूनही मनाला आनंद अन् समाधान न लाभणेे

माझे नोकरीतले काम म्हणजे ‘जहाज बांधकाम.’ या कामात मी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. मी रात्रंदिवस परिश्रम करत होतो, तरी माझ्या मनाला समाधान नसायचे. ते कामच ‘टाईड एंड, टाईम बाऊंड’, (टीप), असे होते. जहाज बांधणीमध्ये अनेक पडताळण्या असतात आणि त्या प्रमाणित करणार्‍या संबंधित आस्थापनांचे प्रतिनिधी तांत्रिकदृष्ट्या संतुष्ट व्हावे लागतात. तेव्हाच जहाज सक्षम असल्याची मान्यता मिळते. त्यामुळे या कामात मी स्वतःचे समाधान विसरूनच गेलो होतो. ‘एका दृष्टीने नोकरीत असतांनाही देवाने गुणवृद्धी आणि अहंनिर्मूूलन करवून घेतले’, असे आता वाटतेेे.

(टीप – १.  टाईड एंड : ‘टाईड’ म्हणजे नदी वा समुद्र यांच्या पाण्याला भरती आणि ओहोटी येणे. त्या परिस्थितीनुरूप दिलेले काम पूर्ण करावे लागते.

२. टाईम बाऊंड : वेळेचे बंधन असल्याने ठराविक वेळेतच तो प्रकल्प पूर्ण करावा लागतो.)

 

२. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेचा आरंभ

२ अ. पत्नीच्या, सौ. बिंदा यांच्या माध्यमातून साधनेतील विषय प्रतिदिन ऐकायला
मिळणे आणि साधकांची तळमळ पाहून आपणही या जन्मात काहीतरी करावेसे वाटणे

माझी पत्नी सौ. बिंदा सिंगबाळ (आताच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) तेव्हा अधिकोषात (बँकेत) नोकरी करत होत्या. वर्ष १९९६ मध्ये त्यांचे स्थानांतर अधिकोषाच्या फोंडा, गोवा येथील शाखेत झाले. त्या शाखेत सनातन संस्थेचे काही सक्रीय साधक नोकरी करत होते. त्यामुळे प्रतिदिन पत्नीच्या माध्यमातून मला साधनेतील विषय समजत असत. मी ते सर्व केवळ ऐकत होतो; मात्र काहीच करत नव्हतो. सौ. बिंदा मला साधकांच्या अनुभूती आणि संत भक्तराज महाराज यांच्या चरित्राशी संबंधित माहिती सांगायच्या. त्यामुळे माझी जिज्ञासा जागृत झाली. त्या वेळच्या सत्संगसेवक सौ. मंगला मराठे यांच्याकडून मला मुंबईला जाण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. पांडुरंग मराठे यांच्यासमवेत मी मुंबई आणि ठाणे येथील साधकांचा त्रैमासिक सत्संग बघण्यासाठी गेलो होतो. तिथे साधकांची तळमळ बघून मला ‘आपणही या जन्मात काहीतरी केले पाहिजे’, असे पहिल्यांदाच वाटले.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवल्यावर ‘जे शोधत होतो, ते ‘हेच’ आहे’, असे जाणवणे

त्या वेळी प्रथमच मला मुंबईतील परात्पर गुरु डॉक्टरांच्या निवासस्थानी त्यांचे दर्शन झाले आणि मला त्यांच्या चरणांजवळ बसण्याची इच्छा झाली. साधना आणि अध्यात्म यांविषयी काहीही ठाऊक नसतांना मला ‘शिष्य’ या ग्रंथातील मुखपृष्ठाचे स्मरण झाले आणि मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवले. तेव्हा मला जाणवले, ‘मी जे शोधत होतो, ते ‘हेच’ आहे.’ मला परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘काय जाणवले ? चांगले वाटले ना ? शिकायला मिळाले ना ?’’ त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला. अशा प्रकारे माझ्या साधनेचा आरंभ झाला.

२ इ. ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ वाचल्यावर
‘सत्य काही वेगळेच असून स्वतः काही वेगळेच करत आहे’, याची जाणीव होणे

त्या कालावधीत मी ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा ग्रंथ वाचला. ‘ग्रंथ वाचतांना मला काही तरी मिळत आहे’, असे मला जाणवत होते. तो ग्रंथ मी अगदी मनापासून वाचला. त्यामुळे माझ्या मनाच्या स्थितीत पालट होऊ लागला. माझ्या मनात त्यागाचे विचार येऊ लागले. नोकरीत असतांना आणि भौतिक जीवन जगतांनाही मला ‘सत्य काही वेगळेच आहे आणि मी वेगळेच काही तरी करत आहे’, असे जाणवू लागले.

२ ई. सांगली येथील गुरुपौर्णिमेला जातांना प्रवासात कुलदेवीचा नामजप अखंड ७ घंटे होणे

वर्ष १९९६ मध्ये मला सांगली येथील गुरुपौर्णिमेला जाण्याची संधी मिळाली. सत्संगसेवक सौ. मंगला मराठे यांनी आम्हा दोघांनाही गुरुपौर्णिमा महोत्सवात शिकण्यासाठी जाण्याची संधी दिली. तोपर्यंत मी जेमतेम एकाच स्थानिक सत्संगाला गेलो होतो. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आम्ही चारचाकी गाडीमधून प्रवास करत होतो. तेव्हा पहिल्यांदाच माझा कुलदेवीचा ७ घंटे अखंड नामजप झाला. तो मला आतून ऐकू येत होता. यापूर्वी मी कधीही नामजप केला नव्हता. ‘संत भक्तराज महाराज यांनी त्या दिवसापासून माझा नामजप चालू केला’, असे मला वाटले. ही माझी पहिलीच अनुभूती होती.

२ उ. गुरुसेवा करणार्‍या साधकांना मिळणारा आनंद पाहून ‘हा
आनंद मिळवण्यासाठी आपण काहीच करत नाही’, असे वाटणे आणि
‘संत भक्तराज’ या नाटकाचे सादरीकरण होतांना वेगळेच भावविश्‍व अनुभवणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना किती छोट्या छोट्या गोष्टी परिपूर्ण रितीने करायला शिकवतात’, ते मला पहायला मिळाले. ‘सुशिक्षित साधक देहभान विसरून कसे सेवा करतात ? आपले गुण कसे अर्पण करतात ? त्यातून त्यांना आनंद कसा मिळतो ?’, हे सर्व मी पाहिले. त्यानंतर स्वतःकडे पाहिल्यावर ‘मी मात्र हा आनंद मिळवण्यासाठी काहीच करत नाही’, असे मला वाटले. याच सोहळ्यात मला प.पू. रामानंद महाराज यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करायची संधी मिळाली. तेव्हा मला वाटले, ‘संतांनी माझे मन जाणले.’ या वेळी साधना करायची माझी तळमळ वाढली.

या ठिकाणी ‘संत भक्तराज’ या नाटकाचे सादरीकरण झाले होते. ‘संत भक्तराज महाराज यांचे चरित्र’ हा मी वाचलेला ग्रंथच त्यातून उलगडला जात आहे’, असे जाणवून मी एका वेगळ्याच भावविश्‍वात गेलोे.

 

३. साधनेत आल्यावर झालेले पालट

३ अ. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना ‘प्रत्येक कृती गुरुदेवांना आवडेल’, अशी करण्याची ओढ
लागणे आणि साधनेविषयीचे दृष्टीकोन स्पष्ट होऊन साधनेसंबंधीच्या कृतींतून आनंद मिळू लागणे

साधनेला आरंभ केल्यावर ‘गुरुकृपायोगानुसार साधना करून परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा संपादन करणे’, हे माझे ध्येय बनले. सत्संगामध्ये सांगितल्यानुसार किंवा उत्तरदायी साधकांनी शिकवल्याप्रमाणे मी तशी कृती करण्याचा प्रयत्न करत होतो. मी एकही सत्संग चुकवायचो नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला कधीच कोणता विकल्प आला नाही. प्रत्येक कृती करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांना काय वाटेल ?’, हा विचार माझ्या मनात यायचा. नोकरीत असतांना नोकरीच्या स्थानी पोहोचेपर्यंतच्या प्रतिदिनच्या प्रवासात येता-जाता नामजप व्हायला लागला. कामावर अकस्मात काही तांत्रिक अडचणी आल्यावर मला देवाची आठवण येऊन प्रार्थना केली जाऊ लागली. त्यानंतर समस्या सुटतही असे. ‘एखादी अज्ञात दैवी शक्ती मला साहाय्य करते’, असे मला जाणवू लागले. दिवसेंदिवस माझे साधनेविषयीचे दृष्टीकोन स्पष्ट होत गेले आणि साधनेसंबंधीच्या कृतींतून मला आनंद मिळू लागला.

३ आ. साधनेचे ध्येय निश्‍चित होऊन साधना अन् गुरुसेवा यांत मनावरील पहिले मायेचे संस्कार न्यून होऊन अंतर्मनात पालट झाल्याचे जाणवणे पूर्वी माझा बर्‍याच अनावश्यक गोष्टींमधेे वेळ जायचा, उदाहरणार्थ वेगवेगळ्या उपाहारगृहांत जाणे, मित्रांच्या घोळक्यात रहाणे इत्यादी. नंतर या गोष्टींचा माझ्यावरील प्रभाव पुष्कळ न्यून झाला आणि काही काळाने तो नाहीसाच झाला. माझे साधनेचे ध्येय निश्‍चित झाले आणि माझा सर्व वेळ साधना अन् गुरुसेवा यांतच जाऊ लागला. पूर्वी ज्या वस्तू पाहिल्यावर मला त्या हव्याशा वाटायच्या किंवा मी मित्रांसमवेत ज्या उपाहारगृहांत जायचो, त्यांच्यासमोरून जातांना ‘माझ्या मनात त्यासंबंधीचे विचारही येत नाहीत’, असे मला जाणवले. माझे अपेक्षांचे प्रमाण बरेच न्यून झाले होते. गुरुकृपेने ते संस्कारच राहिले नव्हते. माझे मन पुष्कळ वेळा शांत असायचेे. ‘इतरांचा विचार करणे आणि इतरांप्रती प्रेम वाढवणे’, यांसाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. साधकांशी मिळून मिसळून राहिल्यामुळे इतरांशी बोलतांना मला आनंद जाणवू लागला. ‘स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन’ या प्रक्रियांमुळे माझी अंतर्मुखता वाढली. नामजप आणि प्रार्थना यांचे गुणात्मक अन् संख्यात्मक प्रमाणही वाढले. ‘हे सर्व गुरुकृपेनेच झाले’, असे मला वाटते. ‘माझ्या अंतर्मनात पालट घडणे’, ही माझ्यासाठी एक मोठीच अनुभूती आहे.

 

४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सार्वजनिक सभांच्या वेळी दायित्व घेऊन सेवा करणे

४ अ. मिळालेल्या सेवेसमवेतच ‘इतरही सेवांचे
आयोजन कसे करावे ?’ ते सत्संगातून ऐकून शिकता येणेे

याच काळात, म्हणजे वर्ष १९९६ मध्ये गोव्यात परात्पर गुरु डॉक्टरांच्या सार्वजनिक सभांचे आयोजन झाले होते. त्यांची पणजी येथे पहिली सार्वजनिक सभा होती. त्या वेळी मला ‘वाहतूक आणि ‘पार्कींग’ यांसंबंधीच्या सेवेचे दायित्व मिळाले होते. मी त्यासंबंधित सर्व सत्संगांना जात असे. त्यातून मला आयोजनाचे पैलू शिकायला मिळत होतेे.

४ आ. फलक रंगवण्याच्या सेवेतून आणि ‘गुरुदेवांना आवडेल’,
अशी सभेची सेवा करतांना पुष्कळ आनंद मिळणे अन् सहसाधकांशी जवळीक निर्माण होणे

आम्ही त्याच सुमारास आमच्या फोंडा येथील सदनिकेत रहायला आलो होतो. आमच्या सदनिकेत सभेच्या ‘पार्कींग’च्या व्यवस्थेसाठी लागणारेे फलक हाताने रंगवण्याची सेवा जवळपास एक मास चालू होती. प्रतिदिन संध्याकाळी या सेवेसाठी साधक यायचे आणि आम्ही सर्व जण मिळून ती सेवा एकत्र करायचो. या सेवेत मला पुष्कळ आनंद मिळाला. त्यामुळे साधकांविषयी आपुलकी आणि जवळीक वाढू लागली. प्रत्यक्ष सभेची सेवा करतांना ‘सर्व काही परात्पर गुरु डॉक्टर यांना अपेक्षित असे व्हायला हवे’, असा एकच विचार असायचा. सभेचे आयोजन पूर्ण झाल्यावर मिळालेला आनंद हा वेगळाच होता. मला सहसाधकांकडूनही पुष्कळ शिकायला मिळाले.

४ इ. प्रवचन घेण्यास शिकणे

सत्संगसेवक सौ. मंगला मराठे यांनी मला प्रवचन आणि सत्संग घ्यायला प्रायोगिक स्तरावर शिकवले. या सभेच्या प्रचारासाठी प्रवचने घेतली जात असत. या वेळी मी प्राथमिक प्रवचन घ्यायला शिकलो आणि ते घ्यायलाही लागलो.

४ ई. वर्ष १९९७ मध्ये गोव्यात झालेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या सार्वजनिक
सभांच्या निमित्ताने सेवेचे व्यापक स्तरावरील आयोजन शिकायला मिळणे

वर्ष १९९७ मध्ये गोव्यात ७ ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सार्वजनिक सभांचे पुन्हा आयोजन करण्यात आले होते. त्या वेळीही माझ्याकडे ‘वाहतूक आणि ‘पार्कींग’ या सेवांचे दायित्व होते. या वेळी सेवा व्यापक स्तरावर करायची असल्याने समन्वयाचा भाग अधिक आणि सलग काही दिवस करावा लागला होता. त्यामुळे ‘समन्वय करणे, काही दिवसांचे नियोजन करणे, एकच व्यवस्था अनेक ठिकाणी करणे, वस्तूंची जुळवाजुळव अचूकतेने करणे, तपाससूची करणे, कार्याचा व्यापक स्तरावर विचार करणे’, आदी अनेक गोष्टी मला प्रायोगिक स्तरावर शिकायला मिळाल्या. त्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनाही सेवा मिळाली होती. त्या वेळी आमचा मुलगा सोहम् केवळ ७ मासांचा होता. त्याला घेऊनच आम्ही काही दिवस आमची सदनिका बंद ठेवून सेवेसाठी बाहेर पडलो होतो. प्रत्येक ठिकाणी चि. सोहम्ची साधकांकडे रहायची व्यवस्था झाल्याने प्रसारातील साधकांचे पुष्कळ साहाय्य झाले. आम्ही सभास्थळी सेवेसाठी जायचो, त्या वेळी कित्येक पटींनी गुरुसेवेचा आनंद मिळायचा.

 

५. वर्ष १९९९ मध्ये सभेच्या आयोजनाची सेवा मिळाल्यावर
नोकरी, सभेचे नियोजन अन् प्रसार यांत १८ घंटे व्यस्त राहूनही थकवा
न जाणवता अधिकाधिक आनंद मिळणे आणि गुरुकृपेचा ध्यास लागणे

वर्ष १९९९ मध्ये गोव्यात अनेक ठिकाणी पुन्हा सार्वजनिक  सभांचे आयोजन केले होते. तेव्हा २ सभांच्या आयोजनाचे दायित्व मला मिळाले. त्यामुळे मला ‘आयोजनाच्या सत्संगांना जाणे, स्वतः सत्संग घेणे, प्रसाराचेे आयोजन करणे, तसेच साधकांच्या गुण-कौशल्यांचा अभ्यास करणे’, हे सर्व प्रायोगिक स्तरावर करायला आणि शिकायला मिळाले. त्या वेळी मी ‘सझा गोवा’ या आस्थापनात नोकरी करत होतो. मला पहाटे ५ वाजता उठून नोकरीला जावे लागायचेे; कारण जवळपास ६० किलोमीटरचा प्रवास करून सकाळी ८ वाजता कामाला आरंभ व्हायचा आणि नियमानुसार साडेचार वाजता माझे काम संपायचे. बर्‍याच वेळा मला कामावर अधिक वेळही थांबावे लागायचे. मी जाता-येता नियोजनाची वही आणि सर्व धारिका समवेत ठेवायचो आणि बसमध्ये प्रवास करतांना पुढच्या नियोजनाचे चिंतन अन् लिखाण करायचो. मी अनेक वेळा दूरभाषवरून प्रसार, तसेच दैनंदिन नियोजन यांचा आढावा घेत असे. संध्याकाळी ७ वाजता फोेंड्याला पोहोचल्यावर मी थेट सभेच्या प्रसाराला जायचो. रात्री घरी यायला मला १२ वाजायचे. झोपतांनाही मी नियोजनाची वही उशीपाशी ठेवायचो. त्यामुळे झोपेत असतांना मध्येच काही सुचले, तर ते लिहिता येत होते. असे अनेक दिवस चालू होते. या वेळी मला गुरुकृपेचा वेगळाच ध्यास लागला होता. मला दुसरे काही सुचत नव्हते. हे सर्व करतांना सतत आनंद मिळायचा. ‘थकवा येणे किंवा झोप अपूर्ण होणे’, यांचा कधी स्पर्शच झाला नाही. सभा संपन्न झाल्यावर मी सेवेमध्ये आणखी सक्रीय झालो.

 

६. ‘गुरुकार्य आणि साधना’ हेच आयुष्याचे प्राधान्य
बनल्याने पूर्णवेळ साधना करण्याविषयी झालेली विचारप्रक्रिया !

६ अ. दैनिकाचे वर्गणीदार वाढवण्याच्या तळमळीतून मोहीम घेणे आणि त्यातून १०० वर्गणीदार होणे

दैनिक सनातन प्रभातची गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती चालू झाली. तेव्हा माझ्या मनाला ‘वितरण अधिकाधिक व्हायला हवे’, असा एकच ध्यास असायचा. वर्गणीदार वाढवण्यासाठी साधकांचे नियोजन करून मीही त्या सेवेला जात असे. एकदा एका आठवड्यात मडगाव येथे मोहीम केल्यावर १०० वर्गणीदार झाले होते आणि पुष्कळ आनंद मिळाला होता.

६ आ. सनातन संस्थेचा अंगफलक घालून प्रसार करतांना काहीही न वाटणे

दैनिक वितरण आणि वर्गणीदार बनवणे यांसाठी मी अंगफलक घालून फिरत असे. गोव्यातील मडगावसारख्या शहरात आमचे दोन्हीकडचे बरेच नातेवाईक रहातात. कधी कधी ते मला अंगफलक घातलेल्या स्थितीत आणि हातात दैनिक घेऊन फिरतांना पहायचे; पण मला त्याचे काही वाटायचे नाही.

६ इ. मायेतील गोष्टींत मन रमत नसल्याने पूर्णवेळ साधना करण्याचे विचार येऊ लागणे

नातेवाइकांकडे जाणे, त्यांच्याकडील कार्यक्रमांना उपस्थित रहाणे, तसेच मित्र, सहकारी, नोकरी आदींमध्ये, तसेच अन्य कोणत्याही गोष्टींत माझे मन रमत नव्हते. कामावरून सुटी घेऊन मी सेवेलाच वेळ देत असे. मी अनेकदा अशा सुट्या घेतल्या. याच वेळी माझ्या मनात पूर्णवेळ साधना करण्याचे विचार घोळू लागले.

६ ई. विदर्भ येथील प्रसार दौर्‍यावर असतांना पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय होणे

या कालावधीत श्री. प्रकाश जोशी यांचे महाराष्ट्रातील विदर्भ या भागात प्रसार दौरे असायचे. त्यांच्या एका दौर्‍यात मला त्यांच्यासमवेत शिकायला जायची संधी मिळाली. जवळपास एक मास चालू असलेल्या या दौर्‍यात मला ‘दौर्‍याचे नियोजन करणे, अभ्यासवर्ग घेणे, साधकांना साधनेचे दृष्टीकोन देणे, तसेच त्यांना घडवणे’, अशा विविध गोष्टी प्रायोगिक स्तरावर शिकायला मिळाल्या. हा दौरा माझ्या साधनेतील प्रवासाला एक वेगळी दिशा देणारा ठरला. याच दौर्‍यात पूर्ण वेळ साधक होण्याच्या दृष्टीने श्री. प्रकाश जोशी यांनी मला अनमोल साहाय्य केले. यामुळे मला त्यांच्याप्रती नेहमीच कृतज्ञता वाटते. दौरा संपवून मी गोव्यात आलो. तेव्हा माझ्यामध्ये व्यापकत्व, दायित्वाची जाणीव आणि आत्मविश्‍वास हे सर्व वाढल्याचे मला जाणवले.

 

७. पूर्णवेळ साधना करू लागल्यावर ‘गोवा उत्तरदायी साधक ’ म्हणून केलेली सेवा !

७ अ. डॉ. दुर्गेश सामंत यांचे सेवेसाठी वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन !

उत्तरदायी साधक म्हणून सेवा करायचा मला फारसा अनुभव नव्हता; पण शिकण्याची आणि सेवा करण्याची तळमळ होती. ‘माझ्यावर विश्‍वास ठेवून मला ही सेवा दिली गेली’, ही केवळ गुरुकृपाच आहे. त्या वेळी मला बरेच प्रश्‍न आणि अडचणी येत अन् त्याविषयी सतत विचारून घ्यावे लागायचे. अशा वेळी मी डॉ. दुर्गेश सामंत यांच्याकडे फोंड्यातील ‘सुखसागर’ येथे जात असे. तेव्हा त्यांच्याकडे सेवांचा व्याप भरपूर असायचा, तरीही ते मला घंटोन्घंटे वेळ देऊन दिशा द्यायचे. त्यामुळे ‘मला निर्णय कसा घ्यायचा ?’, याचे मार्गदर्शन मिळायचे. वर्ष २००१ मध्ये गोव्यात सर्वधर्मसभेचे आयोजन झाले. तेव्हाही मला डॉ. सामंतांचे मार्गदर्शन सतत मिळायचे. ‘दायित्व असलेल्या साधकाचे दृष्टीकोन कसे विकसित व्हायला हवेत ? वेळेचे महत्त्व आणि नियोजन, नियोजनातील बारकावे, तसेच संस्थास्तरावर विचारप्रक्रिया कशी करायची ?’, असे प्रशिक्षण मला मिळत गेले.

७ आ. डॉ. दुर्गेश सामंत यांच्यासमवेत केलेला दौरा
आणि विविध उपक्रमांतून शिकायला मिळालेली सूत्रे

त्यानंतर डॉ. सामंत यांच्यासमवेत मी दौरा केला. तेव्हा ‘कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्रसरस्वती यांच्या स्वर्णमहोत्सवानिमित्त धर्मसभेेचे आयोजन, नामदिंड्यांचे आयोजन, सार्वजनिक उत्सवांतील गैरप्रकार रोखण्याच्या मोहिमा, तणाव मुक्तीसाठी अध्यात्म शिबिरांचे आयोजन’, इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यातून मला समाजात संपर्क करणे, समाजातील लोकांशी संवाद साधणे, त्यांच्या बैठका घेणे, हिंदुत्वाविषयी जागृती करणे’ इत्यादीविषयीचे अनेक दृष्टीकोन शिकायला मिळाले. त्याचबरोबर ‘उत्तरदायी साधक’ या सेवेची व्याप्तीही शिकायला मिळाली.

त्या समवेत डॉ. सामंत यांनी केलेल्या मार्गदर्शनातून शिकायला मिळाले. ‘चुकांचे विश्‍लेषण करणे आणि चुकांचा अभ्यास करणे’ हेही मला शिकायला मिळाले.

७ इ. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून गोव्यात
येणार्‍या साधकांच्या गटांचे नियोजन करण्यास शिकता येेणे

ठराविक कालावधीनंतर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील ३० ते ३५ साधकांचा गट गोव्यात शिकायला यायचा. त्या वेळी त्यांचा निवास, जेवण आणि अल्पाहार यांची व्यवस्था फोंडा येथील प्रसारातील स्थानिक साधकांकडे केली जायची. शिबिराचे आयोजन आणि गोवा दर्शन इत्यादींचेही नियोजन केले जायचे. या माध्यमातून मला ‘शिबिरांचे आयोजन कसे करायचे’, हे शिकायला मिळाले.

७ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अलौकिक कार्यातील जवळून अनुभवलेले महत्त्वपूर्ण क्षण !

गुरुकृपेने परात्पर गुरु डॉक्टरांच्या अलौकिक कार्यातील काही महत्त्वपूर्ण क्षण मला जवळून पहायला आणि प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले’, हे माझे भाग्यच आहे. साधकांनाही आश्रमसेवांचा आणि व्यापक प्रसाराचा लाभ व्हायचा. याची काही उदाहरणे पुढे देत आहे.

१. वर्ष १९९९ मध्ये गोवा-सिंधुदुर्ग ‘दैनिक सनातन प्रभात’ची आवृत्ती चालू होणे.

२. वर्ष १९९९ मध्ये ‘दोनापावला’ येथे पहिले सेवाकेंद्र चालू होऊन तेथे दैनिक सनातन प्रभातचे कार्यालय चालू होणे.

३. एप्रिल २००० मध्ये म्हार्दोळ येथे सेवाकेंद्र आणि दैनिक सनातन प्रभातचे कार्यालय स्थलांतरित होणे.

४. जुलै २००० मध्ये ‘सुखसागर’, फोंडा येथे दैनिक सनातन प्रभातचे कार्यालय स्थलांतरित होणे.

५. वर्ष २००२ मध्ये ‘सुखसागर’, फोंडा येथे अकरा ‘पंचमुखी हनुमानकवच यज्ञ’ होणे.

६. वर्ष २००० मध्ये सूक्ष्म जगताचा अभ्यास आणि संशोधन चालू होणे.

७. वर्ष २००० मध्ये आध्यात्मिक नामजपादी उपायांच्या सत्रांना आरंभ होऊन साधकांना त्याचा लाभ होणे.

८. वर्ष २००३ मध्ये रामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू होणे.

८. साधनेत आल्यानंतर पार पाडलेल्या
दायित्वाच्या सेवा आणि त्यामुळे झालेले उपाय

८ अ. विविध सेवा करणे

साधनेत आल्यानंतर, म्हणजे वर्ष १९९६ ते वर्ष २००३ पर्यंत सत्संग आणि प्रवचने घेणे, केंद्रसेवक आणि गोवा उत्तरदायी साधक म्हणून दायित्व निभावणे, सर्वधर्मसभांचे आयोजन, जाहीर सर्वसंप्रदाय सभेचे आयोजन, गोव्यामध्ये सार्वजनिक उत्सव जनजागृती मोहीम, उज्जैन येथील कुंभमेळ्यात प्रसार आणि प्रदर्शन यांचे आयोजन करणे, या सेवांचे दायित्व घेऊन त्या पार पाडता आल्या.

८ आ. अनेक मोहिमा राबवणे

दायित्व सांभाळत असतांना प्रसारसेवकांच्या मार्गदर्शनानुसार ‘सार्वजनिक उत्सव जनजागृती मोहीम’ राबवणे, सार्वजनिक उत्सवात होत असलेल्या गैरप्रकारांसंबंधी समाजजागृती करणे आणि त्याला सनदशीर मार्गाने विरोध करणे’ या सेवा केल्या.

८ इ. गोव्यातील सर्व साधकांशी जवळीक होणे

मी सेवेसाठी वेगवेगळ्या केंद्रांत गेल्यावर तेथील साधकांच्या घरी माझा निवास असायचा. त्यामुळे मी बहुतांश सर्वच साधकांच्या घरी गेलो असून गोव्यातील सर्व साधकांशी माझी चांगली जवळीक झाली आणि मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायलाही मिळाले.

 

९. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील काही अविस्मरणीय क्षण

९ अ. मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे नैराश्य येणे, परात्पर गुरु
डॉक्टरांनी ‘तीन मासांत सगळे ठीक होणार’, असे सांगणे अन् प्रत्यक्षातही तसेच घडणे

वर्ष २००३ मध्ये मला वेगवेगळ्या कारणांनी मानसिक त्रास होत होता. त्या वेळेपासून मला आध्यात्मिक त्रासही चालू झाले. पुष्कळ प्रयत्न करूनही उपाय सापडत नव्हता. मला जीवनात नैराश्य आले होते; परंतु गुरुकृपेने माझी सेवा आणि साधना चालू होती. एकदा मी उशिरापर्यंत गोवा येथील दैनिक कार्यालयात काही सेवा करत होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर तेथून जात होते. ते मागे वळून माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला मोठ्या वाईट शक्तीचे एका साधिकेने सूक्ष्मातून काढलेले चित्र दाखवले. ते म्हणाले, ‘‘सर्वकाही यांच्यामुळे होत आहे; परंतु काळजी करू नका. तीन मासांत सगळे ठीक होणार आहे.’’ प्रत्यक्षातही माझी स्थिती ३ मासांनंतर पूर्णपणे सुधारली. या अनुभूतीच्या आठवणीने आजही माझे मन कृतज्ञतेने भरून येते.

९ आ. गोवा येथील ‘श्री महालसा देवालया’त मुंजीसाठी गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः तीर्थ देणे

एकदा कर्नाटकातील एका साधकाच्या मुलाची मुंज म्हार्दोळ, गोवा येथील ‘श्री महालसा देवालया’च्या ठिकाणी होती. कार्यक्रम संपल्यावर मंदिरात प्रदक्षिणा घालतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागे होतो. त्या मंदिरात स्वतःच तीर्थ घेण्याची पद्धत आहे. प्रदक्षिणा घालून झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः तीर्थ घेतले आणि मलाही दिले. त्या वेळी साक्षात देवाने तीर्थ दिल्याचा आनंद मला मिळाला.

९ इ. नामदिंडीत केलेल्या जोशपूर्ण भाषणाचे परात्पर गुरु डॉक्टरांनी कौतुक करणे

वर्ष २००२ मध्ये गोव्यात प्रथमच फोंडा येथे नामदिंडी झाली आणि समारोपाच्या वेळी वाहनावर उभे राहून मी जोशपूर्ण भाषण केले होते. त्याचे ध्वनीचित्रीकरण पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझे कौतुक केले. प्रत्यक्ष देवाने कौतुक केल्यामुळेे माझा आनंद, उत्साह आणि आत्मविश्‍वास वाढला.

९ ई. उत्तर भारतात सेवा करायला जाण्यापूर्वी २ वर्षे
अगोदरच परात्पर गुरुदेवांनी त्याविषयी सूतोवाच करून ठेवणे

एकदा सर्वसंप्रदाय सभेविषयी काही तरी सांगायला मी त्यांच्या खोलीत गेलो होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘आता तुमचा तोंडवळा छान दिसतो. आता उत्तर भारतात जायला काही अडचण नाही.’’ त्या वेळी मी केवळ ‘हो’ असे बोललो; कारण मला यामागचा कार्यकारणभाव समजला नव्हता. नंतर २ वर्षांनी मला उत्तर भारतात सेवा करायला जाण्याची संधी लाभली.

 

१०. वाराणसी सेवाकेंद्रात सेवेची मिळालेली संधी !

जून २००४ मध्ये मला उत्तर भारतातील वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी जायची संधी मिळाली. यापूर्वी मी सेवाकेंद्र किंवा आश्रम या ठिकाणी कधीच राहिलो नव्हतो. त्यामुळे मला आश्रमजीवनाचा काडीमात्र अनुभव नव्हता; पण मला ही सेवा शिकायची इच्छा होती.

१० अ. सेवाकेंद्र, तसेच प्रसार यांच्याशी संबंधित विविध सेवा करणे

सेवाकेंद्रात मी सहसाधकांना विचारून, वेगवेगळ्या अनुभवांतून आणि प्रसंगांतून शिकायचा प्रयत्न केला आणि हळूहळू मला सेवा जमू लागली. मी सेवाकेंद्रातील स्वच्छता, भांडी घासणे, जेवण आणि अल्पाहार बनवणे, परिसरातील गवत काढणे आदी सेवांसमवेत पार्सल सेवा, वाहन चालक म्हणून सेवा, तसेच देखभाल – दुरुस्ती करणे, या सर्व सेवा केल्या. त्याचप्रमाणे मी लेखा समन्वयक, समिती समन्वयक, वितरक, प्रयाग कुंभमेळ्याचे आयोजन, संस्था स्तरावर हिंदी ग्रंथ छपाई इत्यादी सेवाही निभावल्या. माझी काहीच पात्रता नसतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी या सर्व सेवा माझ्याकडून करून घेतल्या.

१० आ. प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत परात्पर गुरु
डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न केल्याने सर्व सेवांतून आनंद मिळू लागणे

प्रत्येक वेळी येथे वेगवेगळी परिस्थिती असायची. कधी साधक संख्या अल्प असायची, तसेच कधी हवेत प्रखर उष्णता, तर कधी कडाक्याची थंडी असायची; पण अशा प्रत्येक प्रसंगात परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून माझ्याकडून प्रयत्न व्हायचे आणि नंतर तशी अनुभूतीही यायची. ‘प्रत्येक परिस्थिती म्हणजे गुरुदेवांचेच सूक्ष्म रूप असून तेच मला पुढे घेऊन जात आहेत’, असे मला वाटायचे. गुरुदेवांनीच मला सर्व शिकवले आणि घडवलेही ! काही वेळा सेवाकेंद्रात अगदी मोजके साधक असायचे. त्यातील काही साधक वयस्कर असल्याने त्यांना शारीरिक मर्यादा असायच्या. हे लक्षात घेऊन सर्व सेवांचा समतोल सांभाळावा लागायचा. वाहन चालक म्हणून सेवा करतांना साधकांना आगगाडी स्थानकावरून आणणे, पोहोचवणे, तसेच पार्सले बांधणे, ती उचलून नेणे आणि काही वेळा आगगाडीला विलंब होणार असल्यास स्थानकावर घंटोन्घंटे थांबून रहाणे, असे जवळपास प्रतिदिन घडायचे, तरी या सेवांतून मला नेहमीच आनंद मिळायचा. नंतर मला आगगाडीचेे स्थानकही जवळचे वाटू लागले.

१० इ. प्राप्त परिस्थिती हे वरदान वाटून सेवा पूर्ण करतांना स्वतःचाच विसर पडू लागणे

‘एका दृष्टीने साधकसंख्या न्यून असणे, तसेच वेगवेगळ्या सेवा आणि वेगवेगळी परिस्थिती येणे’, हे माझ्यासाठी वरदानच ठरले. यामुळे विविध सेवा करतांना मला स्वतःचाही विसर पडायचा. यातून मन आणि बुद्धी यांचे अर्पण होणे, क्षमता वाढणे, एकाग्रता वाढणे आणि वेगवेगळ्या सेवा शिकता येणे’, असे घडत गेले.

१० ई. संगणकाविषयी कोणतेही ज्ञान नसतांना त्यासंबंधी अडचणी
सोडवण्याचा विचार आल्यावर भ्रमणभाषवर विचारून संगणकांची दुरुस्ती करता येऊ लागणे

वर्ष २०१३ नंतर जवळपास ३ वर्षे सेवाकेंद्रात संगणकांची देखभाल करण्यासाठी एकही साधक नव्हता. संगणकांसंबंधी काही अडचणी आल्यास साधक मला सांगायचे. या क्षेत्रात मी निरक्षर होतो. त्या वेळी ‘येथे दुरुस्ती करणारा साधक नाही’, या विचारापेक्षा ‘गुरुदेवांनी मला इथे ठेवले आहे, तर मलाच प्रयत्न करायला हवेत’, असा विचार येऊन मी रामनाथी आणि देवद आश्रमांतील संगणक सेवेतील साधकांशी भ्रमणभाषवर बोलून संगणक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू लागलो. यामुळे मला संगणक दुरुस्तीचे थोडेफार ज्ञान मिळाले आणि संगणकांची देखभाल करणे थोडे सोपे होऊ लागले. वाराणसी सेवाकेंद्रात आल्यावर आरंभी मला कळफलकाला (‘की बोर्ड’ला) हात लावायलाही भीती वाटायची; पण कालांतराने देवाने माझ्यात वरील पालट घडवला.

 

११. गुरुमाऊली आणि गुरुसेवा यांच्याप्रती असलेला भाव !

११ अ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे सेवाकेंद्र व्हायला
हवे’, या भावाने अन्य साधकांनी न केलेल्या सेवाही करणे

‘काही साधकांकडून आश्रमातील वाहने धुण्याची सेवा होत नाही’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा प्रत्येक १५ दिवसांनी २ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहने एका रांगेत लावून मी स्वतःच निरपेक्षपणे वाहने धुण्याची सेवा करायचो. सर्व वाहने धुऊन झाल्यावर सेवाकेंद्रातील श्‍वानाला (कुत्र्याला) अंघोळ घालायचो. हे सर्व करायला मला साधारण ४ घंटे लागायचे. त्या वेळी माझ्या मनात ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे सेवाकेंद्र असायला हवे’, असा ध्यास असायचा.

११ आ. श्रीकृष्णाला प्रार्थना करून सेवाकेंद्राच्या परिसरात वाढलेले
गवत काढल्यावर वेगळा आनंद मिळणे आणि  श्रीकृष्णाचे साहाय्यही मिळणे

पाऊस पडला की, सेवाकेंद्राच्या प्रांगणामध्ये गवत वाढते. मागील २ वर्षांपासून वाढलेले गवत काढायला सेवाकेंद्र किंवा प्रसार येथील कोणी साधक उपलब्ध होत नव्हते. तेव्हा मला वाटले, ‘संत भक्तराज महाराज यांच्या आश्रमात असे झाले असते, तर परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेऊन ही सेवा केली असती. त्यांनी त्यांच्या गुरूंच्या सेवाकेंद्रात दगडधोंडे काढणे, परिसर नीटनेटका करणे आदी सेवा केल्याचे वर्णन आपण ऐकले आहे. ‘तोच गुरुभाव ठेवून प्रयत्न करूया’, असा विचार करून मी संपूर्ण प्रांगणातील गवत थोडे थोडे करून काढले. यातून मला वेगळाच आनंद मिळाला. कधी कधी मी श्रीकृष्णाला सांगत असे, ‘तूच मला साहाय्य कर !’ अशी प्रार्थना केल्यावर काही वेळा गावातल्या महिला टोपल्या घेऊन त्यांच्या गुरांसाठी गवत काढायला यायच्या. त्या वेळी ‘श्रीकृष्णाच्या गोपी येऊन मला साहाय्य करून गेल्या’, असे मला वाटायचे.

११ इ. वाराणसी सेवाकेंद्र अन् आश्रमाचे पाणी यांप्रती उत्कट
भाव असल्याने श्री काशीविश्‍वनाथाचे दर्शन अन् गंगास्नान यांची ओढ नसणे

‘साधक आणि सेवाकेंद्रात आलेले पाहुणे यांच्यासाठी मी काशी दर्शनाचे नियोजन करायचोे; पण मला स्वतःला ‘कधी गंगास्नान करावे, दर्शनाला जावे’, याची ओढ नव्हती. संत भक्तराज महाराज यांच्या भजनातून मी ऐकले होते, ‘प्रयाग, गंगा आणि काशी हे सर्व गुरुचरणांपाशीच असते.’ ‘कशाला जाऊ मी काशी पुरी’.. अशी त्यांची भजनपंक्ती आहेत. एकदा प्रयाग कुंभमेळा संपल्यावर सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितले; म्हणून मी तेेथील त्रिवेणी संगमावर स्नान केले. कधी सेवाकेंद्रात आलेल्या संतांना श्री काशीविश्‍वनाथाचे दर्शन करायचे असेल, तर मी संतसेवा म्हणून त्यांच्या समवेत जात असे. ‘वाराणसी सेवाकेंद्र हेच ‘तीर्थक्षेत्र’ असून ‘हे माझ्या गुरूंचे चरण आहेत’ आणि ‘आश्रमाचे पाणी म्हणजे ‘गंगामाता आहे’, असा माझा भाव आहे.

११ ई. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रतिदिन सेवाकेंद्रात
येतात’, असा भाव असल्याने सर्व सेवा मनापासून करणे

१. मी सकाळी सेवाकेंद्राच्या बाहेरच्या परिसराची स्वच्छता करायचो. त्या वेळी नेहमी माझा असा भाव असायचा, ‘मुख्य दारातून आता परात्पर गुरु डॉक्टर येतील आणि सर्व देवताही येतील. त्यामुळे ते येण्यापूर्वीच सर्व स्वच्छता पूर्ण व्हायला हवी.’

२. भांडी घासतांना ‘सर्व भांडी म्हणजे माझे गुरुबंधू-भगिनी आहेत’, असा माझा भाव असायचा.

३. सेवाकेंद्रातील उपकरणे आणि अन्य साहित्य यांची देखभाल करतांना ‘ही माझ्या गुरूंची संपत्ती आहे अन् ‘त्यांचे रक्षण करणे, ही माझी गुरुसेवा आहे’, असा माझा भाव असायचा.

भावपूर्ण सेवेचा एक वेगळाच आनंद मला अनुभवायला मिळायचा.

११ उ. साधक सेवाकेंद्रात आल्यावर त्यांची सर्व व्यवस्था करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी
प.पू. बाबांच्या आश्रमात येणार्‍या भक्तांच्या केलेल्या सेवेची आठवण येऊन भावजागृती होणे

आता स्थानिक प्रसारातील साधकांशी माझी चांगली जवळीक झाली आहे. ते सेवाकेंद्रात आल्यावर आमची नेहमी साधनेसंबंधी चर्चा होते. प्रसारातील साधक रात्री निवासासाठी सेवाकेंद्रात आले असतील, तर ‘त्यांची रहाण्याची आणि जेवण्याची व्यवस्था नीट झाली आहे ना ?’ याची निश्‍चिती करूनच मी झोपायला जात असे. या वेळी ‘मला प.पू. बाबांच्या आश्रमात येणार्‍या भक्तांची सेवा परात्पर गुरु डॉक्टर करायचे’, याची आठवण येऊन भावजागृती व्हायची.

११ ऊ. साधनेतील पुढच्या टप्प्याला गेल्यावर सेवाकेंद्राप्रती वात्सल्यभाव निर्माण होणे

गुरुकृपेने साधनेतील पुढच्या टप्प्याला गेल्यावर माझ्या मनात ‘सर्व साधक, तसेच सेवाकेंद्रातील सर्व निर्जीव वस्तू आणि प्रांगणातील वृक्ष हेही माझे गुरुबंधू आहेत’, असा भाव निर्माण झाला. ‘सेवाकेंद्र म्हणजे लहान बाळ आहे. ते काही सांगणार नाही; म्हणून सेवाकेंद्राला ‘काय हवे-नको ?’, हे आपणच पहायला हवे’, असे वात्सल्याचे विचार माझ्या मनात येऊ लागले. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मी पूर्ण सेवाकेंद्र फिरून पहायचो. ‘सर्व संगणकांवर कापड घातले आहे ना ?’, हे पहायचो. कधी कधी संगणकांवर हात फिरवून त्यांचे लाडही करायचो. ‘सेवाकेंद्रातील सर्व सजीव-निर्जीव वस्तू परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलतात’, असे मला वाटते.

११ ए. सेवाकेंद्रातील कुत्र्याची सेवा करतांना ‘ही गुरुसेवा आहे’, असा भाव असणे

सेवाकेंद्रात एक श्‍वान (कुत्रा) होता. मी त्याची सेवा करायचो. त्याला वर्षातून २ वेळा मोठा त्वचारोग व्हायचा आणि काही वेळा त्वचेवर जखमा व्हायच्या. ‘त्या जखमा स्वच्छ करणे, त्यांना औषध लावणे आणि श्‍वानावर वैद्यकीय उपचार करून घेणे’, ही सेवा मी करायचो. हे करतांना ‘तो सेवाकेंद्रातील कुत्रा आहे आणि त्याचा सांभाळ करणे, ही माझी गुरुसेवा आहे’, असा माझा भाव असायचा. ‘माझ्या हातून प्राणीसेवा करायची राहिली असेल आणि त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टर ती पूर्ण करून घेत आहेत’, असे मला वाटायचे.

१२. वाराणसीतील प्रतिकूल परिस्थितीत रहाणे कठीण वाटत
असतांना ‘गुरुदेवांनी दिलेली कर्मभूमी स्वतःच्या प्रगतीला पोषक आहे’,
असा दृष्टीकोन ठेवल्याने गोवा आणि उत्तर भारत हे दोन्ही प्रदेश सारखेच वाटू लागणे

१२ अ. आरंभी वाराणसी येथे रहाणे आणि हवामानाशी जुळवून घेणे अवघड वाटणे

खरेतर वाराणसी येथील वातावरण फार प्रतिकूल आहेे. उन्हाळ्यात प्रखर उन्हाळा आणि थंडीत कडाक्याची थंडी पडते. येथे या दोन्ही ऋतूंचा कालावधी अधिक आणि पाऊस मात्र अत्यल्प पडतो. पहिल्यापासून गोव्यासारख्या वातावरणात राहिल्यामुळे इकडच्या हवामानाशी जुळवून घेणे मला आरंभी अवघड वाटत होते. येथील रस्ते खराब असल्याने येथे वाहन चालवणेही कठीण आहे. येथे धुळीचे प्रमाणही पुष्कळ आहे. कुठेही गेलो, तरी सामाजिक स्थिती, प्रशासन, वाहतूक नियम आणि व्यवस्था हे सर्व अतिशय गलथानपणाचे आहे. अधिकोष, विद्युत कार्यालय इत्यादी ठिकाणी अनागोंदी कारभार असतो. शिष्टाचाराचा अभाव, कचरा सुनियोजनाचा अभाव, फसवेगिरी, तसेच अरेरावीची भाषा या सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागतेे. एकदा अधिकोषात एक खाते उघडायला मला १३ वेळा जावे लागले.

१२ आ. ‘गुरुदेव समवेत आहेत’, असा भाव असल्याने आणि त्यांनी दिलेला दृष्टीकोन सतत
ध्यानी-मनी असल्याने काही वर्षांनी गोवा अन् उत्तर भारत हे दोन्ही प्रदेश सारखेच वाटू लागणे

सर्व परिस्थिती प्रतिकूल असली, तरी मी हे सर्व मनापासून स्वीकारले आहे. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) नेहमीच माझ्यासमवेत आहेत’, असा माझा भाव असतो. ‘साधना आणि आध्यात्मिक उन्नती यांसाठी प्रतिकूल परिस्थिती अनुकूल असते’, हा गुरुदेवांनी दिलेला दृष्टीकोन माझ्या सतत ध्यानी-मनी असतो. ‘कठीण परिस्थितीत गुरुदेव आपल्याजवळ असून आपले प्रारब्ध जळून जात आहे’, असे मला वाटते. त्यामुळे गुरुकृपेने मला एकदाही ‘पुन्हा गोव्यात परत जाऊया’, असा विचार आला नाही. ‘गुरुदेवांनी दिलेली ही कर्मभूमी माझ्या प्रगतीला पोषक आहे’, असा माझा दृष्टीकोन होता. काही वर्षांनी मला गोवा आणि उत्तर भारत हे दोन्ही प्रदेश सारखेच वाटू लागले.

 

१३. प्रत्येक ३ मासांनी कार्यशाळेसाठी देवद आश्रमात
जाणे आणि तेथून गोव्याला न जाता पुन्हा वाराणसीला परतणे

काही वर्षांपूर्वी देवद, पनवेल येथे प्रत्येक ३ मासांनी  कार्यशाळा आयोजित केली जायची. मी त्या वेळी वाराणसीहून देवद आश्रमात जायचो. त्या वेळी काही साधकांना वाटायचे, ‘मी देवदपर्यंत आलो आहे, तर आता गोव्यालाही जाणार असेन’; पण मी गोव्याला जाणार नाही’, हे समजल्यावर त्यांना आश्‍चर्य वाटायचे. मला मात्र ‘यात आश्‍चर्य कसले ?’, असे वाटायचे. कार्यशाळा संपल्यावर सेवाकेंद्र आणि प्रसार यांसाठी लागणारे साहित्य घेऊन मी वाराणसीला जात असे.

 

१४. गुरुकृपेने नाशिक, उज्जैन आणि प्रयाग या तीर्थक्षेत्री कुंभमेळ्याच्या
सेवेची अन् वर्ष २००४ पासून वाराणसी या तीर्थक्षेत्री रहाण्याची संधी मिळणे

गुरुकृपेने वर्ष २००३ मध्ये नाशिक, वर्ष २००४ मध्ये उज्जैन आणि वर्ष २०१३ मध्ये प्रयाग या ३ ठिकाणी हिंदु धर्मातील सर्वांत मोठ्या धार्मिक (कुंभमेळा) कार्यक्षेत्री मला सेवा करायची संधी मिळाली. वर्ष २००४ पासून श्री काशी-विश्‍वनाथ यांच्या पवित्र क्षेत्री आणि देवनदी गंगेच्या प्रवाहाचा स्रोत असलेल्या वाराणसी या तीर्थक्षेत्रातील सेवाकेंद्रात राहून मला सेवा करायची संधी मिळाली. श्री काशी-विश्‍वनाथ आणि येथील सर्व देवतांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !