सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास – भाग २

१७. ६० ते ७० टक्के आध्यात्मिक पातळीच्या
साधनाप्रवासात परात्पर गुरु डॉक्टरांनी दक्षिण भारतातील
प्रसारसेवेची संधी देऊन बुद्धीलय आणि मनोलय करून घेणे

१७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने कर्नाटक राज्यात
हिंदु धर्मजागृती सभांच्या आयोजनात साहाय्य करता येणे आणि
तेथील सभा संपल्यानंतर आंध्रप्रदेशात जाऊन तेथे सभा होऊ शकते का ? हे पहाणे

डिसेंबर २००८ मध्ये मला ‘कर्नाटक राज्यात हिंदु धर्मजागृती सभा होणार आहेत. तेथील प्रसाराचे आयोजन करण्यासाठी साधकांना साहाय्य करा’, असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे मी डिसेंबर २००८ च्या शेवटच्या आठवड्यात हुब्बळ्ळी येथे गेलो. तेथे पहिली हिंदु धर्मजागृती सभा होती. त्यानंतर एक-एक आठवड्याच्या अंतराने कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ५ सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभा संपल्यानंतर मी मुंबई येथे परत जाण्याचे रेल्वेचे आरक्षण केले होते. त्यावर मला सांगण्यात आले  की, तुम्ही एवढ्या लांब गेला आहात, तर आंध्रप्रदेशातही जाऊन या. तेथे एखादी सभा होऊ शकते का ? ते पहा. त्याप्रमाणे मी माझे परतीचे आरक्षण रहित करून आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे गेलो. तेथील साधकांसमवेत बैठक घेऊन तेथे ४ आठवड्यांनंतर सभा घेण्याचे ठरवले.

१७ आ. विजयवाडा येथील सभेचे आयोजन करतांनाच चेन्नई येथे जाऊन साधकांच्या भेटी घेणे

विजयवाडा येथील सभेसाठी थांबल्यामुुळे मला एक मास महाराष्ट्रात परतता येणार नव्हते. तेथे राहून सभेचे नियोजन करणे, आयोजनाच्या बैठका घेणे, हिंदुत्वनिष्ठांना संपर्क करणे, तसेच त्यांच्या बैठका घेणे इत्यादी सेवा करत असतांना मला थोडा वेळ मिळायचा. त्यामुळे त्या कालावधीत मला चेन्नई येथे जाण्यास सांगण्यात आले. मी तेथे जाऊन साधकांच्या भेटी घेणे आणि त्यांची साधनेची स्थिती जाणून त्यांना मार्गदर्शन करणे, या सेवा करून विजयवाडा येथे परत आलो.

१७ इ. विजयवाडा येथील सभेनंतर महाराष्ट्रात परत येण्याचे आरक्षण केल्यावर
चेन्नईला सभा घेण्यास आणि मदुराई येथे जाऊन एका साधिकेला भेटण्यास सांगणे

रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण असल्याने विजयवाडा येथील सभा झाल्यानंतर मी महाराष्ट्रात परत येण्याचे आरक्षण करून ठेवले आणि परत येण्याविषयी उत्तरदायी सांधकांना विचारले. त्या वेळी त्यांनी ‘चेन्नई येथेही हिंदु धर्मजागृती सभा घेता येेते का ?’, हे पहाण्यास सांगितले. त्यानुसार मी चेन्नई येथे गेलो. तेथे साधकांची बैठक घेऊन मे २००९ मध्ये सभा घेण्याचे आयोजन केले. मध्ये थोडा वेळ होता. त्या वेळी मला सांगण्यात आले की, तुम्ही इथपर्यंत आला आहात, तर मदुराई येथील साधिका श्रीमती कृष्णवेणीअक्का यांच्याकडे जाऊन या. त्या एका साधिकेला भेटायला जाण्यासाठी ८ घंट्यांचा रेल्वेचा प्रवास करावा लागणार होता. तेव्हा ‘संत भक्तराज महाराज एकेका भक्ताकडे जाण्यासाठी पुष्कळ लांबचा प्रवास करून जायचे’, हे गुरुदेवांनी सांगितलेले आठवले आणि आपणही एका साधिकेला भेटण्यासाठी जायला हवे, असे ठरवून त्यानुसार मी मदुराईला जाण्याचे नियोजन केले.

१७ ई. मदुराईला गेल्यावर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव
आणि साधनेची तळमळ असलेल्या साधिकेची भेट होणे अन्
‘एकेका साधकाकडेही गुरुदेवांचे कसे लक्ष असते’, ते शिकायला मिळणे

मदुराईला गेल्यावर लक्षात आले की, तेथे श्रीमती कृष्णवेणी नावाच्या साधिका आहेत आणि कुणाचेही मार्गदर्शन नसतांना तेथे त्या एकट्याच प्रतिकूल स्थितीतही तळमळीने प्रसार करत आहेत. तेथे त्यांनी सत्संग आणि बालसंस्कार वर्ग चालू केले होते. ‘त्यांच्यात गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आणि साधनेची तळमळ आहे’, असे मला जाणवले. कुठेही जगाच्या कोपर्‍यात एखादा साधक असला, तरी गुरुदेवांचे त्यांच्याकडे लक्ष असते, तेच त्यांची कशी काळजी घेतात’, हे शिकायला मिळाले.

१७ उ. चेन्नई येथील सभा संपल्यावर केरळमध्ये जायला सांगितल्यावर ईश्‍वरेच्छा ध्यानी येणे

मे २००९ मध्ये चेन्नई येथे सभा होती. तेथे साधक अल्प असल्याने पुष्कळ नियोजन करावे लागले. त्या वेळी मध्ये वेळ असल्याने मला कर्नाटक राज्याच्या प्रसार दौर्‍यावर जायला सांगितले. नंतर चेन्नई येथील सभा संपल्यावर मी महाराष्ट्रात परत येण्याविषयी विचारल्यावर ‘दक्षिण भारतातील केरळ आदी राज्यांत जाता येते का ?, ते पहा’, असे सांगण्यात आले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सभा आणि सेवा संपल्यावर मी प्रत्येक वेळेला आरक्षण करण्याचे नियोजन करतो अन् प्रत्येक वेळी मला ते रहित करावे लागते. मला कर्नाटक राज्यातील प्रसारासमवेत आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ इत्यादी दक्षिण भारतातील राज्यांत जाण्यास सांगण्यात येत आहे. यावरून ‘मी तेथे रहावे’, अशी देवाची इच्छा (ईश्‍वरेच्छा) आहे’, हे माझ्या लक्षात आले. नंतर मी पुन्हा महाराष्ट्रात परत येण्याविषयी कधी विचारले नाही.

१७ ऊ. दक्षिण भारतात प्रसार सेवेसाठी २ वर्षे रहाणे

सप्टेंबर २००९ मध्ये भावाकडे आमच्या घरातला गणपति बसवला जाणार होता. त्या वेळी मी घरी जाण्याविषयी विचारल्यावर मला घरी जाऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मी २ वर्षे दक्षिण भारतात प्रसारसेवेसाठी राहिलो आणि महाराष्ट्रात परत आलो. या सर्व घटनांवरून ‘गुरुदेव आपला मनोलय आणि बुद्धीलय कसा करून घेतात ?’, हे मला शिकायला मिळाले.

 

१८. विविध ठिकाणी प्रसार सेवेला पाठवून
गुरुदेवांनी खाण्या-पिण्याची आसक्ती न्यून करणे

१८ अ. प्रसारासाठी उत्तर भारतात गेल्यावर साडेतीन मास बटाट्याचे पदार्थ खावे लागणे

सप्टेंबर ते डिसेंबर २००८ या कालावधीत मी प्रसारासाठी उत्तर भारतात गेलो होतो. या साडेतीन मासांत एकही दिवस असा नव्हता की, ज्या दिवशी खाण्यातील पदार्थांत बटाटा नव्हता. सकाळी न्याहरीमध्ये बटाट्याचे पदार्थ असत. दुपारच्या जेवणात दुसरी भाजी केली, तरी बटाट्याच्या भाजीत दुसरी भाजी घातलेली असे, उदा. आलू पालक, आलू मटर, आलू कोबी इत्यादी. रात्रीच्या जेवणातही बटाट्याची भाजी असे. अशा प्रकारे सतत साडेतीन मास मी किती वेळा बटाट्याची भाजी खाल्ली असेल, हे मोजताच येणार नाही. गुरु असे प्रसंग घडवतात की, आपले आवड-निवड केंद्रच बोथट करून टाकतात.

१८ आ. दक्षिण भारतात प्रसारासाठी गेल्यावर जेवणात झालेले पालट

१८ आ १. दक्षिण भारतात चपाती मिळणे कठीण असल्याने लहानपणापासून असलेली सवय पालटावी लागून भात आणि सांबार खाण्याची सवय करून घ्यावी लागणे

मला लहानपणापासून पोळी (चपाती) पुष्कळ आवडते. सकाळी न्याहरीमध्ये चहा-पोळी, तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही मी पोळीच खात असे; मात्र दक्षिण भारतात (२००९ ते मार्च २०११ या कालावधीत) गेल्यावर माझ्या लक्षात आले, ‘तिकडच्या जेवणात पोळी नसते आणि त्यांना ती बनवताही येत नाही. ‘आपल्याला साधना करायची, तर आहे ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे’, या दृष्टीने मी सांबार आणि भात खायला चालू केले. तेथे दुपारी आणि रात्रीच्या जेवणात सांबारभातच असायचे. सकाळच्या जेवणात भाताचे प्रकार असायचे. देवाच्या कृपेने मला सांबार आवडायचे. तिकडे उकड्या तांदळाचा भात असतो. मला पांढर्‍या तांदुळाचा भात करतांना त्यातील पाणी काढून टाकून तो देत असत.

१८ आ २. काही मासांनंतर पाय आणि सांधे पुष्कळ दुखू लागल्याने वैद्यांकडे जाणे अन् त्यांनी ‘हे त्रास कुपोषणामुळे होत आहेत’, असे सांगितल्यावर आश्‍चर्य वाटणे

काही मासांनंतर माझे पाय आणि सांधे पुष्कळ दुखू लागले. वैद्यांकडे गेल्यावर ‘त्यांनी कुपोषणामुळे हे त्रास होत आहेत’, असे सांगितले. तेव्हा मला आश्‍चर्य वाटून मी दुसर्‍या वैद्यांकडे गेलो. त्या वैद्यांनीही मला सांगितले, ‘‘कुपोषणामुळे तुम्हाला हे त्रास होत आहेत.’’ तेव्हा मला आश्‍चर्य वाटले. मी त्यांना सांगितले, ‘‘मी दोन वेळा व्यवस्थित जेवतो, न्याहारी करतो, तरी असे कसे झाले ?’’ तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती विचारून घेतली. मला लहानपणापासून पोळी खायची सवय असल्याने माझ्या शरिरालाही ती सवय लागली होती. ‘येथे केवळ भात आणि तो उकडल्यानंतर त्याचे पाणी काढलेला पांढरा भात मी खात आहे’, हे मी त्यांना सांगितले. दक्षिण भारतात उकडा भात बनवतांना त्यातील पाणी टाकून देऊन भात केला जातो. वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही भातातील सत्त्व टाकून देऊन केवळ चोथा खाल्ला आहे. त्यामुळे तुमच्या शरिराचे पोषण झाले नाही.’’

नंतर तेथील आश्रमातील साधिकांनी ‘पोळी कशी करायची ?’, हे शिकून घेतले; मात्र त्यांना सवय नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात बनवतात, तशी पोळी बनवता येत नव्हती. त्यांची पोळी जाड, चिवट किंवा वेगळ्या आकाराची असायची; मात्र वैद्यांनी सांगितल्यानुसार आणि माझ्या प्रकृतीला आवश्यक असल्याने मला पोळी खायला मिळू लागली.

१८ इ. आंध्रप्रदेशमध्ये पुष्कळ तिखट पदार्थ खावे लागणे

मी आंध्रप्रदेशमध्ये गेलो की, तेथे ठिकठिकाणी बैठका असायच्या. तेव्हा बाहेरचे पदार्थ किंवा कोणीतरी प्रायोजित केलेले अन्नपदार्थ खावे लागायचे अन् ते पुष्कळ तिखट असायचे.

१८ ई. साधनेत येण्यापूर्वी असलेल्या खाण्याच्या आवडी
देवानेच न्यून केल्याने सर्व प्रकारचे अन्न खाण्याची सवय होऊ लागणे

साधनेत येण्यापूर्वी मी आवडीने पदार्थ खायचो. मला नेहमी गरम जेवणच लागायचे. मी प्रतीमास नवनवीन पदार्थ खाण्यासाठी वेगवेगळ्या उपाहारगृहांत जायचो. एकंदरीतच मला चटपटीत आणि मसालेदार पदार्थ आवडायचे. देवाच्या कृपेने मला वेगवेगळ्या राज्यांत गेल्यावर तेथील जेवण घेणे सहजपणे जमू लागले. म्हणजे देवानेच माझ्या आवडी-निवडी न्यून केल्या. अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात पुष्कळ स्वादिष्ट आणि विविधता असलेले जेवण बनवले जाते; मात्र दक्षिण भारतात तसे नाही. मंगळुरु येथे जेवणात तेल, तिखट आणि मीठ एवढे अल्प असते की, ‘आपण पथ्याचे जेवण घेत आहोत’, असे वाटते. अशा प्रकारे सर्व प्रकारचे अन्न खाण्याची सवय देवानेच करून घेतली.

पुढे पोटाचे विकार वाढून पचनसंस्था कमकुवत झाल्याने मला पचण्यास हलके आणि थोडे सपक (कमी तिखट) खावे लागले. त्यामुळे देवाने माझी खाण्यापिण्याची आसक्ती आणखी न्यून केली. हे भगवंता, ‘माझ्या साधनेसाठी पोषक असलेले प्रसंग घडवून तू माझा मनोलय आणि बुद्धीलय करून घेत आहेस’, यासाठी मी तुझ्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहे.

 

१९. प्रसारातील चुकांतून मिळालेली शिकवण

१९ अ. ‘समष्टीमध्ये होत असलेली चूक तत्परतेने दुरुस्त न
केल्यास समष्टीची हानी झाल्यामुळे स्वतःच्या साधनेचीही हानी होऊ शकते !

१९ अ १. धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी गेल्यावर उत्तरदायी साधकांनी सेवेत सहभागी होऊ न देणे आणि या प्रसंगी चुकीचा दृष्टीकोन असल्याने जमेल तशी सेवा करणे

फेब्रुवारी २००९ मध्ये कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील साधकांना अल्प अनुभव असल्यामुळे मला हिंदु धर्मजागृती सभेच्या नियोजनासाठी पाठवले होते; मात्र तेथील उत्तरदायी साधकांनी सभेतील सेवेत मला फारसे सहभागी करून घेतले नाही. मला ते अधिक काही सांगत नसत आणि विचारतही नसत. त्यामुळे मी बराच वेळ निवासाच्या ठिकाणी थांबायचो. मी ‘सभागृहात येऊन एखादी सेवा करू का ? कोणाची रंगीत तालीम घेऊ का ?’, असे विचारत असे; मात्र तेथील साधक मला एखादी छोटीशी सेवा देऊन त्यात गुंतवून ठेवत. साधारण अशाच प्रकारच्या काही चुका बेंगळुरु येथील सभेच्या वेळीही माझ्या लक्षात आल्या होत्या; पण त्या वेळी माझा दृष्टीकोन ‘देव ज्या स्थितीत ठेवेल, तसे राहिले पाहिजे’, असा चुकीचा होता. त्यामुळे मी ही गोष्ट गांभीर्याने न घेता जेवढे जमेल, तेवढे करत राहिलो.

१९ अ २. ‘एका संतांनी वरील दृष्टीकोन समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे’, याची जाणीव करून देणे

नंतर एका साधिकेने ही चूक एका संतांना सांगितली. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमचा हा दृष्टीकोन व्यष्टी साधनेच्या दृष्टीने योग्य आहे; मात्र समष्टी साधनेच्या दृष्टीने अयोग्य आहे. समष्टीमध्ये काही चुकीचे घडत असेल, तर ते दुरुस्त होण्यासाठी आपल्याकडून लगेच प्रयत्न व्हायला हवेत. तसे केले नाही आणि समष्टीची हानी झाली, तर आपल्या साधनेचीही हानी होऊ शकते.’’ तेव्हा मला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीकोनातील भेद लक्षात आला.

१९ आ. कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष करू नये !

कर्नाटकातील उत्तरदायी साधकांनी केलेली चूक गंभीर होती. त्या चुकीमुळे त्या साधकांची आध्यात्मिक पातळी ४ – ५ टक्क्यांनी खाली घसरली. माझ्याकडून या गंभीर चुकीकडे दुर्लक्ष केले गेले. त्या वेळी ‘कोणत्याही चुकीकडे दुर्लक्ष करू नये’, हे मला शिकायला मिळाले.

 

२०. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने शिकायला मिळालेली सूत्रे

२० अ. चुकीविषयी गांभीर्य निर्माण होईपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याविषयी सांगणे
आणि चुकीचे चिंतन होऊन प्रायश्‍चित घेतल्यावर त्यांनी पुन्हा त्याविषयी न विचारणे

एकदा मिरज येथे साधकांसाठी एक शिबीर असतांना त्यात एका साधकाचे नाव घ्यायचे राहिले. त्या साधकाकडे प्रसारसेवेतील दायित्व होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही चूक आमच्या लक्षात आणून दिली. नंतर मी काही विचारण्यासाठी गुरुदेवांना दूरभाष करायचो. त्या वेळी ते सांगायचे, ‘‘त्या साधकाचे नाव शिबिरासाठी घेतले नाही’, ही आपल्याकडून पुष्कळ मोठी चूक झाली ना !’’ असे ४ – ५ वेळा झाल्यावर ‘प्रत्येक वेळी ते चूक सांगतील’, याची मला भीती वाटू लागली. नंतर चिंतन केल्यावर असे लक्षात आले, ‘एवढी मोठी चूक झाल्यावरही मला त्याची खंत वाटली नव्हती. माझ्याकडून क्षमायाचना केली गेली नव्हती किंवा मी प्रायश्‍चितही घेतले नव्हते. नंतर मी पुष्कळ वेळा गुरुदेवांची मानस क्षमायाचना केली आणि प्रायश्‍चित घेतले. त्यानंतर गुरुदेवांंनी मला त्या चुकीविषयी पुन्हा कधीच विचारले नाही. अन्य प्रसंगांतूनही असेच लक्षात आले. एखादी गंभीर चूक झाली आणि त्या चुकीविषयीचे गांभीर्य माझ्यात नसले, तर कोणाच्या तरी माध्यमातून गुरुदेव मला त्या चुकांविषयी पुनःपुन्हा सांगत. यावरून ‘देवाला चुका केलेले आवडत नाही आणि ‘चूक झाल्यावर क्षमायाचना करून प्रायश्‍चित घेतले’, तर देव आपल्याला लगेच क्षमा करतो’, हे माझ्या लक्षात आले.

२० आ. चुकांप्रती गांभीर्य वाढण्यासाठी घडवलेली प्रक्रिया !

२० आ १. गंभीर चुका करूनही साधकांना त्याचे गांभीर्य अल्प असल्याने त्यांना त्याची जाणीव करून देणे

माझा कर्नाटक राज्याचा प्रसारदौरा चालू होता. तेव्हा मुल्की आणि मंगळुरु सेवाकेंद्रांत रहातांना तेथील काही चुका माझ्या लक्षात आल्या. याविषयी मला चुका करणार्‍या साधकांना त्याची जाणीव करून द्यायला सांगण्यात आले. ‘साधकांकडून पुष्कळ गंभीर चुका होऊनही ‘त्यांना त्याविषयी गांभीर्य अल्प आहे’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला त्यांना सतत जाणीव करून द्यावी लागत होती. त्या वेळी जवळ जवळ ३ – ४ मास तेथील साधकांना मी अधूनमधून चुका सांगणे चालू होते. यापूर्वी मला आश्रम किंवा सेवाकेंद्रे या ठिकाणच्या कार्यपद्धती ठाऊक नव्हत्या आणि तेथे रहाणार्‍या साधकांना दृष्टीकोन देण्याचा अनुभवही नव्हता. ‘साधकांची साधनेत हानी होऊ नये, यासाठी त्यांच्याशी कठोरपणे का वागायचे ?’, याविषयी मला या वेळी समजले.

२० आ २. कन्नड साप्ताहिकामध्ये सर्व चुका प्रसिद्ध झाल्यानंतर साधकांमध्ये चुकांविषयी गांभीर्य निर्माण होऊ लागणे

सलग ७ – ८ आठवडे कन्नड साप्ताहिकमध्ये साधकांच्या चुका प्रसिद्ध होत होत्या. परिणामी तेथील साधकांमध्ये चुकांविषयी गांभीर्य निर्माण झाले. या प्रक्रियेतून मला ‘आपण चुकांकडे किती गांभीर्याने पाहिले पाहिजे ? पाठपुरावा कसा करायला हवा ? चुका पुन्हा होऊ नयेत; म्हणून कोणती उपाययोजना केली पाहिजे ?’ इत्यादी पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या.

२० आ ३. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी साधकांना त्याची जाणीव करून देण्याचे महत्त्व गुरुदेवांनी मनावर बिंबवणे अन् कर्नाटक राज्यात सर्व ठिकाणी जाऊन त्याविषयी सांगणे

साधकांमध्ये स्वभावदोष असतात आणि त्यामुळे पुनःपुन्हा चुका होतात. यासाठी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी त्यांना सातत्याने जाणीव करून द्यायला पाहिजे’, याचे गांभीर्य माझ्या मनावर बिंबवले गेले. कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांत फिरून सलग २ – ३ मास मी साधकांना चुकांची जाणीव करून देत होतो.

२० आ ३ अ. चुकांची जाणीव करून दिल्यामुळे झालेले सकारात्मक परिणाम आणि कर्नाटक राज्यात निर्माण झालेली सांघिक भावना !

या वेळी अनेक गंभीर चुका लक्षात आल्या. साधकांच्या मनात अनेक विकल्प होते. साधकांच्या काही अडचणी होत्या; मात्र उत्तरदायी साधक त्याकडे दुर्लक्ष करत होते. ‘आपण पुढे काही सांगितले, तर लाभ होईल’, असा विश्‍वास साधकांमध्ये नव्हता. बर्‍याच साधकांनी त्यांच्या मनातील विचार मनमोकळेपणाने मांडले. दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे साधकांची मने मोकळी झाली आणि त्यांच्यात एकमेकांविषयी असलेली कटूता न्यून झाली. त्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना काढण्यात आल्या. परिणामी साधकांत उत्साह निर्माण होऊन साधक क्रियाशील होण्यास साहाय्य झाले. राज्यात सांघिक भावना निर्माण होऊन पुष्कळ चांगले वाटायला लागले. राज्यातील प्रसाराला गती मिळाली. यावरून ‘चुकांची जाणीव करून देण्याची प्रक्रिया सातत्याने केली पाहिजे आणि ती न केल्यास साधकांच्या व्यष्टी अन् समष्टी साधनेची हानी होते’, हे लक्षात आले.

प.पू. गुरुदेवांनी हे सर्व माझ्याकडून करून घेतले, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०१८)

(‘पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर प्रसारसेवेचे नियोजन पहायचे; पण गेल्या १२-१३ वर्षांत त्यांची प्राणशक्ती अत्यल्प असल्याने, तसेच प्रसारकार्य सांभाळणारे अनेक संत आणि साधक सिद्ध झाल्याने ते आता प्रसारकार्य पहात नाहीत.’ – संकलक)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात