सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास – भाग १

अनुक्रमणिका

१. बालपण

‘माझा जन्म ५ सप्टेंबर १९६२ या दिवशी (भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी या तिथीला) ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे झाला. माझे बालपण कळवा येथे गेले. आम्ही एकूण ५ भावंडे, त्यात माझा क्रमांक ४ था आहे. मला एक मोठा भाऊ आणि २ मोठ्या बहिणी असून एक लहान भाऊ आहे. माझी मोठी बहीण कल्पना ही आम्हा सर्व भावंडांचा अभ्यास घ्यायची. त्यामुळे मी शाळेत जात नसलो, तरी मला बाराखडी आणि अंक लिहिता-वाचता येत होते.

 

२. धार्मिक वातावरण

आमच्या लहानपणापासून घरात धार्मिक वातावरण होते. सर्वांवर धार्मिकतेचेे संस्कार होते. माझे वडील आणि माझे २ काका एकत्रितपणे कुलाचार करत. प्रत्येक वर्षी मधल्या काकांच्या घरी नागपंचमी, कृष्णाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि सत्यनारायण पूजा यांसारखे कार्यक्रम नियमित होत. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी दीड ते दोन घंटे भजने म्हणण्याचा कार्यक्रमही असे. त्या वेळेपासून मला भजनांची आवड निर्माण झाली.

 

३. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण

३ अ. शाळेत जाण्याची विशेष आवड नसणे

लहानपणी मी शाळेत जायला सिद्ध नसायचो. ज्या दिवशी पहिलीची वार्षिक परीक्षा होती, त्या दिवशी मला बळजोरीने शाळेत घातले गेले. परिक्षेच्या दिवशीच मी शाळेत प्रवेश घेतला. मी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाल्यामुळे लगेच दुसरीच्या वर्गात गेलो. सरस्वती मंदिर, कळवा, ठाणे येथेे माझे चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आम्ही ठाण्यातील नौपाडा येथील दातेवाडी या चाळीत रहायला गेलो. येथे गेल्यावर ठाणे स्टेशन जवळील महापालिकेची शाळा क्रमांक २६ मध्ये ७ वी पर्यंत शिकलो. ही शाळा इयत्ता सातवीपर्यंतच होती.

३ आ. आर्थिक स्थिती बेताची असल्याने १० वीला
शिकवणी न लावता घरी अभ्यास करून ६५ टक्के गुण मिळवणे

इयत्ता ८ वी साठी मी मराठी माध्यमाच्या ‘सरस्वती सेकंडरी शाळे’मध्ये प्रवेश घेतला. ही शाळा पुष्कळ चांगली होती. तेथील मुख्याध्यापकांनी शाळेतील मुलांना पुष्कळ चांगली शिस्त लावली होती. १० वीला गेल्यावर मुले शिकवणी लावत; मात्र आमची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मी घरीच अभ्यास केला. मला १० वीला ६५ टक्के गुण मिळाले. त्या वेळी म्हणजे वर्ष १९७८ मध्ये शिकवणी न लावता ६५ टक्के गुण मिळवणे, हे कौतुकास्पद होते; कारण त्या वेळी आताच्या सारखे ८०, ९० टक्के गुण मिळत नसत.

३ इ. वडिलांचे निधन झाल्यामुळे ‘चार्टर्ड अकाउंटंट
(सी.ए.)’ बनण्याचे स्वप्न अपूर्ण रहाणे आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर होणे

११ वीला मी ठाणे येथील ‘एन्.जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयात प्रवेश घेतला. १२ वी नंतर ‘काही तरी वेगळे करायचे’, हा ध्यास मला होता. त्यामुळे ‘चार्टर्ड अकाउंटंट’ बनण्यासाठी मी एका सनदी लेखापालाकडे शिकून मुलुंड येथे ‘टोपीवाला कॉलेज’मध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले होते. वडिलांनी मला एका सनदी लेखापालाकडे शिकण्याची संधी मिळवून दिली; मात्र १२ वी नंतर ही प्रक्रिया चालू करण्यापूर्वीच माझ्या वडिलांचे ऑगस्ट १९८० मध्ये निधन झाले. त्यामुळे माझे चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.) बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. घरी वडिलांच्या नंतर नोकरी करणारे कुणीच नव्हते आणि आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे मी केवळ महाविद्यालयीन शिक्षण पुढे चालू ठेवले. वर्ष १९८३ मध्ये ठाणे महाविद्यालयातून वाणिज्य शाखेचा पदवीधर झालो.

 

४. नोकरी करतांना अनुभवलेला भ्रष्टाचार आणि ‘अन्यायाच्या
विरोधात काहीतरी करावे’, अशी वाटू लागलेली तळमळ !

४ अ. नोकरीसाठी प्रयत्न करतांनाच छोटे-मोठे उद्योग करून आर्थिक कमाई
करणे आणि वयाच्या २० व्या वर्षी ‘लिपिक’ या पदावर नोकरी करू लागणे

मी महाविद्यालयात असतांना नोकरीसाठी अर्ज करत होतो. माझी अभ्यासाची गती चांगली असल्यामुळे मी घराच्या आसपास रहाणार्‍या ५ वी ते ७ वीच्या मुलांच्या शिकवण्या घ्यायचो. काही दिवस मी गोठ्यातील वाळलेल्या शेण्यांची राखाडी विकली. (पूर्वी भांडी घासण्यासाठी या राखाडीचा वापर केला जायचा.) २ – ३ वर्षे मराठी कालनिर्णय हे पंचांग विकणे, कंदील बनवून विकणे, असे उद्योगही केले. मी शिकत असतांनाच अशा रितीने थोडेफार पैसे कमावणे चालू केले होते. महाविद्यालयात गेल्यावर सुट्टीच्या कालावधीत मी २ – ३ मासांसाठी ‘लेबर कन्सलटंट’कडे, तसेच एका सहकारी बँकेत नोकरी केली. महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असतांना मला राज्य सरकारच्या विक्रीकर खात्यामध्ये नोकरी लागली. नोव्हेंबर १९८२ पासून, म्हणजे २० व्या वर्षापासून मी ‘लिपिक’ या पदावर नोकरीला आरंभ केला आणि नोकरी करत असतांना शिक्षणही पूर्ण केले.

४ आ. विक्रीकर कार्यालयातील भ्रष्टाचाराला कंटाळल्यामुळे व्यवस्थापन विभागात स्थलांतर
करून घेणे आणि वर्ष १९८५ मध्ये ‘भारतीय रेल्वे’मध्ये लेखा विभागात नोकरी मिळणे

विक्रीकर कार्यालयात मी साडेतीन वर्षे चाकरी केली. तेथील भ्रष्टाचार आणि बजबजपूरी पाहून मी सतत अन्य ठिकाणी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. त्या खात्यात भ्रष्टाचार न करता रहाणे, म्हणजे एक दिव्यच आहे, इतकी तेथील कार्याची स्थिती दूषित आहे. मी काम करत असलेल्या विभागात व्यापारी लोक त्यांचे काम झाले की, पैसे देत. तेथे ‘पैशाविना काम होणे नाही’, असे वातावरण होते. त्यामुळे व्यापार्‍यांना ‘पैसे नको’, म्हटले, तरी ते काही वेळा पटलाच्या खणात पैसे ठेवूनच जात. या प्रकारांना कंटाळून मी याविषयी माझ्या वरिष्ठांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सर्वजण पैसे घेतात, तर तुम्हाला घेण्यात काय अडचण आहे ?’’ या गोष्टीला कंटाळल्यामुळे मी जेथे व्यापार्‍यांचा संपर्क येत नाही, अशा व्यवस्थापन (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) विभागात माझे स्थलांतर करून घेतले. नंतर देवाच्या कृपेने मला डिसेंबर १९८५ मध्ये ‘भारतीय रेल्वे’मध्ये लेखा विभागात नोकरी मिळाली. विक्रीकर खात्याच्या नोकरीतून सुटका झाल्याने मला आनंद झाला.

४ इ. अनुभूती – साईभक्तांनी ‘रेल्वेतील नोकरीचे तुझे काम होईल’, असे सांगणे आणि
दुसर्‍या दिवशी सकाळी उपनेत्राच्या काचेवर ‘साईबाबां’ची आकृती उमटलेली दिसणे

रेल्वेतील नोकरीच्या नेमणुकीची प्रक्रिया चालू असतांना मी गोरेगाव येथे मावशीच्या घरी गेलो होतो. माझी मावशी एका साईभक्तांकडे जात असे. एकदा तिने मलाही त्या साईभक्तांकडे नेले. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुझे रेल्वेतील नोकरीचे काम होईल !’’ दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मला माझ्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचेवर ‘साईबाबां’ची आकृती उमटल्याचे दिसले. नंतर काही दिवसांतच माझी रेल्वेच्या नोकरीसाठी निवड निश्‍चित झाली. तेव्हा मला याचे पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

४ ई. भ्रष्टाचाराने पैसे मिळवण्यात रस नसल्याने पैसे देऊन काम करून घेणार्‍या लोकांना दूर ठेवणे
आणि २१ वर्षे प्रामाणिकपणे नोकरी करून पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेणे

नोव्हेंबर २००३ मध्ये मी स्वेच्छा निवृत्ती घेईपर्यंत भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी केली. शेवटी २१ वर्षांचा नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यावर ‘वरिष्ठ अनुभाग अधिकारी (सीनिअर सेक्शन ऑफीसर)’ या पदावर असतांना मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. नोकरीत असतांना मी प्रामाणिकपणे नोकरी करण्याचा प्रयत्न केला. लेखा विभागातील लेखा परीक्षण (ऑडिटिंग) करण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळ्या विभागांतील धारिका (फाईल्स) येत. त्या धारिका काटेकोरपणे तपासून मी त्यातील चुका मोठ्या प्रमाणात काढत असल्यामुळे ‘माझे स्थानांतर झाले पाहिजे’, असे काही जणांना वाटायचे. तेथे गेल्यावर मला ‘सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे’, हे कळले; मात्र मला भ्रष्टाचाराने पैसे मिळवण्यात रस नसल्याने माझे कुठेही स्थानांतर झाले, तरी मला वाईट वाटायचे नाही. मी निवृत्ती घेतांना वरिष्ठ विभागीय अधिकारी होतो. माझा ज्या ज्या वेळी समाजातील लोकांशी संबंध यायचा, त्या वेळी व्यावसायिकांना ‘पैसे देऊन काम करून घेण्याची सवयच लागलेली आहे’, हे माझ्या लक्षात आले. माझ्याकडे धारिका आल्यावर त्यांच्या चुकांवर पांघरूण न घालता मी नियमानुसार काम करत असे. पैसे देऊन काम करून घेणार्‍या लोकांना मी दूर ठेवले.

४ उ. ‘भ्रष्टाचाराच्या विरोधात कुणी एकटा काही करू शकत नाही’, हे शिकायला मिळणे

रेल्वेकडून माल हरवला किंवा खराब झाला, तर व्यापारी लोक रेल्वेकडून हानी भरपाईचे दावे लावत. एकदा एका मोठ्या व्यापार्‍याने एका मध्यस्थाला माझ्याकडे पाठवून मला अशा धारिका पास करण्यास सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘या धारिकेत पुष्कळ त्रुटी असल्याने मला तसे करता येणार नाही. या सर्व त्रुटींची पूर्तता करावी लागेल !’’ त्या व्यक्तीने वरिष्ठांकडून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांनी ‘अनुकूल शेरा’ देऊन धारिका ‘पुढे पाठवा’, असे मला सांगितले; पण मी त्यांना नकार दिला. नंतर वरिष्ठांकडून मला लिखित स्वरूपात ‘धारिका पास करा’, असा आदेश आल्यावरच मी त्या धारिका पुढे पाठवल्या.

एका खात्याकडून लेखा पडताळणीसाठी माझ्याकडे धारिका आल्यावर मी त्यात पुष्कळ चुका काढल्या होत्या. त्यामुळे त्या खात्याच्या अधिकार्‍याने मला बोलावले आणि ‘असे करायचे नाही’, असे सांगून पुष्कळ दम दिला. या सर्व घटनांवरून ‘भ्रष्टाचार एवढ्या खालच्या पातळीला गेला आहे की, कुणी एकटा या विरोधात काही करत असेल, तर त्याला वाळूच्या कणाएवढेही महत्त्व दिले जात नाही आणि कुणी एकटा काहीच करू शकत नाही’, हे मला शिकायला मिळाले.

४ ऊ. अन्यायाच्या विरोधात केलेले कार्य !

१. नोकरीच्या कालावधीत मी लेखा विभागात शिवसेनेच्या ‘स्थानीय लोकाधिकार समिती’ची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

२. ‘ऑल इंडिया रेल्वे अकाऊंट्स फेडरेशन’ या लेखा विभागातील कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी कार्य करणार्‍या संघटनेत ‘डेप्युटी सेक्रेटरी’ या पदावर २ वर्षे काम केले होते.

३. विक्रीमूल्यापेक्षा अधिक पैसे घेणार्‍या दुकानदारांना मी याविषयी नेहमी खडसावत असे.

एकंदरीत अन्याय पाहून मला चीड यायची आणि ‘अन्यायाच्या विरोधात काहीतरी करावे’, असे वाटायचे.

 

५. वैवाहिक जीवन

‘११.११.१९९२ या दिवशी माझा विवाह गंगाधरे कुटुंबातील मीना म्हणजे आताच्या सौ. मीनल यांच्याशी झाला. विवाहानंतर एक वर्षानंतर आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव कु. वैदेही आहे. सध्या कु. वैदेही आणि सौ. मीनल दोघीही सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे पूर्णवेळ साधना करत आहेत.

 

६. अध्यात्माविषयी कुतूहल निर्माण होणे

नोकरी करत असतांना ‘साद देती हिमशिखरे’ या नावाची कादंबरी माझ्या वाचनात आली होती. ती वाचल्यावर माझ्या मनात अध्यात्माविषयी कुतूहल निर्माण झाले.

७. सनातन संस्थेशी संपर्क !

७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठाणे येथील जाहीर सभेला जाण्याचा विचार करणे आणि
दूरचित्रवाहिनीवर क्रिकेटचा अंतिम सामना चालू असल्याने तो पहाण्याच्या नादात सभेला न जाणे

एप्रिल १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची ठाणे येथे जाहीर सभा होती. अनेक ठिकाणी परशुरामाची चित्रे असलेली आणि ‘साधना’ या विषयावर प.पू. डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन’, असे लिहिलेली भित्तीपत्रके लावली होती. हे पाहिल्यावर माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि मी ‘त्या सभेला जायचे’, असे ठरवले. ज्या दिवशी सभा होती, त्या दिवशी दूरचित्रवाहिनीवर क्रिकेटचा अंतिम सामना होता. मला क्रिकेट हा खेळ पुष्कळ आवडत असल्याने मी सभेला न जाता क्रिकेट पहात राहिलो. त्या वेळी माझ्याकडून ही फार मोठी चूक झाली.

७ आ. प.पू. गुरुदेवांच्या आवाजातील ध्वनीफीत ऐकल्यावर प्रभावित होणे

माझे काका श्री. वसंत शिंदे अंधेरीला रहात. त्यांनी मला प.पू. गुरुदेवांच्या आवाजातील ‘साधना’ या विषयावरील ध्वनीफीत दिली. ती मी ऐकली; मात्र त्यातून मला अध्यात्माविषयी काही आकर्षण निर्माण झाले नाही. त्यानंतर काकांनी मला आणखी एक ध्वनीफीत ऐकायला दिली. ती ऐकून मी पुष्कळ प्रभावित झालो.

७ इ. राज्यकर्त्यांचे अयोग्य वर्तन आणि भ्रष्टाचार यांमुळे भारताची अधोगती झाल्याचे
ध्यानी येणे अन् हे चित्र पालटण्यासाठी ‘नेमके काय करायला पाहिजे ?’, हे न कळणे

माझ्या मनात भ्रष्टाचारी, गुंडगिरी करणारे, तसेच राष्ट्रहानी करणारे यांच्याविषयी पुष्कळ चीड होती. महाविद्यालयात अर्थशास्त्राचा अभ्यास करतांना ‘भारतात साधनसामुग्री, मनुष्यबळ, खनिजसंपत्ती इत्यादी सर्व विपुल प्रमाणात असूनही आपला देश दरिद्री आहे; कारण ‘आपल्या देशाला नालायक राज्यकर्ते मिळाल्याने, तसेच भ्रष्टाचारामुळे भारताची अधोगती झाली आहे’, हे माझ्या लक्षात आले. हे सर्व पालटण्यासाठी ‘आपण काहीतरी करायला पाहिजे’, असे मला तीव्रतेने वाटायचे; पण ‘नेमके काय करायला पाहिजे ?’, हे मला कळत नव्हते.

७ ई. ध्वनीफीत ऐकल्यावर मनात निर्माण झालेल्या
कुतूहलापोटी घराजवळ असलेल्या सत्संगाला जाणे

परात्पर गुरु डॉक्टरांची ध्वनीफीत ऐकल्यावर माझ्या मनात सत्संगात जाण्याचे कुतूहल निर्माण झाले. ‘माझ्या घराजवळ ५ मिनिटांच्या अंतरावर गुरुवारी एक सत्संग आहे’, हे मला कळले. हा सत्संग ‘उमा निळकंठ शाळा, नौपाडा, ठाणे’ येथे होता. मी त्या सत्संगाला गेलो. तो सत्संग सौ. माधुरी वाडेकर आणि श्री. नंदकुमार ठाकूर हे साधक घ्यायचे. सत्संग संपल्यावर त्यांनी मला ‘तुम्ही सत्संगाला कसे काय आलात ?’, याविषयी चौकशी केली. तेव्हा मी म्हणालो, ‘‘तुम्ही वर्ष २००० पासून अपप्रवृत्तींविरूद्ध जो जनजागृतीचा लढा देणार आहात, त्यामध्ये मला सहभागी व्हायचे आहे आणि त्यासाठी मी आलो आहे.’’ पहिल्याच वेळी सत्संगात येऊन मी असे सांगितलेले पाहून त्यांना पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

७ उ. सत्संगात गेल्यावर साधना करून आध्यात्मिक
बळ वाढवण्याचे महत्त्व लक्षात आल्याने साधना आणि सेवा यांना आरंभ
करणे अन् साप्ताहिक वितरण सेवेसाठी पत्नी आणि मुलगी यांचे साहाय्य लाभणे

जून १९९८ पासून मी सत्संगाला नियमित जायला लागलो. त्या वेळी ‘सत्संगामध्ये ‘प्रशिक्षण देणे’ असे काहीतरी असेल’, असे मला वाटले होते; मात्र तेथे गेल्यावर ‘साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे’, हे मला कळले. त्यानंतर मी साधनेकडे लक्ष देऊ लागलो. नंतर मी सेवाही करू लागलो. त्या वेळी माझ्याकडे साप्ताहिक सनातन प्रभातचे १०० अंक वितरण करण्याची सेवा होती. काही साप्ताहिकांचे वितरण सौ. मीनल (पत्नी) करत असे, तसेच कु. वैदेही (मुलगी) काही वेळा माझ्यासमवेत वितरणासाठी येत असे.

 

८. सेवेतून व्यापकत्व निर्माण होऊन आध्यात्मिक
उन्नती व्हावी, यासाठी गुरुदेवांनी सेवेची दिलेली संधी !

साधना करत असतांना आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने व्यापकत्व निर्माण होणे पुष्कळ आवश्यक असते. गुरुदेवांनी मला व्यापक होण्याची उत्कृष्ट संधी पहिल्यापासूनच दिली. त्यांच्या कृपेनेच माझा साधनाप्रवास चांगल्या प्रकारे होऊ शकला.

८ अ. नवीन गावी जाऊन आणि तेथे राहून प्रसार करणे

सत्संगात जायला लागल्यावर केवळ ६ – ७ मासांनंतर, म्हणजे जानेवारी १९९९ मध्ये मला उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘तुम्ही श्री. रोहित साळुंके यांच्यासोबत मुरबाड तालुक्यात (ठाणे येथून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात) प्रसाराला जायचे आहे.’’ काही दिवसांनी सहसाधकांना अन्य ठिकाणी प्रसाराला जावे लागल्याने मला एकट्यालाच प्रसाराला जावे लागले. मला मूळ गाव इत्यादी नसल्यामुळे मी शहर सोडून कोणत्याही गावी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे एखाद्या नवीन गावी जाऊन आणि तेथे राहून प्रसार करणे, हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. ‘देवाने संधी दिली आहे, तर प्रयत्न करूया’, असा विचार करून मी प्रसार करण्यास जाऊ लागलो. मी मुरबाड आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये साधारण वर्षभर प्रसार केला.

८ आ. विविध सेवा करायला मिळणे

नंतर वर्ष २००० मध्ये मला ठाणे जिल्ह्यातील नौपाडा येथे सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर एक वर्षाने ठाणे जिल्ह्यातील २ – ३ भागांतील प्रसाराचे दायित्व मी पाहू लागलो, तसेच मला जिल्ह्यात होणार्‍या गुरुपौर्णिमेचे दायित्व देण्यात आले.

८ इ. वर्ष २००२ मध्ये मला ठाणे जिल्ह्यातील प्रसाराचे दायित्व मिळाले.

 

९. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय

९ अ. पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतांना पत्नीचा विरोध होणे

आरंभी सौ. मीनलचा (पत्नीचा) माझ्या सेवेला आणि साधनेला विरोध नव्हता; पण वर्ष २००३ मध्ये जेव्हा मी पूर्णवेळ साधक होण्याचा विचार केला, तेव्हा तिने पुष्कळ विरोध केला. ती नोकरी करत नव्हती आणि कु. वैदेही अजून शिकत असल्याने तिने असे करणे साहजिकच होते. ‘आपले कसे होईल ?’, ही चिंता वाटत असल्याने पूर्णवेळ साधना करण्याच्या माझ्या निर्णयाशी ती सहमत होत नव्हती; पण मी तिच्या मागेच लागलो होतो. शेवटी एक दिवशी वैतागून ती म्हणाली, ‘‘पूर्णवेळ व्हा !’’ त्याच दिवशी मी कुठलाही विचार न करता ३.८.२००३ या दिवशी, म्हणजे महिना पूर्ण होण्याची वाट न पहाता त्यागपत्रासाठी ३ मास आगाऊ द्यावे लागणारे पत्र कार्यालयात नेऊन दिले. मी नोव्हेंबर २००३ मध्ये पूर्णवेळ साधक झालो.

९ आ. नोकरीचे त्यागपत्र संमत होण्यात आलेल्या अडचणी गुरुदेवांच्या कृपेने दूर होणे

९ आ १. त्यागपत्र देऊ नये, यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुष्कळ समजावणे

आमचे वरिष्ठ माझे त्यागपत्र पुढे पाठवत नव्हते. ते मला सतत सांगत होते, ‘हा निर्णय कसा चुकीचा आहे.’ मी त्यांना कसेबसे समजावले. त्यागपत्र पुढील वरिष्ठ अधिकार्‍यांकडे गेल्यावर त्यांनीही मला समजावण्याचा बराच प्रयत्न केला, ‘‘तुम्ही वेडेपणा करत आहात. तुमच्या पत्नीला बोलावून मी त्यांना याविषयी सांगतो’’, असे बरेच काही त्यांनी सांगितले. मी त्यांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला आणि त्यांच्या मागेच लागलो. त्यामुळे शेवटी त्यागपत्र आणखी पुढे पाठवण्यात आले.

९ आ २. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेला जप केल्यावर त्यागपत्राच्या प्रक्रियेला गती मिळणे

ही प्रक्रिया फार संथ गतीने चालू होती. कुठलाच अधिकारी माझे त्यागपत्र पुढे पाठवत नव्हता. या काळात मी एकदा देवद आश्रमात असतांना तेथे सौ. अंजली गाडगीळ (आताच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आल्या होत्या. त्यांना मी ‘माझे त्यागपत्र पुढच्या प्रक्रियेला जात नाही’, हे सांगितले आणि ‘त्यासाठी काय करायला हवे ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी मला एक जप करायला सांगितला. तो करायला लागल्यावर त्यागपत्राची पुढील प्रक्रिया होऊ लागली.

९ आ ३. त्यागपत्राच्या कागदांवरील अंतिम स्वाक्षरी होण्यातील अडथळा दूर होण्यासाठी गुरुपौर्णिमेचा विशेषांक वापरल्यावर आलेली अनुभूती

आमचे प्रमुख अधिकारी ‘डेप्युटी फायनान्शियल अ‍ॅडव्हायजर’ आणि ‘चीफ अकाउंट ऑफीसर’ यांची शेवटी अंतिम स्वाक्षरी होणार होती अन् ते त्यावर स्वाक्षरी करत नव्हते. त्यांनी मला एकदा बोलावले. त्या वेळी नुकतीच गुरुपौर्णिमा झाली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त एक इंग्रजी अंक प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये संत भक्तराज महाराज आणि परात्पर गुुरु डॉ. आठवले यांचे रंगीत छायाचित्र होते. प्रमुख अधिकार्‍यांकडे जातांना मी तो अंक माझ्या समवेत घेऊन गेलो. मी त्यांच्या कक्षामध्ये प्रवेश केला आणि तो अंक त्यांच्यासमोर येईल, अशा रितीने पटलावर ठेवला. (जेणेकरून त्यातील चैतन्याच्या प्रभावामुळे हे कार्य व्यवस्थित व्हावे.) बोलता-बोलता त्यांनी तो अंक उलटा केला आणि त्यामुळे रंगीत छायाचित्रे खालच्या बाजूला गेली. तेवढ्यात त्यांना एक दूरभाष आला. ते दूरभाष घेत असतांना मी तो अंक सरळ केला. त्यांचे बोलणे संपल्यावर त्यांनी तो अंक परत उलट केला. ते माझ्याशी बोलणार, तेवढ्यात त्यांच्या साहेबांचा दूरभाष आला आणि त्यांनी त्यांना बोलावले. त्या वेळी मी परत तो अंक सरळ करून ठेवला. नंतर त्यांना एक तातडीचे काम आले. त्यामुळे त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही जाऊ शकता. मी तुमचे त्यागपत्र (राजीनामा) संमत करतो.’’ अशा प्रकारे त्यागपत्र संमत झाले. त्यागपत्र दिल्यावर वर्ष नोव्हेंबर २००३ मध्ये मी ठाणे सेवाकेंद्रात रहायला गेलो. एक मासाने सौ. मीनल आणि कु. वैदेही या दोघीही सेवाकेंद्रात रहाण्यास आल्या. साधारण एक वर्षभर सेवाकेंद्रात राहून त्या सेवा करत होत्या आणि वैदेही शाळेत जात होती.

 

१०. पूर्णवेळ सेवेला आरंभ झाल्यावर
प्रसाराचे दायित्व सांभाळण्याची मिळालेली संधी !

१० अ. वर्ष २००३

मध्ये मला उत्तरदायी साधकांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबई जिल्ह्यात अध्यात्मप्रसार करण्याचे दायित्व दिले आणि वर्ष २००४ मध्ये मला रायगड जिल्ह्याचीही सेवा पहाण्यास सांगण्यात आले.

१० आ. वर्ष २००५

मध्ये वरील ३ जिल्ह्यांसह मला नाशिक आणि संभाजीनगर येथे जाऊन प्रसार करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मी त्या जिल्ह्यांतही प्रसारास जाऊ लागलो.

१० इ. वर्ष २००७

महाराष्ट्रात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभा चालू झाल्या. वर्ष २००७ – २००८ मध्ये सभांच्या नियोजनासाठी माझा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा दौरा झाला.

१० ई. सप्टेंबर ते डिसेंबर २००८

या कालावधीत उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि झारखंड या राज्यांतील दौरे झाले.

१० उ. वर्ष २००९ – २०१०

या काळात मला गुरुदेवांच्या कृपेने दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील प्रसारसेवा मिळाली.

अशा प्रकारे माझ्याकडे प्रसाराचे दायित्व देऊन मला व्यापक होण्याची संधी मिळाली. असेे गुरुदेवांनी माझ्यावर अनंत अनंत उपकार केले. यामुळे सर्वांशी जवळीक करणे, विविध प्रकृतींचा अभ्यास करणे, त्यांच्याशी जुळवून घेणे, तसेच साधकांकडून शिकणे, असे साधनेसाठी आवश्यक असलेले अनेक गुण मला शिकता आले.

यावरून असे लक्षात येते की, साधकांमध्ये व्यापकता यावी आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी सनातन संस्थेमध्ये साधकांना अनेक जिल्ह्यांत पाठवतात.

 

११. संतपदाच्या जवळ आलेल्या साधकांमध्ये
अधिकाधिक व्यापकत्व यावे, यासाठी त्यांनी केलेले प्रसारदौरे !

११ अ. पू. पेठेआजी

ती. पेठेआजी जेव्हा संतपदाच्या जवळ आल्या होत्या, तेव्हा त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती व्हावी; म्हणून त्यांना महाराष्ट्राचा दौरा करण्यास सांगितले होते. नंतर काही दिवसांतच त्या संतपदी विराजमान झाल्या.

११ आ. पू. भाऊकाका परब

गोवा येथील श्री. सदाशिव (भाऊ) परबकाका यांनाही गुरुदेवांनी महाराष्ट्राचा प्रसार दौरा करण्यास सांगितला. दौर्‍यात असतांनाच ते संतपदी विराजमान झाले.

११ इ. पू. नकातेकाका

श्री. नकातेकाका यांना ते संत होण्यापूर्वी अनेक जिल्ह्यांचा दौरा करण्यास सांगितले होते. यावरून साधकाला अधिकाधिक व्यापक करून त्याची जलद आध्यात्मिक उन्नती करवून घेणे, असे केवळ सनातन संस्थेमध्येच घडते. ही परम पूज्य गुरुदेवांची आमच्यावर असलेली अनंत अनंत कृपा आहे.

 

१२. सेवांतील व्यस्ततेमुळे सांसारिक गोष्टींना
वेळ न दिल्याने पत्नीच्या मनात निर्माण झालेली कटूता !

हळूहळू वेगवगळ्या जिल्ह्यांतील माझे प्रसारदौरे वाढत गेले आणि त्यामुळे मी व्यस्त राहू लागलो. त्या काळात सौ. मीनलची पुष्कळ इच्छा होती की, मी वैदेहीचा अभ्यास घ्यावा (पूर्वी मी शिकवण्या घेत होतो, अन्य कुणी आले, तरी मी त्यांना शिकवायचो; पण मी वैदेहीला मात्र शिकवत नव्हतो.) आणि परीक्षेच्या काळात तिच्यासमवेत रहावे; पण माझ्या सेवांच्या व्यस्ततेमुळे मला ते जमत नव्हते. त्यामुळे तिला काही काळ वाईट वाटत असे. वर्ष २००९ मध्ये वैदेही दहावीला असतांना मी दक्षिण भारताच्या दौर्‍यावर गेलो होतो. तिच्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतांनाही मी कर्नाटकातच होतो. सौ. मीनलला या गोष्टी आवडल्या नाहीत आणि तिच्या मनात थोडी कटूता निर्माण झाली. या कालावधीत माझे घरी रहाणेही पुष्कळ अल्प झाले होते.

 

१३. काटकसरी वृत्तीमुळे पत्नीने  सांसारिक दायित्व चांगले पार पाडणे

त्या वेळी मला मिळणारे निवृत्तीवेतन फार अल्प होते. काही मुदत ठेवी होत्या. त्यावर व्याज मिळत होते. तेवढ्या पैशात सौ. मीनलने पुष्कळ चांगल्या प्रकारे संसार केला. ती मुळातच काटकसरी आहे. पैसे वाचवण्यासाठी बर्‍याच वेळा ती रिक्शाने जाण्याऐवजी पायी चालत जात असे.

 

१४. नवीन घर घेण्याच्या प्रक्रियेत अनुभवलेली गुरुदेवांची कृपा !

वर्ष १९८५ मध्ये आम्ही काही जणांच्या भागीदारीत एक जागा घेतली होती. वर्ष २००४ मध्ये तेथे गृहसंकुल निर्माण करण्याची प्रक्रिया चालू झाली. त्या वेळी मी निवृत्त झाल्याने ‘घर घेऊ नये’, असे मला वाटत होते; कारण त्यात बरेच पैसे जाणार होते.

सौ. मीनलचा घर घेण्याचा आग्रह होता. त्यामुळे आमची वादावादी होऊ लागली. त्या वेळी एका संतांनी सांगितले की, सौ. पत्नीची इच्छा आहे, तर तुम्ही घर घ्या. ‘मुदत ठेवी वापरण्याऐवजी वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यावे’, असे ठरवून मी काही वित्तीय संस्थांकडे गेलो. त्यांनी माझे ‘निवृत्तीवेतन अल्प असल्याचे कारण देऊन घरासाठी कर्ज देऊ शकत नाही’, असे सांगितले. शेवटी एका सहकारी अधिकोषाकडून आम्हाला सहजपणे कर्ज मिळाले. येथे प.पू. गुरुदेवांची कृपा लक्षात आली.’

 

१५. गुरुदेवांच्या कृपेने कु. वैदेहीला ‘फिजिओथेरपी’ला प्रवेश मिळणे

कु. वैदेहीचे १२ वीचे शिक्षण झाल्यावर तिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता. गुरुदेवांच्या कृपेने तिला सहजपणे नवी मुंबईतील महाविद्यालयामध्ये ‘फिजिओथेरपी’ या शाखेमध्ये प्रवेश मिळाला.

 

१६. पत्नीच्या मनातील पती आणि कन्या
यांनी पूर्णवेळ साधक होण्यामागील पूर्वग्रह निघून जाऊन
पत्नीने स्वतःच पूर्णवेळ साधक होण्यामागे अनुभवलेली गुरुकृपा !

१६ अ. वैदेहीला श्रीकृष्णाच्या संदर्भात पुष्कळ अनुभूती आल्याने
तिने पूर्णवेळ साधना करायचे ठरवणे आणि पत्नीने तिला तीव्र विरोध करणे

जानेवारी २०१३ मध्ये कु. वैदेहीला देवद आश्रमात येण्याची इच्छा झाली. नंतर ती देवद आश्रमात राहूनच महाविद्यालयात जाऊ लागली. आश्रमात राहिल्यावर तिला श्रीकृष्णाच्या संदर्भात पुष्कळ अनुभूती आल्या आणि ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटू लागले. तिची परीक्षा जवळ आली होती आणि त्याच वेळी तिला पूर्ण वेळ साधक व्हायचे होते. सौ. मीनलचा या गोष्टीला तीव्र विरोध होता; पण वैदेहीची तळमळ पाहून एका संतांनी सांगितले, ‘‘तिला पूर्णवेळ साधना करू द्या.’’ अशा प्रकारे सौ. मीनलचा विरोध असतांनाही वैदेही पूर्णवेळ साधना करू लागली. सौ. मीनलला एकट्या वैदेहीचाच आधार होता आणि तीही पूर्णवेळ साधना करू लागल्यामुळे ती बरीच अस्वस्थ झाली.

१६ आ. वर्ष २०११ ते २०१६ या कालावधीत रुग्णाईत असतांना पत्नीने भेटण्यासाठी
एकदाच येणे आणि गुरुदेवांच्या कृपेमुळेच सर्व गोष्टींकडे साक्षीभावाने पहाता येणे

नोहेंबर २०११ मध्ये मी देवद आश्रमात आलो आणि वर्ष २०१६ पर्यंत मी पुष्कळ रुग्णाईत होतो. मी सतत झोपूनच असायचो. या संपूर्ण कालावधीत मला भेटण्यासाठी ती एकदाच आली. देवाच्या कृपेने या सर्व गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. या सर्व गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला देवच मला शिकवत होता. गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझे सर्व लक्ष साधनेकडे राहू शकले.

१६ इ. पत्नीने व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेसाठी १ मास रामनाथी
आश्रमात राहिल्यावर तिने ठाण्याचे घर विकून गोवा येथे घर घेण्यास स्वतःहून
सुचवणे आणि ३ – ४ मासांत घर विकण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन गोव्यात घर घेता येणे

वर्ष २०१६ मध्ये मी सौ. मीनलला म्हटले, ‘‘आपण रामनाथी आश्रमात कु. वैदेहीला भेटण्यासाठी विमानाने गोव्याला जाऊया.’’ तिला विमान प्रवासाची फार ओढ असल्याने ती रामनाथी आश्रमात येण्यास सिद्ध झाली. तेव्हा गुरुदेवांनी तिला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेसाठी आश्रमात येण्यास सांगितले. नंतर ती घरी जाऊन एक मासाने रामनाथी आश्रमात आली. आश्रमात एक मास राहिल्यावर तिने सांगितले, ‘‘आपण आपले ठाण्याचे घर विकून गोवा येथे घर घेऊया, म्हणजे मला साधना करता येईल !’’ खरेतर ठाण्याच्या घराविषयी तिला पुष्कळ आसक्ती होती. त्यामुळे ‘‘तुम्ही कोठेही जा; पण मी हे घर सोडणार नाही’’, असे ती म्हणत असे; पण गुरुदेवांची अपार कृपा झाली आणि तिने स्वतःहून ते घर विकण्यास सांगितले. पुढच्या ३ – ४ मासांत घर विकण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन आम्ही गोव्यात घर घेतले. आता गुरुदेवांच्या कृपेने ती स्वतःच गोव्यात राहून पूर्णवेळ साधना करू लागली आहे. त्यामुळे तिच्या मनात आमच्याविषयी असलेला पूर्वग्रह पूर्णपणे निघून गेला आहे.

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०१८)

 

१७. सद्गुरु राजेंद्र शिंदे सनातन संस्थेत येण्यापूर्वी करत असलेली साधना !

१७ अ. प्रतिदिन मारुतीच्या देवळात जाणे

‘सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी १२ वर्षे मी प्रतिदिन मारुतीच्या देवळात जात असे. थंडी, ऊन, वारा किंवा पाऊस काहीही असले, तरी मी रात्री ८ वाजता ठरलेल्या वेळी देवळात जात होतो. त्या वेळी मारुतीला व्यावहारिक मागणे न करता ‘हे भगवंता, मला मनःशांती मिळू दे’, एवढी एकच प्रार्थना माझ्याकडून होत असे.

१७ आ. उपवास करणे

या कालावधीत कोणीतरी सांगितल्यानुसार मी संकष्टी चतुर्थीचे उपवास, तसेच अन्य काही उपवासही करत होतो. सनातन संस्थेत आल्यावर कर्मकांड आणि उपासनाकांड यांतील भेद लक्षात आल्यावर मी उपवास करणे बंद केले.’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सनातनचे ८ वे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा साधनाप्रवास – भाग २

Leave a Comment