ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. ज्ञानेश्‍वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला, हे खरे आहे का ?

‘समस्त वारकरी भक्त ज्ञानेश्‍वरांचे अलौकिक व्यक्तीमत्त्व आणि त्यांचे दिव्यातिदिव्य सारस्वत यांनी विनम्र झाले. समस्त महाराष्ट्र समाजाला ‘ज्ञानेश्‍वरादी भावंडांचा विलक्षण छळ झाला’, अशा क्षुद्र तामसी शंका कधीच स्पर्शत नाहीत.

हे सगळे तामसी आंग्लाळलेल्यांनी (त्यांनाच गौरवाने ‘अभिजन’ म्हणतात, म्हणजे निधर्मी, नास्तिक, आग लावणारे) वाद निर्माण केले आहेत आणि ब्राह्मणवर्गावर प्रचंड चिखलफेक करण्यात अनेकांनी हातभार लावलेला आहे.

 

२. छळासंबंधी पुरावे नसणे

ब्राह्मणांनी ज्ञानेश्‍वरादी भावंडांना अन्नच नव्हे, पाणीही मिळू दिले नाही. त्यांचा भयानक छळ केला. त्याचे अगदी पुसटसे प्रतिबिंबही ज्ञानेश्‍वरी अथवा त्यांच्या अभंगादी वाङ्मयात का उमटले नाही ? संशोधकांनी जी ज्ञानेश्‍वरासंदर्भातील चरित्रे लिहिली आहेत, त्यांत ज्ञानेश्‍वरांचा विलक्षण छळ इत्यादी झाल्यासंबंधी काही पुरावे आहेत का ? ज्ञानेश्‍वर चरित्र आणि वाङ्मयांसंदर्भातील ख्यातनाम अशा अभ्यासपूर्ण ग्रंथांत छळासंबंधी तसे पुरावे आढळत नाहीत.

ब्राह्मणांविरुद्ध म्हणजे पुरोहितांविरुद्ध, वेदांविरुद्ध, संस्कृत भाषेविरुद्ध दंड थोपटून उभे रहाणार्‍या ज्ञानेश्‍वरांचे जे चित्रण सर्वत्र झाले आहे, त्यासंबंधी विद्वान काय सांगतात ? प्रा. श्री.मा. कुलकर्णी सांगतात, ‘‘तसे काहीच घडले नाही. तसे कुठेही अधिकृत पुरावे नाहीत. ही सर्व कपोलकल्पिते आहेत.’’ डॉ. शं.गो. तुळपुळे, पेंडसे, शं.वा. दांडेकर, म.रा. जोशी असे कुणीही ‘छळ झाला’, असे म्हणत नाही.

 

३. ‘गोबेल्स’च्या प्रचारतंत्रासारखा प्रचार !

ज्ञानेश्‍वर चरित्राच्या आधारे सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्यावर अशी विलक्षण चिखलफेक केली जात आहे की, सागरातील चिखलही न्यून पडावा. हिंदु समाजाचा महाविलक्षण बुद्धीभेद केला जात आहे. ज्ञानेश्‍वर हे साक्षात् विष्णूचा अंश आहेत. त्यांचे जीवन तुमच्या आमच्या डोळ्यांनी कसे पहाता येईल ? त्यांचे वाङ्मय हेच वास्तविक त्यांचे चरित्र आहे ! ज्ञानदेवादी भावंडांचा आणि त्यांचे पिता विठ्ठलपंतांचा भयंकर छळ झाला, अमानुष छळ झाला इत्यादी जो काही प्रकार आहे, तो गोबेल्सच्या प्रचार तंत्रासारखाच आहे.

३ अ. ‘संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती’ हा प्रा. सरदार यांचा ग्रंथ आहे. मानवता, धर्म सुधारणा, ब्राह्मणशाही, सनातनी पंडित, दास्यत्व, वर्गभेद, पुरोगामी, सुधारणावादी, सामाजिक विषमता, परिवर्तनादी असे हिंदूंच्या वर्णव्यवस्था समाजव्यवस्थेची निंदानालस्ती करणारे साम्यवादाचे घुटके घेऊन ते आधुनिकांचे शब्दप्रयोग देतात. प्रा. सरदारांप्रमाणे सुंठणकर, ओतुरकर असे आधुनिक अभिजन (आंग्लाळलेले पंडित) सांगतात. आणखी काही प्रसंगी तर ते परस्परांचे खंडनही करतात.

३ आ. ज्ञानेश्‍वर चरित्राचे संशोधक प्रा. सुंठणकर सांगतात, ‘लोकांचा धर्मभोळेपणा आणि बौद्धिक दास्यत्व हाच ब्राह्मणशाहीचा आधार होता. आर्थिक दास्यत्वाहूनही हे दास्यत्व भयंकर होते.’

ज्ञानेश्‍वरांचा काळ ७०० वर्षांआधीचा आहे. त्या काळी हे शब्द रूढ होते का ? या शब्दांना काय अर्थ होता ? हे साम्यवादाचे घुटके आहेत. ७०० वर्षांआधी ज्ञानेश्‍वरकाळी साम्यवादाची बिजे अंकुरत होती, असे काही ते सांगत नाहीत. आधुनिकांचे हे शब्द बुडबुडे, पोकळ वारा असे आहेत.

३ इ. प्रा. सरदार त्यांच्या ‘संतांच्या सामाजिक कार्याची फलश्रुती’ या ग्रंथात सांगतात, ‘ज्ञानेश्‍वर हे कडवे धर्मसुधारक होते.’

खरेतर संत ज्ञानेश्‍वर यांनी शास्त्रप्रमाणावर भर दिला आहे ! सर्व जनसामान्यांना विधीनिषेध कटाक्षाने पालन करण्याचा आदेश दिला आहे. ज्ञानदेव जर धर्मसुधारक असते, तर त्यांनी वेदप्रामाण्य, शास्त्रप्रामाण्य यांची टवाळी केली असती आणि त्यांनी त्यांच्या सर्वज्ञतेच्या बळावर एखादा नवा सुधारक पंथही काढला असता. तसे त्यांनी काही केले नाही आणि पावलोपावली वेदप्रामाण्यावरची पराकाष्ठेची निष्ठा अभिव्यक्त केली.

३ ई. आधुनिक संस्कृतीद्वेष्टे हे विठ्ठलपंतांच्या देहांत प्रायश्‍चित्ताच्या संदर्भात पैठणच्या ब्राह्मणांनी अन्याय केला, असा सूर लावतात. ही त्यांना पर्वणीच होती; परंतु संतांनी मात्र कुणालाच दोष दिला नाही. जे घडले, तेच त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वरांनी अभावानेही त्रागा केला नाही. स्वधर्म म्हणजे वेदप्रतिपाद्य धर्म ! पैठणच्या ब्राह्मणांनी शास्त्रविधीनुसार संन्याशांच्या मुलांचा व्रतबंध करण्यास नकार दिला आणि आधुनिकांनी ब्राह्मणांवर शस्त्र धरले. कोणताही, कोणत्याही जातीतील संत श्रुती-स्मृती प्रतिपादित धर्माचे आचरण अभावानेही टाळत नाही आणि तसा उपदेशही करत नाही.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २२ मार्च २००७, अंक ८)

1 thought on “ज्ञानेश्वरादी भावंडांचा ब्राह्मणांनी छळ केला, हे धादांत खोटे ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी”

Leave a Comment