कोरोनाकाळात देवस्थानांनी केलेले साहाय्य आणि पुरोगाम्यांकडून केला जाणारा दुष्प्रचार !

अयोध्येत निर्माण होणारे भव्य राममंदिर हा राष्ट्राच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. प्रदीर्घ संघर्ष आणि न्यायिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंदिराच्या उभारणीपर्यंत झालेला हा प्रवास ज्या असत्यकथन करणार्‍या प्रवृत्तींच्या पचनी पडलेला नाही, अशांकडूनच सध्या कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर ‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’, अशा प्रकारचे दिशाभूल करणारे संदेश नियमितपणे प्रसारित होत आहेत. अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.


कोविडच्या आपत्ती स्थितीत हिंदु देवस्थानांनी केलेले साहाय्य

वैद्य परीक्षित शेवडे

कोविडच्या दुसर्‍या लाटेला प्रारंभ होताच वडोदराच्या स्वामीनारायण मंदिराने सभागृहाचे रूपांतर १०० खाटांच्या सुसज्ज कोविड हॉस्पिटलमध्ये केले. येथे ऑक्सिजन बेडसह आयसीयू आणि व्हेंटिलेटर यांची व्यवस्था केली. पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापनानेही ‘नीलाचल भक्त निवासा’चे रूपांतर १२० खाटा असलेल्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत १ कोटी ५१ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री साहाय्य निधीला दिलेली आहे. केवळ जगन्नाथच नव्हे, तर ओडिशामधील किमान ६२ छोट्या-मोठ्या मंदिरांनीही अशाच प्रकारच्या देणग्या तेथील मुख्यमंत्री साहाय्य निधीला दिल्या आहेत. इतकेच नव्हे, तर मुंबईतील कांदिवली येथील पवनधाम मंदिराने स्वतःची ४ मजली इमारत ‘कोविड विलगीकरण कक्ष’ म्हणून उपलब्ध करून दिली आहे. हे सारे कोविडच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीतच झाले, असे नसून मागील वर्षीही देशभरातील अनेक छोट्या-मोठ्या हिंदु देवस्थानांनी आपापल्या परीने या आपत्तीत साहाय्य केले होते. यातील काही प्रमुख उदाहरणे पुढीलप्रमाणे –

» श्री वैष्णोदेवी मंदिर व्यवस्थापनाने ‘आशीर्वाद संकुला’ला तेथील जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द करून त्याचा कोरोना रुग्णांसाठी वापर करण्याची विनंती केली होती. याव्यतिरिक्त तेथील नोकरदार वर्गाने वेतनाच्या स्तरानुसार स्वतःच्या वेतनातील काही अंश हा देणगी म्हणून दिला.

» गुजरात येथील सोमनाथ मंदिरानेही १ कोटी रुपये देऊ केले. तसेच गुजरातमधील सर्व ७ स्वामीनारायण मंदिरांनी मिळून १ कोटी ८८ लाख रुपये देणगी दिली. याखेरीज मोठ्या प्रमाणात अन्नछत्रांचीही व्यवस्था केली.

» कांची कामकोटी शंकराचार्य पीठाने १० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्य निधी, तर १० लाख रुपये पंतप्रधान साहाय्य निधीमध्ये दिले.

» शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने तब्बल ५१ कोटी रुपये महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्य निधीला दिले. याखेरीज श्री साईनाथ हॉस्पिटल, शिर्डी अनाथालये, वृद्धाश्रम आदी विविध माध्यमांतून सेवा करणार्‍या त्यांच्या संस्थानाद्वारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांना नियमितपणे अन्नपुरवठा केला आणि करत आहेत.

» कोल्हापूर येथील श्री अंबाबाई देवस्थानकडून मुख्यमंत्री साहाय्य निधीसाठी दीड कोटी रुपये, तर जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी, यासाठी ५० लाख रुपये साहाय्य निधी म्हणून दिले.

» तुळजापूर देवस्थाननेही नुकतेच १५० खाटांचे कोविड रुग्णालय चालू केले, तसेच तेथे खासगी डॉक्टरांना सेवा देण्याचे आवाहन केले आहे.

» राजस्थानातील राणी सती मंदिराने विलगीकरण कक्ष म्हणून २०० खोल्या उपलब्ध करून दिल्या, तर श्री माता मनसादेवी मंदिराने हरियाणा सरकारला १० कोटी रुपयांची देणगी दिली.

याव्यतिरिक्त देशभरातील अनेक ठिकाणची लहान-मोठी
मंदिरे आणि मठ यांनी यथाशक्ती देणगी, जागा, अन्नपुरवठा या
माध्यमातून कोविडच्या आपत्तीमध्ये साहाय्य केले. यावरून मंदिरांच्या कार्याच्या भव्यतेचा अंदाज येईल.

 

मंदिरांविषयी अपप्रचार करून ढोंगी
पुरोगामित्व रेटत जनतेची दिशाभूल करणारे छद्म बुद्धीवादी !

मंदिरे किंवा मठ यांच्याकडून साहाय्य होत असतांना यापैकी कुठल्याही देवस्थानचा धर्मांतर करण्याचा उद्देश नव्हता. याचा विशेष उल्लेख करण्याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या आपत्तींच्या संधी साधून धर्मांतराच्या गोष्टी हिंदूंना नवीन नाहीत. आताच्या कोविड काळातही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची धर्मांतरे घडवल्याचे हळूहळू समोर येत आहे. कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली वा कोरोनाचा कालावधी असला, तरी देवस्थाने यथाशक्ती साहाय्य करतात, हे आजवरचे संपूर्ण देशातील चित्र आहे. असे असतांना केवळ स्वतःचे ढोंगी पुरोगामित्व पुढे खरे करण्याकरता अथवा स्वतःचा छद्म बुद्धीवादाचा वापर करून जनतेची दिशाभूल करत देवस्थानांवर आक्षेप घेणारे संदेश प्रसारित करतात, तेव्हा ते प्रसारित करणार्‍या व्यक्तीने स्वतः नेमके कुठे आणि कधी साहाय्य केले, याचा तपशील ते सप्रमाण घोषित करतील का ? इतक्या मोठ्या जागतिक संसर्गाच्या समयीही ज्या व्यक्तींना स्वतःचे हीन दर्जाचे ‘अजेंडा’ पुढे रेटण्यात धन्यता वाटत रहाते, त्या व्यक्ती समाजासाठी संपूर्णतः निरुपयोगी आहेत, याचाच त्या प्रत्यय देत असतात !

असे खडे समाजाने नीट वेचून बाजूला सारायला हवेत. अन्यथा आढीतील एक सडका आंबा ज्याप्रमाणे सगळे आंबे सडवतो, त्याच प्रकारे हे लोकही अनेक लोकांची बुद्धी भ्रष्ट करतात. अशा व्यक्तींकडे केवळ दुर्लक्ष करणे, हेच आपले कर्तव्य नसून त्यांचे असत्यकथन वारंवार सप्रमाण उघड करत रहाणे, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा ‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या तत्त्वावर पोसलेली ही बांडगुळे अशीच फोफावत राहून समाजाची दीर्घकालीन हानी करू शकतात !

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली (साभार: तरुण भारत, बेळगाव)

Leave a Comment