देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट !

सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात देवतांचे दर्शन घेतांना डावीकडून १. आमदार श्री. प्रशांत ठाकूर, २. पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण आणि माहिती सांगतांना ३. श्री. निनाद गाडगीळ

देवद (पनवेल) – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांचा सत्कार केला. ‘‘आम्ही तुमच्या समवेतच आहोत’’, असे त्यांनी या वेळी सांगितले. त्यांच्यासमवेत भाजपचे पनवेल येथील आमदार श्री. प्रशांत ठाकूर होते. या वेळी देवद ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. विनोद वाघमारे, सदस्य श्री. विजय वाघमारे, सौ. नीला गडकरी, तसेच प्रतिष्ठित श्री. वामन वाघमारे आणि श्री. संदीप वाघमारे अन् शेजारील गावांतील ग्रामस्थही उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. चव्हाण यांनी देवद आणि नवीन पनवेल यांना जोडणार्‍या गाढी नदीवरील प्रस्तावित नवीन पुलाच्या जागेची पाहणी केली. त्या वेळी सनातनचे साधक आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. निनाद गाडगीळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने पुलाची दुःस्थिती अन् ग्रामस्थांची होणारी गैरसोय याविषयी श्री. चव्हाण यांना अवगत केले.

सध्या देवद आणि सुकापूर या दोन गावांना जोडणारा, तसेच देवद ग्रामस्थांना पनवेल येथे जाण्यासाठी आवश्यक असलेला गाढी नदीवरील सध्याचा जलवाहिनीचा पूल कमकुवत झाल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने तो बंद करून ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांची, तसेच या गावात येणार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. गाढी नदीत तात्पुरता मातीचा रस्ता निर्माण करून वाहतूक चालू केली होती; परंतु पावसामुळे तीही आता बंद झाल्याने पनवेल येथे जाण्यासाठी पुष्कळ लांबच्या रस्त्याचा वापर करावा लागतो. यामुळे शालेय विद्यार्थी, गृहिणी, गावकरी या सर्वांनाच अडचणीचे झाले आहे. या संदर्भात ग्रामस्थांसह सनातन आश्रमाच्या वतीने पालकमंत्र्यांना यापूर्वी नवीन पूल बांधून देण्याविषयी निवेदन देण्यात आले होते.

या वेळी श्री. शिवाजी वटकर यांनी गाढी नदी आणि सनातनचा आश्रम यामध्ये आवश्यक असणार्‍या सुरक्षाभिंतीविषयीच्या प्रलंबित प्रस्तावाच्या संदर्भात श्री. चव्हाण यांना सांगितले. या वेळी श्री. चव्हाण यांनी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील देवतांचे दर्शन घेतले आणि वेळ अल्प असल्याने ‘‘मी पुन्हा सविस्तर आश्रम पहाण्यासाठी येईन’’, असे सांगितले.

श्री. रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीही हिंदु जनजागृती समितीची आंदोलने आणि हिंदु धर्मजागृती सभा यांना वेळोवेळी सहकार्य केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment