भगवंताप्रमाणे वैशिष्ट्ये असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

 

१. भगवंताच्याअवताराप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांचा
जन्मदिवस साधकांकडून सृष्टीच्या अंतापर्यंत साजरा होत राहील !

‘सर्वसामान्य मनुष्याचे जीवन काही काळापुरते असल्याने त्याचा वाढदिवस त्याच्या मृत्यूपर्यंतच साजरा होतो. भगवंत अनादि आणि अनंत असल्याने भगवंताच्या अवताराचा जन्मदिवस (उदा. रामनवमी, जन्माष्टमी) भक्तगणांकडून सृष्टीच्या अंतापर्यंत साजरा होत राहील. परात्पर गुरु डॉक्टर भगवंताशी एकरूप झालेले असल्याने ते देहात असूनही देहात नसल्यासारखेच आहेत. थोडक्यात ते अनंतस्वरूप असल्याने त्यांचा जन्मदिवसही साधकांकडून सृष्टीच्या अंतापर्यंत साजरा होत राहील !

 

२. भगवंताप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांच्या
संकल्पाने धर्मकार्य होत असल्याची साधकांना येणारी प्रचीती !

भगवंताने संकल्पाने सृष्टीची निर्मिती केली. आज सनातनचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे कार्य जगभरात वेगाने पसरत आहे. हे कार्य परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने होत असल्याची साधकांची दृढ श्रद्धा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या विविध कार्यांपैकी ग्रंथकार्याविषयीच्या पुढील उदाहरणांवरून या श्रद्धेला पुष्टी मिळते.

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पामुळेच साधकांना ग्रंथलिखाणासाठी सूत्रे आपोआप सुचणे

वर्ष २००१ मध्ये एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘क्षत्रिय’ आणि ‘क्षात्रवीर-साधक’ यांच्यातील भेदाची सूत्रे लिहिण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्यावर पुढच्याच मिनिटाला मी सर्व सूत्रे आपोआप सुचल्याप्रमाणे भरभर लिहून काढली. त्यानंतर पुढे पुढे असे लक्षात येऊ लागले की, परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रत्यक्ष सांगितलेले नसले, तरी त्यांचा अव्यक्त संकल्प हीच लेखनाची स्फूर्ती बनत असते; कारण बहुतेक वेळा लेखन आपोआप केले जाते. ग्रंथ-निर्मितीची सेवा करणार्‍या अन्य साधकांनाही अशी अनुभूती येते. एवढेच नव्हे, तर सनातनच्या बर्‍याच साधकांनाही राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे लिखाण आपोआप सुचत आहे.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पामुळे सनातनचे एक साधक-वैद्य अत्यंत अल्प कालावधीत आयुर्वेदाच्या अंतर्गत असलेली ‘वर्म चिकित्सा’ शिकून तिच्याद्वारे उपचार आणि उपचारपद्धतीविषयीचे ग्रंथलिखाण करू शकणे

सनातनचे कर्नाटकमधील एक साधक-वैद्य वैद्यकीय शिक्षण घेत असतांना एकदा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले होते, ‘‘आपण भूतनाडी शोधायला हवी. ती सापडली, तर तिच्या माध्यमातून उपचार करून आपल्या साधकांचे बरेच त्रास न्यून होतील.’’ या एकाच वाक्यातून प्रेरणा घेऊन त्या साधक-वैद्यांनी ‘भूतनाडी’चा शोध घेण्यास प्रारंभ केला. तेव्हा दक्षिण भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या; पण मोजक्याच लोकांना अवगत असलेल्या ‘वर्म चिकित्सा’ या चिकित्सापद्धतीशी त्यांचा परिचय झाला. या चिकित्सापद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वांना शिकवली जात नाही, तर केवळ ‘गुरु-शिष्य परंपरा’ या अंतर्गत शिष्य एका विशिष्ट योग्यतेचा झाल्यावरच गुरूंकडून त्याला शिकवली जाते, तसेच हे शिक्षण केवळ तमिळ भाषेतच दिले जाते. ‘सर्व साधकांना भावी संकटकाळाच्या दृष्टीने या उपचारपद्धतीचा पुष्कळ लाभ होईल’, असा विचार करून त्या साधक-वैद्यांनी तमिळ भाषा शिकून घेतली आणि मग ‘वर्म चिकित्सा’ केवळ १४ दिवसांत शिकून त्या अंतर्गत ते ‘शिक्षक’ या स्तरावर पोेहोचले. त्यानंतर जुन्या तमिळ भाषेत असलेला ‘भूतनाडी’ याविषयीचा ग्रंथही त्यांना सापडला. सध्या ते ‘वर्म चिकित्से’द्वारे रुग्णांवर उपचार करतात आणि हे ज्ञान सर्वांना मिळावे, या उद्देशाने त्याविषयीचे ग्रंथलिखाणही करतात. ते नेहमी म्हणतात, ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पामुळेच मी इतक्या अल्प कालावधीत ‘वर्म चिकित्सा’ शिकू शकलो आणि त्यांच्या कृपेमुळेच मी रुग्णांवर उपचार आणि ग्रंथलेखनही करू शकत आहे.’

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

देवतास्वरूप गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर !

‘महादेवापरी ज्ञान अगाध, श्रीरामापरी भक्तवात्सल्यरूप ।

श्रीकृष्णापरी ‘धर्मसंस्थापना’ ध्येय, हनुमंतापरी शिष्योत्तमरूप ।

अग्निदेवापरी साधका शुद्धीकारक, सूर्यदेवापरी तेजःपुंजरूप ।

श्रीगणेशापरी साधका विघ्नहारक, दत्तात्रेयापरी श्री गुरुरूप ।

मोक्षदायिनी आमची गुरुमाऊली, असे साक्षात् देवतास्वरूप ॥’

– (पू.) श्री. संदीप आळशी (२०.४.२०१८)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या
कृपेविषयी साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहेत !

देवतांनी अलंकारांना धारण केल्याने, म्हणजे त्या अलंकारांना स्वीकारल्याने अलंकारांना शोभा येते. याप्रमाणेच परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वीकारल्याने, म्हणजे त्यांना आपले मानल्याने साधकांना शोभा आली आहे, अर्थात् त्यांची अध्यात्मात झपाट्याने प्रगती होत आहे. यासाठी साधक त्यांच्या चरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञ आहेत.

अलंकारांना चकाकी असते तोपर्यंत त्यांची शोभा टिकून रहाते. साधकांमध्ये साधकत्व असते तोपर्यंत त्यांची शोभा टिकून रहाते, म्हणजे त्यांची प्रगती टिकून रहाते. स्वतःतील साधकत्व टिकवणे, हे साधकांच्या स्वतःच्याच हातात आहे.’

– (पू.) श्री. संदीप आळशी

Leave a Comment