हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानात सनातनचा सहभाग

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची
डॉ. लहाने समिती तीन वर्षे निष्क्रीय ! – संतोष देसाई

आंदोलनात विषय मांडतांना श्री. संतोष देसाई

सांगली – धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रणसाठी शासनाने डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. याद्वारे ज्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी चालू असलेल्या योजनांचा लाभ मिळत नाही, त्यांना तो मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या समितीने गेल्या तीन वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही कि शासनाला कसलाही अहवाल सादर केलेला नाही. शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे. या पार्श्‍वभूमीवर या तज्ञ डॉक्टरांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे, असे मत हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई यांनी व्यक्त केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांचे ५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंदार पाटुकले यांनी सूत्रसंचालन केले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने म्हणाल्या, हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेऊन एप्रिल २०१७ आणि डिसेंबर २०१७ मध्ये राज्य साहाय्यित धर्मादाय रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन अभ्यास केला असता बर्‍याच रुग्णालयांत शासकीय योजनेची प्रसिद्धी होत नसल्याचे लक्षात आले. या संदर्भात आम्ही  मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहोत. आज हे आंदोलनाचे पहिले पाऊल आम्ही उचलले आहे.

क्षणचित्रे

  • आंदोलनाचे फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
  • या वेळी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
  • रस्त्यावरून येणारे-जाणारे अनेक नागरिक थांबून विषय ऐकत होते.

या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. या समितीचा कारभार पारदर्शक होण्यासाठी या समितीचा कार्य आढावा, चौकशी अहवाल आणि केलेली कारवाई प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीस द्यावी.

२. सामान्य रुग्णांच्या तक्रारी धर्मादाय रुग्णालयांकडून सोडवल्या जात नसल्यास त्या रुग्णांना या तज्ञांच्या समितीकडे थेट तक्रारी याव्यात, यासाठी व्यवस्था निर्माण करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment