प्रशासकीय कारभार सांभाळतांना देश आणि धर्म यांची सेवा करा ! – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस

लखनऊ – आधुनिक राज्यव्यवस्थेमध्ये प्रशासनाला अधिक शक्ती प्राप्त झाली आहे. प्राचीन भारतीय राज्ये आणि इंग्रजांचे राज्य यातही एवढी शक्ती प्रशासनाला नव्हती, तेवढी आताच्या व्यवस्थेत प्रशासनाकडे आहे. या शक्तीचे यथार्थ लक्षात घेऊन पुढे प्रशासकीय कारभार सांभाळतांना देश आणि धर्म यांची सेवा केली, तर तुमची कर्मयोगानुसार साधना होईल आणि पारलौकिक उन्नतीही होईल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा यांचे प्रशिक्षण देणार्‍या ओरिएंटल स्टडी सेंटरमध्ये केले.

युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन सांभाळते आणि नीती-सदाचार व्यवस्था चर्च सांभाळते. भारतात धर्मसंस्था किंवा धर्मगुरु यांना कोणतीही वैधानिक मान्यता नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थसह नीती-सदाचार व्यवस्था सांभाळण्याचे अतिरिक्त उत्तरदायित्व प्रशासनाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आधुनिक व्यवस्थेत प्रशासन शक्तीमान आहे. प्रशासकीय व्यवस्थेला घटनात्मक संरक्षण देण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी या दायित्वाचे महत्त्व लक्षात घेऊन कुठले कर्म पापमय आहे आणि कुठले कर्म शुभ आहे याचे चिंतन करून कार्य केले पाहिजे. खरे तर भारतात राज्यकर्ते अशिक्षित असतात. त्यांच्या हाताखाली उच्चशिक्षित सनदी अधिकार्‍यांनी काम करणे, ही भारतीय लोकशाहीत महत्त्वाची त्रूट आहे, असेही या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले.

या वेळी प्रशासकीय कामकाज आणि अध्ययन करतांना मनावर निर्माण होणार्‍या तणावाचे निर्मूलन करण्यासाठी साधना कशी करायची, याविषयी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले.

प्रशासकीय अधिकार्‍यांना शिकवल्या जाणार्‍या विषयांमध्ये हिंदु दर्शनशास्त्र शिकवले जात नाही; पण इतिहास विषयात बौद्धदर्शन आणि जैनदर्शन शिकवायचे असते, असे ओरिएंटल स्टडी सेंटरचे संचालक श्री. संजय अवस्थी यांनी सांगितले. ज्या बहुसंख्य हिंदु समाजाचे प्रशासन करायचे आहे, त्या समाजाच्या धर्माचा अभ्यास करण्याचे कोणतीही प्रावधान नसणे, हे गंभीर आहे. प्रशासकीय अधिकारी हिंदु धर्मविरोधी निर्णय का घेतात, याचे मूळ येथे आहे. भारतीय लोकसेवा आयोगाचा कारभार कसा चालतो, हे यावरून लक्षात येते. – पू. नीलेश सिंगबाळ, मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती, पूर्व भारत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment