युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे सनातनच्या सेवाकेंद्रात युवा शिबीर

  • ८ जिल्ह्यातील युवांचा सहभाग
  • सर्वांचा कृतीशील होण्याचा निर्धार
शिबिराला उपस्थित युवा साधक आणि मध्यभागी (१) सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने युवा शिबीर घेण्यात आले. त्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, धुळे येथील युवा साधकांनी सहभाग घेतला. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. शिबिरात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा परिचय, ईश्‍वरप्राप्तीचे महत्त्व, दैनिक सनातन प्रभातचे अध्ययन कसे करावे या जोडीला भावसत्संग, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, गुरुकृपायोग, भाषण कसे करावे, धर्मकार्यात कृतीशील सहभाग कसा घ्यावा, या विषयांवर सदगुरु नंदकुमार जाधव, श्री. वैभव आफळे यांनी मार्गदर्शन केले, तर कु. वर्षा जेवळे, श्री. श्रेयस पिसोळकर, श्री. प्रशांत जुवेकर यांनी शिबिरार्थींशी संवाद साधला.

शिबिरार्थींचे मनोगत

१. ईश्‍वर स्वत: माझ्या सभोवती असून तो मार्गदर्शन करत असल्याचे जाणवले. – कु. चिन्मय चांदेकर, नेर, यवतमाळ

२. परात्पर गुरूंचा संदेश ऐकल्यावर भावजागृती झाली. गुरुभेटीची ओढ लागली. – कु. श्रुती विजय शिरसाठ, नाशिक

३. मला आता पूर्णवेळ साधना करायची आहे. त्यासाठी मी कुटुंबियांची अनुमती घेईन. – कु. हेमराज पाटील, धुळे

४. शिबिरामुळे चिडचिडेपणा हा स्वभावदोष अल्प होऊन नामजप करण्याची ओढ निर्माण झाली. – कु. शिवा पंडित थोटे, वर्धा

५. मी अभ्यासाच्या जगात कुठेतरी हरवलो होतो. शिबिरातून मला साधना जवळून शिकायला मिळाली. आता मी साधनाच करणार !

– कु. अभिजित जाधव, जळगाव

शिबिरातून साधनेविषयीच्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली !

येथे भेटलेल्या युवा साधकांना ‘मी पूर्वीपासूनच ओळखत आहे आणि आमची घनिष्ट मैत्री आहे’, असे जाणवले. दिवसभर शिबिरात बसूनही थकवा जाणवला नाही. येथे असतांना आई-बाबांची आठवण आली नाही. शिबिराच्या माध्यमातून माझ्या मनातील साधनेविषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. – कुमारी शीतल चंदनखेडे, चंद्रपूर

युवा शिबीर म्हणजे ईश्‍वराकडे जाण्याचे माध्यम ! – सदगुरु नंदकुमार जाधव

प्रेमभाव कसा वाढवावा, हे शिकून घेण्यासाठी शिबीर असते. देवाला अनुभवण्यासाठी हे शिबीर होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच आपली शिबिरात निवड केली आहे. या संधीचा प्रत्येकाला लाभ करून घेता आला पाहिजे. साधनेत सातत्य रहाण्यासाठी अखंड प्रयत्न करा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment