गायकाचा ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने होणारा आध्यात्मिक प्रवास

संगीत ही ईश्‍वरप्राप्ती करून देणारी एक कला आहे. या साधनापथावर मार्गक्रमण करीत असलेल्या साधकाला संगीताच्या अंतर्गत ‘गायन’ या कलेच्या माध्यमातून साधना करतांना ‘आपली साधना योग्य मार्गाने होत आहे का ?’, असा प्रश्‍न मनात येऊ शकतो. सदर लेखाच्या माध्यमातून साधकाला साधना म्हणून करावयाच्या गायनाविषयीच्या अभ्यासाला दिशा मिळेल. तसेच गायनाच्या माध्यमातून आपली साधना उत्तरोत्तर वृद्धींगत होण्यासाठी त्याला प्रयत्नशीलही रहाता येेईल.

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विभाग

 

१. गायन आणि उच्चारणशास्त्र

अ. ‘त्रेतायुगात यज्ञयागास प्रारंभ झाला. त्यात मंत्रांच्या उच्चाराचे शास्त्र विकसित झाले. शब्द उच्चाराचे शास्त्र पक्के झाल्यानंतर प्राचीन ऋषींनी यज्ञाच्या भिन्न प्रयोगांना प्रारंभ केला. त्यामुळे यज्ञाद्वारे अनेकविध कार्याला यश प्राप्त होऊ लागले. त्यानंतर याच उच्चारण शास्त्राच्या धर्तीवर गायनातील स्वरशास्त्र आणि उच्चारणशास्त्र यांचा विकास झाला.

आ. शब्दांचा शुद्ध उच्चार हा गायनाचा पाया असून त्याला ३० टक्के इतके महत्त्व आहे. हा पाया जितका पक्का होईल तितकी गायनाद्वारे आध्यात्मिक प्रगती लवकर साध्य होते.

इ. गायनात प्रथम मंत्रांप्रमाणे शब्दांच्या उच्चाराला महत्त्व आहे. त्यानंतर शब्दांच्या चढ-उतरांना विलक्षण महत्त्व आहे. गायक साधकातील सत्त्वगुण वाढू लागला की आवाजामध्ये गोडवा येऊ लागतो.

 

२. आवाजात गोडवा निर्माण होणे

अ. गायकीचा सराव सातत्याने केल्याने शब्दांतील पृथ्वीतत्त्वातील जडत्व न्यून होऊ लागते. तेव्हा शब्द कोमल किंवा आल्हाददायक बनतात. त्याचा परिणामस्वरूप आवाजात गोडवा उत्पन्न होतो. या प्रक्रियेत शब्दांतील रज-तम गुण न्यून झालेले असतात.

आ. गायकाचे प्रेम शब्दात उतरू लागते. तेव्हा गायनात गोडवा निर्माण होतो.

गायनातील रज-तम न्यून होणे + प्रेम = आवाजात गोडवा निर्माण होणे

 

३. गायनात माधुर्य उत्पन्न होणे

अ. गायकातील सत्त्वगुण आणि भगवंताविषयीचे प्रेम यांमुळे गायनात माधुर्य उत्पन्न होते.

आ. गायकातील सत्त्वगुण + भगवंताविषयीचे प्रेम = गायनात माधुर्य उत्पन्न होणे

 

४. गायनात भक्तीरस उत्पन्न होण्याची प्रक्रिया

गायक साधकाचा प्रथम शब्दांचा उच्चार शुद्ध होऊ लागतो. साधकातील रज-तम न्यून होते, तसे त्याच्या आवाजात गोडवा उत्पन्न होतो. साधकात सत्त्वगुण वाढू लागतो, तेव्हा शब्द मधुर बनतात. त्यात भगवंताविषयीचे प्रेम निर्माण होऊ लागले की, गायकीत भावरस उत्पन्न होतो. हा भावरस पुष्कळ प्रमाणात वाढल्यावर त्याचे भक्तीरसात रूपांतर होते. हा गायनातील अंतीम टप्पा आहे.

शब्दांचा शुद्ध उच्चार –> आवाजात गोडवा –> शब्दमाधुर्य –> भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होणे –>  भावरस –> भक्तीरस

या तत्त्वावर वरील सूत्र आधारित आहे.

 

५. साधक-गायकात भगवंताविषयीचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी करावयाचे प्रयत्न

५ अ. भगवंताच्या गुणांचे स्मरण करणे

साधकाने गायनापूर्वी भगवंतात कुठले गुण आहेत, याचा प्रथम अभ्यास करावा, उदा. सर्वशक्ती, यश, कीर्ती, ऐश्‍वर्य, कृपा, मारक, तारक, व्यापक, प्रेमस्वरूप इत्यादी भगवंताचे गुण लक्षात घ्यावेत.

५ आ. भगवंताचे रूप समोर आणणे

गायन करण्यापूर्वी संबंधित देवाचे रूप आठवावे.

५ इ. भाव

‘गातांना देव प्रत्यक्ष माझ्यासमोर उभा आहे आणि मी त्याला आळवत आहे’, असा गायनात भाव ठेवावा.

वरील कृती नित्यनियमाने केल्यास साधकात हळूहळू भगवंताविषयी प्रेम आणि भाव उत्पन्न होऊ लागतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०१७)

Leave a Comment