श्रवणभक्तीने संगीताचा आस्वाद घेणारा रसिक भक्त खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होऊ शकतो !

‘संगीताच्या श्रवणातून नादब्रह्माची अनुभूती येतेे. त्यामुळे नवविधा भक्तींमध्ये ‘श्रवणभक्तीला’ अग्रस्थान दिलेले आहे. भावपूर्ण श्रवणातून हृदयाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सहज प्राप्त होतो आणि चैतन्य चित्तापर्यंत सहजतेने पोहोचू शकते. त्यामुळे चित्तशुद्धीची प्रक्रिया जलद गतीने होऊन प्रारब्धभोग सुसह्य होऊन संचितरूपी कर्माचे बीजही ज्ञानाच्या तेजाने जळून भस्मसात होते. अशा प्रकारे जिवाने केलेल्या श्रवणभक्तीमुळे त्याची कर्मबंधनातून मुक्तता होते आणि तो भगवंताकडे अग्रेसर होतो, उदा. संत मीराला तिचे गुरु संत रहिदास (पाठभेद – रैदास, रोहीदास, रहिदास) यांनी काव्यातून उपदेश केला. तिने तो भावपूर्णरित्या श्रवण केल्यामुळे तिला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. (याठिकाणी काव्यातील उपदेश श्रवणाने तिला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असे म्हटले आहे. परंतु असा स्पष्ट उल्लेखही कुठे मिळाला नाही. – संकलक)

कु. मधुरा भोसले

१. आध्यात्मिक स्तरावर कलेचा आस्वाद घेण्यासाठी भक्तांमध्ये रमणारा भगवंत आणि दैवी कलेच्या क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठून आध्यात्मिक ज्ञानानेही परिपूर्ण असणार्‍या आध्यात्मिक कलेचा उत्कृष्ट आविष्कार करणारे थोर कलाकार संत !

भगवंताविषयीचा उत्कट भाव दाटून आल्यामुळे संतांनी स्वच्छंदपणे रचलेले ‘अभंग’ हे उत्स्फूर्तपणे होणार्‍या कलेच्या आविष्काराचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. विविध भाषांमध्ये भगवंताचे स्तुतीगान करण्यासाठी संतांनी रचलेले अभंग, ओव्या आणि दोहे भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले असतात. त्यामुळे भगवंत रसिक बनून त्यांचे श्रवण करत असतो. भगवंताविषयीच्या अतूट प्रेमापोटी स्फुरलेले काव्य, रचलेले अभंग, गायलेली भक्तीगीते, लिहिलेले ग्रंथ, काढलेली चित्रे किंवा घडवलेल्या मूर्ती, हे दैवी कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत; परंतु त्याचबरोबर ते आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्णही असल्याने ज्ञानकलेचा आविष्कारही आहेत. त्यामुळे संतांनी निर्मिलेल्या कलेचा आस्वाद घेतांना सात्त्विक कलेतील सात्त्विक सुखासह शुद्ध आध्यात्मिक ज्ञानाच्या निर्लेप आनंदाची चवही चाखायला मिळते, उदा. संत कबीर यांचे भक्तीमय दोहे ऐकून भक्तीत रममाण झालेल्या प्रभु श्रीरामाने त्यांचे शेले विणले. संगीत सम्राट तानसेन यांचे व्रजनिवासी गुरु श्रीहरिदास यांच्या दिव्य संगीताने भगवंत प्रसन्न झाला. दक्षिणेतील संत त्यागराज यांच्या संगीत साधनेने प्रसन्न होऊन प्रभु श्रीरामाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि नारदमुनींनी त्यांना नारदीय वीणा दिली. कीर्तनातून पंजाबपर्यंत धर्मप्रसार करणारे महाराष्ट्रातील संत नामदेव यांचेे कीर्तन ऐकतांना स्वत: विठ्ठल तल्लीन होऊन डोलत असे. संगीत अन् नृत्य यांद्वारे विठ्ठलाला खिळवून ठेवणारी संत कान्होपात्रा आणि संगीत अन् नृत्य यांच्या माध्यमातून शिवोपासना करून त्याला प्रसन्न करणार्‍या आणि शिवशंकराने रसिकाचे रूप धारण करून जिचा उद्धार केला ती थोर शिवोपासक नर्तकी ‘महानंदा’, ही दैवी कलेची उदाहरणे आहेत.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (११.३.२०१६, रात्री १२.३०)

संगीताच्या भावपूर्ण श्रवणानेही नादब्रह्माची अनुभूती येते !

बर्‍याच जणांची नाळ ही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संगीताशी जोडलेली असते. त्यामुळे काहींना गाता येत नसले, तरी ते संगीताचे चाहते (आवड असणारे) असल्याने त्यांनाही संगीताच्या श्रवणामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊ शकतो. संगीत ही नादब्रह्माची उपासना आहे. त्यामुळे केवळ भावपूर्ण श्रवणानेही या नादब्रह्माची अनुभूती घेता येते, हे लेखावरून आपल्याला अभ्यासायला मिळेल.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात