सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा उपयोग केलेला असूनही तिच्यामुळे कोणतेही तोटे होत नसून उलट आध्यात्मिकदृष्ट्या लाभच होत असणे आणि ती उदबत्ती धर्मशास्त्राविरुद्धही नसणे

Article also available in :

हिंदू पूजा आणि आरती करण्यासाठी घर, दुकाने आणि मंदिरे यांमध्ये उदबत्तीचा सर्रास वापर करतात. उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा वापर केला जातो. सध्या संकेतस्थळे आणि विविध प्रसारमाध्यमे ‘उदबत्तीमध्ये वापरण्यात येणार्‍या बांबूच्या काडीमुळे विविध प्रकारे तोटे होतात’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करत आहेत. सदर लेखात वैज्ञानिक उपकरणाचा उपयोग करून केलेल्या संशोधनातील निष्कर्ष, या सूत्रांविषयी सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, तसेच सूक्ष्म-चित्र यांच्या आधारे या वृत्ताचे खंडण करण्यात आले आहे.

१. पेठेतील उदबत्ती, सात्त्विक उदबत्ती आणि धूप यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘पेठेतील (बाजारातील) सर्वसाधारण उदबत्ती, सात्त्विक उदबत्ती आणि धूप यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. ही चाचणी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात ३.११.२०१७ आणि ६.१२.२०१७ या दिवशी घेण्यात आली. या चाचणीत पेठेतील सर्वसाधारण उदबत्ती, सात्त्विक उदबत्ती आणि धूपकांडी या पेटवण्यापूर्वी आणि पेटवल्यानंतर ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे त्यांच्यातील ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा अन् सकारात्मक ऊर्जा यांविषयी निरीक्षणे नोंद करण्यात आली. या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

१ अ. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ १. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – पेठेतील सर्वसाधारण उदबत्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळणे आणि उदबत्ती पेटवल्यावर ती ऊर्जा न्यून होणे; पण सात्त्विक उदबत्ती आणि धूप यांच्यात आरंभी, तसेच ते घटक पेटवल्यानंतरही नकारात्मक ऊर्जा न आढळणे

पेठेतील सर्वसाधारण उदबत्ती पेटवण्यापूर्वी तिच्यात ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या. उदबत्ती पेटवल्यावर त्या नकारात्मक ऊर्जा अनुक्रमे नष्ट अन् न्यून झाल्या. सात्त्विक उदबत्ती आणि धूप यांत दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नव्हत्या अन् ते दोन्ही घटक पेटवल्यानंतरही त्यांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ अ २. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – पेठेतील उदबत्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा न आढळणे; परंतु सात्त्विक उदबत्ती आणि धूप पेटवण्यापूर्वी अन् पेटवल्यानंतरही त्या दोन्हींमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. पेठेतील उदबत्तीमध्ये आरंभी आणि उदबत्ती पेटवल्यावरही सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. सात्त्विक उदबत्ती, तसेच धूपकांडी पेटवण्यापूर्वी केलेल्या निरीक्षणात त्या दोन्ही घटकांसाठी ‘यू.टी.एस्.’ स्कॅनरच्या भुजा १७० अंशाच्या कोनात उघडल्या. याचा अर्थ दोन्ही घटकांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती; परंतु त्या ऊर्जेची प्रभावळ मोजण्याएवढी नव्हती. (स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या तरच प्रभावळ मोजता येते.) उदबत्ती, तसेच धूपकांडी पेटवल्यानंतर केलेल्या निरीक्षणात मात्र सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली आणि ती दोन्ही घटकांपासून अनुक्रमे ६५ सें.मी. आणि ७१ सें.मी. दूरपर्यंत होती.

१ आ. निष्कर्ष

सात्त्विक उदबत्तीमध्ये बांबूची काडी असूनही ती पेटवल्यावर धूप पेटवल्यावर ज्याप्रकारे त्याच्यामध्ये जेवढी सकारात्मक ऊर्जा आढळली, जवळपास तेवढीच सकारात्मक ऊर्जा सात्त्विक उदबत्तीमध्ये आढळली. पेठेतील सर्वसाधारण उदबत्तीमध्ये मात्र सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली.

१ इ. निष्कर्षामागील अध्यात्मशास्त्र

सात्त्विक उदबत्तीमध्ये जशी सकारात्मक ऊर्जा आढळली, तशी पेठेतील उदबत्तीमध्ये न आढळण्याचे कारण पुढील सारणीतून लक्षात येईल.

उदबत्तीचा वापर करणे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक नाही; मात्र त्यासाठी उदबत्ती सात्त्विक असणे आवश्यक आहे. सात्त्विक उदबत्ती आध्यात्मिकदृष्ट्या धुपाएवढाच लाभ करून देते, हे या चाचणीतून लक्षात येते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.१२.२०१७)

 

२. उदबत्तीचा वापर हानीकारक असल्याच्या
वृत्तातील सूत्रांचे आध्यात्मिक स्तरावर केलेले खंडण

२ अ. सूत्र १

उदबत्तीमध्ये बांबूच्या काडीचा वापर करणे, हे धर्मशास्त्राविरुद्ध आहे; कारण धर्मशास्त्राने बांबू जाळणे निषिद्ध मानले आहे. बांबू जाळल्यामुळे पितृदोष लागतो.

२ अ १. खंडण – धर्मशास्त्राने विविध धार्मिक कर्मांमध्ये बांबूचा वापर करण्यास सांगितला असणेे

‘हिंदु धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बांबूचा वापर पुढील धार्मिक कर्मांमध्ये केला जातो.

२ अ १ अ. पार्थिव नेण्यासाठी तिरडी बनवतांना बांबूचा वापर केला जाणे

पार्थिव नेण्यासाठी तिरडीचा वापर केला जातो. ही तिरडी बनवण्यासाठी बांबूचा वापर करण्यात येतो. बांबूमध्ये असणार्‍या पोकळीमध्ये मृत व्यक्तीचा वायुरूपी असणारा लिंगदेह सहज शिरकाव करू शकतो आणि पार्थिवातील धनंजय वायूही बांबूच्या पोकळीत भरून जातो. त्यामुळे प्रेताशी संबंधित असणारी स्पंदने तिरडीमध्ये कार्यरत होऊन तिच्यावर केलेले संस्कार मृत व्यक्तीच्या लिंगदेहापर्यंत पोहोचतात.

२ अ १ आ. गुढीपाडव्याला बांबूची गुढी उभी करण्याचे शास्त्र

गुढीपाडव्याला घरासमोर उभी करायची गुढी ही बांबूपासून बनवली जाते. बांबूच्या घनभागाकडे तेजरूपी सगुण चैतन्यलहरी आणि बांबूमध्ये कार्यरत असणार्‍या पोकळीकडे वायुरूपी निर्गुण चैतन्यलहरी अन् निर्गुणतत्त्व प्रबळ असणार्‍या ब्रह्मतत्त्वाच्या लहरी शीघ्रतेने आकृष्ट होतात.

२ अ १ इ. भागवतकथा सांगत असतांना पितरांना कथा ऐकता यावी, यासाठी कार्यक्रमस्थळी बांबूची काठी रोवली जाणे

अनेक ठिकाणी विशेषत: उत्तर भारतात मोठ्या पटांगणात श्रीमद्भागवताचे वाचन करून त्यांतील कथा सांगितल्या जातात. ही कथा ऐकण्यासाठी पुष्कळ लोक जमतात. या कथांचे भावपूर्ण श्रवण केल्यामुळे जिवाची समस्त पापे नष्ट होतात. त्यामुळे कथा ऐकणार्‍या व्यक्तींच्या अतृप्त पितरांनाही त्याचा लाभ होण्यासाठी कथेच्या ठिकाणी व्यासपिठाजवळ जमिनीत एक बांबू रोवला जातो. या बांबूला प्रत्येक व्यक्ती एक दोरा बांधते. ‘त्यामुळे व्यक्तीच्या पितरांना बांबूच्या पोकळीमध्ये येऊन बसणे आणि संपूर्ण कथा ऐकणे सुलभ होते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अशा प्रकारे बांबूचा संबंध (पितर आणि मृतात्मे) लिंगदेह आणि देवता या दोघांशी असल्याने त्याचा वापर शुभकार्यात अन् अंत्यसंस्कार अशा दोन्ही कार्यांत केला जातो. त्यामुळे बांबूचा वापर करणे निषिद्ध नाही. तसेच बांबू जाळल्यामुळे पितृदोष लागत नाही.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०१७, रात्री ११)

२ अ १ ई. बांबूपासून निर्माण केलेल्या वास्तूत आणि पात्रात स्पंदने अन् शक्ती टिकून रहाणे

‘बांबूत असलेल्या स्थिती आणि वायू या तत्त्वांमुळे बांबूचा मंडप उभारणी अन् वंशपात्र (सूप) यांसारख्या घटकांच्या निर्मितीसाठी वापर केला जातो. बांबूपासून निर्माण केलेल्या वास्तूत धार्मिक कृती केल्यास त्या वास्तूतील चैतन्य टिकून रहाते, तर बांबूपासून निर्माण केलेल्या पात्रात वस्तू ठेवल्यावर तिची स्पंदने आणि शक्ती बाह्य वायूमंडलात प्रक्षेपित न होता त्या वस्तूत टिकून रहाते. – श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (२.१२.२०१७, रात्री ९.०९)

२ आ. सूत्र २ – उदबत्तीमध्ये बांबूची काडी वापरणे अयोग्य आहे.

२ आ १. खंडण – उदबत्तीमध्ये असणार्‍या बांबूच्या काडीचे महत्त्व

२ आ १ अ. बांबू नैसर्गिक वनस्पती असल्याने तिच्यापासून बनवलेली उदबत्ती सात्त्विक असणे

‘बांबू ही एक नैसर्गिक वनस्पती आहे. मानवनिर्मित वस्तूंपेक्षा निसर्गनिर्मित पदार्थांमध्ये अधिक सात्त्विकता असते, उदा. शंख, रुद्राक्ष. त्यामुळे बांबूपासून बनवलेल्या उदबत्त्या सात्त्विक असतात.

२ आ १ आ. बांबूमध्ये पोकळी असल्याने वायु आणि आकाश ही तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत असून बांबूकडेे ब्रह्मतत्त्व आकृष्ट होणे

ज्याप्रमाणे दर्भामध्ये सात्त्विकता आणि चैतन्य यांचे प्रमाण अधिक असते अन् दुर्वांमध्ये गणेशतत्त्व प्रबळ असते, त्याप्रमाणे बांबूमध्ये पोकळी असल्याने त्यात वायू अन् आकाश ही तत्त्वे पुष्कळ प्रमाणात कार्यरत असून बांबूकडे ब्रह्मतत्त्व आकृष्ट होते.

२ इ. सूत्र ३

उदबत्तीच्या काडीमध्ये असणारा बांबू पेटल्यावर निर्माण होणारा धूर विषारी असल्याने तो प्रकृतीस्वास्थ्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे कर्करोग आणि हृदयविकार, तसेच मेंदूशी संबंधित व्याधी होतात. बांबूची काडी असलेल्या उदबत्तीच्या धुरामुळे खोलीतील वातावरण दूषित होते.

२ इ १. सात्त्विक उदबत्ती पेटवल्यावर होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

सात्त्विक उदबत्तीच्या काडीवर लावलेला सुगंधी लेप, हा पृथ्वीतत्त्वाशी संबंधित असतो, तर या उदबत्तीमध्ये असणारी बांबूची काडी ही वायू आणि आकाश या तत्त्वांशी निगडित असते. सात्त्विक उदबत्ती पेटवल्यामुळे पृथ्वीतत्त्वमय सुगंधीलेपाला अग्नीचा स्पर्श होऊन त्यातून सगुण स्तरावरील चांगली ऊर्जा गंधमय लहरींच्या रूपाने कार्यरत होते. सात्त्विक उदबत्तीच्या आत असणार्‍या बांबूच्या काडीला अग्नीतत्त्वाचा स्पर्श झाल्याने काडीतील वायू आणि आकाश तत्त्वांपासून चांगली शक्ती धुराच्या रूपाने निर्माण होते.

२ इ २. सात्त्विक उदबत्ती पेटवल्यामुळे होणारा परिणाम

सात्त्विक उदबत्ती पेटवल्यावर त्यातून प्रक्षेपित होणारा धूर आणि गंधमय लहरी वार्‍यासमवेत संपूर्ण खोलीत किंवा वास्तूत पसरतात. त्यांचे कार्य पुढीलप्रमाणे आहे.

२ इ २ अ. संपर्कात येणार्‍या व्यक्ती

सात्त्विक उदबत्तीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या भोवती निर्माण झालेेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होते. सात्त्विक उदबत्तीचा धूर पवित्र आणि सात्त्विक असल्यामुळे व्यक्तीच्या देहातील त्रासदायक शक्तीची स्थानेही नष्ट होऊन व्यक्तीची, म्हणजे पिंडाची आध्यात्मिक शुद्धी होऊन तिच्याभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे पेटत्या सात्त्विक उदबत्तीचा धूर कोणत्याही जिवासाठी अपायकारक नसून, तो आध्यात्मिकदृष्ट्यालाभदायक आहे.

२ इ २ आ. वातावरण

२ इ २ आ १. सात्त्विक उदबत्तीतील बांबूची काडी पेटल्यामुळे निर्माण होणार्‍या धुरामुळे वातावरणाची शुद्धी होणे

बांबूची काडी जळल्यामुळे त्यातून मारक शक्तीच्या लहरींचे प्रक्षेपण होेते. त्यामुळे खोली किंवा वास्तूतील वातावरणात कार्यरत असणार्‍या रज-तमप्रधान लहरींचे उच्चाटन होऊन वातावरणाची शुद्धी होते.

२ इ २ आ २. सात्त्विक उदबत्तीतील गंधमय लहरींमुळे वातावरणाची सात्त्विकता वाढणे

सात्त्विक उदबत्तीतील सुगंधमय द्रव्याच्या लेपातून पवित्र आणि सात्त्विक असणार्‍या सुगंधमय गंधलहरींचे धुरासमवेत वातावरणात प्रक्षेपण होऊन वातावरणातील सात्त्विकता वाढते. अशा प्रकारे बांबूची काडी असलेल्या सात्त्विक उदबत्तीच्या धुरामुळे खोलीतील वातावरण दूषित न होता उलट पवित्र आणि सात्त्विक होते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.१२.२०१७, रात्री ११)

२ इ ३. धूप आणि उदबत्ती यांतील भेद

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान),  (२.१२.२०१७, रात्री ९.०९)

 

३. प्रज्वलित सात्त्विक उदबत्तीमुळे होणारे सूक्ष्मातील लाभ

प्रज्वलित सात्त्विक उदबत्तीमुळे होणारे सूक्ष्मातील लाभ पुढील सूक्ष्म-चित्रातून स्पष्ट होतात.

 

४. उपासनाकांडानुसार केल्या जाणार्‍या पूजेत सात्त्विक
उदबत्तीचा उपयोग श्रेष्ठ, तर शास्त्रोक्त पूजेत धुपाचा प्रयोग अधिक श्रेष्ठ !

‘पूर्वीच्या काळी जिवांची आणि वायूमंडलाची सात्त्विकता अधिक प्रमाणात होती. त्यामुळे धुपाच्या उपचारातून आवश्यक ते ईश्‍वरी तत्त्व जिवाला सहजतेने ग्रहण व्हायचे. कलियुगातील अधिकांश जिवांना अनिष्ट शक्तींचा त्रास असल्याने आणि त्यांच्यावर असलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणामुळे त्यांना ईश्‍वरी शक्ती ग्रहण करता येत नाही. अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या जिवांना शास्त्रोक्त पूजा करणेही शक्य होत नाही. त्यामुळे अशा जिवांना उपासनाकांडाच्या पूजेतून अधिक चैतन्य मिळण्यासाठी आणि त्यांचे अनिष्ट शक्तींचे त्रास न्यून होण्यासाठी धुपाच्या तुलनेत सात्त्विक उदबत्तीचा उपयोग अधिक श्रेष्ठ ठरतो. याउलट शास्त्रोक्त पूजेत धूप अर्पण करणे अधिक श्रेष्ठ ठरते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१२.२०१७, रात्री ९.०९)

धर्माच्या अभ्यासकांना विनंती !

‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित होणारे साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान योग्य कि अयोग्य, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती’, यांचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा ! : ‘आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्‍वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला ‘योग्य कि अयोग्य ?’, असे म्हणता येत नाही. ‘ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?’, यासंदर्भात, तसेच साधकांना येणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात (उदा. उच्च लोक, पंचमहाभूते यांच्याविषयीच्या अनुभूतींच्या संदर्भात) धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर ‘अयोग्य काय ?’, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो.’

– संपादक, सनातन प्रभात

सूक्ष्म : प्रत्यक्ष दिसणारी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. ‘सूक्ष्म’ ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

Leave a Comment