भाग्यनगर येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संशोधन केंद्रातील वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. जगन्नाधम् यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

डॉ. जगन्नाधम् (मध्यभागी) यांना सूक्ष्म जगतातील संशोधनाविषयी माहिती देतांना डॉ. (सौ.) नंदिनी सामंत आणि कु. प्रियांका लोटलीकर

रामनाथी (गोवा) – तेलंगण येथील वैज्ञानिक डॉ. एम्.व्ही. जगन्नाधम् यांनी ६ नोव्हेंबर २०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. ते भाग्यनगर येथील ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या जगविख्यात आणि जैविक तंत्रज्ञानातील अग्रगण्य संशोधन केंद्रात वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक (Senior Principal Scientist) पदावर कार्यरत आहेत. आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असूनही त्यांनी ‘पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम – आधुनिक विज्ञान आणि वेदांत यांतील मतांची तुलना’ हा वेदांतावरील अभ्यासपूर्ण शोधनिबंध नेपाळ येथे ऑगस्ट २०१७ मध्ये  झालेल्या पाचव्या ‘सायन्स अ‍ॅण्ड सायन्टिस्ट २०१७’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला होता.

आश्रमात आल्यावर डॉ. जगन्नाधम् यांनी येथे राष्ट्र आणि धर्म यांसाठी चाललेले विविधांगी कार्य समजून घेतले. आश्रमात सेवारत असलेले बाल आणि युवा साधक यांचा सेवाभाव पाहून ते प्रभावित झाले. या वेळी साधकांशी चर्चा करतांना डॉ. जगन्नाधम् म्हणाले, ‘‘ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्याचे कार्य सुरळीतपणे चालवण्यासाठी विविध स्तरांवरचे कारकून निर्माण करणारी इंग्रजी शिक्षणपद्धत प्रस्थापित केली. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय सरकारांनी तीच शिक्षणपद्धत चालू ठेवल्यामुळे विद्यालये आणि महाविद्यालये ज्ञानदान करणार्‍या संस्था न रहाता ‘शासकीय नोकरी मिळवणे’, या संकुचित विचारसरणीचे पोटार्थी ‘रोबो’ निर्माण करणार्‍या फॅक्टरी (कारखाने) बनल्या आहेत’, असे मत त्यांनी व्यक्त केले. शासकीय नोकरी मिळवणे ही जीवनाची इतिकर्तव्यता नसून स्वतःला प्रथम मनुष्य, नंतर साधक या पायर्‍यांनी मोक्षापर्यंत जाण्याचे ध्येय ठेवून त्यावर निश्‍चयाने मार्गक्रमण करणारी आश्रमातील तरुण पिढी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “सनातन समाजाला वेदांतातील तत्त्वांनुसार जीवन जगायला शिकवत आहे. आश्रमातील साधकांमध्ये ही तत्त्वे रुजली आहेत, हे जाणवत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी याच प्रतिकृतीचे (‘मॉडेल’चे) रोपण आता समाजात विविध ठिकाणी केले की झाले.’’ डॉ. जगन्नाधम् यांनी आश्रमात चालू असलेले विपुल संशोधन कार्य विस्ताराने जाणून घेतले, तसेच संशोधन कार्यात सहभागी साधकांना मौलिक मार्गदर्शनही केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात