रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात युवा साधकांना साधना व व्यक्तिमत्त्व विकास यांवर मार्गदर्शन

युवा साधकांनो, पंचसूत्रीनुसार साधनेचे प्रयत्न करा ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

डावीकडून मार्गदर्शन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सौ. संगीता घोंगाणे

रामनाथी (गोवा) – दूरदर्शन, भ्रमणभाष, इंटरनेट, तसेच सामाजिक प्रसारमाध्यमे (सोशल मीडिया) यांचा अनावश्यक वापर केल्याने बहिर्मुखता येते, तसेच कोणतीही कृती ताण घेऊन केल्याने साधना खर्च होते आणि फलनिष्पत्तीही न्यून होते. रज-तम वाढवणार्‍या आणि साधना खर्च करणार्‍या सर्व कृती टाळा अन् ‘ऐकणे, स्वीकारणे, शिकणे, विचारणे आणि आढावा देणे’ या पंचसूत्रीनुसार साधनेचे प्रयत्न करा. ही शिबिराची सांगता नसून साधनेच्या प्रयत्नांचा प्रारंभ आहे, हे लक्षात घेऊन साधनेसाठी जोमाने प्रयत्न करा, असे मार्गदर्शन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी युवा साधकांना केले. येथे १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या युवा साधक प्रशिक्षण शिबिराची उत्साही वातावरणात सांगता झाली.

शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेत भावजागृतीचे महत्त्व, वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली. शिबिरात झालेल्या गटचर्चांमध्ये ‘स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोषांची सूची कशी काढावी ?’, तसेच ‘स्वभावदोषांची सारणी कशी लिहावी?’ या विषयांवरील तात्त्विक आणि प्रायोगिक भागही घेण्यात आला. लहान वयात साधनेची आवड निर्माण झाल्यामुळे आश्रमजीवन स्वीकारणार्‍या साधिका कु. वैष्णवी येळेगावकर, कु. मृण्मयी गांधी आणि कु. वैष्णवी वेसणेकर, तसेच अन्य युवा साधक आणि बालसाधक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

 

जे शिकलो, ते कृतीत आणणे ही कृतज्ञता !
– सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका, सनातन संस्था

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या प्रसारसेविका सौ. संगीता घोंगाणे मार्गदर्शन करतांना म्हणाल्या, ‘‘शिबिरात जे शिकलो, ते कृतीत आणणे, हीच गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. ईश्‍वराच्या या कार्यासाठी त्याने आपली निवडी केली, संतांचे मार्गदर्शन मिळाले, आश्रमात येण्याची संधी मिळाली, यांसाठी ईश्‍वराप्रती सतत कृतज्ञ राहून साधनेचे प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे.’’

 

क्षणचित्रे

१. युवा साधकांनी शिबिरातील विविध सत्रांमध्ये उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वतःच्या शंकांचे निरसन करून घेतले.

२. वयाने लहान असल्यापासून आश्रमात राहून सेवा करणारे युवा आणि बाल साधक यांचे मनोगत ऐकल्यावर ‘साधनेसाठी प्रेरणा मिळाली’, असे अन्य युवा साधकांनी सांगितले.

३. स्वभावदोष घालवण्यासाठी शिबिरात सांगितलेले प्रयत्न युवा साधकांनी लगेचच कृतीत आणले, तसेच शिबिरात अनेक सूत्रे शिकायला मिळत असल्यामुळे सर्वांची भावजागृती होत होती.

 

शिबिरात सहभागी युवा साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा केलेला निश्‍चय

साधनेचा निश्‍चय करतांना कु. अनमोल करमळकर

१. कु. अनमोल करमळकर – दिवसभराचे स्वत:चे नियोजन करून सेवेसाठी वेळ देईन. प्रत्येक कृतीला भावाची जोड देईन. तळमळीने साधना करीन. आश्रमात ज्या कार्यपद्धती शिकायला मिळाल्या त्यांचे घरातही पालन करीन.

२. श्री. प्रसाद वसाने – नियमितपणे नामजप करीन आणि व्यष्टी साधनेचा आढावा देईन. दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करीन.

३. कु. सृष्टी तवटे – न्यूनतम दिवसांमध्ये व्यष्टी साधनेची घडी बसवीन, तसेच प्रतिदिन ३ घंटे आणि सुट्टीच्या दिवशीही सेवा करीन.

४. श्री. संग्राम पवार – व्यष्टी आणि समष्टी साधना होण्यासाठी प्रयत्न करीन.

५. कु. शिवलिला गुब्याड – प्रत्येक ३ घंट्यांनी स्वत:चा साधनेचा आढावा घेणार. व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करून त्याचा उत्तरदायी साधकांना आढवा देईन. इतरांच्या चुका न पहाता अंतर्मुख राहून प्रयत्न करीन.

६. श्री. राहुल ढवण – चिरंतन आनंद मिळवण्यासाठी साधना का करणे आवश्यक आहे, हे शिबिरातून शिकायला मिळाले. परमपूज्य डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना तळमळीने कृतीत येण्यासाठी प्रयत्न करीन.

श्री. कल्पेश हलगेकर, बेळगाव

७ अ. ‘रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जायचे आहे’, असे सांगितल्यावर ताण येऊन ‘जाऊ नये’, असे वाटणे आणि वडील ओरडल्यावर आणि काकांनी समजावल्यावर शिबिरासाठी जाण्याची सिद्धता करणे

‘२१.१०.२०१७ या दिवशी मला काकांनी ‘रामनाथी आश्रमात शिबिरासाठी जायचे आहे’, असे सांगितले. त्या वेळी मला पुष्कळ ताण आला. ‘मी साधना करत नाही, तरी मला हे का बोलावतात ?’, असे वाटत होते. मला मनापासून आश्रमात जायचे नव्हते. मी काकांना जाण्यासाठी ‘हो-नाही’, असे सांगत होतो. तेव्हा २२.१०.२०१७ या दिवशी माझे वडील ओरडून मला म्हणाले, ‘‘देवाने चांगली संधी दिली आहे आणि तुला ती नको आहे. मी तुला यापुढे काहीही सांगणार नाही. तुला जे करायचे आहे, ते कर.’’ २३.१०.२०१७ या दिवशी सकाळी १० वाजता मला आश्रमात जाण्यासाठी निघायचे होते. सकाळी ७ वाजता मला काकांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आम्हाला आश्रमात जायला संधी मिळत नाही आणि तुला संधी मिळत असूनही तू ‘नाही’ म्हणतोस. या वेळी तू माझ्यासाठी जा. इथून पुढे मी तुला ‘आश्रमात जा’, असे सांगणार नाही.’’ नंतर मी आश्रमात जाण्यासाठी सिद्ध झालो. मला वाटले, ‘महाविद्यालयात सुटी मिळेल का ?’; पण प्राचार्यांनी मला सुटी दिली.

७ आ. आश्रमात आल्यावर ‘शिबिराला आलो, ते बरे झाले’, असे वाटणे आणि ‘प्रसार करतांना साधनेविषयी कसे बोलायचे ?’, ते शिकायला मिळणे

मी आश्रमात आल्यावर ‘आश्रमात आलो, ते बरे झाले’, असे मला वाटले. मला सर्व साधकांसमोर बोलायला भीती वाटत होती. देवाने ती भीती घालवून मला बोलायला शिकवले. ‘प्रसारात गेल्यावर साधनेविषयी कसे बोलायचे ? सनातन प्रभातविषयीची माहिती, संतांचे मार्गदर्शन, साधक एकमेकांशी कसे बोलतात ? प्रेमभाव, शिस्त’, अशा पुष्कळ गोष्टी मला शिकायला मिळाल्या. शाळेत शिक्षकांना ३ – ४ वेळा प्रश्‍न विचारल्यास ते लगेच चिडतात; पण आश्रमातील साधक समोरील व्यक्तीला विषय समजेपर्यंत प्रेमाने सांगतात.

७ इ. आश्रमात आल्यापासून ‘साधना करावी’, असे वाटू लागणे

मला घरी असतांना ‘साधना करावी’, असे वाटत नव्हते; पण आश्रमात आल्यापासून ‘साधना करावी’, असे मला वाटू लागले आहे.’

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment