शिरोली (जिल्हा कोल्हापूर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणी कुंकूमार्चन आणि प्रवचन

धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी

शिरोली येथील श्री महाकाली मंदिरात कुंकुमार्चन करतांना महिला

शिरोली – येथील छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळ, नवजवान मित्र मंडळ आणि श्री महाकाली मंदिर या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त कुंकूमार्चन आणि प्रवचन कार्यक्रम पार पडले. या सर्व कार्यक्रमांना जिज्ञासू महिला आणि तरुण यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरोली ग्रामपंचायत येथे केवळ कुंकूमार्चनाचा कार्यक्रम पार पडला. प्रवचनामध्ये ‘देवीला कुंकूमार्चन कसे करावे ? ओटी कशी भरावी ? श्री दुर्गादेवीचा जप कसा करावा ? तसेच आपली कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचा नामजप कसा आणि का करावा’, याविषयी माहिती दिली. तसेच ‘धर्मशिक्षण वर्गाची आवश्यकता का आहे आणि धर्मशिक्षण वर्गात काय सांगितले जाते’, याविषयीची माहितीही दिली.

नवरात्रोत्सवात छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळाच्या
महिलांनी प्रतिदिन सामूहिक १ घंटा ‘श्री दुर्गादेवीचा’ नामजप करणे

धर्मप्रेमी सौ. नंदा जाधव यांनी शिरोली येथे धर्मशिक्षण वर्ग चालू केला आहे. २२ सप्टेंबरला छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळामध्ये सौ. नंदा जाधव यांनी प्रवचनाचे नियोजन केले होते. धर्मशिक्षण वर्गात सांगितलेली ‘घटस्थापना आणि नवरात्र उत्सव’ यांविषयीची माहिती ऐकूण त्यांच्या महिला मंडळातील महिलांसाठी या विषयावरील प्रवचनाची मागणी केली. छत्रपती शिवाजीनगर महिला मंडळाच्या महिला प्रतिदिन एकत्र बसून १ घंटा ‘श्री दुर्गादेवीचा’ नामजप करत होत्या.

सनातनचे साधक आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि साधिका सौ. साधना गोडसे यांनी प्रवचन घेतले. सूत्रसंचालन श्री. रोहित खवरे यांनी केले. तसेच शिरोली येथील डॉ. योगेश खवरे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या मंडळाच्या अध्यक्षा सौ. शोभा संकपाळ यांनी श्रीफळ आणि संस्थेच्या कार्याला साहाय्य म्हणून स्वखुशीने देणगी देऊन आभार मानले. या प्रवचनाचा लाभ ६५ महिलांनी घेतला.

नवजवान मित्र मंडळाच्या अध्यक्षांचे धर्मप्रसाराच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन

नवजवान मित्र मंडळ येथे शिरोली ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. रूपाली खवरे यांनी प्रवचनाचे आयोजन केले होते. कु. राजलक्ष्मी कदम हिने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेश यादव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री. महेश चव्हाण यांची उपस्थिती होती. या वेळी ‘घटस्थापना आणि नवरात्र उत्सव’ या विषयाची माहिती आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि सौ. साधना गोडसे यांनी दिली. या प्रवचनाचा लाभ ५० ते ६० जिज्ञासूंनी घेतला. प्रवचनानंतर सर्वांनी शंकानिरसन करून घेतले, तसेच या ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली. तरुण मुलांनीसुद्धा ‘आमच्यासाठी अजून काहीतरी चालू करा’, असे सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण घटना

नवजवान मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. रणजित कदम म्हणाले, ‘‘१ सहस्र रुपयांची श्री दुर्गादेवीची हस्तपत्रके छापून स्वतः सर्वांना देतो. हा भाग खूप चांगला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी तुम्हाला सर्वतोपरी साहाय्य करीन.’’

 

श्री महाकाली मंदिरात कुंकूमार्चनाचा कार्यक्रम

२८ सप्टेंबरला श्री महाकाली मंदिरात महिलांनी कुंकूमार्चनाचा कार्यक्रम केला. या वेळी ६९ महिलांची उपस्थिती होती. कुंकूमार्चनानंतर सर्व महिलांनी भावपूर्णरीत्या ‘श्री दुर्गा देवीचा’ नामजप केला. तसेच सौ. साधना गोडसे यांनी ‘घटस्थापना आणि नवरात्र उत्सव’ विषयी माहिती दिली. ही माहिती ऐकूण महिलांनी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली. कुंकूमार्चन कार्यक्रमाचे आयोजन श्री महाकाली मंदिराच्या सौ. जुही साळुंखे यांनी केले.

वैशिष्ट्यपूर्ण घटना

समाजातील एका व्यक्तीने सहस्र नामावली केली. त्यानंतर श्री दुर्गादेवीचा नामजप करण्यात आला. समाजातील महिलांनी ‘नामजप पुष्कळ छान झाला’, असा अभिप्राय दिला. तसेच जिज्ञासू सौ. मीना दळवी यांनी देवीच्या चित्रावर कुंकूमार्चन केले. या वेळी  कुंकूमार्चन केलेल्या ठिकाणी श्री महाकाली देवीचे चित्र उमटले आणि त्यांच्या समोर देवी हातात शस्त्र घेऊन उभी असल्याचे दिसले. त्यांना देवीचे सूक्ष्मातून दर्शन झाले.

 

शिरोली ग्रामपंचायत येथे कुंकूमार्चनाचा कार्यक्रम

शिरोली ग्रामपंचायत येथे महिलांचा कुंकूमार्चनाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ३५ ते ४० महिलांनी सहभाग घेतला होता.

 

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे नवरात्रीनिमित्त प्रवचन आणि कुंकूमार्चन

कागल – काळम्मावाडी वसाहत येथे रामलिंग मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रवचनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी ‘नवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित महिलांनी देवीला कुंकूमार्चन केले. या कार्यक्रमाला भाजपचे श्री. अतुल जोशी, कागलचे नगरसेवक श्री. आनंदा पसारे, सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. ईगल प्रभावळकर, ३५ महिला यांसह एकूण ७० जिज्ञासू उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. प्रमोद आरेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

अभिप्राय : कार्यक्रमानंतर अनेक जिज्ञासूंनी कार्यक्रम आवडल्याचे सांगून असे कार्यक्रम अधूनमधून घेण्याची इच्छा व्यक्त केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment