सनातन संस्थेकडून जुन्नर येथील नगर वाचनालयास सनातन-निर्मित ७२ ग्रंथांचा संच भेट

भेट ग्रंथ घेतलेले नगर वाचनालयातील अधिकारी

जुन्नर (जिल्हा पुणे) – येथील नगर वाचनालयाला सनातन संस्थेकडून सनातनने प्रकाशित केलेल्या ७२ ग्रंथांचा संच भेट देण्यात आला. धर्मशिक्षण, बालसंस्कार, अध्यात्म-धर्म, आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. ललित गुजराथी, उपाध्यक्ष अधिवक्ता सुधीर ढोबळे, कार्याध्यक्ष श्री. सतिष राणे, चिटणीस अधिवक्ता शरदचंद्र गुरव, संचालक श्री. म.पां. काजळे, श्री. शिवले, श्री. भदे, नगरसेविका सौ. मोनाली म्हस्के, ग्रंथपाल श्री. दिपक चकवे, सौ. स्वाती टेकवडे, श्री. राहुल पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वाचनालयात गेल्या ७ वर्षांपासून मराठी दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’, तसेच हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ चालू आहे. संस्थेचे श्री. गुरव यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ‘सनातन प्रभात’चा वाचनालयात पुष्कळ जण लाभ घेतात, असे ते म्हणाले. पूर्वी वाचनालयात होणार्‍या शारदोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अनेकदा प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. ललित गुजराथी यांनी सनातन संस्थेच्या सौ. बोरकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

वाचनालयाच्या वतीने सनातन संस्थेला दिलेल्या आभारपत्रात म्हटले आहे, ‘आपण आपला अमूल्य ठेवा संस्थेकडे जतन करण्यासाठी दिला, त्याविषयी आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या सहकार्याने ग्रंथालयामध्ये साहित्य क्षेत्रातील अमूल्य ग्रंथांची भर पडली आहे. वाचकांची तृष्णा शांत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. समाजाला अशाच दीपस्तंभाची आज आवश्यकता आहे, तो शतकानुशतके तेवत राहील.’

 

Leave a Comment