गणेशोत्सव : हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची सुवर्णसंधी !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धींगत व्हावी, या हेतूने आणि श्री गणेशाच्या कृपेने ‘श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास’ या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र  इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती आतापर्यंत आपण जाणून घेतली. आज गणेशोत्सवात हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची निकड जाणून घेवूया.

१. स्वातंत्र्यानंतरही प्रतिदिन हिंदु
धर्मीय अधोगतीकडे मार्गक्रमण करत असणे

‘गणेशोत्सवात होणार्‍या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश होण्याच्या भीतीची छाया पसरलेली असायची. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदु धर्माच्या नाशाचे भय न्यून होईल’, असे वाटणार्‍यांना ‘हा आपला भ्रम होता’, हे आता लक्षात येत आहे. स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे होऊनही प्रतिदिन हिंदु धर्मीय अधोगतीकडे मार्गक्रमण करत आहेत. त्यामागील कारणे आहेत पाश्‍चात्त्यांचे अनुकरण, मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून हिंदूंचे धर्मांतर, लव्ह जिहाद, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण, पुरोगाम्यांचा नास्तिकवाद, देवतांचे विडंबन, विदेशी आक्रमणाचे भय इत्यादी.

२. उत्सवात धर्महानी करून भगवंताची अवकृपा ओढवून घेणारे हिंदू !

अशावेळी हिंंदूंनीच धर्महानी रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक असतांना ते मात्र तसे करत नाहीत. हे संकट दूर करून भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी सण, उत्सव हे श्रद्धेने शास्त्रोक्त पद्धतीने आचरण्याचा प्रयत्न करायला हवा होता; परंतु दुर्दैवाने हल्लीच्या उत्सवांचे पावित्र्य हिंदूंनी घालवल्याने ते भगवंताच्या अवकृपेला पात्र होत आहेत. धर्मविरोधक हे हिंदूंचा आणि हिंदु धर्माचा नाश करण्यासाठी मगरीसारखा जबडा वासून हिंदूंना गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटातून केवळ भगवंतच हिंदूंना वाचवू शकतो; परंतु हिंदू भगवंताची कृपा प्राप्त करण्याऐवजी धार्मिक आचरण, सण, व्रते अशास्त्रीय पद्धतीने साजरे करून अवकृपेला पात्र होण्यासारखे वर्तन करत आहेत.

३. गणेशोत्सव अशास्त्रीय पद्धतीने साजरा होण्यामागील काही कारणे

३ अ. काही संस्थांनी अशास्त्रीय पद्धतीने
गणेशमूर्ती आणि गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उद्युक्त करणे

काही संस्था अयोग्य पद्धतीने आणि अशास्त्रीय रितीने गणेशमूर्ती सिद्ध करण्यास अन् उत्सव साजरा करण्यास उद्युक्त करतात. हिंदु धर्मातील शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास न करता ‘मनाप्रमाणे गणपतीच्या मूर्ती सिद्ध करून आणि त्यांची प्रतिष्ठापना (स्थापना) करून पूजा करा’, असा त्या संस्था प्रसार करतात, उदा. कागदाचा गणपति, शेणाचा गणपति. या संस्था ‘झाडाचे बी मूर्तीत ठेवून झाड वाढवा’, असे सांगतात. अशा प्रकारे या संस्था ‘हिंदूंचा उत्सव भगवंताच्या अवकृपेला पात्र होईल’, अशा रितीने साजरा करण्यास सांगत आहेत. अशा रितीने त्यांनी सांगणे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील किंचित्ही ज्ञान नसलेल्या व्यक्तीने स्वतःच्या मनाने रुग्णाची रोगचिकित्सा करण्यासारखे आहे. धर्मशिक्षण नसणारे हिंदू या संस्थांची अशास्त्रीय पद्धत स्वीकारून पापाचे धनी होत आहेत. असे हिंदू धर्माधिकार्‍यांना याविषयी विचारतही नाहीत. हिंदूंनो, मनाला येईल तशी गणेशमूर्ती सिद्ध न करता शाडूच्या मातीची गणेशमूर्ती सिद्ध करून तिची प्रतिष्ठापना करा आणि ती वहात्या पाण्यातच विसर्जित करा !

३ आ. केवळ हिंदूंच्या सणांमध्ये नाक खुपसणार्‍या संस्था !

‘या संस्था केवळ हिंदूंचे सण आणि उत्सव यांतच नाक खुपसतात. ‘जत्रेतील बैल आणि रेडे यांची झुंज थांबवा’, अशी ओरड करणार्‍या या संस्था अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी प्राण्यांची हत्या होत असतांना तोंडातून चकार शब्दही काढत नाहीत. या संस्था ‘होळीच्या वेळी लाकडे जाळू नका’, असे सांगतात, तसेच गणेशमूर्तींचे प्रदूषणाच्या नावाखाली अशास्त्रीय पद्धतीने विसर्जन करण्यास सांगतात; परंतु पशूवधगृहात होणारे प्रदूषण, अन्य पंथियांच्या सणांच्या वेळी प्राण्यांच्या हत्येमुळे होणारे प्रदूषण, यांविषयी मात्र मौन बाळगतात. तथाकथित बुद्धीवाद्यांनो, ‘ईश्‍वराने हिंदु धर्मातील प्रत्येक धर्माचरण हे निसर्ग, समाज आणि प्राणीमात्र यांची काळजी घेऊनच निर्माण केले आहे’, हे जाणा ! ‘हिंदु धर्माप्रमाणे आचरण केल्यास सर्वांचाच उद्धार होईल’, हे जाणून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा !

३ इ. प्रशासनाची दायित्वशून्यता !

पूर्वीचे राजे प्रत्येक सण, उत्सव भक्तीने आणि पावित्र्याने साजरा होण्यासाठी काळजी घेत; परंतु आता प्रशासन अशी कोणतीही काळजी न घेता उत्सव साजरे करायचे म्हणून करते. कोणतीही समस्या उद्भवू नये; म्हणून उपाय शोधतांना ‘तो धर्माच्या विरोधात आहे का ?’, हे ते पहात नाहीत. उदा. कर्नाटकात ‘गणेशमूर्ती विसर्जन पाण्याच्या टाकीमध्ये करावे’, असा उपाय काढला. प्रत्यक्षात (शास्त्राप्रमाणे) वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था करायला हवी होती; परंतु शासनाने त्याची काळजी न घेतल्याने टाकीमध्ये विसर्जित केलेल्या गणपतीच्या मूर्ती गटारासारख्या घाणेरड्या पाण्याच्या खाणीत, अस्वच्छ ठिकाणी टाकण्यात आल्याचे ऐकिवात आले. अशा रितीने मोठ्या प्रमाणात झालेल्या धर्महानीला प्रशासन कारणीभूत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे (हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षांपासून या संदर्भात निवेदन देत आहे.) शासनाने कठोर पाऊल न उचलल्याने अशा विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत अन् मूर्तीचे अवयव छिन्नविछिन्न होऊन इतस्ततः पडलेले आढळतात. अशा रितीने प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उत्सवाचा घोर अपमान होत आहे.

३ ई. हिंदूंमध्ये असलेला धर्मशिक्षणाचा अभाव

वरील धर्महानी पाहून आपल्याला उत्सवांमध्ये होणार्‍या धर्महानीची जाणीव होते. मद्यपान करून उत्सवात भाग घेणे, चित्रपटाची गाणी लावणे, मोठ्या आकाराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणे, विनोदी कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात देवतांचे विडंबन करणे, गणेशोत्सवाच्या नावाने गोळा केलेल्या पैशांचा मद्यपान, अशा अनेक चुका उत्सव साजरा करतांना होतात. यास हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे !

४. हिंदु राष्ट्राची आवश्यकता

इतक्या मोठ्या प्रमाणात धर्महानी होतांना पाहून ‘प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण दिले पाहिजे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे म्हणणे किती सत्य आहे’, याची जाणीव होते. ‘स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात धर्माभिमानी हिंदू सिद्ध होतील’, हे असत्य ठरले आहे आणि धर्माभिमानशून्य अन् धर्माला हानी पोहोचवणारे हिंदू सर्वत्र झाले आहेत. यावर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, हा एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्रात सर्व सण आणि उत्सव शास्त्रीय पद्धतीने साजरे होतील. हिंदूंचे सण, उत्सव आदी शास्त्रोक्त पद्धतीने साजरे करण्यासाठी आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे.

५. हिंदु युवकांना आवाहन !

गणेशोत्सव मंडळांनो, हिंदु युवकांनो, हिंदूंमध्ये भगवंताविषयी श्रद्धा, भक्ती, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्यासाठी गणेशोत्सव ही ईश्‍वराने दिलेली अमूल्य अशी सुवर्णसंधी आहे. गणेशोत्सवात मनोरंजन आणि मौज-मस्ती करून भगवंताची अवकृपा ओढवून घेऊ नका. हिंदूंमध्ये श्रद्धा, भक्ती, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्यासाठी उत्सवाचे नियोजन करा. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी या उत्सवाचा एक मोठे माध्यम म्हणून उपयोग करून ईश्‍वराच्या कृपेला पात्र व्हा.

– श्री. हर्षवर्धन शेट्टी, हासन, कर्नाटक. (२४.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment