प.पू. पांडे महाराज यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ आणि त्याची स्थापना करणारे साक्षात् विष्णुरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उलगडलेले विश्‍वकल्याण स्वरूप !

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज

‘वर्ष १९९३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची संकल्पना मांडली. त्यानुसार विश्‍वविद्यालयाचे आराखडे आणि नियोजन चालू झाले. त्या वेळी ‘साधना आणि सेवा करण्यासाठी हे एक आध्यात्मिक विश्‍वविद्यालय असेल’, असे सर्वांना वाटले होते. त्यानंतर काही वर्षांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पुरोहित पाठशाळा चालू झाली. त्या वेळीसुद्धा ‘हा एक अध्यात्म विश्‍वविद्यालयाचाच भाग आहे’, असे सर्वांना वाटले. त्यानंतर मात्र पुरातन काळातील विख्यात तक्षशिला, नालंदा यांसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयांप्रमाणेच विश्‍वविद्यालयाची स्थापना करण्याचे नियोजन चालू झाले. मागील दीड वर्षापासून अगस्ति जीवनाडीपट्टीच्या वाचनानुसार या विश्‍वविद्यालयाचे नाव केवळ अध्यात्म विश्‍वविद्यालय न ठेवता ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ ठेवावे, असे स्वत: महर्षींनी सांगितले असल्यामुळे या कार्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. तसेच महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, हे साक्षात् विष्णूचा अवतार आहेत’, असेही सांगितले. यावरून हे अध्यात्म विश्‍वाविद्यालय म्हणजे संपूर्ण विश्‍वातील जीवमात्रांच्या, तसेच प्रत्येक चेतन-अचेतन वस्तूंच्या कल्याणासाठी निर्माण होणारे जागतिक स्वरूपाचे विद्यापीठ असेल.

प.पू. पांडे महाराज यांनी उलगडलेला या ईश्‍वरी कार्यामागील कार्यकारणभाव त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहोत.

१. सद्यस्थितीत मानवाची झालेली अधोगती
आणि खर्‍या ध्येयापासून दूर गेल्याने त्याला आलेली निराशा

१ अ. अध्यात्मशास्त्राच्या ज्ञानाअभावी मानवाला जीवनाचे खरे ध्येय न
उमजल्याने तो भौतिक जीवनाच्या फसव्या सुखाच्या लालसेने आत्मघाताकडे वळणे

‘आज विज्ञानामुळे ‘केवळ भौतिक सुख मिळावे’, हाच मनुष्याच्या जीवनाचा उद्देश दृढ झाला आहे. त्यामुळे मनुुष्य सुखाच्या अभिलाषेत आणि उपभोगमय जीवन जगण्यात व्यस्त आहे. त्यातच त्याची सर्व शक्ती व्यर्थ जात आहे. मानवाच्या वासना वाढत आहेत. एवढे होऊनही त्याला तृप्ती किंवा समाधान नाही. चैतन्य शक्तीचे महान सामर्थ्य, भगवत् भक्ती, भगवंताची सेवा यांकडे त्याचे दुर्लक्ष झाले आहे.

ईश्‍वरप्राप्ती हेच मानवाच्या जीवनाचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी त्याला ८४ लक्ष योनींतून जाऊन मानव जन्म मिळालेला आहे. भौतिक आणि पारमार्थिक सुख उपभोगून, भगवंताच्या स्मरणातील आनंद सतत घेऊन अन् त्या दृष्टीने स्वतःत पालट घडवून तो या जन्ममरणाच्या फेर्‍यांतून सुटू शकतो. या दृष्टीने नियोजन करून जगणे, हे त्याच्या जीवनाचे खरे ध्येय आहे; परंतु जीवनाचे हे खरे ध्येय न कळल्यामुळे आणि आजच्या भौतिक जीवनातील लालसा अन् त्यांच्या पूर्णत्वाचा अभाव यांमुळे मानव आत्मघाताकडे वळला आहे.

१ आ. चुकीची शिक्षणपद्धती अन् उपजिविकेच्या संधींचा अभाव यांमुळे सुशिक्षित बेरोजगारी
वाढून व्यसनी, दुर्बल, व्यभिचारी, विघातक अन् राष्ट्रभक्ती आणि राष्ट्राभिमान शून्य बनलेली तरुणाई !

आजकालच्या शिक्षणातील पुस्तकी ज्ञान (भौतिक शिक्षण प्राप्त करून त्यातून मिळालेल्या ज्ञानानुसार मांडलेले सिद्धांत) हे सिमित आहे. त्यात सद्यपरिस्थितीत आलेल्या संकटांना तोंड देण्याचे सामर्थ्य नाही. असे शिक्षण घेऊन आणि पदवी प्राप्त करूनही मानव स्वतःची भौतिक धारणा म्हणजेच भौतिक उपजीविका प्राप्त करू शकत नाही. या ज्ञानाने तो स्वतः सामर्थ्यवान बनून कृतीशील झाला नाही किंवा त्याचे आत्मबळही वाढले नाही.

अशा शिक्षणपद्धतीमुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मानसिक विकृतीमुळे सध्या विघातक राजकीय पक्ष आणि अधर्माने वागणारे लोक त्यांना प्रलोभनांद्वारे आकृष्ट करून त्यांचा दुरुपयोग करून घेत असतांना दिसत आहेत. त्यामुळे ही तरुण शक्ती व्यसनी, दुर्बल, व्यभिचारी, पुरोगामी वृत्तीची, विघातक कार्य करणारी झाली आहे. यांच्यात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान आणि संस्कृतीचा अभिमान हे काहीच राहिलेले नाही.

आजचे सुशिक्षित हलके (गौण प्रतीचे) कर्म करू शकत नाही. यात त्यांचा अहंकार आड येतो. (साधना जाणणारा शिक्षित कोणतेही कर्म करून स्वतःची उपजीविका करतो आणि सुखाने संसार करत स्वतःचे कल्याण करून घेतो.)

१ इ. फलाशा धरून कर्म केल्याने निराशा येणे

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥’

(श्रीमद्भगवत्गीता अध्याय २, श्‍लोक ४७)

अर्थ : तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी कधीही नाही; म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस.

विवरण : ‘फळाची आशा न धरता कर्म करत रहा’, असे भगवंताने सांगितले आहे. भगवंताच्या या म्हणण्यातही रहस्य दडलेले आहे. ईश्‍वराने मानवाला बीज दिले आहे. त्याने ते भूमीची मशागत करून त्यात पेरल्यावर त्यापासून निर्माण झालेल्या झाडापासून फळे मिळतील. यावरून कर्मामध्ये फळ अंतर्भूत आहेच. असे कर्म केल्याने सेवा आणि साधना होईल अन् त्याचे फळ म्हणजे आनंदही मिळेल.

कर्म आणि फळ वेगळे समजून केले, तर गडबड होते. जसे कर्म कराल, त्यानुसार फळ मिळणार आहे. ‘कर्म करतांना भाव कसा होता ? फळाची अपेक्षा होती का ?’, अशा प्रकारच्या गोष्टींवर फळ अवलंबून आहे. कर्म आणि फळ वेगळे केले अन् फळाची आशा धरून कर्म केले, तर दोन्हीही मिळणार नाही. हे भगवंताचे नियोजन आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे.

फळाची आशा धरून कर्म केल्यास फळाकडेच लक्ष असते. त्यामुळे कर्म करतांना फळाच्या अभिलाषेने केले जाते. याचा परिणाम असा होतो की, कर्म करण्याच्या स्थितीच्या वेळी संपूर्ण एकाग्रता किंवा शक्ती एकवटली जात नाही आणि होणारे कर्म हे ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (अर्थ : समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे), याप्रमाणे होत नाही. कर्म योग्य न झाल्याने त्याचे योग्य फळही मिळत नाही. केवळ निराशा आणि दुःख पदरी पडते.

२. गुरुकुल शिक्षणपद्धतीचे महत्त्व आणि राम
अन् कृष्ण यांनी गुरुकुलात राहून शिक्षण घेण्याचे प्रयोजन

प्रभु श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण हे अवतार असूनही त्यांनी तत्कालीन प्रचलित शिक्षणपद्धतीनुसार गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतलेले आपण वाचले आहे. त्यांनी अशा प्रकारे गुरुकुलात जाऊनच शिक्षण घेण्यामागे काय कारण होते ?, हे पाहूया.

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥

– श्रीमद्भगवत्गीता अध्याय ३, श्‍लोक २१

अर्थ : श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो, त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय आचरण करू लागतो.

अशा प्रकारे गुरुकुल शिक्षणपद्धतीमुळे साधक क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी परिपूर्ण होऊन स्वतः स्वतंत्रपणे समर्थ होऊन कार्य करू शकत असे. अशा प्रकारे परिपूर्ण झालेल्या साधकांद्वारेच इतिहास घडल्याचे आपण पाहिले आहे.

३. अखिल मानवजातीच्या भौतिक आणि पारमार्थिक कल्याणासाठी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केली अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना !

राज्यकर्ते निवडणुका लढवण्यापूर्वी आश्‍वासने देतात. निवडून आल्यावर मात्र ही आश्‍वासने पोकळच (फसवी) ठरलेली दिसून येतात. राजकारण्यांना ठाऊक आहे की, हिंदू विघातक नसून ते समंजस, शहाणे आणि सहिष्णु आहेत; मात्र अन्य धर्मीय लोक आक्रमक होऊन जागतिक स्तरावर विघातक ठरत असल्याचे दिसत आहे. असे असतांना आजकालच्या जगात हिंदूंमधील चांगुलपणा त्यांचा कमकुवतपणा बनला आहे. परिणामी राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती बिकट झाली आहे. कायदे आणि नियम यांची बांधिलकी केवळ हिंदूंवरच लादली गेलेली दिसून येते. अन्य धर्मीय मात्र आक्रमक असल्याने कायदे आणि नियम धाब्यावर बसवतात, तरीही अशा धर्मांधांवर कडक कारवाई न झाल्यामुळे ते मुजोर झाले आहेत.

यासाठी रज-तमाने मोठ्या प्रमाणात आवृत्त झालेल्या सद्यस्थितीवर कायमचा उपाय म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवी जीवनाच्या भौतिक आणि पारमार्थिक कल्याणासाठी अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना केली आहे.

४. सनातन संस्थेचे अध्यात्म विश्‍वविद्यालय म्हणजे
कृतीशीलतेने कार्य करणारे चालते-फिरते विश्‍वविद्यालयच !

मानवी जीवनाच्या भौतिक आणि पारमार्थिक कल्याणासाठी निर्माण झालेल्या विश्‍वविद्यालयाचे कार्य हे सनातन संस्थेच्या कार्याच्या आरंभीपासूनच चालू आहे. सध्याच्या स्थितीत सनातन संस्थेचे हे अध्यात्म विश्‍वविद्यालय म्हणजे इमारती, शिक्षक, विद्यार्थी, परीक्षा, पुस्तके, अभ्यासक्रम अशा प्रकारचे काही नसून प्रत्यक्ष कृतीशीलतेने कार्य करणारे चालते-फिरते विश्‍वविद्यालयच आहे. साधनेमुळे साधकाकडून योग्य पद्धतीने कर्म होऊन त्याला त्याचे योग्य फळ मिळून तो आनंदी होतो. त्याच्या जीवनाचे सार्थक होते. अशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करून येथे शिक्षण दिले जात आहे.

५. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची वैशिष्ट्येे

५ अ. विश्‍व हीच प्रयोगशाळा !

सनातनच्या या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची विश्‍व हीच प्रयोगशाळा आहे. साधनेसाठी परिपूर्ण असलेल्या सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही येथे साधन असून प्रत्येक निष्काम कर्म ही साधना आहे. तीच भगवत्सेवाही आहे.

५ आ. कृतीशील भक्तीतून साधकाची आध्यात्मिक उन्नती होणे

याद्वारेच साधकाकडून कृतीशील (अनुभूतीजन्य) भक्ती (जिवातील भावाद्वारे निर्माण होणारे चैतन्य घनीभूत होऊन कार्यप्रवण करणारी स्वसंवेद्य शक्ती) होऊन तिच्याद्वारे त्याची आध्यात्मिक उन्नती होते. अशा रितीने त्याची ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल चालू रहाते.

५ इ. कृतीशील भक्ती करून ईश्‍वरसेवा करणे, असा आगळावेगळा अभ्यासक्रम

या विश्‍वविद्यालयाद्वारे मिळणारे ज्ञान विश्‍वव्यापक आहे. येथे पुस्तक वाचणे, कथा-कीर्तन ऐकणे, हा अभ्यास नाही; कारण केवळ अशा प्रकारच्या कर्माने आध्यात्मिक उन्नती होत नसून त्यासाठी कृतीशील भक्तीही असावी लागते. तीच ईश्‍वरी सेवा म्हणून कार्य करते. साधकांना सखोल अभ्यास करता यावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मशास्त्राच्या प्रत्येक विषयावर ग्रंथही लिहून ठेवले आहेत (अजूनही अनेक विषयांवरील ग्रंथ लिखाणाचे कार्य चालूच आहे.) त्यानुसार साधक अभ्यास करून आणि तो कृतीत आणून प्रगती करू शकतो. येथे महत्त्व कृतीला (प्रायोगिक भागाला, अनुभूतीला) आहे. स्वतःत सकारात्मक पालट घडवून अध्यात्मशास्त्रानुसार योग्य कर्म करणे, हा त्यांचा अभ्यास आहे.

५ ई. चैतन्यवृद्धी आणि आंतरिक शुद्धी यांसाठी
स्वभावदोष अन् अहं निर्मूलन करण्याची आवश्यकता

स्वतःला पालटत असतांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांमुळे हातून झालेल्या चुकांसाठी प्रायश्‍चित्त घेणे, चुकांतून शिकणे आणि चैतन्य मिळवून आध्यात्मिक उन्नती करून घेणे, ही येथे साधना आहे. चुकांचा अभ्यास करून योग्यायोग्य काय आहे, हे सांगणारा साधक येथे शिक्षक आहे. यातून साधक शिकून आणि साधना करून स्वतःची आंतरिक शुद्धी करत असतो. या शुद्धीकरण प्रक्रियेमुळेच त्याच्यातील चैतन्य वाढून त्याची आध्यात्मिक उन्नती होत जाते आणि तो पुढे कोणतेही कार्य समर्थतेने पार पाडू शकतो. यासाठी गुरूंवर श्रद्धा ठेवून स्वभावदोष निर्मूलन करणे, हे येथे महत्त्वाचे आहे.

५ उ. साधनेमुळे चैतन्य वाढून आत्मा स्वयंप्रकाशित होणे

येथे चैतन्य हीच कार्य करणारी शक्ती असून ती स्वयंपूर्ण आहे. तिच्यावर आवरण आल्यामुळे रज-तमाचा प्रभाव वाढतो. त्यामुळे दोष वाढतात. या दोषांमुळेच साधकाकडून होणारे कर्म हे योगः कर्मसु कौशलम् ।, (समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे) प्रमाणे स्वयंपूर्ण होत नाही; कारण प्रत्येक जिवातील आत्मा हा स्वसंवेद्य (स्वतःला जाणता येण्याजोगा) आहे. त्यावर अनेक जन्मांचे आवरण असल्याने त्याच्या निवारणासाठी साधनेची अनन्य आवश्यकता आहे. हे आवरण निघाले की, आत्मा स्वयंप्रकाशित होऊन कार्य करू लागतो, म्हणजे ईश्‍वरेच्छेने कार्य होऊ लागते. साधना करून प्राप्त झालेले आत्मज्ञान कोणत्याही प्रकारचे कार्य करण्यास सक्षम असते. ज्या आत्म्याद्वारे उत्पत्ती होते, त्याला काही येत नाही, असे होऊच शकत नाही. चांगले-वाईट फळ मिळवायचे, हे त्या साधकाच्या साधनेवर अवलंबून असते; परंतु विशेष असे की, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यशक्तीच्या आकर्षणामुळे साधकात आत्मजागृती होऊन तो ईश्‍वरी सेवा म्हणून कार्य करू लागतो.

५ ऊ. विश्‍वविद्यालयाच्या शिक्षणाची व्याप्ती

५ ऊ १. कुठेही राहून केलेले साधनायुक्त कर्म हे अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिक्षणांतर्गतच असणे : एखादा साधक आश्रमात रहात आहे आणि त्याचे आई-वडील घरी रुग्णाईत आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी साधकाला घरी रहावे लागणार असेल, तर साधकाची घरी राहून झालेली माता-पित्याची सेवा ही भगवत् सेवा (साधना) म्हणून होते. अशा प्रकारे घडलेले साधनायुक्त कर्म हे अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिक्षणांतर्गतच आहे.

५ ऊ २. शिक्षण आणि शिक्षणाचा कालावधी मर्यादित नसणे : साधक कोणत्याही स्थितीत असला आणि कोणतेही कार्य करत असला, तरी त्याची साधना अष्टांगयोगाप्रमाणे (स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती आणि भावजागृती) चालूच रहाते, हेच येथे त्याचे शिक्षण आहे. हे सध्याच्या पद्धतीप्रमाणे केवळ मर्यादित शिक्षण नाही आणि मर्यादित कालावधीचेही शिक्षण नाही.

५ ऊ ३. हे शिक्षण विश्‍वकल्याणासाठी असल्याने सर्वांसाठी, बंधनविरहित आणि विनामूल्य असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चालू केलेले अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे नियोजन समजणे फार कठीण आहे. ते मानवाच्या कल्याणासाठी योग्य काय आहे, ते जगाला सांगत आहेत. मानवजातीच्या कल्याणासाठी असलेल्या या शिक्षणासाठी नियम किंवा असे केलेच पाहिजे, अशी बळजोरी नाही. या विश्‍वविद्यालयाचे म्हणजेच सनातनचे कार्य हे केवळ भारतातच नाही, तर विश्‍वामध्ये चालू आहे. ते काही लोकांसाठी नसून सर्वार्ंसाठी खुले आहे. येथे धर्म, जात इत्यादी भेद नाही. तसेच या शिक्षणाला कुठलाही व्यय (खर्च) नाही.

५ ऊ ४. या शिक्षणातून सर्व प्रकारचे ऋण फेडले जाऊन ते ध्येयप्राप्तीस साहाय्यभूत असणे : या प्रकारचे शिक्षण चालू असतांना तो साधक पितृऋण, ऋषीऋण, समाजऋण आणि देवऋण फेडत असतोे. यामुळे त्याच्याकडून धर्माचरणासहित कर्म आणि साधना दोन्हीही साध्य होते. तसेच जीवनाचे ध्येय मोक्षप्राप्ती हेही साध्य होते. अशा प्रकारचे कर्म त्याच्या वर्णाश्रमानुसार होत रहाते. एवढेच नव्हे, तर साधक सर्व दृष्टीने समर्थतेने अनेक प्रकारचे कार्य करू शकतात.

५ ए. वैज्ञानिकतेची कास धरून आधुनिक
प्रणालीचा उपयोग करून दिलेले धर्मशिक्षण

१. सनातनचे धर्मशिक्षणाचे कार्य आधुनिक प्रणालीद्वारेसुद्धा चालू आहे. त्यामुळे साधकाला धर्मशिक्षण घेण्यासाठी कोणतेही स्थळ वा काळ यांची मर्यादा नाही. तो याचा लाभ कशाही प्रकारे करून घेऊ शकतो.

२. सनातनच्या अध्यात्म विश्‍वविद्यालयातील साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आध्यात्मिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

३. अशा प्रकारे ग्रहण केलेल्या ज्ञानाने आनंद उपभोगत असतांना त्याचे घर आश्रम बनते आणि त्याच्यातील चैतन्याद्वारे वातावरणातील रज-तम दूर होऊन सत्त्वगुणी वातावरण बनते.

४. ऋषीमुनींनी मानवी जीवन आनंदी होऊन ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी १४ विद्या आणि ६४ कला दिल्या आहेत. यांचाही अभ्यास अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे चालू झाला आहे. यात साधक लहान लहान कृतींतून भगवंताच्या अनुभूती घेऊन त्यातील आनंद घेत आहेत.

५. सनातनचे आश्रम हे महर्षि विश्‍वविद्यालयाचे प्रतिरूप (मॉडेल) आहेत. येथे ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे शिक्षण दिले जाते. येथे साधक काही दिवस राहून साधनेतील बारकाव्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत अभ्यास करतात. त्याचा त्यांना साधनेतील पुढील प्रगतीस लाभ होतो.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल

६. साधनेमुळे बुद्धीने प्रगल्भ आणि प्रतिभा
जागृत झालेली अध्यात्म विश्‍वविद्यालयातील लहान मुले !

सध्या शालेय शिक्षणात ‘केवळ पाठ्यपुस्तकाद्वारा (संकुचित विचारधारेवर आधारलेला, पोपटपंची आणि सिमित असा) अभ्यास करा आणि गुण मिळवा’, असे झाले आहे; मात्र सनातन संस्थेच्या अध्यात्म विश्‍वविद्यालयात शिकणारी लहान मुलेसुद्धा साधनेमुळे बुद्धीने प्रगल्भ असून त्यांची प्रतिभा जागृत आहे. ती प्रगल्भ लिखाण करू शकत असून लहान-मोठ्या सेवेचे उत्तरदायित्वही स्वतंत्रपणे यशस्वीरीत्या सांभाळू शकतात.

७. साधकाच्या प्रगतीचा आढावा गुरुपौर्णिमेला प्रगट केला जाणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाची जडणघडण अष्टांगयोग साधनेच्या माध्यमातून त्याला ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत करून ठेवली आहे. साधकाच्या मृत्यूनंतरही त्याची साधना पुढे चालू रहाते, हे सनातनचे साधक अनुभवत आहेत. वर्षभर साधकाकडून होत असलेल्या साधनेद्वारे त्याच्या झालेल्या प्रगतीचा आढावा गुरुपौर्णिमेला प्रगट केला जातो. यावरून साधकाला आपली प्रगती जाणून त्यानुसार पुढील प्रयत्न आरंभ करता येतात. येथील प्रगती ही ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग हा भू, भुव, स्वर्ग, महर्, जन, तप, सत्य लोक असा आहे. साधकाची ६० टक्के पातळी गाठल्यावर तो महर् लोकात जातो आणि तो जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होतो. याप्रमाणे पुढील पातळीनुसार त्याची साधनेतील प्रगती पुढे चालू रहाते.

८. चैतन्यमय शिक्षणाने होणारे पालट

अ. आध्यात्मिक शिक्षणाने साधकात चैतन्यवृद्धी होते. त्यामुळे जीव सत्त्वगुणी होतो. त्याच्यातील सत्त्वगुण आणि चैतन्य यांमुळे सभोवतालच्या वातावरणातील रज-तमाचा प्रभाव उणावून तेथे सत्त्वगुणाची वृद्धी होते. अशा सत्त्वगुणी वातावरणामुळे रज-तमामुळे विकृत बनलेली समाजाची मनोवृत्ती पालटून सत्त्वगुणी बनण्यास साहाय्य होते.

आ. चैतन्यमय जिवाच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक जड-अचेतन वस्तूंवरही चैतन्याचा परिणाम होऊन त्याही चैतन्यमय होतात.

इ. अशा प्रकारे चैतन्यमय बनलेल्या वातावरणामुळे निसर्गसुद्धा चैतन्यमय बनतो आणि तो मानवाला साहाय्यभूत ठरू लागतो. (सध्या वातावरणातील रज-तमाच्या आधिक्यामुळे निसर्ग कोपला आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप, त्सुनामी, ढगफुटी, पृथ्वीचे तापमान वाढणे (ग्लोबल वॉर्मिंग), साथीचे असाध्य आजार, दूषित हवा, दूषित पाणी, इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्ती येतांना जगभरात दिसत आहेत.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे मुमुक्षु जिवांना भौतिक आणि पारमार्थिक कल्याणासाठी अशा प्रकारे विनामूल्य शिक्षण उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे आपले जीवन खर्‍या अर्थाने आनंदी होणार आहे. यासाठी सर्व साधक जिवांकडून त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !!’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१२.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment