साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

श्रीमती वंदना करचे

१. ‘मनुष्य जन्माचे ध्येय ईश्‍वरप्राप्ती आहे’,
याची जाणीव करून दिल्याविषयी कृतज्ञता !

१ अ. गुरुदेवांनी मायेतील संसाराची निरर्थकता
लक्षात आणून देऊन भक्तीच्या वाटेवर चालायला शिकवणे

‘मला काही कौटुंबिक अडचणी आल्यावर ‘तुला व्यवस्थित संसार करता आला नाही’, असे काही जण तोंडावर, तर काही जण पाठीमागे मला बोलत असत. त्या वेळी मला वाईट वाटत असे. माझी गुरुमाऊली आई मला ‘तुझे ध्येय ईश्‍वरप्राप्ती आहे’, याची जाणीव करून देत असे. माझी गुरुमाऊली आईच सर्व प्रयत्न करून घेऊन या भक्तीच्या वाटेवर चालायला शिकवत आहे.

१ आ. साधनेचे सर्व प्रयत्न करून घेणार्‍या गुरुमाऊलीविषयी कृतज्ञता !

हे गुरुमाऊली, सेवा कधी चालू होते आणि कधी संपते, याची जाणीव रहात नाही. भाव काय असतो, हे समजण्याची या जिवाची पात्रता नाही. मी काही प्रयत्न करावेत, अशी क्षमताही नाही. हे गुरुमाऊली, तुम्हीच या जिवाकडून सर्व प्रयत्न करून घेत आहात. जन्मदात्या आईने बोट धरून चालायला शिकवले, बोलायला शिकवले, शारीरिकदृष्ट्या भरणपोषण केले; पण या जीवनात माझी गुरुमाऊली आली आणि हा जीव केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठी जन्माला आल्याची जाणीव झाली. साधनेचे सर्व प्रयत्न तीच करवून घेत आहे. त्याविषयी अखंड कृतज्ञता !

 

२. गुरूंनी सहसाधकांच्या माध्यमातून स्वभावदोष
आणि अहं यांचे निर्मूलन करायला शिकवल्याविषयी कृतज्ञता !

२ अ. स्वभावदोषांच्या खाचखळग्यांतून जातांना
जीव भटकू नये; म्हणून साधकांच्या माध्यमातून सांभाळणे

हे देवा, साधनेसाठी काय करावे, हे या जिवाला समजत नाही; पण माझी गुरुमाऊली सर्व साधकांच्या माध्यमातून या जिवाचे साधनेसाठी भरणपोषण करत आहे. स्वभावदोषांच्या खाचखळग्यांतून जातांना हा जीव भटकू नये; म्हणून गुरुमाऊली साधकांच्या माध्यमातून या जिवासह रहात आहे. हा जीव ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गापासून दूर जाऊ नये; म्हणून समष्टी रूपांच्या माध्यमातून, असंख्य नेत्रांतून गुरुमाऊली मला सांगते, ‘सांभाळ, पुढे कर्तेपणाची दरी आहे. अपेक्षांच्या कड्यावरून पडलीस, तर तुला दुखापत होईल.’ जणू प्रत्येक अवघड वळणावर गुरुमाऊली बोट पकडून मला ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गावर पुढे पुढे घेऊन जात आहे.

२ आ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया
राबवून सर्व अडथळ्यांवर मात करायला शिकवणे

स्वभावदोषांच्या खाचखळग्यातून अहंरूपी काटेरी रस्त्यावरून चालण्यासाठी गुरुमाऊलीने मला स्वभावदोष निर्मूलनाची विजेरी (बॅटरी) हातात दिली आहे. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून घेऊन ती या जिवाला अध्यात्माच्या मार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करायला शिकवत आहे. तिच्या या लेकराचा उद्धार होण्यासाठी ती अखंड कृपा करत आहे. याविषयी हे गुरुमाऊली, माझे आई, तुमचे चरणी अखंड कृतज्ञता !

 

३. साधकांना ‘आध्यात्मिक आई’
होण्यासाठी घडवणार्‍या प्रेमळ गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता !

३ अ. आई होणे, हे सर्वसामान्य स्त्रियांचे स्वप्न !

प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात आई झाली की, तिला ‘आपल्या जन्माचे सार्थक झाले’, असे वाटते. सासरी गेलेल्या मुलीची कूस एकदा उजवली, ती व्यावहारिकदृष्ट्या आई झाली, म्हणजे मुलीच्या आईला धन्य झाल्यासारखे वाटते.

३ आ. मायेतील नव्हे, तर ‘अध्यात्मातील आई’
होऊन वात्सल्याची अनुभूती घ्यायला शिकवणे

माझी गुरुमाऊली विश्‍वातील एकमेव अशी आई आहे की, ती लेकरांना ‘अध्यात्मातील आई’ होण्यासाठी घडवत आहे. सर्व उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून ती सतत सांगत असते, ‘तुलाही माझ्यासारखे या सर्वांची आई व्हायचे आहे.’ मागे रहाणार्‍या लेकराला पुढे कसे न्यायचे, सहसाधकांना प्रेम कसे द्यायचे, हे ती शिकवते. सहसाधकाची अध्यात्मात प्रगती झाल्यावर आभाळ ठेंगणे वाटेल, एवढा होणारा आनंद व्यवहारातील आई होण्यापलीकडचा आहे. जो शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. ‘अध्यात्मातील आई’ होण्यासाठी माझी आई मला असे घडवत आहे. त्याविषयी अखंड कृतज्ञता !

३ इ. दुसर्‍याच्या प्रगतीचा ध्यास लागल्यावर आपली प्रगती आपोआप होते, हे शिकवणे

व्यवहारात प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी झटत असतो; पण अध्यात्मात बरोबर या उलटे आहे. माझ्या गुरुमाऊलींनी ‘परेच्छा’ आणि ‘ईश्‍वरेच्छा’ ही दोनच पावले चालायला सांगून अध्यात्मात जलद गतीने प्रगती होते’, हे शिकवले. ईश्‍वरेच्छा म्हणजे काय, तर अखंड इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास लागायला हवा. ‘सर्वांची आध्यात्मिक प्रगती झाली की, आपली आपोआप होते’, हे सांगणारी गुरुमाऊली जीवनामध्ये आली. त्याविषयी त्यांचे चरणी अखंड कृतज्ञता !

 

४. गुरुमाऊली चैतन्याचे संरक्षककवच
पुरवून रक्षण करत असल्याविषयी कृतज्ञता !

हे गुरुमाऊली, घोर आपत्काळात या जिवाचा प्रत्येक श्‍वास तुमच्या कृपेने चालू आहे. येणारे प्रत्येक संकट तुम्ही झेलत आहात; म्हणून या आपत्काळातही हा जीव जिवंत आहे. तुमच्या चैतन्याचे अखंड संरक्षककवच या जिवाभोवती आहे. हे परम दयाळू गुरुमाऊली, तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.

 

५. गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मनातील
‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूची जाणीव झाल्यामुळे कृतज्ञता !

सत्संगांत गुरुमाऊलीचे अस्तित्व असते. त्यामुळे पूर्वी सत्संगांत बसल्यानंतर या जिवाचे नामस्मरण आतून चालू होई. ‘चैतन्यामुळे नामस्मरण होत आहे, ही माझ्या गुरुमाऊलीची कृपा आहे’, हे लक्षात येत नसे. ‘माझा नामजप आतून होतो’, असे मला ‘कर्तेपणा’ या अहंच्या पैलूमुळे वाटायचे; पण ‘गुरुमाऊली मला घडवण्यासाठी अपार कष्ट घेत आहे’, हे आता लक्षात येत आहे.

 

६. हे गुरुमाऊली, तव चरणी केवळ कृतज्ञता ।

गुरुमाऊलींनी मनातील कृतज्ञतारूपी विचार पुढील ओळी सुचवून त्यांच्या चरणी अर्पण करवून घेतले.

तव कृपेला आदी अन् अंतही नसे ।
तव कृपा वर्णन करण्या शब्दही नसे ॥ १ ॥
तव कृपेचा अखंड वर्षाव । वर्षावातून आनंदाची बरसात ॥

तव समष्टी रूपाच्या संगे ।
या हृदयी अखंड असेे तुझाच वास ॥ २ ॥

तव चरणांशी एकरूप होण्याची ।
या जिवाला लागली आस ॥

ईश्‍वरा, केवळ तूच मजला हवास ।
कृतकृत्य कर ना या जिवास ॥ ३ ॥

तुझीच रूपे दिसती सर्वत्र चराचरांत ।
अखंड लाभतो तुझाच सहवास ॥

चित्त दंगू दे, मती गाऊ दे तुझे गुण वर्णायास ।
कृतज्ञता हे गुरुमाऊली, तुझ्या कृपेस्तव ॥ ४ ॥

नको जन्म-मृत्यू, नको ८४ लक्ष योनींचा फेरा ।
चरणांसी स्थान देऊनी या जिवास उद्धरा ॥ ५ ॥’

तुमचा पेंद्या,

– श्रीमती वंदना करचे, पुणे (११.६.२०१७)

Leave a Comment