देवी महाकालीच्या आशीर्वादाने संस्कृतमध्ये अतुलनीय काव्यरचना करणारे महाकवी कालिदास !

कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत. सुमारे चौथे शतक ते सहावे शतक या काळात अथवा गुप्त साम्राज्याचा कालखंडात ते होऊन गेले असावे, असे मानले जाते. ‘विक्रमोर्वशीयम्’, ‘मालविकाग्निमित्रम्’ आणि ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ ही त्यांनी लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत.

 

प्रारंभीस कालिदास अडाणी, अशिक्षित आणि
मूर्ख असणे अन् त्याच्या जीवनाचा कायापालट काशीच्या राजकन्येमुळे होणे

‘उज्जैनचा सम्राट विक्रमादित्य याच्या दरबारातल्या नवरत्नातील एक रत्न म्हणजे कालिदास. कालिदास ब्राह्मण कुटुंबात जन्मला. तो शिवाचा उपासक होता. प्रारंभीस कालिदास अडाणी, अशिक्षित आणि मूर्ख होता. त्यामुळे कुणीही त्याची मस्करी करायचे; परंतु त्याच्या जीवनाचा कायापालट काशीच्या राजकन्येमुळे झाला. ती विलक्षण बुद्धीमान आणि प्रतिभावान अशी पंडिता होती. वाङ्मय, कला आदी विद्यांत ती अग्रणी होती. तिच्याशी विवाह करायला आलेल्या अनेक तरुणांना तिने बुद्धीच्या तेजाने पराभूत केले. त्या सगळ्या असंतुष्टांनी त्या राजकन्येचा सूड घ्यायचे ठरवले. त्यांनी एका महामूर्ख तरुणाला हाती धरले. त्याला विपुल धन, उत्तम अन्न आणि सुंदर वस्त्रे देण्याचे प्रलोभन दाखवले. राजकुमारीसमोर त्याला केवळ उभे रहायचे होते. राजकुमारी जे प्रश्‍न विचारील, त्याचे उत्तर न देता त्याने मौन रहायचे, अवाक् रहायचे. त्या महामुर्खाला सुंदर वेशभूषा करून नटवण्यात आले. अलंकार घातले आणि अत्यंत बुद्धीमान, प्रतिभावान असा दार्शनिक म्हणून त्याला राजकुमारीसमोर उभे केले.

 

राजकुमारीला तो महामुर्ख असल्याचे
लक्षात येणे आणि तिने त्याला राजवाड्याबाहेर काढणे

जेव्हा राजकुमारीने कूट प्रश्‍न विचारले, त्या वेळी तो मान हलवायचा आणि चमत्कारिक नजरेने राजकन्येकडे पहायचा. त्या चतुर लोकांनी ‘अत्यंत प्रतिभासंपन्न आणि शहाणपणाचा कळस’, अशी त्याची उत्तरे त्या मौनातून अभिव्यक्त होत असल्याचे सांगितले. त्याच्या दृष्टीक्षेपाचे निर्वचन असे केलेे की, त्या राजकुमारीचे समाधान झाले. राजकुमारीचे त्याच्याशी लग्न झाले आणि काही दिवसांतच तिच्या लक्षात आले की, तो महामूर्ख आहे. तिने त्या महामुर्खाची भयंकर निंदा केली आणि त्याला राजवाड्याबाहेर काढले. त्याला सांगितले की, जोवर तू पंडित होत नाहीस, तोवर इकडे फिरकू नकोस.

 

एका रात्री अकस्मात मूर्तीतून महाकाली
प्रगटलेली दिसणे, दिव्य देवीने त्याच्या जिभेवर मातृका लिहिणे

मालवा, उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री कालिमाता ! याच मंदिरात देवीने कालिदासाला दर्शन दिले होते !

तो तरुण प्रामाणिक, निष्कपट आणि साधाभोळा होता. ‘त्या दुष्टांनी आपला उपयोग राजकुमारीला फसवण्याकरता केला’, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपला प्रमाद ओळखला. तो तडक देवीच्या देवळात गेला. रात्री देवळातच राहिला. काय घडले, कसे घडले, ते त्याला काहीच कळेना. पुजार्‍याने त्याला देवीची आराधना करायला सांगितले. नंतर त्याने त्या देवळात राहून महाकालीची उपासना केली. जसे पुजार्‍याने सांगितले, तसेच कडक व्रत केले. एका रात्री त्याला अकस्मात त्या मूर्तीतून महाकाली प्रगटलेली दिसली. ती दिव्य देवी त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या जिभेवर मातृका लिहिल्या आणि त्याला आशीर्वाद दिला, तू महापंडित, महाकवी होशील.’ त्याचे नाव कालिदास ठेवले.

 

कालिदासाने चार महाकाव्यांनी राजकुमारीच्या प्रश्‍नाचे उत्तर देणे

नंतर तो कालिदास राजवाड्यात आला. राजकुमारीने विचारले, ‘अस्ति कश्‍चित् वग्विशेषः। …’ ‘तू परत का आलास ? काही पांडित्य संपादिले का ?’ कालिदासाने चार महाकाव्यांनी तिच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. प्रत्येक महाकाव्याचा प्रारंभ राजकुमारीने विचारलेल्या प्रश्‍नाच्या एकेका शब्दापासून होता आणि त्याने ती चार शब्दांनी प्रारंभ होणारी चार महाकाव्ये धडाधड म्हणून दाखवली.

कुमारसंभव महाकाव्याची प्रारंभीची ओळ अशी,…….

‘अस्ति उत्तरस्यां दिशि देवतात्मा

हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधी विगाह्य

स्थित: पृथिव्या इव मानदण्ड: ॥’

अर्थ : उत्तर दिशेला देवतांचा निवास असलेला ‘हिमालय’ नावाचा पर्वतांचा स्वामी पूर्व आणि पश्‍चिम दिशेला असलेल्या समुद्रमध्ये पृथ्वीचा मानदंड म्हणून उभा आहे.

मेघदूत या महाकाव्याचा प्रारंभ असा,…….

कश्‍चित् कांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः ।

शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥

यक्षश्‍चव्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु ।

स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥

अर्थ : स्वकर्तव्यापासून ढळलेला, प्रेयसीच्या विरहाने व्याकुळ झालेला, कुबेराच्या शापामुळे महती अल्प झालेला एक यक्ष सीतेच्या डुंबण्याने जेथील नदी पवित्र झाली आहे आणि जिथे घनदाट सावली आहे, अशा रामगिरीनामक पर्वतावर राहू लागला.

रघुवंशाचा प्रारंभ असा,……

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।

जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्‍वरौ॥

शब्द आणि अर्थ यांप्रमाणे एकरूप असलेल्या जगत्पालक शिवपार्वतींना शब्द अन् अर्थ यांचे आकलन होण्यासाठी मी वंदन करतो.

ऋतुसंहार महाकाव्याच्या प्रारंभी ग्रीष्माचे वर्णन याप्रमाणे आहे…….

‘विशेषसूर्यः स्पृहणीयचंद्रमाः ।’

अर्थ : उग्र असा सूर्य आणि मनोरम्य चंद्र असणारा ग्रीष्म ऋतू (आला आहे)’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जुलै २००५)

 

महाकवी कालिदास यांची देवी सरस्वती यांनी घेतलेली परिक्षा

कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली.
कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात.

कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?

कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ?

वृद्ध स्त्री म्हणाली, ‘अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात.

कालिदास आता हतबल झाले,

कालिदास म्हणाले मी हट्टी आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नख आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच.

कालिदास आता कंटाळले आणि कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे.

वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.

कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले.

वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता *नतमस्तक झाले.
सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.

Leave a Comment