परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ग्रंथ-निर्मितीचे कार्य

Article also available in :

 

अ. सर्वांगस्पर्शी ग्रंथांचे संकलन

अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांची काही अद्वितीय वैशिष्ट्य

अ १ अ. पृथ्वीवर प्रथमच उपलब्ध झालेले ज्ञान !

सनातनच्या बहुतांशी ग्रंथांत पृथ्वीवर प्रथमच उपलब्ध झालेल्या ज्ञानाचे प्रमाण सुमारे ३० ते ७० टक्के आहे.

अ १ अ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानात मिळणारे ज्ञान

ग्रंथांत दिलेले टक्केवारीच्या स्वरूपातील ज्ञान (उदा. विविध देवतांची ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची क्षमता’), प्रायोगिक विषयांच्या संदर्भातील ज्ञान (उदा. आदर्श देवघराची मापे) यांसारखे ज्ञान हे परात्पर गुरु डॉक्टरांना ध्यानात मिळालेले आहे. हे ज्ञान पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले असे अनमोल आहे.

अ १ अ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काही ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे सखोल अध्यात्मशास्त्रीय असे दिव्य (ईश्वरी) ज्ञान !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काही साधकांच्या माध्यमातून अध्यात्मातील विविध विषयांवर सूक्ष्मातून ‘न भूतो न भविष्यति’, असे सखोल अध्यात्मशास्त्रीय ज्ञान प्रतिदिन पानेच्या पाने भरून मिळत आहे.

अ १ आ. अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे

सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे’, हे समजावून सांगितले की, त्यांचा अध्यात्मावर लवकर विश्वास बसतो आणि ते साधनेकडे वळतात. यासाठी सनातनच्या प्रत्येक ग्रंथात अध्यात्मशास्त्र सांगण्यावर भर दिला आहे.

अ १ इ. विज्ञानयुगातील वाचकांना सहज समजेल अशा वैज्ञानिक परिभाषेतील लिखाण

सध्याच्या विज्ञानयुगातील वाचकांना वैज्ञानिक परिभाषेतील लिखाणाचे चटकन् आकलन होते, हे जाणून सनातनच्या ग्रंथांतील लिखाण वैज्ञानिक परिभाषेत (सारणी, टक्केवारी आदी प्रकारे) केले आहे.

अ १ ई. प्रगत वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेले संशोधनात्मक प्रयोग

व्यक्तीने साधना केल्याने तिच्यावर होणारा चांगला परिणाम; इंग्रजी अक्षरे नव्हेत, तर देवनागरी अक्षरे सात्त्विक असणे; तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य आदींविषयी वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनाचा अंतर्भाव सनातनच्या त्या त्या विषयावरील ग्रंथात केला जातो.

अ १ उ. सूक्ष्म-ज्ञानाविषयीची परीक्षणे आणि चित्रे

सात्त्विक वेशभूषा, आहार, अलंकार, धार्मिक कृती इत्यादींचा व्यक्तीवर होणारा चांगला परिणाम आदींच्या संदर्भातील सूक्ष्म-स्तरावरील क्रिया दर्शवणारी परीक्षणे आणि चित्रे सनातनच्या त्या त्या विषयावरील ग्रंथात सिद्ध केली जातात.

अ १ ऊ. ग्रंथांची अन्य काही वैशिष्ट्ये

१. आनंदाप्राप्ती अन् शीघ्र ईश्वरप्राप्ती यांसाठी काळानुसार आवश्यक अशा योग्य साधनेची शिकवण !
२. अध्यात्माचे तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !
३.मानवजातीच्या ८० टक्के समस्यांचे मूळ असलेल्या वाईट शक्तींसंदर्भात पूर्वी कधीही उपलब्ध नसलेले ज्ञान आणि वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय !

अ २. सनातनच्या ग्रंथांचे काही विषय

८,००० हून अधिक ग्रंथ होतील इतके लिखाण आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी एकत्रित करून ठेवले आहे. ग्रंथांचे काही विषय पुढे दिले आहेत.

अ. हिंदु धर्म : सोळा संस्कार; सण, उत्सव, व्रते आणि परंपरा; धर्म; धर्मरक्षण; कुंभपर्व; खरे आणि भोंदू साधू-संत

आ. आचारधर्म : आदर्श दिनचर्या, वेशभूषा, अलंकार, आहार आणि निद्रा

इ. धार्मिक कृती : देवपूजा, देवळात दर्शन घेणे, श्राद्ध आदी धार्मिक कृती; धर्माचरण; तीर्थक्षेत्रे इत्यादी.

ई. विविध योगमार्ग : कर्मयोग, हठयोग, नामसंकीर्तनयोग आणि गुरुकृपायोग

उ. साधना : देवता (गुणवैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासनेमागील शास्त्र), गुरु, शिष्य, व्यष्टी आणि समष्टी साधना, स्वभावदोष-निर्मूलन आणि गुणसंवर्धन, अहं-निर्मूलन, भावजागृती, बालकभाव, गोपीभाव इत्यादी.

ऊ. ईश्वरप्राप्तीसाठी कला : सात्त्विक अक्षरे, रांगोळ्या, मेंदी इत्यादी.

ए. कौटुंबिक विषय : बालसंस्कार अन् पालकांसाठी मार्गदर्शक ग्रंथमालिका

ऐ. सामाजिक विषय : गोरक्षण आणि गोसंवर्धन, स्वभाषारक्षण, आदर्श शिक्षणव्यवस्था इत्यादी.

ओ. हिंदु राष्ट्र : आदर्श राष्ट्ररचना, हिंदु राष्ट्र का हवे? इत्यादी.

औ. पंचमहाभूतांशी संबंधित अनुभूती आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

अं. वाईट शक्तींच्या त्रासांवरील आध्यात्मिक उपाय: दृष्ट आणि उतारा

क. आयुर्वेद

ख.भावी आपत्काळातील संजीवनी : विकार-निर्मूलनासाठी सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार,बिंदूदाबन उपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय, नामजप-उपाय, स्वसंमोहन उपचार; प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणा-या विकारांवरील उपाय; अग्निहोत्र; अग्नीशमन प्रशिक्षण; प्रथमोपचार प्रशिक्षण इत्यादी.

 

आ. प्रकाशित ग्रंथांची संख्या

मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.

 

ई. अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमाचा पाया असलेले ग्रंथ !

अध्यात्म विश्वविद्यालयाला अध्यात्मातील सर्व अंगांचे सखोल ज्ञान देणा-या क्रमिक पाठ्यपुस्तकांची आवश्यकता भासणार आहे. विश्वविद्यालयाची ही आवश्यकता परात्पर गुरु डॉक्टर संकलित करत असलेले ग्रंथ निश्चितपणे भागवतील.

 

प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या संख्येने उच्चांक गाठण्याची कारणे

गेल्या २३ वर्षांत, म्हणजे जून २०१९ पर्यंत मी संकलित केलेल्या आणि सनातनने प्रकाशित केलेल्या अध्यात्मविषयक ग्रंथांची स्थिती अशी आहे – १७ भाषांतील ३२३ ग्रंथांच्या सुमारे ७९ लक्षांहून अधिक प्रती ! अध्यात्मविषयक ग्रंथांचे लिखाण करणार्‍या काही जणांनी प्रश्‍न केला, ‘आपण एवढे ग्रंथ एवढ्या कमी काळात कसे संकलित करू शकलात ?’ या प्रश्‍नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. 

१. इतरांच्या ग्रंथांत धर्मात काय सांगितले आहे, याचा उल्लेख असतो; ‘पण तसे का सांगितले आहे’, याचे स्पष्टीकरण नसते, उदा. एखाद्या देवाला विशिष्ट फूलच का वाहतात ? बायकांनी कुंकू लावण्याचे कारण काय ? इत्यादी. मी संकलित केलेल्या ग्रंथांत अशा प्रश्‍नांची उत्तरे असतात, म्हणजेच अध्यात्मातील ‘का ?’, या प्रश्‍नांची उत्तरे असतात. त्यामुळे वाचकांच्या बुद्धीचे समाधान होते. शंकांचे निरसन झालेले वाचक अधिकाधिक ग्रंथांचे वाचन करतात आणि पुढे साधनेला लागतात.

२. इतरांच्या ग्रंथांत ‘काय करायचे’, हे सांगितलेले असते; पण ‘ते कसे करायचे’, हे सांगितलेले नसते, उदा. ‘एकाग्रतेने नामजप करा’, असे सांगितलेले असते; पण ‘मन एकाग्र करण्यासाठी काय केले पाहिजे’, हे सांगितलेले नसते. मी संकलित केलेल्या ग्रंथांत हेही सांगितलेले असते.

३. ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानात उपलब्ध असणार्‍या उपकरणांचाही वापर करून मजकूर ग्रंथांत घेतलेला असतो. त्यामुळे विज्ञानवाद्यांचे समाधान होऊन तेही वाचक बनतात.

४. सनातनच्या ग्रंथांतील काही लिखाण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलिकडील, तसेच पृथ्वीवर आतापर्यंत उपलब्ध नसलेले ज्ञान देणारे असे असते.

५. ग्रंथांसाठी मी निवडलेला मजकूर टंकलिखित करणे, त्याचे प्राथमिक संकलन करणे इत्यादी सेवा साधक साधना म्हणून करतात. त्यामुळे त्यांत माझा वेळ न गेल्याने आतापर्यंत ४००० हून अधिक ग्रंथांचा मजकूर अंतीम संकलनाच्या प्रतीक्षेत संगणकात जमा झालेला आहे. हे ग्रंथ पुढील २५ – ३० वर्षांत प्रकाशित झाले की, अध्यात्माच्या बहुतेक सर्वच अंगांची माहिती वाचकांना उपलब्ध होईल.

६. साधना केल्याने ज्यांना सूक्ष्मातील, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळते, त्यांना या ग्रंथांतील शक्ती, चैतन्य, भाव, आनंद इत्यादी जाणवते. त्यामुळे तेही ग्रंथांकडे आकर्षित होतात.

७. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वाचकांना हे ग्रंथ आवडतात; म्हणूनच एवढ्या प्रतींचे प्रकाशन होऊ शकले. एवढेच नव्हे, तर विदेशांतील जर्मन आणि स्पॅनिश या दोन भाषांत काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि इतर अनेक भाषांतही प्रकाशित होण्याची प्रक्रिया चालू आहे.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment