भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

पाश्चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे. – एक प्रसिद्ध संगीतकार

१. भगवंताशी एकरूपता साधण्यासाठी त्यानेच
निर्मिलेल्या विविध कलांपैकी संगीत ही एक कला असणे

कु. तेजल पात्रीकर

निर्गुण निराकार परब्रह्माला एकोऽहम् । बहुस्याम् । म्हणजे मी एक आहे आणि अनेकांत रूपांतरित होईन, अशा रूपात स्वतःला पहाण्याची इच्छा झाली. त्याचीच परिणती म्हणजे त्याने केलेली सृष्टीची उत्पत्ती. या सृष्टीतील प्रत्येकच जीव त्या वेळी सोऽहम् म्हणजे तोच मी आहे, या भावात होता, म्हणजेच प्रत्येक जिवाला आपण भगवंताचाच अंश आहोत, याची पूर्ण जाणीव होती. सृष्टीच्या रचनेच्या वेळीच भगवंताने त्याच्याशी एकरूपता साधण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तीयोग इत्यादी विविध योगमार्गांची निर्मिती केली. यासमवेतच विविध दैवी कलांची उत्पत्ती करून त्यायोगेही जिवाने साधना करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, हा त्यामागील उद्देश होता. संगीत ही त्यातीलच एक कला. गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा समावेश ज्यात होतो, त्याला संगीत असे म्हणतात.

 

२. प्राचीन भारतीय संगीताच्या समृद्धतेची उदाहरणे

२ अ. संगीताचा उपयोग करून गायकाने नादब्रह्माची अनुभूती घेणे

शिवाच्या डमरूतून निघालेला ॐकार हा सृष्टीतील प्रथम नाद. त्यानंतर कालपरत्वे या नादाला जोडून विविध शब्दांचे प्रचलन (मूळ निर्गुणातील ॐ कार सगुण रूपात येतांना नादाला विविध शब्दांची जोड दिली गेली. ती प्रक्रिया म्हणजे प्रचलन.) चालू झाले. अशा प्रकारे संगीत हे विविध बोलांतून व्यक्त व्हायला लागले. आपल्या प्राचीन काळी गायक संगीताचा उपयोग साधना करण्यासाठी करत असत आणि त्यातूनच ते नादब्रह्माची अनुभूती घेत असत.

२ आ. एकेक स्वर सिद्ध करून गायकाने साधना म्हणून गाणे

प्राचीन काळी भारतीय संगीत अतिशय समृद्ध होते. संगीतातील एकेका स्वराला सिद्ध करून गायक साधना म्हणून गात असत. रागांच्या स्वर समुहावर प्रभुत्व मिळवून दीप प्रज्वलीत करणे, तसेच निरभ्र आकाश मेघांनी आच्छादित करणे, हे त्यांना सहज शक्य होत असे.

२ इ. संगीताच्या उपयोगाने रोग बरे करणे

आयुर्वेदामध्येही संगीताचा उपयोग करून रुग्णांचे विविध रोग बरे करण्याचे दाखले प्राचीन इतिहासात आढळून येतात.

 

३. संगीतकलेचा -हास होण्याची कारणे

साधनासमृद्ध संगीतकलेचा काळपरत्वे -हासच होत गेलेला आपल्याला दिसतो. मनुष्याची आध्यात्मिक पातळी जसजशी घटत गेली, तसतशी संगीताकडे ईश्वरप्राप्तीसाठीचे माध्यम म्हणून पहाण्याची दृष्टी लुप्त होऊन मनोरंजनाकरता संगीत असा दृष्टीकोन अधिकाधिक दृढ होत गेला. याला तशीच विविध कारणेही आहेत.

३ अ. यवनी आक्रमणे

संगीतकलेचा -हास होण्यासाठी बहुतांशी कारणीभूत आहेत यवनी आक्रमणे ! त्यांनी भारतात येऊन केवळ राज्य केले नाही, तर आपली संस्कृती नष्ट करण्याचे पूर्ण प्रयत्न केले.

३ आ. ईश्वरप्राप्ती नव्हे, तर लोकेषणा मिळवणे, हा संगीताचा उद्देश असल्याचे जनमानसात दृढ करणे

ईश्वरप्राप्ती हा संगीताचा उद्देश नसून मनोरंजन, राजांची खुशमस्करी करणे, राजदरबारात वाहवा मिळवणे, इनाम मिळवणे इत्यादीसाठीच ते असल्याचे जनमानसात दृढ केल्याने संगीताची अपरिमीत हानी झाली. त्यातूनच कव्वाली, ठुमरी इत्यादी गीतप्रकारांची चलती होऊ लागली.

३ इ. प्रसिद्ध हिंदु गायक-वादक यांचे धर्मांतर करणे

यवनी आक्रमणकारी एवढेच करून थांबले नाहीत, तर त्याकाळचे कितीतरी प्रसिद्ध हिंदु गायक आणि वादक यांना त्यांनी इस्लाम पंथात धर्मांतरित करून घेतले. आज त्यामुळेच तानसेनसारख्या कितीतरी हिंदु गायकांचा गायन वारसा त्यांची इस्लामी पिढीच चालवत आहे.

३ इ १. संगीताचा उपयोग साधना म्हणून
केल्यास त्या गायनात किती सामर्थ्य येते, हे स्पष्ट करणारी कथा

३ इ १ अ. अकबराला तानसेनच्या गुरूंचे गायन ऐकण्याची इच्छा होणे आणि त्याने वेश पालटून तानसेनसमवेत गुरूंचे गायन ऐकायला जाणे

एकदा राजा अकबराने गानसम्राट तानसेनकडे विचारणा केली, तू अतिशय सुंदर गातोस. ज्यांनी तुला हे संगीत शिकवले, त्या तुझ्या गुरूंचे संगीत मला एकदा ऐकायचे आहे. त्या वेळी तानसेन म्हणाला, महाराज, माझ्या गुरूंचे गायन तुम्हाला ऐकायचे असेल, तर ते चोरून ऐकावे लागेल; कारण ते कुणासाठी गात नाहीत. त्यावर अकबर बादशहाने तानसेनसमवेत जाण्याची सिद्धता दर्शवली. त्याप्रमाणे अकबर आणि तानसेन वेश पालटून स्वामी हरिदास यांच्याकडे ब्राह्ममुहूर्तावर पोेहोचले.

३ इ १ आ. स्वामी हरिदासांचे गायन ऐकून अकबराने समाधी अवस्था अनुभवणे

स्वामी हरिदासांनी आपले प्रातर्विधी आटोपून सूर्याला अर्घ्य दिले आणि झोपडीत येऊन गायन आरंभ केले. त्यांचे गायन ऐकून अकबर बादशहाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या आणि तो एका विलक्षण समाधी अवस्थेत गेला. काही वेळाने त्या स्थितीतून बाहेर आल्यावर तानसेन आणि अकबर दोघेही परतीच्या प्रवासाला निघाले.

३ इ १ इ. स्वतःचे गाणे लोकेषणेसाठी असून गुरूंचे गाणे केवळ जगन्नियंत्या परमेश्वरासाठी असल्याने त्यांच्या गाण्यात सामर्थ्य असल्याचे तानसेनने सांगणे

परतीच्या प्रवासात अकबराने तानसेनला विचारलेे, तुझ्या गाण्याला तर तुझ्या गुरूंच्या गाण्याची थोडीही सर नाही. असे का ? त्यावर तानसेन उत्तर देतो, तुमचे म्हणणे खरे आहे, महाराज. माझे गाणे माझ्या गुरूंच्या गाण्याच्या तुलनेत कवडीमोलही नाही. आमच्या गाण्यात हा भेद असण्याचे कारण म्हणजे माझे गाणे लोकेषणेकरता, आपल्याला खुश करण्याकरता आहे, तर माझे गुरु केवळ जगन्नियंत्या परमेश्वरासाठीच गातात.

संगीताचा उपयोग साधना म्हणून केल्यास त्या गायनात किती सामर्थ्य येते, हे यावरूनच लक्षात येते. संगीताची वाटचाल अधोगतीकडे कशी होऊ लागली, हे तानसेनने दिलेल्या उत्तरावरून लक्षात येते.

३ ई. संगीताला शृंगारिकतेकडे वळवणे

या इस्लामी राजवटींनी राजदरबारात संगीताला विशेष स्थान देऊ केले आणि हळूहळू त्या संगीताला शृंगारिकतेकडे वळवले. त्यामुळे संगीतात कामुक भाव अधिक दिसायला आरंभ झाला. अशा प्रकारे ईशभक्तीकडून कामवासनेकडे नेणार्याि संगीताचा आरंभ झाला.

उत्तर भारतीय संगीताची ही स्थिती असली, तरी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की, मोगलांच्या एवढ्या आक्रमणांनंतरही दाक्षिणात्य संगीताने मात्र आजही आपली पारंपरिक संगीतसाधना जोपासून ठेवली आहे.

३ उ. भारतीय संगीतात विदेशी पॉप गायनाचा अंतर्भाव होणे

त्यानंतर आताच्या एकूणच भारतीय संगीतात विदेशी पॉप गायनाचा अंतर्भाव व्हायला लागला आहे. त्यामुळे भारतीय संगीताचे रूपांतर आता पाश्चारत्त्य गायनात व्हायला लागले आहे. कर्णकर्कश आवाज, अनेक वाद्यांची सरमिसळ आणि कामुक हावभाव अन् बोल यांच्या आधारे आपण आजच्या संगीताचे अधःपतन पहात आहोत. हल्लीच्या गायनाबद्दल एका प्रसिद्ध संगीतकाराने म्हटले आहे, पाश्चात्त्य संगीताने केवळ शरीर डोलते, तर शास्त्रीय संगीतात अंत:करणाचा ठाव घेण्याची शक्ती आहे.

 

४. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून
ईश्वरप्राप्तीसाठी संगीतकला या साधनामार्गाने साधनेला केलेला आरंभ !

४ अ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय ईश्वरनिर्मित
सर्व कलांचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी कार्यरत असणे

परमेश्वराचीच कृपा आहे की, आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी श्रीमत् नारायणाचा अवतार या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने आपल्याला पुन्हा घेऊन जात आहे. संगीतच नव्हे, तर ईश्वरनिर्मित सर्व कला आजच्या काळातही ईश्वरप्राप्ती करवून देऊ शकतात, हे सिद्ध करण्यासाठी आणि संगीतासमवेतच सर्व कलांचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय कार्यरत आहे.

४ आ. संगीताच्या माध्यमातून नादब्रह्माची अनुभूती
घेता येते, हे सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वंविद्यालय कटिबद्ध असणे

आतापर्यंत तानसेनने दीप राग गाऊन दिवे पेटवले. मल्हार राग गाऊन पाऊस पाडला, हे आपण ऐकले आहे. हा काही कपोलकल्पित इतिहास नाही. हे शास्त्र आहे. आज संगीतशास्त्राच्या माध्यमातून खरोखर नादब्रह्माची अनुभूती घेता येते, हेच आपल्याला पुन्हा सिद्ध करण्याची वेळ आली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गायनाची आवड असलेल्यांना, गायन, वादन या कला शिकलेल्यांना संगीताच्या माध्यमातून साधना करण्याची एक सुवर्णसंधीच चालून आली आहे. या साधनेचा भाग म्हणून काही साधक-विद्यार्थ्यांनी आता ईश्वरप्राप्तीसाठी संगीतकला या साधनामार्गाने साधनेला आरंभ केला आहे.

४ इ. येणा-या  आपत्काळाच्या दृष्टीने संगीत-उपचार पद्धत या विषयाच्या अभ्यासाचाही आरंभ !

प्राचीन काळचा आपला इतिहास सांगतो की, चरक, सुश्रुत यांसारखे महर्षी आयुर्वेदानुसार रोग्यांवर उपचार करतांना त्या उपचारात संगीताचा अंतर्भाव करत असत. त्या काळी आपली संगीतकला एवढी समृद्ध होती की, पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांशी संबंधित विविध रागांच्या गायनाने रुग्णांच्या विविध रोगांचे निवारण होत असे. येणा-या आपत्काळात विविध रोग, व्याधी यांवर औषधे सहज उपलब्ध नसतील. त्यामुळे या आपत्काळासाठी आवश्यक आणि योग्य अशा उपचारपद्धतींवरही आपण भर देत आहोत. त्या दृष्टीने संगीत-उपचार पद्धत या विषयाचाही साधक-विद्यार्थी अभ्यास करत आहेत.

४ इ १. प्राचीन भारतीय संगीतशास्त्राच्या आधारे विविध रोगांवर संगीत-उपचारांचा परिणाम पहाण्यासाठी अभ्यास आणि प्रयोग करणार असणे

आज विदेशातील लोकही आपल्या प्राचीन प्रगत संगीतशास्त्राचा अभ्यास करून संशोधनाद्वारे मनुष्याच्या शारीरिक आणि मानसिक रोगांच्या निवारणासाठी संगीत-उपचार पद्धतीचे (म्युझिक-थेरपीचे) परिणामकारक अनुभव घेत आहेत. त्या तुलनेत आज भारतात संगीत-उपचार पद्धतीचा लाभ आपण म्हणावा तेवढ्या प्रमाणात करवून घेत नसल्याचे लक्षात आले आहे. आपल्या प्राचीन दैवी संगीतशास्त्राचा आपल्याला लाभ करवून घेता यावा, यासाठी संगीतातील विविध राग विविध रोगांवर कसे उपयुक्त आहेत ? ते राग ऐकून काय जाणवते ?, याविषयीही साधक-विद्यार्थी अभ्यास आणि प्रयोग करणार आहेत.

अशा या जीवनोद्धारक संगीतकलेच्या माध्यमातून आम्हा कलाप्रेमी जिवांना साधनेच्या प्रगतीपथावर आपणच घेऊन जावे, अशी भगवान शिव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करते.

 

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील ईश्वरप्राप्तीसाठी संगीतकलेचा अभ्यास अन्
त्याविषयीचे संशोधनकार्य यांत सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हिंदु धर्मात सांगितलेल्या १४ विद्या आणि ६४ कला ही हिंदु धर्माने विश्वाला दिलेली अनमोल देणगी आहे. या विद्या आणि कला मनुष्यास आंतरिक सुख, समाधान, ऐहिक उत्कर्ष तर प्राप्त करून देतातच; परंतु त्यांचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माध्यमातून साधना करून व्यक्तीला ईश्वरप्राप्ती करून घेता येते; मात्र सद्यस्थितीत या विद्या अन् कला यांपैकी बहुतांश लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्या काही प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यांची जीवनाभिमुखता अन् ईश्वरप्राप्ती हा त्यांचा मूळ उद्देश यांपासून त्या पुष्कळ दूर गेल्याचे आढळत आहे. या पार्श्वभूमीवर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात या विद्या आणि कला यांचा अधिकाधिक अभ्यास अन् संपूर्ण मानवजातीस उपयुक्त होण्याच्या दृष्टीने त्यांविषयी संशोधन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या शाखांचे आपोआप जतन होईल. त्याचसह ज्यांना विविध कलांच्या, उदा. चित्रकला, शिल्पकला, अक्षरयोग इत्यादींच्या माध्यमांतून साधना करावयाची असेल, त्यांना ते विषय शिकवले जातील.

६४ कलांपैकी संगीत ही एक कला आहे. या कलेचा उपरोल्लेखित उद्देशांनी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी त्यासंबंधीची आवड असणा-या अन् संगीतकलेचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्ती; स्वतः शिक्षण न घेतलेल्या; पण या कलेतील अधिकारी व्यक्तींचे साहाय्य मिळवून देऊ शकणा-या व्यक्ती; तसेच संगीत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक माहिती देणारी पुस्तके, कात्रणे, लिखाण; यांसमवेत शास्त्रीय गायन आणि वादन यांच्या ध्वनीफिती, ध्वनी-चित्रचकत्या, रेकॉर्ड डिस्क आपल्याकडे उपलब्ध असल्यास, तसेच संगीताच्या माध्यमातून रोगांवर उपचार (म्युझिक थेरपी) याविषयीही काही तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती असल्यास कु. तेजल पात्रीकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.

भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.
भ्र.क्र. : ९५६१५७४८२४, ७९७२४४८९०२ ई-मेल : [email protected]

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या विश्वकल्याणार्थ चालू असलेल्या ज्ञानयज्ञात साहाय्य करणा-या ची त्या साहाय्यातून एक प्रकारे साधनाच होणार आहे. आपण केलेल्या साहाय्याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आपले नेहमीच कृतज्ञ राहील.

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment