परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुरुकार्याविषयी असलेला कृतज्ञताभाव !

माझ्याकडून जे काही कार्य झाले, ते माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या आशीर्वादाने झाले. याची दोन उदाहरणे येथे दिली आहेत.

अ. गुरूंनीच हे सर्व माझ्याकडून करवून घेतले आहे !

वेळोवेळी बाबा जे शिकवायचे, ते सर्व मी लिहून ठेवायचो. बाबा मला म्हणायचे, या लिखाणाचा तुम्हाला उपयोग नाही (कारण आता तुम्ही शब्दातीत माध्यमातून शिकू शकता); पण इतरांना होईल. मी अध्यात्मावर लिहिलेला अध्यात्मशास्त्र हा (चक्रमुद्रांकित, म्हणजे सायक्लोस्टाईल) ग्रंथ वर्ष १९९४ मध्ये बाबांना दाखवला. त्यांना तो आवडला. बाबा मला म्हणाले, माझ्या गुरूंनी मला आशीर्वाद दिला होता, तू किताबों के उपर किताबे लिखेगा । मी भजनाचे एकच पुस्तक लिहिले. माझ्या गुरूंचा आशीर्वाद मी तुम्हाला देतो. तेव्हा मी म्हणालो, आता पुस्तके लिहिण्यात आनंद वाटत नाही. (शब्दांच्या पलीकडच्या पातळीला गेल्यावर शब्दांच्या पातळीला येणे, म्हणजे आनंद गमावणे, असे होते.) त्यावर बाबा म्हणाले, आमच्या गुरूंचा आशीर्वाद फुकट घालवणार का ? तुम्हाला पुस्तके लिहावीच लागतील. ते तुमचे कर्तव्यच आहे. एकेका विषयावर एकेक, अशी लहान लहान पुस्तके लिहा. लोकांना हाताळण्याच्या दृष्टीने ती सुटसुटीत हवीत आणि परवडलीही पाहिजेत. मार्च १९८७ मध्ये, म्हणजे गुरुभेटीपूर्वी पाच मास (महिने), अध्यात्मशास्त्र या (चक्रमुद्रांकित) ग्रंथाच्या प्रस्तावनेत मी लिहिले होते, पुस्तकातील एकेका प्रकरणावर एकेक ग्रंथ आधुनिक शास्त्रीय पद्धतीने माझ्याकडून लिहून घेतला जावा, अशी ईश्‍वराला प्रार्थना. जणू मी पूर्वी केलेली प्रार्थना लक्षात घेऊन गुरूंनी मला बरीच पुस्तके लिहिण्याचा आशीर्वाद दिला. आता शास्त्रीय भाषेत धर्मशिक्षण देणार्‍या अनेक ग्रंथांची निर्मिती होत आहे. हे सर्व ठाऊक नसल्याने इतरांना वाटते, काय यांचा व्यासंग ! त्यांनी किती उपयुक्त ग्रंथ लिहिले आहेत ! त्यांना ही गोष्ट ठाऊक नाही की, गुरूंनीच हे सर्व माझ्याकडून करवून घेतले आहे.

 

आ. देशविदेशांतून जिज्ञासू साधना
शिकण्यास येणे, ही गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाची प्रचीती

१९९४ या वर्षी प.पू. बाबांनी मला धर्मप्रसारासाठी अमेरिकेत जाण्यास सांगितले. माझ्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते आणि अमेरिकेत कोणाशी ओळखही नव्हती. हे प.पू. बाबांना सांगितल्यावर ते म्हणाले, जाऊ दे. अमेरिका तुझ्याकडे येईल ! प्रत्यक्षातही वर्ष २००३ पासून अमेरिका आणि विविध देशांतील जिज्ञासू आमच्याकडे येऊ लागले. आता जगातील अनेक देशांत सत्संग चालू आहेत.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१०.२०१५)

 

इ. श्री गुरुचरणी प्रार्थना

परमपूज्य नाथा । गुरु भक्तराजा ।
विनवितो आता । करुणा करा ॥ १ ॥
आशीर्वाद द्यावा । जगद्व्यापी धर्मसाराचा ।
सकल जनांना । उद्धरण्याला ॥ २ ॥

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन-निर्मित ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’

Leave a Comment