सनातन संस्थेचे फ्लेक्स फलक आणि ग्रंथ-उत्पादन यांच्या प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !

सनातनच्या फ्लेक्स फलक प्रदर्शनाचा लाभ घेतांना जिज्ञासू

1

देवास (मध्यप्रदेश) : दत्तजयंतीच्या निमित्ताने बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या वेळी मध्यप्रदेश आणि आणि महाराष्ट्र राज्यांतील सहस्रो भक्तांनी दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. दत्तजयंतीनिमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पहाटे ५ वाजता काकड आरती आणि त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले. सायंकाळी ५.३५ वाजता दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्तजन्मानंतर आरती, पाळणागीत म्हणून नंतर प्रसाद वितरण करण्यात आले. सायंकाळी झालेल्या महाआरतीलाही भक्तांची मोठी गर्दी होती. रात्री कवीसंमेलनही पार पडले. या कवीसंमेलनात कवींनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी वीररस उत्पन्न करणार्‍या कविता म्हणून उपस्थितांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमाची भावना जागृत केली.

दत्तजयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी अध्यात्मप्रसार !

या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला. या प्रदर्शन कक्षाच्या उभारणीसह सेवेसाठी आलेल्या साधकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्थाही मंदिराचे श्री. दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी केली.

बांगरप्रमाणेच वैशालीनगर, इंदूर येथील केशवानंद आश्रम ट्रस्टच्या दत्तमंदिरात आणि उज्जैन येथील ऋषिनगरमधील दत्तमंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला. या ग्रंथ प्रदर्शनासाठी इंदूर येथे श्री. कोराने महाराज आणि उज्जैन येथे विश्‍वस्त श्री. कोरडे आणि श्री. प्रमोद पाठक यांचे सहकार्य लाभले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात