साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे
आणि योग्य दृष्टीकोन देऊन समष्टीचे कल्याण करणारे अवताररूपी परात्पर गुरु डॉ. आठवले !

granth_mukhprushta

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते. असेच काही विनोद सेवा करतांना शीव येथेही घडत असत. ते प्रसंग खाली दिले आहेत. त्याकडे विनोद म्हणून न पहाता त्यातून प्रत्येकाला शिकता येईल आणि त्याचा साधनेच्या दृष्टीकोनातून उपयोग करता येईल.

 

१. व्यावहारिक जीवनातील व्यक्तीचेही कल्याण व्हावे,
असा विचार करणारी जगद्गुरु माऊली प.पू. डॉक्टर !

१ अ. भिंतीला फळी ठोकण्यासाठी बाहेरून सुतार येणे आणि
त्याने फळी ठोकतांना प.पू. डॉक्टरांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे

एकदा शीव येथे साहित्य ठेवण्यासाठी भिंतीला लाकडाची फळी ठोकायची होती. त्यासाठी एका साधकाच्या सुतारकाम करणार्‍या मित्राला बोलावले होते. तो भिंतीला फळी ठोकत असतांना प.पू. डॉक्टर मधे-मधे येऊन त्याला काही सूचना देत होते, भिंतीत खिळा मोठा मारा म्हणजे फळीला वजन पेलवेल. तो त्या सूचनेचा विचार न करता प.पू. डॉक्टरांना इंग्रजीमधे डोन्ट वरी, बी हॅपी असे म्हणाला. त्या वेळी आम्ही त्याला हळूच कानात सांगितले, अरे, त्यांच्याशी असे काही बोलू नकोस. ते सांगतात तसे कर. असे सांगितल्यानंतरही त्याचे ते पालूपद चालूच होते.

१ आ. फळी बसवून झाल्यावर तिच्यावर साहित्य ठेवल्यावर फळी खिळ्यांसहीत उखडून येणे

प.पू. डॉक्टर न रागवता त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते. जणू त्यांना पुढे घडणार्‍या घटनेची कल्पना होती. फळी ठोकून झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्या फळीवर साधकांना साहित्य ठेवण्यास सांगितले. दोन साधकांनी फळीवर सामान ठेवायला घेतले. अन्य साधक इतर सेवा करण्यासाठी निघून गेले. फळीवर दोन-तीन खोके ठेवल्यानंतर कर्रर्रऽऽ असा आवाज झाला आणि काय होत आहे, हे कळायच्या आत धडाम् असा मोठा आवाज झाला. आम्ही सेवा करत असलेले आजूबाजूचे सर्व साधक जमा झालो आणि पाहिले, तर ती फळी भिंतीतून खिळ्यासकट उखडून खाली सेवा करणार्‍या साधकाच्या अंगावर पडली होती.

१ इ. प.पू. डॉक्टरांनी सुताराकडे पाहून हसणे आणि त्याला त्याच्याच शब्दांत सांगणे

आम्ही त्या साधकाच्या अंगावर पडलेले सामान पटापट बाजूला काढून त्याला बाहेर काढले. आवाज ऐकून प.पू. डॉक्टरही तेथे आले आणि नेहमीप्रमाणे विचारले, हं काय झालं ?, कसला आवाज आला ? आम्ही म्हणालो, फळीवर सामान ठेवल्यावर भिंतीतून खिळा उखडून फळी बाहेर आली आणि साधकाच्या अंगावर पडली. त्यांनी विचारले, लागलं नाही ना ? आम्ही नाही म्हणालो. मग ते त्या सुताराकडे बघत म्हणाले, डोन्ट वरी. बी हॅपी असे म्हणून मोठ्याने हसायला लागले. त्या बिचार्‍या सुताराचा तोंडवळा बघण्यासारखा झाला होता.

१ ई. सुतारालाही साधनेचा दृष्टीकोन देणे

त्यानंतर सुताराने प.पू. डॉक्टरांच्या सूचनेचे तंतोतंत पालन करत फळी लावली आणि मग आम्ही ते सर्व सामान तिच्यावर ठेवले. सेवा पूर्ण झाल्यावर त्या सुताराला प्रसाद देतांना प.पू. डॉक्टर म्हणाले, कोणी सूचना केल्या, तर ऐकायला पाहिजे, नाहीतर काय होते, ते पाहिले ना ! आमच्याकडे (अध्यात्मात) विचारत विचारत करण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे स्वतःच्या मनाने करण्याची पद्धत आहे. कोणी सांगितलं, तर ऐकत चला, म्हणजे पुढे कधीतरी साधना चालू कराल, तेव्हा त्याचा लाभ होईल. यावरून प.पू. डॉक्टरांना गुरुमाऊली का म्हणतात ? ते कळले. त्यांच्या सहवासात साधक येवो अथवा सिद्ध पुरुष किंवा सर्वसामान्य माणूस, ते त्याच्या उद्धारासाठी त्याला मार्गदर्शन अवश्य करतात आणि त्याचे जन्माचे कल्याण करतात. संत किंवा गुरु जे काही सांगतात, ते ऐकून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञापालन करणे महत्त्वाचे असते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती न केल्यास सुतारासारखी स्थिती होते.

 

२. साधक वस्तूस्थिती लपवत आहे, हे
सर्वांच्या लक्षात आणून देत साधकांना सतर्कता शिकवणे

२ अ. नोकरी करून सेवेला येणार्‍या साधकाने बाहेरून खाऊन येणे; पण तसे खाऊन
आल्याचे न सांगणे आणि तो साधक काही न खाता सेवा करत असल्याचे पाहून प.पू. डॉक्टरांनी कौतुक करणे

एक साधक नोकरी करून संध्याकाळी सेवा करायचा. आल्यावर तो प.पू. डॉक्टरांकडे काय सेवा करू ? असे विचारण्यासाठी जायचा, त्या वेळी प.पू. डॉक्टर त्याला प्रथम काहीतरी खायला देत असत. दिवसभर काम करून आला आहे. दमला असेल आणि भूकही लागली असेल, असा त्यांचा विचार असे. तो साधक काही न सांगता त्यांनी दिलेेले खात असे. कधी-कधी अगोदरच पोट भरल्यामुळे तो काही न खाताच सेवेला बसत असे. त्या वेळी प.पू. डॉक्टर त्याचे कौतुक करून सर्वांना सांगत, बघा, कामावरून येऊन काही न खाता सेवा करतो. त्याच्यात किती तळमळ आहे.

२ आ. साधक सेवेला येण्याआधी पाणीपुरी खात असल्याचे
प.पू. डॉक्टरांनी गच्चीतून पहाणे आणि इतर साधकांनाही ते पहाण्यासाठी गच्चीत बोलावणे

एकदा प.पू. डॉक्टर त्यांच्या खोलीच्या गच्चीत सहज उभे होते. संध्याकाळची वेळ होती. सहज आजूबाजूचा परिसर ते न्याहळत होते आणि त्यांना तो साधक येतांना दिसला. ते त्याच्याकडे पहात होते; परंतु त्याला माहीत नव्हते की, प.पू. डॉक्टर त्याच्याकडे पहात आहेत. तो चालत आला आणि पाणीपुरीच्या दुकानाजवळ थांबला अन् पाणीपुरी खाऊ लागला. तोपर्यंत इकडे प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना हाका मारून गोळा केले आणि त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाले, बघा बघा, तो पहा, कसा पाणीपुरी खातोय आणि आपल्याला वाटत होतं की, काही न खाता सेवा करतो, आता कळलं ! त्यानंतर तो साधक सेवेसाठी आला. त्या दिवशी प.पू. डॉक्टर त्याला काही म्हणाले नाहीत. तो सेवेला बसला आणि सेवा पूर्ण केली. दुसर्‍या दिवशी परत तो सेवेसाठी आला आणि प.पू. डॉक्टरांकडे सेवा मागायला गेला. त्यांनी त्याला सेवा दिली आणि म्हणाले, खाऊन आला असशील. सेवेला लाग. संत आणि गुरु त्रिकालदर्शी असतात. त्यांना निर्मळ मन असणारा, सत्य बोलणारा आवडतो. लपून काही केल्यास त्यांच्यापासून ते कधीच लपून राहू शकत नाही. यासाठी जे आहे, ते प्रांजळपणे त्यांना सांगावे, अन्यथा आपणच आपल्या साधनेची हानी करून घेऊ.

 

३. विश्रांती घेत नसल्याचे वाटून प.पू. डॉक्टरांनी साधकाचे कौतुक करणे

एक साधक प्रत्येक वेळी प.पू. डॉक्टर दुपारच्या वेळी विश्रांती घ्यायला गेल्यानंतर झोपायला जायचा आणि ते उठून यायच्या आत तो येऊन सेवा करायला बसायचा. त्यामुळे प.पू. डॉक्टरांना वाटायचे, हा रात्री न झोपता सेवा करतो आणि दुपारीही विश्रांती घेत नाही. त्यामुळे त्यांना कौतुक वाटे आणि ते इतरांनाही त्याविषयी सांगत. एकदा ते दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी गेल्यावर हा साधक झोपण्यासाठी गेला. १० मिनिटांनी प.पू. डॉक्टरांना ग्रंथातील एक सूत्र सुचले; म्हणून ते त्याला सांगण्यासाठी बाहेर आले. त्या वेळी तो साधक झोपायला गेला आहे, असे त्यांना कळले. ते म्हणाले, हा नेहमी मी झोपायला गेल्यावर झोपायला जातो का ? आम्ही हो म्हणालो. नंतर ते काही बोलले नाहीत.

दुसर्‍या दिवशी तातडीची सेवा असल्याने प.पू. डॉक्टरांची दुपारची विश्रांतीची वेळ टळून गेली. ते विश्रांतीसाठी कधी जातील, याची वाट पहात तो साधक सेवा करत राहिला. त्याला झोप अनावर झाल्याने तो जांभया देऊ लागला. हे पाहून प.पू. डॉक्टर त्याला म्हणाले, मी आज विश्रांती घेणार नाही. मी जायची वाट पाहू नकोस. तू झोप. हे ऐकून तो साधक खजील झाला आणि विश्रांतीसाठी निघून गेला.

संत आणि गुरु यांच्याकडे दिखाऊपणा कधी टिकत नाही. एक ना एक दिवस लबाडी पकडली जाऊन वरील साधकाप्रमाणे खजील होऊन संतांच्या आणि गुरूंच्या सेवेस अपात्र ठरू शकतो.

 

४. साधकाला त्याच्या चुकीची जाणीव करून देणे

४ अ. सकाळी लवकर उठण्यासाठी साधकाने गजर लावणे आणि
इतर साधकांना उठून गजर बंद करावा लागल्याने उशिरा झोपणार्‍या साधकांची झोपमोड होणे

एक साधक सकाळी ६ वाजता उठून नोकरीला जायचा. लवकर उठता यावे, यासाठी तो घड्याळाचा गजर लावायचा. सकाळी गजर वाजल्यावर तो स्वतः कधी उठत नसे. त्यामुळे गजर वाजतच रहायचा. आमच्यापैकी कोणीतरी उठून गजर बंद करायचे आणि त्याला उठवायचे. मग परत झोपायचे. असे प्रतिदिन व्हायला लागले. अन्य साधक रात्री उशिरापर्यंत सेवा करत असल्यामुळे त्यांचीही झोपमोड होत असे. ही अडचण प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, मी झोपतो, त्या बाजूच्या खोलीत त्याला झोपायला सांगा; म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. त्याप्रमाणे आम्ही त्या साधकाला सांगितले. त्या रात्री तो त्या खोलीत झोपायला गेला.

४ आ. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या बाजूच्या खोलीत साधकाला
झोपण्यास सांगणे, गजर सलग वाजत राहिल्याने प.पू. डॉक्टरांनी उठून बंद करणे

सकाळी ६ वाजता गजर वाजायला लागला. ५ मिनिटे गजर वाजत होता, तरी तो साधक उठला नाही. शेवटी प.पू. डॉक्टर बाजूच्या खोलीतून उठून आले आणि गजर बंद करून त्याला उठवले. त्यानंतर तो कामावर गेला. परत रात्री तो साधक झोपण्यासाठी त्या खोलीत आल्यावर प.पू. डॉक्टरांनी त्याला विचारले, तू गजर कोणासाठी लावतोस ? स्वतःसाठी कि इतरांसाठी ? तो ऐकून इतरांनी तुला उठवावे यासाठी ? तू असं कर. दुसर्‍या खोलीत झोप.

४ इ. आपल्यामुळे इतर साधकांना त्रास होतो,
ही जाणीव नसल्यामुळे चुकांचे गांभीर्य नसल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

तो एकटा झोपू शकेल, अशी खोली प.पू. डॉक्टरांनी त्याला सांगितली आणि गजराचा आवाज इतरांना त्रास होणार नाही एवढा लहान ठेवायला सांगितला. प्रेमभावाच्या स्तरावर दुसर्‍यांचा विचार करणे हे साधनेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आपल्यामुळे इतर साधकांना त्रास होतो, ही जाणीव नसल्यामुळे होणार्‍या चुकांचे गांभीर्य नाही. त्यामुळे परत-परत तीच चूक होत आहे आणि यामुळे साधनेचीही हानी होते, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. तसेच परत असे होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगितली.

साधक झोपलेले असतांना दरवाज्याचा आवाज करणे, आवाज होणार्‍या प्लास्टिकच्या पिशवीतील सामान आवाज करून काढणे अशा कृतींमुळे साधकांची झोपमोड होते. वरील कृतींवरून साधकामधे प्रेमभावाचा अभाव आणि दुसर्‍यांचा विचार करण्याची वृत्ती नसणे हे दोष आढळून येतात. आपल्याकडूनही अशा कृती होऊ नये, यासाठी आपण सतर्क राहिले पाहिजे. असे केल्यास आपल्यामधे प्रेमभाव निर्माण होण्यास साहाय्य होईल आणि दुसर्‍यांचा विचार करण्याची वृत्ती निर्माण होईल. अन्यथा वरील साधकाप्रमाणे आपली स्थिती होऊन साधनेची हानी होऊ शकते.

– श्री. दिनेश शिंदे, रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (११.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात