स्वामी वरदानंद भारती यांचे विचारधन !

swami_varadanand_bharati_clrस्वामी वरदानंद भारती यांचे पूर्वाश्रमीचे नाव अनंत दामोदर आठवले. वर्ष १९९१ मध्ये त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि स्वामी वरदानंद भारती हे नाव धारण केले. राष्ट्र, धर्म, अध्यात्म आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

श्रावण कृष्ण पक्ष त्रयोदशीला असणार्‍या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साप्ताहिक पंढरी प्रहारच्या स्वामी वरदानंद भारती विशेषांकातील (संपादक : भागवताचार्य श्री. वा.ना. उत्पात, एप्रिल १९९१) आणि हिंदु धर्म समजून घ्या ! या पुण्याच्या स्वस्तिश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील विविध विषयांवरील निवडक विचार येथे देत आहोत.

धर्माचरण इष्ट आणि कर्तव्य आहे !

माणसे एक प्रश्‍न नेहमी विचारतात, तो माणूस वाईट वागतो, देवधर्म करत नाही, कुळधर्म-कुळाचार पाळत नाही, भ्रष्ट आहे, तरीही तो मजेत रहातो. आम्ही सर्व काही पाळतो, मग आम्हाला दु:ख का ? हा प्रश्‍न प्राचीन काळापासून विचारला जात आहे. महाभारतात द्रौपदीने धर्मराजाला विचारले आहे, कौरव अधर्माने वागतात,तरी सुख भोगतात, तुम्ही मात्र धर्माचरण करून दु:ख भोगता. धर्माचरणाचे हेच फल का ? त्यावर धर्मराजाने उत्तर दिले, मी व्यापार म्हणून धर्माचरण करीत नाही. धर्माचरण इष्ट आणि कर्तव्य आहे म्हणून करतो !

काही लोकांची प्रकृती चांगली असते. त्यांनी कितीही कुपथ्य केले, तरी त्यांना काहीही होत नाही, ते ठणठणीत असतात. काहींची प्रकृती इतकी नाजूक असते की, त्यांना थोडे अपथ्य झाले तरी आजारपण येते. मग असे म्हणणार का ? वैद्यराज काय हा अन्याय ? तो इतका वाईट वागतो, तरी त्याची प्रकृती चांगली आणि आम्ही इतकी पथ्ये पाळतो, तरी आमची प्रकृती अशी. पाप करून चैनीत रहाणार्‍या लोकांच्या बाबतीत तेच म्हणता येईल. काहींना पापाचे फळ लगेच मिळते, तर काहींना त्यांच्या पुण्यामुळे प्रतिकारशक्ती असल्याने पापाचे फळ उशिरा भोगावे लागते. लहानपणी शरिराला लागलेला मुका मार त्या वेळी त्रास देत नाही; पण ते दुखणे म्हातारपणी उद्भवते. कुत्रा चावल्यावर पुष्कळ वेळा १०-१५ वर्षांनी विकार उद्भवतो. मुरमाचा दगड हातोड्याने लगेच फुटतो. काळा पाषाण खूप वेळाने फुटतो. तसे काही माणसांवर पापाचा परिणाम लगेच, तर काहींवर कालांतराने होतो. न्यायाचा हातोडा दोघांनाही फोडणार आहे !

ईश्‍वराचे अस्तित्व : संतांच्या शब्दांवर विश्‍वास ठेवा !

पृथ्वी ताटलीसारखी गोल आहे, हे कळते; पण पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे, याचा प्रत्यय येत नाही. एवढेच नव्हे, तर इमारती बांधण्यासाठी जे नकाशे काढले जातात, तेही पृथ्वी सपाट असल्याचे गृहीत धरूनच काढले जातात. पृथ्वीचा पृष्ठभाग वक्र मानला, तर काटकोन कधीही सिद्ध होणार नाही. मोठमोठ्या अभियंत्यांच्याही जे उपयोगाचे नाही, ते पृथ्वी चेंडूसारखी गोल आहे, हे ज्ञान प्राथमिक शाळेतील मुलाला वयाच्या आठव्या वर्षी दिले जाते. ते का ? अनुभव नसतांनाही शास्त्रज्ञांवर भरवसा ठेवून मान्य करण्याचा प्रसंग येतो ना ! मग आपल्याला ईश्‍वराचा अनुभव नसतांना ज्यांना अनुभव आहे, अशा संतांवर विश्‍वासून ईश्‍वर आहे असे का मान्य करायचे नाही ?

डार्विन आणि हिंदूंचे शास्त्र !

डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगतो की, विश्‍व एकातून दुसरे अशा क्रमाने उत्क्रांत होत गेले.माकडापासून माणूस विकसित झाला. मग मी विचारतो, जगात माकडे का शिल्लक राहिली ? सर्वांची माणसे का झाली नाहीत ? आपले शास्त्र असे मानते की, ईश्‍वराने हे जग, त्यातील वस्तू, प्राणी एका नंतर एक निर्माण केल्या. त्यामुळे पहिली निर्मिती राहून दुसरी निर्मिती झाली. तरीही ईश्‍वराला समाधान मिळाले नाही;म्हणून त्याने ब्रह्मावलोकधीषण (ब्रह्माकडे पहाणारा, त्याला जाणणारा, कार्यामागचे कारण शोधणारा) असा माणूस निर्माण केला. मग निर्मात्याला संतोष झाला; पण ज्या हेतूसाठी त्याला निर्माण केले, तो ईश्‍वराचा हेतू मानवाने साध्य केला नाही. तो ब्रह्माकडे पहावयाच्या ऐवजी भोगाकडे पाहू लागला !

माणूस अध:पतनाकडे जात आहे !

मानवाचा उत्तरोत्तर विकास होत आहे, असे काही शास्त्रज्ञ सांगतात; पण आपल्या शास्त्राप्रमाणे मानवाचा उत्तरोत्तर अध:पात होत आहे. सत्ययुगात सर्व लोक पुण्यवान होते. धर्माने वागत होते. त्यामुळे राजा नव्हता,कायदे नव्हते, शिक्षा नव्हत्या; पण जे जसे आहे ते सृष्टीत तसे रहात नाही, हा नियम आहे. सत्ययुगात सर्व उपलब्ध होते. खूप संपन्नता होती, त्यावर नियंत्रण राहिले नाही. शरीर लठ्ठ झाले. विकृती निर्माण झाली,थकवा आला. आळस निर्माण झाला. त्यामुळे संग्रह करू लागले. त्यातून लोभ निर्माण झाला. त्यातून इतर विकृती निर्माण झाल्या आणि माणसे अध:पाताकडे गेली. एका रोगातून दुसरा रोग निर्माण व्हावा, तसे एका विकृतीतून दुसरी विकृती निर्माण झाली. तेव्हा मानवाचा उत्तरोत्तर अध:पात होतो आहे, हे कटूसत्य आहे.

स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांचे गुलाम राहिलेले भारतीय !

स्वराज्य मिळण्यापूर्वी आम्ही जेवढे इंग्रजांचे गुलाम होतो, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आज आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत. आमची सभ्यता ही इंग्रजी सभ्यता आहे. आमची विचारसरणी ही इंग्रजी विचारसरणी आहे. आमची निर्णय घेण्याची पद्धत ही इंग्रजी पद्धत आहे.

हिंदूंचा आवश्यकतेपेक्षा अधिक थंडपणा !

आम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक थंड आहोत. या थंडपणाचा राग यावा इतके थंड आहोत; पण हस्ती मिटती नही हमारी म्हणून आशावादी रहाता येते. एखादी गोळी घेतली की, आम्ही उभे राहू शकतो. कार्यक्षम होऊ शकतो; पण हे आजारपण तरी आम्हाला का येते, याचे एकदा तरी निदान झाले पाहिजे ! व्यक्तीला आजारपण येते, हे समजू शकतो; पण ते संस्कृतीला का यावे ? धर्माला का यावे ?

धर्म मोडल्यावर काय होते ?

धर्म असेल, तरच ते राष्ट्र्र सुखी, शांत असते. संघर्षरहित, शांत आणि समाधानी जीवनासाठी धर्म आवश्यक आहे. धर्म हा आचाराचा विषय आहे. बाह्य गोष्टींनी धर्म ठरत नाही. लोक म्हणतात, धर्म मोडल्यावर काय होते? आरोग्याचे नियम मोडल्यावर जे शरिराचे होते; ते धर्म मोडल्यावर समाजाचे होते. आरोग्याचे नियम मोडल्यावर शरिरात रोग निर्माण होतात. धर्म मोडल्यावर समाजात भ्रष्टाचार, अनीती, गुन्हे इत्यादी रोग निर्माण होतात.

पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे झालेली हानी !

शिक्षणात पालट झाला पाहिजे, असे सर्वजण म्हणतात; पण ११ वी, १२ वी महाविद्यालयाला जोडायचे कि शाळेला एवढाच केवळ पालट होतो. आपल्याला समृद्ध असा शैक्षणिक वारसा मिळाला आहे; पण तो आपण घेत नाही. मोहरा पुरलेल्या जागेवर बसून भीक मागणार्‍या प्रमाणे आपण करंटे आहोत. पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत सुश्रुतासारखे शल्यविशारद निर्माण झाले. मीनाक्षी मंदिर, अबूच्या पर्वतावरील भीलवाडा मंदिर बांधणारे कारागीर निर्माण झाले. अत्यंत तलम कापड निर्माण करणारे विणकर निर्माण झाले. त्या शिक्षण पद्धतीचा अंतर्मुख होऊन आम्ही विचार करणार आहोत कि नाही ? आता एक इंजिनियर किंवा डॉक्टर तयार करण्यास सरकारला लाखो रुपये व्यय (खर्च) येतो. पूर्वी हेच शिक्षण परंपरागत पद्धतीने फुकट मिळत असे;पण पाश्‍चात्य शिक्षणपद्धतीमुळे आपण आपली चांगली शिक्षणपद्धत नष्ट केली. आधुनिक शिक्षण घेतलेल्या एकातरी विद्यार्थ्याने मीनाक्षीसारखे मंदिर बांधले आहे काय? असे प्रत्येक शास्त्राविषयी म्हणता येईल; म्हणून प्राचीन शिक्षणपद्धतीवर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

संस्कृतमध्ये कुलूप या अर्थी शब्द नाही !

या देशात प्राचीन काळी लोक अत्यंत प्रामाणिक होते. चीनमधून आलेल्या प्रवाशांनी लिहिले आहे की, लोक घराला कुलपे लावत नाहीत, चोरी होत नाही, रघुराजाच्या नगरीवर कुबेराने सुवर्णमुद्रांंचा पाऊस पाडला, तरी कोणीही एक मोहोर उचलली नाही. लक्षावधी शब्द असणार्‍या संस्कृत भाषेत कुलूप याला शब्द नाही. याचा अर्थ चोरी होत नव्हती, म्हणून कुलूप संस्कृती नव्हती. संस्कृतीच्या उच्चतेचा आणखी काय पुरावा पाहिजे ?

रामराज्य का हवे ?

रामराज्यात लोकमताला जी किंमत होती, ती लोकराज्यात (लोकशाहीत) आहे काय ? एका सामान्य परीटाच्या अपवादासाठी रामाने प्राणापेक्षा प्रिय पत्नीचा त्याग केला; पण हल्लीच्या लोकराज्यात भ्रष्टाचाराविषयी आयोग नेमून भ्रष्टाचार सिद्ध झाला, तरी राजकारणी खुर्ची त्याग करीत नाहीत. हा रामराज्य आणि लोकराज्य यांतील भेद आहे.

ईश्‍वराचे पुरावे मागणार्‍यांनी आधी विज्ञानाचे पुरावे द्यावेत !

ईश्‍वराचे पुरावे मागता ? मग विज्ञानाचे पुरावे द्या की, गुरूत्वाकर्षण जर आहे, तर झाड वर का वाढते ?उष्णता प्रसरण करते, शीत संकोच करते, मग शून्य तापमानाखाली पाणी प्रसरण का पावते ? गणितात वजा÷ वजा = अधिक कसे होते ? बिंदूला जर लांबी, रुंदी, उंची, जाडी नाही, तर कागदावर तो कसा काढला जातो ? हे सर्व शास्त्रज्ञ सांगतात; म्हणून आपण त्यावर विश्‍वास ठेवतो, मग ईश्‍वराविषयी संत, आचार्य सांगतात त्यावर विश्‍वास ठेवला तर कुठे बिघडले ?
– स्वामी वरदानंद भारती

हे राष्ट्र हिंदु राष्ट्रच होते आणि आहे !

धर्म आणि राष्ट्र वेगळे नाही. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत.देवाचे पाय धुतांनासुद्धा या राष्ट्र्राला बळ प्राप्त होवो, असा मंत्र आम्ही म्हणतो. मंत्रपुष्पांजलीतसुद्धा समुद्रापर्यंत एक राष्ट्र्र होवो, हीच प्रार्थना असते. धर्माचे सारे मंत्र राष्ट्र्रकल्याणाचेच आहेत. धर्म आणि राष्ट्र पूर्वीही कधी वेगळे नव्हते, आजही नाहीत. केवळ राजसत्ता वेगळी असू शकते. राजसत्ता वेगळी आणि राष्ट्र वेगळे. राजसत्ता कधी मुसलमान होती, कधी ख्रिस्ती होती; पण हे राष्ट्र मात्र हिंदु राष्ट्रच होते आणि आहे. – स्वामी वरदानंद भारती

असे अनमोल विचारधन देणार्‍या स्वामी वरदानंद भारती यांना शतशः प्रणाम !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

स्वामी वरदानंद भारती यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री. अनंत दामोदर आठवले असे होते. राष्ट्र, धर्म, अध्यात्म, बुद्धीप्रामाण्यवाद आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आज राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म यांसंबंधी त्यांचे तेजस्वी विचार येथे देत आहोत.

धर्म आणि संस्कृती एकच !

‘संस्कृती हा शब्दच मुळी आपण नवीन निर्माण केला आहे. ‘सिव्हिलायझेशन’ (नागरीकरण) आणि मुख्यतः ‘कल्चर’ (रीतीभाती) यांसाठी तो आपण वापरतो. आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये या अर्थाचा ‘संस्कृती’ हा शब्द नाही. पाश्‍चात्त्यांच्या संपर्कापूर्वी ‘धर्म’ या शब्दानेच आपले सगळे काम पूर्णपणे भागत असे. आपल्या धर्मकल्पनेत तत्त्वज्ञान, विचार, नीती आणि आचार या सर्वांचाच समावेश होतो; म्हणून खरेतर संस्कृती अन् धर्म एकच आहेत.

आजचे विज्ञान म्हणजे तामसी तप !

विध्वंसाकरता विज्ञान म्हणजे राक्षसी तपश्‍चर्या आहे. घोर तपश्‍चर्येच्या बळावर राक्षस उन्मत्त झाले आणि जगाला पीडा देऊ लागले. तसे आजचे विज्ञान राक्षसांच्या हातात गेल्यामुळे जगाच्या नाशाला प्रवृत्त झाले आहे. जगताच्या कल्याणासाठी विज्ञान असेल, तर ते सात्त्विक तप आहे. विलासासाठी अथवा उपभोगासाठी असेल, तर राजस तप आहे, तर विध्वंसासाठी असेल, तर तामस तप आहे.

विषमता निसर्गसिद्ध आहे !

सृष्टीची निर्मिती हा ईश्‍वराचा खेळ आहे आणि खेळात विषमता असल्याशिवाय खेळ होऊच शकत नाही. आपण निर्माण केलेले खेळ पहा, त्यात तरी समानता आहे का ? सर्व पत्त्यांंची किंमत सारखी असते का ? काही डावांत एक्क्याची किंमत सर्वाधिक, तर काही डावांत राजाची, काहीत गुलामाची किंमत सर्वाधिक असते. पत्त्यांंचे आकार, रंग सारे विषम असते, म्हणून तर खेळ होतो. सगळे पत्ते सारखे केले, तर खेळ होत नाही. बुद्धिबळाचा डाव घ्या ! त्यात राजा आहे, प्यादे आहेत, उंट आहे, घोडा आहे. प्रत्येकाची चाल वेगळी. कोणी अडीच घरे चालतो, तर कोणी तिरपा. तेथे काय समानता आहे ? सर्वांच्या वाट्याला सारखे पत्ते येतात का ? खेळात सर्वांचा विजय होतो का ? जो कौशल्याने खेळतो, त्याला पत्तेे वाईट आले, तरी विजय मिळतो. तसेच ईश्‍वराच्या सृष्टीचे आहे. हा ईश्‍वराचा खेळ आहे. इथे कोणी राजा, तर कोणी प्यादे, कोणी राणी, तर कोणी गुलाम अशी विषमता आहे. मानवी जीवनात वाट्याला चांगले पत्ते जरी आले नाही, तरी जो कौशल्याने खेळेल, तो जिंकेल. तेव्हा समता, समानता हे थोतांड आहे. सृष्टी विषमच आहे, हे जाणून कसे वागायचे, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

भारतीय लोकशाहीतील निलाजरेपणा !

कालपर्यंत विरोधी पक्षाचा प्रचारक असलेला, सत्ताधारी पक्षाला सतत शिव्या घालणारा आज ‘कॅबिनेट मिनिस्टर’ होतो. पक्षात घेणाराही निर्लज्ज आणि जाणाराही निर्लज्ज ! लाज नावाची वस्तू उभयपक्षी नाही. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

मस्तकातील आणि हृदयातील ईश्‍वर !

ईश्‍वराचे स्थान हृदयात आणि मस्तकात दोन्ही ठिकाणी आहे. मस्तकातील परमेश्‍वरापाशी योग आणि ज्ञान मार्गाने पोहोचता येते, तर हृदयातील ईश्‍वर कर्म अन् भक्तीने मिळतो; पण योग वा ज्ञान मार्ग फार कठीण ! त्या तुलनेत भक्ती सोपी ! तशी भक्ती फार सोपी नाही. तुकाराम महाराज भक्तीला ‘सुळावरची पोळी’ म्हणतात. भक्तीत उत्कट भाव लागतो. उत्कट भाव हा ईश्‍वराचा दूरभाष क्रमांक आहे; ‘वेव्ह लेंथ’ आहे. ती जुळताच साक्षात्कार होतो !

संदर्भ : साप्ताहिक ‘पंढरी प्रहार’ (एप्रिल १९९१) आणि ‘हिंदु धर्म समजून घ्या !’ हा ग्रंथ