समष्टी जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी करावयाचे सर्वंकष उपाय

या लेखात आपण साधना करून ईश्वरी राज्य स्थापन करण्यासाठी समाजाने स्वभावदोष निर्मूलन करणे का आवश्यक आहे, याविषयी जाणून घेऊ.

 

१. स्वतःत आणि समाजात साधकत्व निर्माण करणे

समाजात ईश्वरी राज्य स्थापन करावयाचे झाल्यास आपण प्रथम ईश्वरी राज्याचे नागरिक होण्यासाठी पात्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्रथम स्वतःमध्ये ईश्वरी राज्य निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतः साधना करून स्वतःत साधकत्व निर्माण करावे लागेल. त्यानंतरच्या टप्प्यात समाजात साधकत्व निर्माण करण्यासाठी अध्यात्माबद्दलचे अज्ञान आणि गैरसमज दूर करणे, बुद्धीप्रामाण्यवाद्यांना विज्ञानाच्या मर्यादा समजावून सांगणे, समाजाला अध्यात्माचे, व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व पटवून साधना करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे. हे कार्य यशस्वी होण्यासाठी ईश्वरी अधिष्ठानाची आवश्यकता आहे आणि त्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे.

साधकत्व निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी रज-तमात्मक प्रवृत्तींचे म्हणजेच अहं आणि स्वभावदोष यांचे निर्मूलन करून प्रामाणिकपणा, मुमुक्षूत्व, श्रद्धा, भाव, भक्ती, सातत्य, चिकाटी, उन्नतांच्या आज्ञेचे पालन करणे, त्याग, प्रीती, सेवातत्परता, व्यापकता, नम्रपणा, लीनता, शरणागती, चिंतनशीलता, अंतर्मुखता वगैरे आदर्श गुणांचे संवर्धन केल्यास साधनेने सत्त्वगुण वाढवून समाजातील सर्व घटकांत साधकत्व निर्माण करणे आणि धर्माचरणाने समाजाचे आत्मबल वाढवणे शक्य होईल.

 

२. क्षात्रवृत्ती बाणवणे

राष्ट्र सुखी होण्यासाठी सत्त्वगुणावर आधारलेली आदर्श राज्यप्रणाली किंवा धर्मराज्य स्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतः धर्माचरण करून धर्माचे पालन न करणाऱ्यांना शासन करण्याची क्षमता स्वतःत निर्माण करावी लागते. तिलाच ‘क्षात्रवृत्ती’, असे म्हणतात.

संपत्कालाप्रमाणे आपत्कालात धर्माचरण करण्यासाठी साधकांमध्ये क्षात्रवृत्ती असणे आवश्यक आहे. धर्म आणि राष्ट्र यांच्या हिताच्या आड येणाऱ्या आणि स्वभावदोष बळावण्यास कारणीभूत ठरलेल्या दुर्जन प्रवृत्तीचा समूळ उच्छेद करण्यासाठी, तसेच प्रतिकूल काळात राष्ट्रातील समाजव्यवस्था टिकून रहावी, यासाठी समाजातील सर्वच घटकांनी क्षात्रवृत्ती अंगी बाणवणे आवश्यक आहे. ईश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करतांना

ईश्वराच्या मारक रूपाशी एकरूप होण्यासाठी क्षात्रधर्म साधना करणे आवश्यक आहे. ‘अन्यायाविरुद्ध लढणे’ हा क्षात्रधर्म साधनेतील अविभाज्य घटक आहे. प्रथम स्वतःवर विजय मिळवल्यास नंतर दुर्जनांवर विजय मिळवणे सोपे असते. स्वतःतील स्वभावदोषांविरुद्ध क्षात्रभावाने लढणे आवश्यक ठरते.  मनुष्यत्वाकडून आदर्श अशा साधकत्वाकडे वाटचाल करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी साधना करून स्वतःमधील सत्त्वगुण वाढवणे आणि आदर्श गुणांचा परिपोष करणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नियोजन आणि संघटनकौशल्य, सतर्कता, दक्षता, तत्परता, अन्यायाविरुद्ध चीड, चिकाटी, निर्भीडपणा, संघभावना, व्यापकत्व, धैर्य, शौर्य, पराक्रम, समष्टीसाठी तळमळ आणि विजिगीषू वृत्ती हे गुण समाजातील सर्व घटकांनी अंगी बाणवल्यास भारतियांत क्षात्रवृत्ती बाणवण्यास मदत होईल.

 

३. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ती बाणवणे

राष्ट्राचा मान, गौरव आणि उत्कर्ष वाढवण्यासाठी तन, मन, धन आणि प्रसंगी प्राणही अर्पण करण्याची तयारी असणे, याला ‘राष्ट्राभिमान’ असे म्हणतात.

राष्ट्राबरोबरच आपला धर्म, देवता, चारित्र्य, शौर्य, विद्वत्ता, भाषा, परंपरा आणि संस्कृती यांचाही अभिमान बाळगणे आणि राष्ट्राच्या उत्कर्षासाठी प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असणे आणि राष्ट्राची आणि राष्ट्रबांधवांची सेवा, हेच सर्वस्व मानणे, याला ‘राष्ट्रभक्ती’ असे म्हणतात.

निःस्वार्थी, निर्लोभी, अनासक्त, त्यागी, प्रीती असलेली आणि निर्भीड अशी व्यक्तीच राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते. हे महान कार्य आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीच यशस्वी करू शकते. भारताच्या इतिहासात आद्य शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद यांसाररख्या अध्यात्मवादी पुरुषांनी हे कार्य यशस्वी केल्याचे सर्व ज्ञातच आहे. समाजात हे गुण वाढवण्यासाठी आंतरिक ऐक्य निर्माण करणे गरजेचे आहे. समाजाच्या संघटनाला अध्यात्माचे आणि धर्माचे अधिष्ठान असेल, तर आंतरिक ऐक्य निर्माण होते. समाजातील सर्वच

घटकांनी साधकत्व निर्माण करण्याबरोबरच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ती यांसाठी मारक असलेले आत्मकेंद्रितपणा, स्वार्थीपणा, संकुचितपणा, इतरांचा विचार न करणे, पारख नसणे, निर्णयक्षमतेचा अभाव, आळशीपणा, अप्रामाणिकपणा, विश्वासार्ह नसणे, पराभूत मानसिकता वगैरे स्वभावदाष्ोांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.

राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्ती वृद्धींगत करण्यासाठी प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा, समष्टी भावना, समष्टी तळमळ, संघटनकौशल्य, दूरदृष्टी, पुढाकार घेणे, पारख असणे, योग्य निर्णयक्षमता, जिद्द, चिकाटी, सातत्य, निःस्वार्थीपणा, त्याग, प्रीती वगैरे गुण अंगी बाणवणे आवश्यक आहे.

 

४. आंतरिक ऐक्य-निर्मितीच्या दृष्टीकोनातून
अहं आणि स्वभावदोष यांच्या निर्मूलनाचे महत्त्व

समाजाला धर्माच्या छत्राखाली संघटित करण्याचे प्रयत्न यापूर्वी काही उपासनापंथ, संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या नेत्यांनी केले होते; परंतु त्यांना अल्प प्रमाणातच यश लाभले होते. समाजाला संघटित करून बाह्य परिस्थिती अनुकूल झाली, म्हणजे समाजात आंतरिक ऐक्य निर्माण झाले, असे होत नाही. जेव्हा एखादा मोठा बदल घडवून आणण्यासाठी बाह्य परिस्थिती अनुकूल असते; परंतु माणसाचे मन आणि बुद्धी त्या बदलासाठी तयार झालेले नसतात. त्यामुळे हमखास अपयश येते; म्हणून आंतरिक ऐक्य निर्माण करण्यात येणारा मानवी मन आणि बुद्धी यांचा अडथळा दूर करणे आवश्यक आहे.

सध्या समाज साधना करत नसल्यामुळे समाजाची सात्विकता खूप कमी आहे. मानवी मनाचा विचार केल्यास स्वार्थांधता, संकुचितपणा, आत्मकेंद्रितपणा, दुसऱ्यांचा विचार नसणे, हेवा, मत्सर, द्वेष, अहं, संशयीपणा, गर्विष्ठपणा, घमेंडखोरपणा, भोगलोलुपता वगैरे स्वभावदोष आंतरिक ऐक्य-निर्मितीच्या आड येतात. अहं आणि स्वभावदोष यांचे निर्मूलन आणि गुण-संवर्धन यांमुळे हे स्वभावदोष दूर करून आंतरिक ऐक्य-निर्मितीतील मानवी मनाचा अडथळा दूर करणे शक्य होईल. बुद्धीचा निश्चय झाल्यास बुद्धीचा अडथळाही दूर करणे शक्य आहे. एखाद्या कृतीचे महत्त्व बुद्धीला पटले की, बुद्धीचा निश्चय होतो. अशी निश्चयात्मक बुद्धी विकल्प निर्माण करणाऱ्या विकारी मनावर मात करू शकते. साधनेने सत्त्वगुण वाढवून आणि निश्चयामुळे आंतरिक ऐक्य-निर्मितीतील मानवी बुद्धीचा अडथळा दूर होईल. व्यष्टी साधनेने सत्त्वगुण वाढतो. ‘विश्वबंधूत्व’ ही आंतरिक ऐक्याची परिसीमा आहे. समष्टी साधनेने व्यापकत्व वाढते. सांप्रदायिक ऐक्य साधून धर्मप्रसार (समष्टी साधना) केल्यामुळे विश्वबंधुत्वाकडे वाटचाल करून ईश्वराच्या बृहत्तर रूपाशी (समष्टीशी) एकरूप होता येईल. सांप्रदायिक ऐक्यामुळे संतां-संतांमध्ये भेदभाव करण्याऐवजी त्यांच्याशी जवळीक साधून सर्वच संत आतून एकच असतात, याची अनुभूती सांप्रदायिक आणि हिंदूंचे धार्मिक नेते यांना घेता येईल. ही समाजाच्या आंतरिक ऐक्याची नांदी असेल. विविध उपासनापंथांप्रमाणे साधना करणारे, सांप्रदायिक, हिंदूंचे धार्मिक नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांमध्ये परस्पर प्रेमभाव वाढवून आंतरिक ऐक्य निर्माण झाल्यास ते समाजात निर्माण करणेही शक्य होईल.

 

५. स्वभावदोष-निर्मूलनामुळे मृत्योत्तर होणारे लाभ

अ. उच्च लोकात स्थान मिळणे : एखाद्या लोकात स्थान मिळणे, हे जिवाची समष्टी साधनेतील पातळी आणि देहांची शुद्धी यांवर अवलंबून असते. स्वभावदोष-निर्मूलनाने साधकाच्या व्यष्टी, तसेच समष्टी साधनेतील चुका दूर होऊन समष्टी साधना चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. त्यामुळे मृत्यूनंतर त्याला आध्यात्मिक पातळीनुसार स्वर्गलोकाच्या पुढील उच्च लोकात स्थान मिळते. उच्च लोकात स्थान मिळवण्यासाठी आवश्यक समष्टी गुणांपैकी स्वभावदोष-निर्मूलनास सर्वाधिक महत्त्व आहे.

आ. व्यष्टी आणि समष्टी साधना चांगल्या प्रकारे होऊन सायुज्य मुक्ती मिळणे : मृत्यूनंतर सायुज्य मुक्ती मिळण्यासाठी ईश्वराच्या तारक आणि मारक या दोन्ही रूपांशी एकरूप होण्यासाठी व्यष्टी साधनेबरोबरच जिवाची समष्टी साधनाही परिपूर्ण होणे आवश्यक आहे, स्वभावदोष-निर्मूलनामुळे साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतील अडथळे दूर झाल्यामुळे साधनेतील पूर्णत्वाकडे साधकाची वाटचाल होते. त्यामुळे ईश्वराशी १०० टक्के एकरूप होऊन, म्हणजेच सायुज्य मुक्ती मिळण्यातील अडथळेही दूर होतात.

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ – स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया