स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज आणि त्यांमागील कारणे आणि स्वभावदोषांमुळे व्यक्तीगत जीवनात होणारी हानी यांविषयी तसेच स्वभावदोषांमुळे विविध योगमार्गांत होणारे नुकसान, व्यष्टी आणि समष्टी साधनेत होणारी अपरिमित हानी यांविषयीची विस्तृत माहिती या लेखात दिली आहे.

 

१. स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया

स्वभावदोषांमुळे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवर होणारे दुष्परिणाम टाळून तिला यशस्वी आणि सुखी जीवन जगता यावे, यासाठी तिच्यातील स्वभावदोष दूर करून तिच्या चित्तात गुणांचा संस्कार निर्माण करण्याच्या प्रक्रियेला ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलन प्रक्रिया’, असे म्हणतात.

 

२. स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलचे गैरसमज

अ.स्वभावदोषांचा विचार कशाला करायचा ? : ‘व्यक्ती म्हटले की, तिच्यात गुण आणि दोष दोन्ही येतात. मग आपल्यातील दोषांचा विचार कशाला करायचा, गुणांचाच विचार करूया’, असे काही व्यक्तींना वाटते.

आ.स्वभाव बदलणे शक्य आहे का ? : ‘स्वभावाला औषध नाही. व्यक्तीचा स्वभाव, म्हणजे कुत्र्याचे शेपूट. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले, तरी ते सरळ होत नाही, तसेच एखाद्याचा स्वभाव कसा बदलेल ? मग ‘स्वभावदोषनिर्मूलन प्रक्रिया’ करून काय उपयोग’, असे समाजातील बहुसंख्य व्यक्तींना वाटते.

इ.समाजात चांगली वागणूक असली म्हणजे झाले, त्यासाठी दोष कशाला दूर करायचे ? : स्वभावदोष म्हणजे गुणांप्रमाणे स्वभावाचाच एक घटक असल्यामुळे प्रसंगानुसार ते उफाळून येतातच. त्यामुळे समाजातील व्यक्तींशी वरवर चांगले वागण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी वृत्तीत बदल होत नसल्यामुळे दोष तसेच रहातात. तसेच प्रसंगानुरूप ते कधीतरी उफाळून येतात आणि तणाव वाढवतात; म्हणून त्यांचे संस्कारांसह समूळ उच्चाटन करणेच श्रेयस्कर ठरते.

ई. साधना करतांना स्वभावदोष उफाळून येत नाहीत, तर त्यांच्या निर्मूलनाची आवश्यकता नाही : अशांना ‘साधना’ म्हणजे व्यवहारात अध्यात्म जगणे, हे माहीत नसल्यामुळे स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करावेसे वाटत नाहीत.

उ. नामजप सर्वकाही करण्यास समर्थ असल्यामुळे ‘स्वभावदोषनिर्मूलना’पेक्षा आमचा नामजपावरच अधिक विश्वास आहे : काही साधकांना वाटते; ‘स्वभावदोषनिर्मूलना’पेक्षा आमचा नामजपावरच अधिक विश्वास आहे. त्यामुळे नामजप करणारे कित्येक साधक स्वभावदोषांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या नामजपाची शक्ती मनात येणारे निरर्थक विचार आणि विकल्प दूर करण्यासाठी खर्च होते.

 

३. स्वभावदोष-निर्मूलनाबद्दलच्या गैरसमजांमागील कारणे

अ. अज्ञान : स्वभावदोषांमुळे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत अज्ञान असल्यामुळे स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे ते दूर करण्याची अशा व्यक्तींना आवश्यकता वाटत नाही.

आ. नकारात्मक मानसिकता : ‘स्वभावात बदल होणारच नाही’, असे ठामपणे गृहीत धरल्यामुळे स्वभावदोष-निर्मूलनाचा विचारही होत नाही.

इ. अहंमुळे दोषांचा अस्वीकार : ‘माझ्यात काही स्वभावदोषच नाहीत’, अशी काही जणांची अहंवर आधारित ‘स्व’विषयक भ्रामक समजूत असल्यामुळे त्यांना स्वतःत स्वभावदोष आहेत, हे मान्य होत नाही. त्यामुळे ते दूर करण्यासाठी त्यांना प्रयत्नही करावेसे वाटत नाहीत.

ई. बहिर्मुखता : बहिर्मुखतेमुळे बऱ्याचदा प्रतिकूल प्रसंगात परिस्थिती आणि प्रसंगाशी संबंधित अन्य व्यक्ती यांना दोष दिला जातो. त्या प्रसंगात ‘माझे कुठे चुकले’, असा विचार होत नाही. त्यामुळे स्वतःतील स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, तर सोडाच; पण ते दूर करण्याचा विचारही होत नाही.

उ. दुर्लक्ष : बऱ्याचदा स्वतःतील स्वभावदोष स्वतःला, तसेच इतरांना त्रासदायक ठरत आहेत, हे लक्षात येऊनही स्वबदलास अंतर्मनाकडून होणारा विरोध आणि स्वभावदोष-निर्मूलनाविषयी गांभीर्याचा अभाव यांमुळे स्वभावदोषांकडे दुर्लक्ष केले जाते.

 

४. व्यष्टी जीवन सुखी होण्यासाठी
स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

अ.स्वभावदोषांमुळे व्यावहारिकदृष्ट्या होणारी हानी

  • शारीरिक स्तरावर : स्वभावदोषांमुळे शारीरिक आजारही उद्भवतात. त्यांना ‘मनोकायिक विकार’, असे म्हणतात, उदा. काळजी करणारा स्वभाव असल्यास शरीरातील सर्व संस्थांवर त्याचा दुष्परिणाम होतो आणि त्यामुळे आम्लपित्त, आंत्रव्रण (अल्सर), दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब इत्यादी आजार उद्भवतात.
  • मानसिक आजार होणे : स्वभावदोषांमुळे निराशा, एकाग्रता आणि आत्मविश्वास यांचा अभाव, विस्मरण, उद्ध्वस्त व्यक्तीमत्त्व (स्किझोफ्रेनिया) यांसारखे विविध मानसिक आजार होतात.
  • जीवन तणावग्रस्त होणे : जितके स्वभावदोष जास्त, तितका आपल्या मनावर ताण येतो. विचारचक्रात मनाची ऊर्जा खर्च झाल्यामुळे त्या व्यक्तीला लगेचच थकवा येतो आणि निरुत्साह जाणवतो.
  • व्यसनाधीनता : काळजी करणारा, निराशावादी आणि नकारात्मक दृष्टीकोन असलेला स्वभाव असल्यास त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती सिगारेट, दारू आदी व्यसनांचा आधार घेते. त्यामुळे मनाचे लक्ष तेथे जाऊन तिला तात्पुरते काळजीपासून दूर गेल्यासारखे वाटते. दारूचा अंमल संपल्यावर पुन्हा तणाव जाणवतो आणि त्यानंतर ती पुन्हा दारू पिते. अशा प्रकारे ती व्यक्ती हळूहळू व्यसनाच्या आहारी जाते.
  • स्वभावदोष दूर न करणे, म्हणजे वर्तमान आणि पुढील जन्मांत त्यांचे ओझे वाहणे : स्वभावदोषानुरूप होणारी प्रत्येक अयोग्य कृती मनावरील त्या प्रकारच्या अयोग्य वृत्तीचा अयोग्य संस्कार बळकट करत असते. प्रत्येक जन्मात स्वभावदोषांचे संस्कार दृढ होतात. व्यक्तीने या जन्मातच स्वतःतील स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर या जन्मी जमा झालेल्या व्याजासहित या स्वभावदोषांचे वाढीव ओझे पुढील जन्मी व्यक्तीला वाहावे लागते.
  • स्वभावदोषांमुळे मनावर विवेकबुद्धीचा प्रभाव निर्माण न होणे : दोषानुरूप एखादी अयोग्य कृती किंवा प्रतिक्रिया अयोग्य का आहे, हे बुद्धीने कितीही स्पष्ट झालेले असले, तरी ती अयोग्य कृती व्यक्तीकडून वारंवार होत रहाते आणि अयोग्य प्रतिक्रिया मनात सतत उमटते. म्हणून मनावर स्वभावदोषांचा नव्हे, तर विवेकबुद्धीचा प्रभाव वाढवण्यासाठी स्वभावदोषनिर्मूलन अनिवार्य ठरते.
  • स्वभावदोष अधिक असल्यास आकलनशक्ती आणि विचारप्रक्रिया यांवर प्रतिकूल परिणाम होणे : स्वभावदोष अधिक असल्यास त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या आकलनशक्तीवर पडतो. मनात चालणाऱ्या विचारप्रक्रियेवर स्वभावदोषांचा प्रतिकूल परिणाम होतो. जीवनातील घटनांसंबंधीची विचारप्रक्रिया जितकी स्वभावदोषांच्या अधीन, तितकी ती व्यक्तीला चुकीच्या निष्कर्षाकडे नेते.
  • कौटुंबिक स्तरावर : कुटुंबातील सदस्यांमध्ये असणाऱ्या स्वभावदोषांमुळे त्यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यात अडथळे येतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती रागीट असेल, तर त्या एका व्यक्तीमुळे घरातील संपूर्ण वातावरण तणावग्रस्त बनते आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.
  • सामाजिक स्तरावर : व्यक्तीतील स्वभावदोषांमुळे तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्रास होतो. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे स्वभावदोष समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात.

आ.स्वभावदोषांमुळे आध्यात्मिकदृष्ट्या होणारी हानी

विविध योगमार्गांद्वारे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती साध्य करता येते. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग. ईश्वरप्राप्ती करणे किंवा ईश्वराशी एकरूप होणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय आहे. भगवंताशी एकरूप होण्यासाठी भगवंताच्या गुणधर्मांशी एकरूप व्हावे लागते. ईश्वर दोषरहित, सर्वगुणसंपन्न आणि परिपूर्ण असल्यामुळे साधनेने त्याच्याशी एकरूप होतांना स्वभावदोष- निर्मूलन आणि गुण-संवर्धन करणे अपरिहार्य ठरते.

विविध योगमार्ग आणि त्यांस बाधक ठरणारे स्वभावदोष पुढीलप्रमाणे आहेत.

  • कर्मयोग : आळशीपणा, निष्काळजीपणा, नीतीभ्रष्टता, अपेक्षा असणे, संकुचितपणा वगैरे स्वभावदोष कोणतेही कर्म कौशल्यपूर्ण आणि फलेच्छाविरहित (निष्काम) होण्यास बाधक ठरतात.
  • कर्मकांड : आळशीपणा, कंजूषपणा, अव्यवस्थितपणा, निष्काळजीपणा, वक्तशीरपणा, चिकाटी आणि सातत्य यांचा अभाव; लहरीपणा वगैरे स्वभावदोष वेदशास्त्रोक्त आणि विधिवत षोडषोपचारे पूजन- अर्चन करण्यास बाधक ठरतात.
  • ध्यानयोग : यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या टप्प्यांत आळशीपणा; चिकाटी, सातत्य, एकाग्रता, संयम आणि सहनशीलता यांचा अभाव; निरर्थक विचार करणे वगैरे स्वभावदोष बाधक ठरतात.
  • ज्ञानयोग : ज्ञानयोगात विवेक आणि वैराग्य यांच्या साहाय्याने बुद्धीला सूक्ष्मत्व आणि वृत्तीला साक्षित्व प्राप्त होते. स्वभावदोषांमुळे विवेक आणि वैराग्य निर्माण होण्यात अडथळे येतात.
  • भक्तीयोग : पूर्वग्रहदूषित असणे; संशयीपणा; निरर्थक आणि नकारात्मक विचार करणे; एकाग्रता, एकनिष्ठता, संयम आणि सहनशीलता यांचा अभाव वगैरे स्वभावदोष श्रद्धा, भावआणि भक्ती यांना मारक ठरतात.
  • नामसंकीर्तनयोग : एकाग्रता, सातत्य आणि चिकाटी यांचा अभाव; अतिचिकित्सकपणा वगैरे स्वभावदोष अखंड नामानुसंधानास आणि नामजप दशापराधविरहित होण्यास मारक ठरतात.
  • गुरुकृपायोग : कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी गुरुकृपेशिवाय मोक्षप्राप्ती असंभव आहे. गुरुप्राप्ती होऊन गुरुकृपा सातत्याने टिकून राहण्यास महत्त्व असते. तन, मन, धन, बुद्धी आणि प्राण, म्हणजेच ‘सर्वस्व’ गुरुचरणी अर्पण केल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. कोणताही स्वभावदोष हा गुरुप्राप्तीत अडथळा ठरतो.

५.समष्टी जीवन सुखी होण्यासाठी
स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व

समाजाला साधनेचे महत्त्व पटवून देऊन त्याला साधना करण्यासाङ्गी प्रवृत्त करणे, याला समष्टी साधना म्हणतात. व्यक्ती हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. दैनंदिन आयुष्यात सामाजिक समस्यांमुळे किंवा समाजातील इतर घटकांच्या अयोग्य वर्तनामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक वेळा तणावाची परिस्थिती उद्भवते.व्यक्तीला सुखी जीवन जगायचे असेल, तर व्यष्टी स्तरावर स्वभावदोषांचे निर्मूलन करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच समष्टी स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी समाजातील इतर घटकांच्या अयोग्य वर्तनाला कारणीभूत ठरणाऱ्या स्वभावदोषांचे निर्मूलन करणेही अनिवार्य ठरते. सांप्रतकालीन राज्यव्यवस्थेत आणि समाजरचनेत समाजऋण फेडण्यापेक्षा व्यक्तीस्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांमध्ये संकुचितपणा, स्वार्थीपणा आणि आत्मकेंद्रित वृत्ती बळावली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक समाज आणि राष्ट्र यांच्या कल्याणाचा विचार करण्यापेक्षा स्वतःचे, स्वतःच्या जातीचे आणि वर्गाचे जीवन कसे अधिकाधिक सुखी होईल, यासाठी प्रयत्नरत आहे. नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाल्यामुळे समाजव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. शिक्षणक्षेत्रापासून ते संरक्षणक्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भ्रष्टाचार, सत्तेचा मोह, धनलालसा आणि आरक्षण यांमुळे अयोग्य व्यक्तींच्या हाती सत्ता आल्यामुळे राष्ट्राचे नुकसान होत आहे. राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांच्यातील अहं, षड्रिपू आणि स्वभावदोष यांच्या प्राबल्यामुळे राष्ट्राचे नुकसान होत आहे.

या समस्या सोडवण्यासाठी रज-तमात्मक प्रेरणेऐवजी सत्त्वप्रधान प्रेरणेवर आधारित राज्यप्रणाली स्वीकारणे आवश्यक आहे. अध्यात्म आणि धर्म यांवर आधारलेली भारतीय राज्यप्रणाली व्यष्टी आणि समष्टी या दोहोंमधील सत्त्वगुण वाढवू शकते. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमधील रज-तम गुणांचे निदर्शक असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून समाजाला साधना आणि धर्मपालन करण्यास प्रवृत्त करून समाजाचा सत्त्वगुण वाढवणे आणि समाजघटकांमधील षड्रिपूंवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ – स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया