समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे !

१. अध्यात्मप्रसाराचे कार्य वाढवण्यासाठी
प्रारंभी प.पू. डॉक्टरांनी अध्यात्माविषयी अभ्यासवर्ग घेणे

PP_Dr_2012_nirgun_01jun2014वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. अध्यात्माचे तात्त्विक विवेचन आणि वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती असा अभ्यासवर्गाचा विषय असे. या अभ्यासवर्गात स्वतःकडून आणि शीव गुरुकुलातील साधकांकडून झालेल्या चुका, प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, अभ्यासवर्गात येणार्‍या भाव असलेल्या साधकांच्या साधनेचा आढावा, कुणाचे नाम अल्प पडते ? ते वाढण्यासाठी काय करायला हवे ? सेवावृत्ती, प्रेमभाव वाढण्यासाठी काय करायला हवे ?, असे विविध विषय असत.

२. प्रारंभी साहित्य उपलब्ध नसल्याने
क्वचितच अभ्यासवर्गाचे ध्वनीमुद्रण होणे

श्री. दिनेश शिंदे
श्री. दिनेश शिंदे

 

या काळात संस्थेकडे ध्वनीचित्रीकरणाचे साहित्य उपलब्ध नसल्याने कधी कुणी ध्वनीमुद्रण करून दिले, तर किंवा अन्य काही व्यवस्था होऊ शकली, तरच ध्वनीमुद्रण व्हायचे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे डोंबिवली येथे घेतलेल्या अशाच एका अभ्यासवर्गातील श्री. श्रीकांत पाटील यांनी अभ्यासवर्गाचे चित्रीकरण केले आणि पुढे स्वतःचा व्हिडिओ कॅमेरा संस्थेला अर्पण केला.

३. प.पू. भक्तराज महाराज यांना
प.पू. डॉक्टरांनी अर्जुन आवडत असल्याचे सांगणे अन्
वर्ष १९९६ पासून साधना या विषयावर छोट्या स्वरूपात प्रवचने घेणे

वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या शेवटच्या आजारपणात प.पू. डॉक्टरांनी त्यांची सेवा केली. त्या काळात एकदा ते प.पू. बाबांना (प.पू. भक्तराज महाराजांना) म्हणाले, आता मला तुम्ही शिकवलेले नाम, सत्संग याऐवजी अर्जुन अधिक आवडू लागला आहे. त्यावर प.पू. बाबांनी त्यांना पुढे तुम्हाला आंदोलने करावी लागतील. वैचारिक क्रांती करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्जुन आवडायला लागला आहे, असे सांगितले. या प्रसंगानंतर वर्ष १९९६ पासून प.पू. डॉक्टरांनी साधना या विषयावर गावोगावी छोट्या स्वरूपात प्रवचने घेऊन समाजाला जागृत करण्यास आरंभ केला.

४. प्रत्येक कृतीच्या परिणामांचा अगदी बारीक-
सारीक आणि दूरदर्शीपणे विचार करणारे प.पू. डॉक्टर !

४ अ. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून
त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये,
यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरणे

पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. या १०० प्रवचनांसाठी प.पू. डॉक्टरांनी अवघा एकच झब्बा आणि एकच पॅन्ट वापरली. प्रवचन संपल्यानंतर झब्बा आणि पॅन्ट धुऊन वाळत घालायची अन् दुसर्‍या दिवशी प्रवचनापूर्वी इस्त्री करून परिधान करायची, असा त्यांचा नित्यक्रम असे.

याचे कारण म्हणजे प्रत्येक प्रवचनामध्ये प.पू. डॉक्टरांना साधनेच्या संदर्भात काही नवीन सूत्रे सुचलेली असत. अशा प्रत्येक प्रवचनाचे सुचलेली सर्व नवीन सूत्रे (एकही न सुटता) घेऊन या चित्रीकरणाचे संकलन करायचे होते. याची ध्वनीचित्रचकती बनवून प्रसारासाठी सगळीकडे पाठवायची होती. जर प.पू. डॉक्टरांनी वेगवेगळे कपडे परिधान केले असते, तर सिद्ध होणारी अंतिम ध्वनीचित्रचकती चांगली दिसली नसती; म्हणून त्यांनी सर्वच्या सर्व सभांमधील प्रवचनांसाठी एकच झब्बा आणि एकच पॅन्ट यांचा वापर केला. यातून प.पू. डॉक्टर प्रत्येक कृतीच्या परिणामांचा किती बारीक-सारीक आणि दूरदर्शीपणे विचार करतात, हे लक्षात येते. केवढा हा परिपूर्ण सेवेचा ध्यास आणि त्यासाठी झोकून देण्याची, सर्वकाही त्यागण्याची वृत्ती !

४ आ. चित्रीकरणाच्या दृष्टीने प्रवचन
परिपूर्ण व्हावे, याची तळमळ असणारे प.पू. डॉक्टर !

प.पू. डॉक्टर प्रवचनांच्या चित्रीकरणाच्या दृष्टीने केवळ कपड्यांचाच विचार करून थांबले नाहीत. त्यांनी प्रवचनाच्या वेळी चित्रीकरण करणार्‍या साधकाला काही सांकेतिक खुणा सांगून ठेवलेल्या असायच्या, उदा. बोलतांना ध्वनीवर्धक (माईक) ओठांच्या अगदी जवळ आल्यास अर्धा तोंडवळा झाकला जातो. ते चांगले दिसत नाही. कधीतरी प्रवचन करतांना बोलण्याची गती वाढल्यास ते लक्षात आणून देण्यासाठी हाताने खुणावणेे, प.पू. डॉक्टरांच्या झब्ब्याला सुरकुत्या पडल्यास चित्रीकरण करणार्‍या साधकाने स्वतःचा झब्बा हाताने हलवणे, केस विस्कटल्यास चित्रीकरण करणार्‍या साधकाने स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवणे, या आणि अशा प्रकारच्या नानाविध खाणाखुणा प.पू. डॉक्टर आणि चित्रीकरण करणारा साधक यांच्यामध्ये प्रवचन चालू असतांना होत असत; मात्र श्रोत्यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नसे. तसेच सर्व जाहीर प्रवचनांतील प.पू. डॉक्टरांच्या बोलण्याची गती समानच होती.

४ इ. व्यासपिठावरील प्रचंड उकाड्यातही सलग २ घंटे प्रवचन करणे

या जाहीर प्रवचनांच्या वेळी चित्रीकरणासाठी व्यासपिठावर प्रत्येकी एक सहस्र वॅटचे (१ केव्हीचे) ८ ते १० हॅलोजन लावलेले असायचे. त्यांच्या प्रखर प्रकाशात बसून प.पू. डॉक्टर २ घंटे प्रवचन करायचे. चित्रीकरणातील आवाजाला अडचण येऊ नये; म्हणून पंखा बंद असायचा. एवढा वेळ हॅलोजनमुळे व्यासपिठावर प्रचंड उकडायचे. त्यामुळे प.पू. डॉक्टर घामाघूम झालेले असायचे. अशा वेळी प्रवचनाच्या मध्येच थांबून तोंडवळ्यावरील घाम पुसून आणि पाणी पिऊन पुन्हा पुढचे प्रवचन अन् चित्रीकरण चालू व्हायचे.

जाहीर प्रवचनांच्या चित्रीकरणाचे संकलन करतांना एक महत्त्वाचे सूत्र लक्षात आले. ते म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांच्या तळमळीमुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण जोडल्यानंतर बघणार्‍याला एकाच जाहीर प्रवचनाचे चित्रीकरण पहात आहोत, असे वाटे.

४ ई. संकलनाच्या सेवेतून श्रद्धा वाढवून
परिपूर्ण सेवेचा आनंद देणारे प.पू. डॉक्टर !

पुढे ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेत प.पू. डॉक्टरांच्या प्रवचनांचे ध्वनीमुद्रण अन् त्याचे संकलन होऊ लागले. ध्वनीमुद्रित ध्वनीफितीचे कॅसेट रेकॉर्डरवर संकलन करतांना काही वेळा प.पू. डॉक्टर एखाद्या वाक्यातील शब्द काढायला सांगायचे. मी त्यांना बुद्धीने विचार करून तसे करता येणार नाही, असे सांगायचो. त्यावर प्रयत्न कर, असे प.पू. डॉक्टर सांगायचे. मग तो एकच शब्द काढण्यासाठी ध्वनीफीत शेकडो वेळा मागे-पुढे करावी लागे. शेवटी तो शब्द संकलनात काढला जात असे.

हे करायला ३ – ४ घंटे सहज लागायचे; परंतु तेवढा वेळ सेवेशी एकरूप होऊन जायला व्हायचे आणि स्वतःचा विसर पडत असे. चिकाटीने तो शब्द काढण्याचा प्रयत्न होत असे. शब्द काढल्यावर सेवा परिपूर्ण झाल्याचा आनंद त्यातून मिळत असे आणि यामुळे बुद्धीने विचार करणार्‍या माझी प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धाही वाढत असे.

४ उ. मनावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि थोड्याशा
परिश्रमात कृती करून काटकसर कशी करायची ?, हे कृतीतून शिकवणे

प.पू. डॉक्टरांची प्रवचने मराठी, हिंदी आणि एक-दोन ठिकाणी इंग्रजी भाषेत झाली होती. इतर भाषिकांसाठी इंग्रजी भाषेतही ध्वनीफीत सिद्ध करावी, या उद्देशाने या विषयाचे ध्वनीमुद्रण करायचे ठरले. हे ध्वनीमुद्रण प.पू. डॉक्टरांच्या चिकित्सालयातील एका खोलीत करायचे ठरले.

जाणार्‍या-येणार्‍यांचे, तसेच रस्त्यावरील गाड्यांंचे आवाज यांमुळे दिवसा ध्वनीमुद्रणाला पुष्कळ अडचण येत असे. त्यामुळे ध्वनीमुद्रण दिवसा न करता रात्री ११ च्या पुढे करावे लागे, तरीही मध्ये-मध्ये अनेक आवाज येत असल्यामुळे थांबावे लागे. जवळजवळ २ – ३ घंटे या पद्धतीने ध्वनीमुद्रण चालायचे. ध्वनीमुद्रणात पंख्याचा आवाज येऊ नये; म्हणून पंखाही बंद ठेवत असू. त्यामुळे प.पू. डॉक्टर घामाने ओले चिंब झालेले असायचे. तशाही स्थितीत ते ध्वनीमुद्रण पूर्ण करत असत. इतके करूनच ते थांबत नसत, तर त्यात अपेक्षित असा परिणाम साधला गेला आहे का ?, हे ते स्वतः पडताळून पहात असत.

चिकित्सालयाच्या एका खोलीत शीतयंत्र होते. ही सेवा तेथे करूया का ?, असे विचारल्यावर त्यांनी नको म्हणून सांगितले. ४ ८ फूट खोलीत दोन जण व्यवस्थित बसतील, एवढीच जागा असलेल्या खोलीत करूया, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगातून त्यांनी मनावर नियंत्रण कसे ठेवायचे ? थोड्याशा परिश्रमाने ज्या गोष्टी आपण करू शकतो, तेथे काटकसर कशी करावी ?, याचा उच्च आदर्श आमच्यासमोर ठेवला. त्याचसमवेत अध्यात्म हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे शास्त्र आहे. ते जसे सोपे नाही, तसे कठीणही नाही, हे त्यांनी या उदाहरणातून शिकवले. आजही आश्रमातल्या त्यांच्या खोलीतील शीतयंत्र चालू करूया का ?, असे विचारल्यावर ते नको म्हणून सांगतात.

५. आपल्या ध्वनीफितीचा विषय मनोरंजनासाठी
नसून प्रबोधनासाठी आहे, असे सांगणारे प.पू. डॉक्टर !

काही प्रवचनांचे ध्वनीमुद्रण तांत्रिक अडचणींमुळे चांगले होऊ शकले नव्हते; परंतु त्यामध्ये साधनेच्या संदर्भातील काही चांगली सूत्रे असल्याने ते विक्रीच्या ध्वनीफितीमध्ये घेतले होते. त्यामुळे ध्वनीफितीतील आवाजामध्ये बर्‍याच ठिकाणी चढ-उतार राहिले होते. पुढे आवाजातील या चढ-उतारांमुळे ध्वनीफीत खराब आहे, असे समजून प्रसारातील बर्‍याच जणांकडून तशा तक्रारी यायला लागल्या. काय करायचे ?, असा प्रश्‍न पडला.

यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, आपल्या ध्वनीफिती साधना कशी आणि कोणती करावी ?, याचे मार्गदर्शन करण्यासाठी, म्हणजेच प्रबोधनासाठी आहेत, मनोरंजनासाठी नाहीत. ज्यांना ध्वनीमुद्रण चांगले हवे, त्यांच्यासाठी नाहीत. ज्यांना नको असतील, त्यांचे पैसे परत करा. जे खरे साधक आणि जिज्ञासू आहेत, तेच या ध्वनीफिती घेतील. या प्रवचनांच्या विषयाचे आकलन लोकांना पुढे दहा वर्षांनी होईल.

अशा प्रकारे समाजाच्या उत्थानासाठी प.पू. डॉक्टरांनी प्रवचनांचा यज्ञच केला होता, असे वाटले.
– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात