तांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा !

अन्नावरचा भारतीय संस्कार

Suvinaya_Damle_Hasara_oct2014_col
वैद्य सुविनय दामले

कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना ! तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत रहातील ? एका बाजूने गॅस वाचेल, त्यापेक्षा अधिक रक्कम डॉक्टरांना कायमस्वरूपी द्यावी लागते ! अग्निसंस्कार चुकीचा झाला ना ! कसा ?

आपली भात करण्याची पारंपरिक पद्धत काय आहे ? त्यातील तापमान अभ्यासूया. प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी १०० सेंटीग्रेडला उकळवून घ्यावे. आधीच रोवळीमध्ये धुवून घेतलेले तांदुळ त्यात ओतावे. उकळत्या पाण्यात ८ ते १० मिनिटे तांदुळ शिजवावा. त्यानंतर एक शीत काढून तो आतपर्यंत शिजला आहे, हे पाहून अधिकचे पाणी काढण्यासाठी हा भात चाळणीवर ओतावा. शिजलेले पाणी, म्हणजचे पेज काढून टाकावी आणि भात पुन्हा पातेल्यात ओतून केवळ ५० ते ६० सेंटीग्रेडला १० मिनिटे झाकण टाकून ठेवावा. भात मस्त फुलतो. वेगळी केलेली पेज प्यायची हं. पोषक अंश (आजच्या भाषेत, कार्बोहायड्रेटस्) त्याच्यातच आहेत ना ! आता या पद्धतीच्या भातात, भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील ना ! अग्निचा संस्कार यथायोग्य झाल्याने आणि पाणी काढून टाकल्याने भात पचायला हलका आणि पेजही पचायला हलकी.

तांदळाच्या १६ पट पाणी, ८ पट पाणी, ४ पट पाणी आणि दुप्पट पाणी घालून केलेल्या भाताला अनुक्रमे मंड, पेया, विलेपी आणि ओदन अशी नावे आहेत. म्हणजेच निवळ, पेज, आटवल आणि भात. अशा पेज काढलेल्या भाताने पोट अजिबात सुटत नाही आणि क्लेद वाढवणारा चिकट भाग योग्य वेळी वेगळा केल्याने शरीरातील साखरही वाढत नाही. कोकणात जेवणात भात अधिक प्रमाणात खातात; पण कोणाचे पोट सुटलेले बघितलेले नाही. याउलट कुकरचा भात चालू केल्यापासून पोट सुटायला लागले आहेत आणि रक्तातील साखर देखील वाढायला लागली असल्याचे दिसू लागले आहे. आता सांगा, कुकरच्या भातात आणि पेज काढून केलेल्या भातात भूमी-आकाशाएवढा भेद असेल कि नाही ? हा आहे अन्नावरच्या अग्निचा भारतीय संस्कार.

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग (व्हॉटस्-अ‍ॅपवरून साभार)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात