शरिराला मर्दन करण्याची शास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धत आणि मर्दनाचे लाभ !

१. मर्दन करण्याची आवश्यकता

शरिराच्या क्षमतेपलीकडे परिश्रम केल्यास, अचानक आपत्कालीन कृती कराव्या लागल्यास किंवा कृती करतांना ती अयोग्य प्रकारे झाल्यास आपले स्नायू दमतात किंवा आखडल्यासरखे होतात. अशा वेळी त्यांत अशुद्ध द्रव्य निर्माण होते. ते शरिराच्या वाहिन्यांमध्ये पूर्णपणे शोषले जात नाही किंवा हळूहळू शोषले जाते. यामुळे स्नायू दुखू लागतात किंवा जड वाटू लागतात. या स्थितीमध्ये कामे करायला अधिक कष्ट होतात. तसेच दुखण्यामुळे अनेकदा रात्री झोपही लागत नाही. खरे तर ही साचलेली द्रव्ये पुन्हा मूळ प्रवाहात येण्यासाठी रात्री आरामदायी झोप लागणे आवश्यक असते.

मर्दन केल्याने ही अशुद्ध द्रव्ये मूळ प्रवाहात प्रवाहित होण्यास प्रवृत्त केली जातात. असे केल्याने स्नायूंमध्ये साचलेला द्रव्यांचा बराचसा भाग निघून जातो. त्यामुळे दुखणे अल्प होते. शरीर हलके वाटू लागते आणि आराम वाटू लागतो. ही द्रव्ये पुन्हा निर्माण होईपर्यंत थकलेल्या शरिराला झोप लागते आणि निर्माण होणार्‍या द्रव्याची गती अल्प होऊन त्याचे नियमन होते.

२. मर्दन केव्हा करावे ?

अ. अनेक दिवसांपासून अंगाला सूज असणे

आ. स्नायू आखडलेले असणे

इ. स्नायूंवर ताण आलेला असणे

३. मर्दन करण्याचे लाभ

अ. स्नायूंना आराम मिळतो.

आ. मर्दन केलेल्या भागातील अशुद्ध द्रव्ये जाऊन शुद्ध रक्तप्रवाह पुन्हा नेहमीप्रमाणे चालू होतो.

इ. मर्दन केल्यामुळे मोठ्या जखमांची खपली आतील त्वचेला चिकटत नाही. असे झाल्याने जाड खपलीमुळे होणार्‍या वेदना, तसेच सांध्यांच्या हालचालींमध्ये येणारे अडथळे नाहीसे होतात.

ई. झोपण्यापूर्वी मर्दन केल्याने झोप चांगली लागते आणि शारीरिक ताणामुळे निर्माण झालेल्या द्रव्यांचे नियमन होते. आपण कपडे धुतांना त्यातील मळ निघण्यासाठी ते घासतो, आपटतो आणि धुवून झाल्यावर त्यातील पाणी काढण्यासाठी पिळतो किंवा झटकतो. मर्दन करतांना स्नायूंवरही अशीच, कपड्यांप्रमाणेच प्रक्रिया होणे अपेक्षित असते. स्नायू थोडे नाजूक असल्याने रगडून मर्दन न करता हलक्या हाताने मर्दन करावे.

४. मर्दन करण्याच्या योग्य पद्धती

प्रकार १

तर्जनी आणि अंगठा शरिराच्या बाधित भागाभोवती पसरून ठेवावेत. तर्जनी आणि अंगठा यांच्यामधील हाताच्या भागाने (webspace) शरिराच्या बाधित भागावर हळूवार दाब द्यावा. हात शरिराच्या खालच्या भागातून वरच्या भागाकडे न्यावा. असे करतांना हात मध्येच उचलू नये. लादीवर पडलेले पाणी जसे आपण फडक्याने पुढे ढकलतो, त्याप्रमाणे शरिरात साचलेलेे अशुद्ध द्रव्य आपल्याला मर्दन करून लोटायचे, पुढे ढकलायचे आहे, याची जाणीव असावी. हे करतांना द्रव्ये अनेक वेळा बाजूला सरकतात. असे होऊ नये; म्हणून तर्जनी आणि अंगठा शरिराच्या बाधित भागाभोवती पूर्णत: पसरवणे आवश्यक असते. शरिराच्या त्या भागावरून हात फिरवतांना त्याचा दाब सर्वत्र समान असावा.

प्रकार २

हाताच्या अंगठ्याने किंवा अंगठ्याच्या खालील तळहाताच्या फुगीर भागाने (thenar eminence) किंवा करंगळीच्या खालील तळहाताच्या फुगीर भागाने (hypo-thenar eminence) रुग्णाच्या शरिरावर मध्यम ते जास्त दाब देत हात वर्तुळाकार फिरवावा. (घड्याळाच्या किंवा विरुद्ध दिशेने फिरवला, तरी चालेल.) वर्तुळाकार फिरवतच हात न उचलता शरिराच्या भागावर वरच्या वरच्या दिशेने (स्प्रिंगप्रमाणे) न्यावा. हात वर्तुळात फिरवतांना अर्ध्या वर्तुळात अधिक दाब द्यावा, तर उरलेल्या अर्ध्या वर्तुळात दाब अल्प करावा. पूर्ण वर्तुळ दाब देऊनही पहावे. ज्या प्रकाराने रुग्णाला बरे वाटते, त्या प्रकाराने मर्दन करावे.

या प्रकाराने स्नायूंमधील अशुद्ध द्रव्ये तेथून बाहेर काढली जातात. हा प्रकार केल्यावर प्रकार १ पुन्हा करावा. असे केल्याने प्रकार २ केल्यावर जी द्रव्ये बाहेर काढली जातात, ती मूळ प्रवाहात प्रवाहित केली जातात.

५. जखम सुकू लागल्यावर तिची खपली घट्ट होऊन
त्वचेच्या खालील पदरांना चिकटू नये; म्हणून करावयाचे मर्दन

एखादी मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर तेथे टाके घालतात. ते सुकल्यावर त्वचेच्या खालील पदरांना (त्वचेच्या थरांना) ते चिकटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे एखादी मोठी जखम सुकल्यावर तिची खपलीसुद्धा त्वचेच्या खालील पदरांना चिकटू शकते. त्यामुळे संबंधित सांध्यांची हालचाल करतांना अडचण येऊ शकते. असे होऊ नये; म्हणून जखम सुकू लागल्यावर वैद्यकीय समुपदेशन (सल्ला) घेऊन तिच्यावर पुष्कळ हळुवारपणे पुढे दिल्याप्रमाणे मर्दन करावे.

खपलीच्या दोन्ही बाजूंना आपले अंगठे ठेवावेत. अंगठे समोरासमोर न ठेवता एक अंगठा दुसर्‍या अंगठ्यापेक्षा थोडा खाली ठेवावा. एकेका अंगठ्याने मध्यम दाब देऊन खपली एकेका बाजूला न्यावी. असे करतांना केवळ खपली हलत आहे ना, याकडे लक्ष द्यावे. तसे होत नसल्यास, खालच्या दिशेने दाब थोडा अल्प करून आडव्या दिशेने दाब द्यावा. मर्दनापूर्वी शेक घेतल्यास उत्तम. असे केल्याने खपली आतील त्वचेला चिकटत नाही आणि कालांतराने हालचाल करण्यास अडचण येत नाही.

६. मर्दन करतांना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी

अ. मर्दन नेहमी शरिराच्या वरच्या आणि मधल्या दिशेने करावे. बोटांकडून वरील सांध्याच्या दिशेने किंवा शरिराच्या कडेकडून शरिराच्या मध्यभागी असे करावे.

आ. मर्दन छोट्या-छोट्या भागात केल्यास अधिक परिणामकारक होते. पूर्ण पायाला करण्यापेक्षा आधी बोटांना, मग तळव्याला, मग घोट्याकडून गुडघ्याकडे, गुडघ्याकडून खुब्यापर्यंत (जांघेपर्यंत) असे करावे. हाताला मर्दन करतांना आधी

बोटे, मग तळहात, मनगट ते कोपर, कोपर ते खांदा किंवा काख आणि काखेपासून छातीपर्यंत असे करावे.

इ. मर्दन करतांना तेल किंवा पावडर यांचा वापर करू शकतो. औषधी मलमने (क्रीमने) मर्दन करणे शक्यतो टाळावे. तेल किंवा पावडर वापरण्याचा उद्देश हात आणि त्वचा यांमधील घर्षण न्यून करणे, हा असतो. घर्षण न्यून झाल्याने हात त्वचेवर सहज फिरतो आणि रुग्णाला त्याचा त्रासही होत नाही. औषधी तेलाने मर्दन केल्यास त्याचे औषधी परिणामही दिसून येतात.

ई. हातापायांना सूज आली असल्यास मर्दन करतांना तो भाग हृदयाच्या पातळीच्या वर असावा. त्यासाठी तो २-३ उशांवर ठेवू शकतो.

उ. मार लागला असेल किंवा शरिराचा भाग मुरगळला असेल, तर पहिला एक आठवडा मर्दन करू नये. तेल लावायचे असल्यास हलक्या हाताने लावावे.

ऊ. मर्दन करणार्‍याची नखे कापलेली असावीत.

ए. मर्दन करणार्‍या व्यक्तीला, तसेच रुग्णाला कोणतेही संसर्गजन्य, विशेषतः त्वचेचे रोग नसावेत.

ऐ. मर्दन अलगदपणे आणि एका लयीत केल्याने मज्जासंस्था प्रवृत्त होऊन सर्व नसा आरामदायी (relax) होतात. याचा परिणाम म्हणून रुग्णाला झोप येऊ लागते. मर्दन (मॉलीश) करतांना किंवा केल्यानंतर झोप येणे, हे चांगले लक्षण आहे.

– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment