दुष्काळ : महाराष्ट्रासमोरील एक भीषण आव्हान !

पाण्याचे दुर्भिक्ष्य….पाण्यासाठी भटकंती….विहिरी कोरड्याठाक…पाण्याची आगगाडी….हे शब्द महाराष्ट्रवासियांसाठी आता नेहमीचेच झाले आहेत; कारण गेल्या काही मासांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रातील सर्वच जनता अल्प-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. मेरे देश की धरती….मेरे देश की धरती सोना उगले हिरे मोती, या काव्यपंक्ती आता केवळ स्वप्नवतच वाटतील, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. मध्यंतरी शासनाने १५ सहस्र ७४७ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित केले. गेली २ वर्षे अत्यल्प पडलेला पाऊस, वेळीअवेळी होणारी गारपीट आणि वाढती उष्णता यांची परिणती शेवटी दुष्काळात झाली. या दुष्काळाची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक निसर्गनिर्मित आणि दुसरे मानवनिर्मित. निसर्ग आणि मनुष्य हे एकमेकांना खरेतर पूरक असायला हवेत; पण दुर्दैवाने आज मनुष्यच निसर्गाच्या जिवावर या ना त्या प्रकारे उठला आहे, मग ती वृक्षांची अमाप केली जाणारी तोड असो, समुद्राच्या पाण्यावर केले जाणारे बांधकाम असो किंवा या सर्वांच्या मुळाशी असलेले अधर्माचरण असो. हा दुष्काळ माणसाला गिळंकृत करणारा आहे, हे चिंताजनक आहे. याचा मनुष्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

drought01

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

शेतकरी कणा मोडून पडला !

farmer-in-drought

दुष्काळाने असंख्य संकटे समोर मांडून ठेवली आहेत; मात्र याचा सर्वाधिक फटका बसला आहेे, तो अर्थातच शेतकर्‍यांना ! पिकांची झालेली हानी, बेताची आर्थिक परिस्थिती, चाराटंचाई, पाणीटंचाई यांमुळे या दुष्काळाशी दोन हात करतांना हा शेतकरीराजा कोलमडून गेला आहे. पावसानेच दगा दिला, तर आशा तरी कुणाची करायची, या चिंतेत शेतकरी असल्याने त्यांच्यासाठी प्रत्येक क्षण, प्रत्येक वर्षच जणू काही दुष्काळमय झाले आहे. दुष्काळाने त्याचे जीवन उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्याजवळ एकच उपाय उरला आणि तो म्हणजे गळफास लावून आत्महत्या करणे ! वर्ष २०१५ मध्ये राज्यात सहस्रावधी शेतकर्‍यांनी आपले आयुष्य संपवले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो; पण आज हाच कणा मोडून पडू लागला, तर अर्थव्यवस्था तरी कशी काय टिकेल, याचा राज्यकर्त्यांनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का ?

पाणीटंचाईची भीषण समस्या

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण इंग्रजांनी घालून दिलेले कायदेच अमलात आणत असल्याने जल संस्कृतीचा वेगाने र्‍हास होत आहे. माणूस आणि जलस्रोत यांचा एकमेकांशी असलेला संबंधच तुटत आहे. त्यामुळे पावसामुळे धरणे जरी भरली, तरी आवश्यक तेवढे पाणी मिळतच नाही. त्यामुळे कायमच पाणीटंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पूर्वीच्या काळी खेडेगावे अधिक आणि शहरे अल्प असायची; मात्र आता उलट झाले आहे. लोकसंख्येच्या विस्फोटामुळे शहरात ना शुद्ध अन्न, शुद्ध हवा, ना शुद्ध पाणी ! शहरांना सिंचनाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठाही अल्प होत आहे. या सर्वांचाच परिणाम म्हणून भविष्यात भीषण अन्नटंचाईलाही सर्वांनाच सामोरे जावे लागणार आहे. येणारा काळ भयावह असेल, याची काही अंशी तरी कल्पना सध्याच्या दुष्काळावरून करता येईल.

पाण्याविषयी प्राथमिक साधन-साक्षरता हवी !

१०० मिमी पाऊस म्हणजे हेक्टरी १० लाख लिटर. याचा अर्थ अवर्षणप्रवण भागात हेक्टरी ३० ते ५० लाख लिटर पाणी भूमीवर पडते ! या भागातील दर चौ. कि.मी.ची लोकसंख्या घनता विचारात घेतल्यास माणसी १५ ते २५ लाख लिटर पाणी वर्ष २०१४ च्या पावसाळ्यामध्ये मिळाले. एवढे पाणी किमान भरणपोषणांच्या आवश्यकता भागवण्यास नक्कीच पुरेसे आहे. या प्राथमिक साधन-साक्षरतेची आज नितांत आवश्यकता आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन आणि कृती
यांचा ताळमेळ घालून पाणीबचतीचे नियोजन करा !

दुष्काळी जनतेची होणारी ससेहोलपट टळावी, पशू-पक्ष्यांचे हाल होऊ नयेत, तसेच अन्नधान्य तुटवडा भासू नये, यासाठी दुष्काळाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवावा लागेल. पाणी हा विषय विज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन आणि कृती यांच्याशी संबंधित आहे. या सर्वच स्तरांवर प्रयत्न केल्यास दुष्काळासारख्या भीषण समस्येवर काही प्रमाणात मात करता येईल ! यासाठी शासनाने विविध पर्यायांचा अभ्यासपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.
आज जलयुक्त शिवार, जलसंधारण, जलपुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसारखे नवे प्रकल्प राबवले जात आहेत; मात्र याच जोडीला भूगर्भ पातळी वाढवण्यासाठीही सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. आज सर्वत्र केली जाणारी वृक्षतोड भूगर्भातील पाण्याची पातळी अल्प करत आहे. वृक्षसंवर्धनानेच खर्‍या अर्थाने भूमातेला आणि पर्यायाने मानवाला पाणी लाभू शकते. यासाठी सर्वांनी वृक्षतोड थांबवून अधिकाधिक झाडे लावण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. विकसित आणि अविकसित खेड्यांमध्ये जलनियंत्रणाच्या दृष्टीने उपाययोजना राबवायला हव्यात. लहान लहान बंधारे बांधणे, नदी-नाले यांतील गाळ काढणे यांकडे लक्ष द्यायला हवे !

शासनाने पाण्याच्या
नियोजनासाठी इतिहासकालीन राजांचा आदर्श घ्यावा !

पर्यावरणीय हानीच्या जोडीलाच पाटबंधारे प्रकल्पांतील अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार लक्षात घेता त्यावर आणखी कितीही पैसे व्यय केले, तरी फार काही साध्य होणार नाही. पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळपासून मुक्त करण्यासाठी शासनाने सिंचन घोटाळे, टँकर लॉबी, पाणी प्रकल्पात केला जाणारा भ्रष्टाचार या प्रकरणांतही तत्परतेने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळ पडायचा; मात्र त्यांनी जनतेसाठी काही तात्पुरत्या सोयी, तर काही कायमस्वरूपीसाठी उपाययोजनाही केल्या. राजर्षि शाहू महाराजांनी २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यात ५ वर्षे भीषण दुष्काळ पडला. त्या वेळी इंग्रज राजवटही होती. असे असतांनाही त्यांनी दीर्घ काळासाठीचे उपाय अमलात आणले. त्यांनी केलेल्या सुधारणा, त्यांची कृती इंग्रजांनाही आवडली. छत्रपती शाहू महाराजांची जलनीती, त्यांची कृती आणि आदर्श आज आणि यापुढेही सूचक समजून कार्य करावे.

संदर्भ : सामाजिक संकेतस्थळे

हे आहे महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाचे विदारक चित्र !

  • पाणीटंचाईच्या अभावी खेड्यापाड्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या वेळी पाण्यावरून झालेल्या वादात एका ठिकाणी चक्क तलवारीच उपसल्या गेल्या. काही ठिकाणी तर पाणी भरायच्या वेळेला पोलिसांना संरक्षणही पुरवावे लागते.
  • पाण्याला मूल्य प्राप्त झाल्याने त्याचीही चोरी होऊ लागली. यामुळे पाण्याच्या टाक्यांनाही कुलुपे लावण्याची वेळ नागरिकांवर ओढवली आहे.
  • अनेक किलोमीटर पायपीट करून पाणी भरावे लागत असल्याने काही महिलांचे गर्भ सरकले आहेत, तर पाणी भरल्याने होणार्‍या शारीरिक त्रासांसाठी अनेकींना प्रतिदिन वेदनाशामक गोळ्या घ्यावा लागत आहेत. त्याच्या दुष्परिणामांमुळे वेगळेच दुखणे चालू झाले आहे.
  • हात धुवायला पाणी नाही, यामुळे काही आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्मही करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
  • पाण्याचा साठाच दिवसेंदिवस अल्प होत नसल्याने अनेकांना मातीमिश्रीत पाणीही नाईलाजास्तव वापरावे लागत आहे.
  • पाण्याच्या अभावी काही गावांमध्ये तर १५-१५ दिवस लोकांना कपडे धुता येत नाही.
  • टँकरही अल्प वेळेसाठी येत असल्याने त्याही वेळी हाणामारी, एकमेकांना ढकलणे असे प्रकारही होतात. लोक एकमेकांच्या जिवावर उठले आहेत.
  • लातूर येथे पाणी भरण्याच्या ठिकाणी हाणामारी होऊ नये, यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश बजावला.
  • दूर अंतरावरून रखरखीत उन्हातून पाणी आणतांना दोन लहान मुलांचा मृत्यू झाला.
  • पाणी मिळावे, यासाठी एकाच कुटुंबातील दोन भावांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाला.
  • पाण्याच्या शोधार्थ जंगलातील श्‍वापदे मनुष्यवस्तीकडे वळू लागली आहेत. त्यामुळेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
  • टँकरमधून येणारे पाणी काही वेळा अत्यंत गढूळ असते.
  • लांबच लांब अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे घागरींच्या लांबच लांब लागलेल्या रांगा सर्वत्र दिसत आहेत.
  • काही जण रात्रीपासून रांगा लावतात, रात्रभर जागरण करतात, तेव्हा सकाळी थोडेसे पाणी मिळते.
  • १ लिटर पाणी पैसे देऊन विकत घेण्याची वेळ लोकांवर आली आहे.
  • काही जण धुणी भांडी करण्यासाठी गटाराचे पाणी वापरतात.
  • मोठ्या प्रमाणात खर्च करून लातूरला रेल्वेने पाणी पाठवण्यात येत आहे. त्यात जनतेचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

लोकहो, दुष्काळाची वाढती तीव्रता पहाता याहीपेक्षा भयानक घटना येत्या काळात घडू शकतात. यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वेळीच साधनेला अन् धर्माचरणाला प्रारंभ करा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात